
Bimal Roy यांनी एक मिनिटाच्या सीनसाठी तब्बल पाच हजार फूट फिल्म वापरली!
हिंदी चित्रपटाच्या सुवर्ण काळातील एक प्रतिभावंत दिग्दर्शक म्हणजे बिमल रॉय. चित्रपटातील प्रत्येक फ्रेम, प्रत्येक शॉट हा परफेक्टच असला पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा आणि त्या पद्धतीने ते कलाकारांकडून काम देखील करून घ्यायचे. त्यामुळेच आज साठ-सत्तर वर्षे झाली तरी ‘दो भीगा जमीन, देवदास, मधुमती, सुजाता, बंदिनी…. या चित्रपटातील प्रत्येक शॉट रसिकांच्या नजरेसमोर आहे. या चित्रपटातील कुठलेही गाणं रेडिओवर ऐकलं तरी डोळ्यापुढे त्या गाण्याचे प्रसंग उभे राहतात इतकी छान दृश्यकलात्मकता विमल रॉय यांच्याकडे होती. यासाठी ते कुठलीही तडजोड करायला तयार नसायचे.(Untold Stories of Bimal Roy)

‘सुजाता’ हा चित्रपट खरंतर भारतातील सामाजिक जीवनातील कलंक असणाऱ्या अस्पृश्यतेबद्दल भाष्य करणारा चित्रपट. पण हा प्रश्न देखील हाताळताना त्यांनी इतक्या सुंदर आणि सुलभ पद्धतीने पडद्यावर मांडला की त्यात कुठेही अनावश्यक आक्रस्ताळी पणा नव्हता. सकारात्मक रीतीने या प्रश्नाकडे त्यांनी बघितले होते आणि या समस्येवर उपाय देण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांना हा त्यातील सामाजिक आशयामुळे सिनेमा खूप आवडला होता. त्यांनी दिग्दर्शक बिमल रोय यांना खास पत्र पाठवून त्यांचे अभिनंदन केले होते. बिमलदा यांच्यासाठी हि मोठी गौरवाची गोष्ट होती.

या सिनेमातील एका शॉट साठी बिमल रॉय यांनी तब्बल ५००० फूट फिल्म वापरली होती! खरंतर त्या काळात फिल्मचा स्टॉक प्रत्येकाकडे खूप लिमिटेड असायचा. असं असताना एका एक मिनिटाच्या सीन साठी त्यांनी तब्बल ५००० फूट फिल्म वापरली होती. याचं कारण एकच होतं परफेक्शन. मनाजोगता शॉट मिळेपर्यंत त्यांचे समाधान होत नसे. त्यांनी मनात योजलेलं दृश्य पडद्यावर आणण्यासाठी ते कुठल्याही प्रकारच्या तडजोडी साठी तयार नसायचे. ‘सुजाता’ या चित्रपटात सुनील दत्त आणि नूतन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. नूतन हिने रंगवलेली ‘सुजाता’ ही एक आश्रित हरिजन मुलगी असते. तर सुनील दत्त यांनी रंगवलेला ‘अधीर’ हा अभिजन वर्गातील तरुण दाखवला आहे. या दोघांची मुग्ध अबोल प्रेम कहानी या चित्रपटाचा प्रमुख गाभा आहे. (Sujata Movie)
================================
हे देखील वाचा: Pyar ka mausam : तुम बिन जाऊं कहां के दुनिया में आके…
=================================
या चित्रपटात एक सीन आहे जिथे सुजाता आपल्या बागेमध्ये झाडांची देखभाल करत असते आणि पाठीमागून अधीर येतो आणि तो तिला हळुवार आवाजात म्हणतो ,” मेरा कुसूर सिर्फ यही है कि मै सिर्फ तुम्हे मिलने यहा आता हूं” सुनील दत्तच्या त्या रोमँटिक शब्दांनी सुजाता आंतर्बाह्य मोहरून जाते. सलज्ज नजरेने ती खाली पाहू लागते. सुनील दत्त च्या त्या वाक्यानंतर तिला लाजून पाठीमागे वळायचे असते. असे करत असताना तिच्या हाताचा स्पर्श बागेतील लाजवंतीच्या झाडाला होतो आणि लाजवंतीची पाने सुजाताच्या स्पर्शाने हळुवार पणे मिटली जातात! दिग्दर्शक बिमल रॉय यांना या सीन मधून दोघांच्या प्रेमाची अव्यक्त भावना दाखवायची होती. पण काही केल्या सुजातासं मागे फिरणं आणि तिच्या हाताच्या स्पर्शाने लाजवंतीच्या पानांनी हळुवार मिटणे हे काही योग्य रीत्या होत नव्हते. यासाठी ते जंग जंग पछाडले होते. (Bollywood News)

परफेक्ट शॉट करीता लागोपाठ दोन दिवस याच सीन चे चित्रीकरण चालू होतं. असं म्हणतात यासाठी तब्बल ५००० फूट फिल्म त्यांनी वापरली.(वाया घालवली!) त्या काळात हा मोठा खर्चिक मामला होता पण बिमल रॉय यांनी परफेक्ट शॉट येण्यासाठी हा खर्च केला. २० मार्च १९५९ या दिवशी प्रदर्शित झालेल्या सुजाता या चित्रपटाची एकूण लांबी ही १४५०० फूट आहे. यावरून लक्षात येते की तब्बल १/३ फिल्म केवळ या एक मिनिटाच्या सीन साठी बिमलदा वापरली हे आश्चर्यच म्हणावे लागेल. (Classic bollywood movies)
===========
हे देखील वाचा : saudagar : अमिताभ-नूतनचा अप्रतिम सिनेमा
===========
आज सुजाता आठवला जातो नूतन च्या आरस्पानी अभिनयासाठी, बिमलदा यांच्या प्रतिभाशाली दिग्दर्शनासाठी आणि सचिनदा यांच्या मेलडीअस संगीतासाठी. जलते है जिसके लिये (तलत) काली घटा छाये (आशा) सून मेरे बंधू रे (सचिनदा) नन्ही कली सोने चली (गीता दत्त) तुम जियो हजारो साल (आशा गीता) हि गाणी सिनेमाची रंगत वाढवणारी होती. कान्स फिल्म फेस्टिवलसाठी हा
सिनेमा पाठवला होता. फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात चार पुरस्कार मिळाले. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘सुजाता’ ला प्राप्त झाला होता.(Indian Cinema)