Ramayana : “काही गोष्टी शब्दांत मांडण्यापलिकडे असतात”;आलिया झाली भावूक!

Ramayana : प्रभू श्रीराम यांच्या जीवनचरित्रावर गाजलेल्या ‘या’ कलाकृती माहित आहेत का?
“स्वये श्री रामप्रभू ऐकती.. कुश लव रामायण गाती….” हे बोल कानांवर पडले की प्रसन्न वाटते. हजारो वर्षांपुर्वीचा इतिहास असणाऱ्या रामायणाचे भक्त आजही प्रभू श्रीराम आणि सीता माता यांचे पुजन भक्तिभावनेने करतात. वाल्मिकी यांनी लिहिलेले ‘रामायण’ गेली अनेक वर्ष आपण विविध माध्यमांतून ऐकत, पाहात आणि जगत आलो आहोत. आजवर हिंदी भाषेत रामायणावर आधारित बऱ्याच कलाकृती तयार झाल्या ज्या आपण जाणतोच. परंतु, हिंदी व्यतिरिक्त तमिळ, तेलुगू, मल्याळम भाषेत ‘रामायणा’वर आधारित चित्रपट अगदी १८व्या शतकात देखील तयार करण्यात आले होते. जाणून घेऊयात अशा काही अजरामर कलाकृतींबद्दल…

अश्मयुगीन काळापासून मनोरंजनाचे विविध प्रकार आपल्याला इतिहासात डोकावल्यास माहित पडतात. नृत्य, चित्र, गीत अशा विविध कलांमधून अनेक पौराणिक कथा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचल्या आहेत. भाषेचा अडसर न येऊ देता चित्र, शिल्प, कोरीव काम अशा विविध कौशल्यांचा वापर करुन रामायण, महाभारत किंवा अन्य पौराणिक कथा आज २१व्या शतकापर्यंत पोहोचल्या आहेत. काळानुरुप मनोरंजनाची माध्यमं उलगडत गेली आणि एका मराठमोळ्या माणसाने चित्रपट या दृकश्राव्य माध्यमाची प्रेक्षकांना ओळख करुन दिली. दादासाहेब फाळके यांनी १९१७ साली ‘रामायणा’वर आधारित हा पहिला मुकपट प्रदर्शित केला. या मुकपटाची खासियत अशी होती की यात प्रभू रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अण्णा साळूंके यांनी सीता मातेची देखील भूमिका साकारली होती. यानंतर दादासाहेब फाळके यांनीच मराठीतील पहिला बोलपट १९३२ साली प्रदर्शित केला होता ज्याचे नाव होते ‘अयोध्येचा राजा’. या चित्रपटात गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे, बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या होत्या.

रामा पादुका पट्टभिषेकम
आता थोडे चित्रपटांच्याच जगात पण आणखी मागच्या काळात जाऊयात. १९३२ साली एकीकडे मराठीतील पहिला बोलपट ‘अयोध्येचा राजा’ दादासाहेब फाळके यांनी ‘प्रभात फिल्म कंपनी’च्या साथीने प्रदर्शित केला होता, तर दुसरीकडे १९३२ साली ‘रामा पादुका पट्टभिषेकम’ हा तेलुगु भाषेतील चित्रपट देखील प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे कथानक हे ज्यावेळी प्रभू श्री राम १४ वर्षांचा वनवास पुर्ण करुन अयोध्येत परतले होते त्यावेळी त्यांच्या पादुकांची पुजा करण्यात आली होती. या प्रसंगाचे चित्रण या चित्रपटात दाखवण्यात आले होते. यात रामाच्या भूमिकेत यादवल्ली सुर्यनारायण आणि सीतेच्या भूमिकेत सुरभि कमलाबाई दिसल्या होत्या.

ट्रॉलीचा वापर करण्यात आलेला पहिला चित्रपट : चंद्रसेना
व्ही शांताराम यांनी अनेक अजरामर कलाकृती मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासासाठी निर्माण करुन ठेवल्या. त्यापैकी १९३५ साली त्यांनी तयार केलेला ‘चंद्रसेना’ हा नाटक चित्रपट एकाचवेळी मराठी आणि हिंदी भाषेत तयार करण्याता आला होता. १९३१ साली व्ही शांताराम आणि धायबर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘चंद्रसेना’ या चित्रपटाचा रिमेक होता. या चित्रपटाची कथा रावणाचा पुत्र इंद्रजित, महिरावणाची पत्नी चंद्रसेना, हनुमान यांच्या भोवती फिरते. ‘चंद्रसेना’ या चित्रपटाची आणखी एक खासियत म्हणजे ट्रॉलीचा वापर करणारा हा पहिला चित्रपट होता. शिवाय यात उडत्या आकृत्या, जादुई बाण आणि अवाढव्य हनुमान देखील दाखवण्यात आला होता.

सीता कल्याणम :तमिळमधील पहिला रंगीत चित्रपट
रामायणातील विविध प्रसंगावर आधारित अनेक चित्रपट खरं तर दिग्गज दिग्दर्शकांनी विविध भाषेत तयार केले होते. ज्यात १९३४ साली सीता स्वयंवरावर आधारित ‘सीता कल्याणम’ हा चित्रपट दिग्दर्शक बाबूराव पेंढारकर आणि के. रामनोथ यांनी दादासाहेब फाळके यांच्या प्रभात फिल्म कंपनीच्या बॅनरखाली प्रदर्शित केला होता. महत्वाची बाब म्हणजे तमिळ चित्रपटसृष्टीतील सीता कल्याणम हा पहिला रंगीत चित्रपट होता. याशिवाय सीता स्वयंवरावर आधारित चित्रपट ओरीसी भाषेत देखील १९३६ साली प्रदर्शित झाला होता. मोहन सुंदर देब गोस्वामी दिग्दर्शित ‘सीता बिबाह’ या चित्रपटात माखनलाल बनर्जी, मोहन सुंदर देब गोस्वामी, कृष्णचंद्र सिंह आणि प्रभावती यांनी भूमिका साकारल्या होत्या. यानंतर तमिळ भाषेतील ‘सेतु बंधनम’ हा चित्रपट १९३७ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन आर. पद्मनाभन यांनी केले होते. ज्यात पीबी रंगाचारी, नॉट अन्नाजी राव, एमडी पार्थसारथी और एमएस मोहनम्बल यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटात प्रभू श्रीराम सीतामातेला रावणाच्या ताब्यातून सोडवण्यासाठी प्रस्थान करत असतात त्यावेळी वानरसेनेच्या मदतीने उभारलेल्या रामसेतुची कथा मांडण्यात आली होती.

१९४३ मध्ये विजय भट्ट यांनी ‘राम राज्य’ चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाची विशेष बाब म्हणजे युएसमध्ये प्रदर्शित झालेला हा पहिला भारतीय चित्रपट होता. प्रेम अदिब आणि शोभना समर्थ यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘राम राज्य’ चित्रपटाने १९४३ साली सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट असे नाव कोरले होते. यानंतर तेलुगू भाषेतील ‘श्री सीता राम जन्मम्’ हा चित्रपट १९४४ साली आणि ‘पादुका पट्टभिषेकम’ १९४५ साली असे दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते. यानंतर १९५८ साली ‘संपुर्ण रामायणम’ हा चित्रपट तमिळ भाषेत प्रदर्शित झाला होता. के. सोमू दिग्दर्शित ‘संपुर्ण रामायणम’ चित्रपट वाल्मिकी यांनी लिहिलेल्या रामायणावर आधारित होता. २६४ दिवस चित्रपटगृहात यशस्वी शो करणारा हा पहिला रौप्य महोत्सवी चित्रपट ठरला होता. यानंतर १९६१ साली दिग्दर्शक बाबूभाई मिस्त्री यांनी हिंदीत ‘संपुर्ण रामायण’ हा चित्रपट साकारला होता.
युएसमध्ये प्रदर्शित झालेला पहिला भारतीय चित्रपट
१९४३ मध्ये विजय भट्ट यांनी ‘राम राज्य’ चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाची विशेष बाब म्हणजे युएसमध्ये प्रदर्शित झालेला हा पहिला भारतीय चित्रपट होता. प्रेम अदिब आणि शोभना समर्थ यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘राम राज्य’ चित्रपटाने १९४३ साली सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट असे नाव कोरले होते. यानंतर तेलुगू भाषेतील ‘श्री सीता राम जन्मम्’ हा चित्रपट १९४४ साली आणि ‘पादुका पट्टभिषेकम’ १९४५ साली असे दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते. यानंतर १९५८ साली ‘संपुर्ण रामायणम’ हा चित्रपट तमिळ भाषेत प्रदर्शित झाला होता. के. सोमू दिग्दर्शित ‘संपुर्ण रामायणम’ चित्रपट वाल्मिकी यांनी लिहिलेल्या रामायणावर आधारित होता. २६४ दिवस चित्रपटगृहात यशस्वी शो करणारा हा पहिला रौप्य महोत्सवी चित्रपट ठरला होता. यानंतर १९६१ साली दिग्दर्शक बाबूभाई मिस्त्री यांनी हिंदीत ‘संपुर्ण रामायण’ हा चित्रपट साकारला होता.

मल्याळम भाषेला रामायणाची भूरळ
१९६० साली ‘सीता’ हा मल्याळम चित्रपट कुंचाको यांनी दिग्दर्शित केला होता. तर १९६२ साली प्रदर्शित झालेला जी.के रामू दिग्दर्शित ‘श्री राम पट्टाभिषेकम’ हा देखील मल्याळम भाषेतील चित्रपट कालांतराने हिंदी भाषेत ‘प्रभू जय श्री राम’ या नावाने डब करण्यात आला होता. तसेच, १९६३ साली प्रदर्शित झालेल्या ‘श्री राम राज्यम’ या तेलुगू भाषेतील चित्रपटाने सात विभागात नंदी पुरस्कार, तीन फिल्म फेअर आणि प्रथम दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील पटकावला होता.

आदर्श ॲनिमेटेड सीरिज
१९९१ साली ‘ब्रह्मर्षि विश्वामित्र’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्यात ज्युनिअर एन.टी.आर यांनी या तेलुगू चित्रपटातून अभिनयाची कारकिर्द सुरु केली होती. ऋषि विश्नमित्र यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन एन.टी. रामा राव यांनी केले होते. रंगीत आणि कृष्णधवल चित्रपटांसोबत हळूहळू ॲनिमेटेड चित्रपटांकडे देखील कल प्रेक्षकांचा आणि दिग्दर्शकांचा वळत चालला होता. आजही जपान आणि भारताने मिळून १९९३ तयार केलेली ‘रामायण: द लीजेंड ऑफ प्रिंस राम’ ही वेब सीरीज ॲनिमेटेड चित्रपटांच्या जगतात आदर्श मानली जाते. या सीरिजमध्ये संस्कृत गीतांचा समावेश प्रामुख्याने करण्यात आला होता. यात रामायणाची संपूर्ण कथा दाखवण्यात आली होती. इंग्रजी भाषेत तयार करण्यात आलेल्या या सीरिजला हिंदी भाषेतही डब करण्यात आले होते.

इंडोनेशियन-ऑस्ट्रियन संगीतमय चित्रपट
याशिवाय २००६ साली ‘ओपेरा जावा’ हा गॅरिन नुग्रोहो यांनी दिग्दर्शित केलेला इंडोनेशियन-ऑस्ट्रियन संगीतमय चित्रपट होता. ज्यात सीता मातेचे अपहरण पारंपारिक शास्त्रीय संगीत, नृत्य आणि ओपेरा यांच्या मिलाफातून दाखवण्यात आले होते. यानंतर २०१२ मध्ये ‘सन ऑफ राम’ हा ॲनिमेटेड चित्रपट आला होता.
================================
हे देखील वाचा: Marathi in Hollywood : हॉलीवूडमधला मराठी तडका!
=================================
चित्रपट, नाटकानंतर मालिका विश्वातही रामायणावर आधारित कलाकृती तयार केल्या गेल्या होत्या. यात १९८७ साली दुरदर्शन वाहिनीवर प्रसारित झालेली ‘रामायण’ ही मालिका अधिक लोकप्रिय आहे. तसेच, ओटीटी वाहिनीवर देखील अनेक मालिका व चित्रपट लहान मुलांसाठी आले असून यात ‘द लेजेंड ऑफ हनुमान’ या ॲनिमेटेड वेब सीरीजची अधिक चर्चा आहे.
-रसिका शिंदे-पॉल