Housefull 5 OTT: थिएटर्सनंतर आता ओटीटीवर झळकणार ‘हाउसफुल 5’; जाणून घ्या, कधी आणि कुठे

Amol Palekar : जब दीप जले आना जब शाम ढले आना…..
अमोल पालेकर , झरीना वहाब आणि विजयेंद्र घाटगे यांना घेवून राजश्री ने १९७५ साली चित्रपट बनविला होता ‘चितचोर’. साधी सोपी काळजाला भिडणारी हि प्रेमकथा बंगाली लेखक सुबोध घोष यांच्या ‘चित्तचकोर’ या कादंबरीवर आधारीत होता. लहान गावातील लोकांची स्वप्ने तशी लहानच असतात. या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी त्यांचा लढा चालू असतो. आयुष्यात बघितलेलं छोटस स्वप्न साकार होण्यासाठी त्यांचा आटापिटा असतो. असली छोटी छोटी गावे त्याकाळात भारतात सर्वत्र पसरलेली होती.खेडेगाव, तिथलं साधं सरळ जीवन, स्पर्धा कुचेष्टा अपमान या विकारांपासून कोसो दूर. इथंच फुलणारी साधी कहाणी. त्यांचे प्रश्न, जगण्याबद्दलची तिथल्या समाजाची असोशी, संस्कृतीशी असलेलं घट्ट नातं , सण वार व्रत वैकल्ये आणि कुटुंबातील परस्परांशी असलेला स्नेह हा राजश्रीचा त्या काळातील हिट फॉर्म्युला होता.

या चित्रपटात हे सारे दाखवत असताना दिग्दर्शक बासू चटर्जी यांनी सरळ साधी कथा देखील किती सुंदरपणे सादर करता येते याचा आदर्श वस्तुपाठच प्रेक्षकांसमोर ठेवला. पितांबर चौधरी (ए के हंगल) गावातील शाळेचे मुख्याध्यापक असतात. आपली पत्नी (दिना पाठक) आणि मुलगी गीता (झरीना वहाब) सोबत राहत असतात. गीता टिपिकल ‘गांव की गोरी’ असते. तिचा संपूर्ण दिवस खोड्या काढण्यात आणि तिच्यापेक्षा कितीतरी लहान मुलांसोबत दंगा मस्ती करण्यात जात असतो. मुलगी वयात आली की तिचे ‘हाथ पिले’ करण्याची घाई पालकांना होते. गीताची मोठी विवाहित बहिण मीरा (रितू कमल) मुंबईत असते. एके दिवशी मीराचे पत्र गावी येते आणि गीताच्या पालकांचा नूर बदलतो. पत्रात मीराने गीताकरीता एक स्थळ सुचविलेले असते. मुलगा इंजिनियर असतो आणि त्याची पोस्टिंग त्याच गावात झालेली असते तो लवकरच त्या गावात येणार असतो. हे स्थळ सोडू नका असा आदेश देखील मीरा कडून आलेला असतो.

गीताच्या आई वडिलांना खूप आनंद होतो.ते गीताला याचा काही थांगपत्ता लागू देत नाहीत. इंजिनियर जावई म्हणून लाभणार या कल्पनेने ते हरखून जातात. त्याला आणायला स्वत: चौधरी स्टेशनवर जातात. त्याची रहायची व्यवस्था सरकारी निवासात केलेली असली तरी त्याला गीताच्या घरून जेवणाचा डबा जात असतो. गीता त्याला रोज भेटत असते. विनोद (अमोल पालेकर) या साऱ्या पाहुणचाराने स्तंभित होतो. गीता रोज त्याला ताजी फुले आणि डबा देत असते. तिचा बालमित्र दीपू (मा. राजू) याच्याशी विनोदची गट्टी जमते. मग रोजच्या भेटीगाठी आणखी मनमोकळ्या होवू लागतात.. विनोद गीताला हार्मोनियम वाजवायला शिकवतो.
कळत नकळत पणे दोघांना एकमेकांचा सहवास आवडू लागतो. आणि मनोमन प्रेम करू लागतात. गावातील निसर्गाला आता प्रीतीचा गुलाबी रंग चढतो. विनोदचा साधेपणा , सर्वांचा आदर करण्याची भावना यामुळे गीताच्या पालकांना भावी जावई भलताच आवडलेला असतो. पण मीराच्या आलेल्या दुसऱ्या एक पत्राने साऱ्याच खेळावर पाणी पडते. त्या पत्रात तिने लिहिलेले असते की ज्या इंजीनियरचा उल्लेख तिने आधीच्या पत्रात केलेला असतो त्याचे आगमन काही कारणाने प्रलंबित झाल्याने आता तो पुढच्या आठवड्यात गावी येतो आहे! मग हा विनोद कोण? सारा खेळ चौपट हो गया.
अखेर ओरीजनल इंजिनियर सुनील (विजयेंद्र घाटगे) चे गावात आगमन होते. विनोद हा सुनीलचा कनिष्ठ सहकारी असतो आणि कामाच्या पूर्व तयारी साठी तो आधी गावात आलेला असतो असा खुलासा होतो. आता गीताच्या आई वडलांचा विनोद कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. आता ते सुनील कडे भावी जावई म्हणून पाहू लागतात.विनोदला ते टाळू लागतात. आणि गीतालाही तोच सल्ला देतात. गीता मात्र पुरती विनोदच्या प्रेमात असते. तिला हे’ switch on ,switch off ‘ पटत नाही. विनोद ला गीताचा निरागस स्वभाव आवडलेला असतो. ‘तू जो मेरे सूर में सूर मिला ले संग गाले ‘ या गीतातून त्यांच्या मनातल्या उत्कट भावना दिसून येतात. यातील शास्त्रीय ‘आरोह’ आणि ‘अवरोह’ त्याची लय दोघातील परस्परांच्या प्रेमाला चांगले अधोरेखित केले आहे.
=============
हे देखील वाचा : Bappi Lahiri : पंचम यांच म्युझिक असलेल्या चित्रपटाला बप्पी लहरी यांच बॅकग्राऊंड म्युझिक !
=============
गीताकरीता विनोदला विसरणे निव्वळ अशक्य असते. मात्र गीताच्या पालकांना इंजिनियर सुनील जावी म्हणून हवा असतो. ते तसे रीतसर प्रपोजल सुनील समोर ठेवतात. लवकरच लग्नाचा साखरपुडा ठरतो. विनोद कटू वास्तवाला सामोरं जात गीताला सुनील सारखा चांगला,हुशार आणि सुंदर नवरा मिळतोय हे पाहून स्वत: बाजूला जातो. ‘हृदयाची’ हाक ऐकायची की आई वडलांच्या भावनांना जपायचे या द्विधा मनस्थितीत गीता असते.विनोद परत गावी जायला निघतो. गीता मात्र आता आपल्या भावनांना आवर नाही घालू शकत. ती धावत पळत स्टेशन वर जाते पण तिला पोचायला खरोखरच उशीर झालेला असतो गाडी तिच्या डोळ्यादेखत निघून गेलेली असते.दु:खी अंतकरणाने ती घरी येते आणि काय आश्चर्य विनोद घरी असतो!!
सुखद धक्का. प्रेक्षकांना आणि गीतालाही. हि किमया असते सुनीलची. विनोद- गीताचे मूक प्रेम तो पाहत असतो पण त्याचा तो अर्थ लावू शकत नसतो. विनोदच्या गावाला जाण्याच्या निर्णयाने गीताच्या जीवाची घालमेल तो बघतो आणि निर्णय घेतो. (बिचाऱ्या विजयेन्द्रला कायम अशा समजूतदार प्रियकराची भूमिका वाट्याला यायची)शेवट अर्थातच गोड. प्रेमाचा विजय होतो. या साध्या प्रेमकथेला बासुदा यांनी छान फुलविले आहे. अमोल पालेकर यांचा ‘रजनी गंधा’, ‘छोटी सी बात‘ या नंतरचा हा ‘चितचोर ’ हा बासू चटर्जी यांच्याकडील सलग तिसरा सिनेमा. या चित्र त्रयीतून अमोलचे हिंदी सिनेमातील स्थान बळकट झाले. झरीना वहाब हिचा हा पहिलाच यशस्वी सिनेमा. ए के हंगल आणि दिना पाठक यांची काहीशी संधीसाधू भूमिका उत्तम . मा राजू ने मजा आणली. चित्रपटाच्या यशात खरा वाटा होता रवींद्र जैन यांच्या गीत संगीताचा. ‘गोरी तेरा गांव बडा प्यारा’,’ आजसे पहले आज से जादा खुशी आज तक नही मिली’,’ जब दीप जले आना जब शाम ढले आना’ आणि ‘तू जो मेरे सूर में’ या येसुदास आणि हेमलता यांनी गायलेल्या सुरील्या गीतांची जादू आजही अबाधित आहे.
==============
हे देखील वाचा : Suresh Wadkar : ‘ही’ गजल गायल्यावर सुरेश वाडकर का अस्वस्थ होते?
==============
हा संपूर्ण चित्रपट अवघ्या २५ दिवसात बासू चटर्जी यांनी पाचगणी आणि महाबळेश्वर इथे सलग चित्रित केला. या चित्रपटातील गीतांकारीता येसुदास आणि बालकलाकार मा. राजू यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. फिल्मफेयर पुरस्कार हेमलता यांना ‘तू जो मेरे सूर मे’ करीता प्राप्त झाला तर उत्कृष्ट चित्रपट,दिग्दर्शक आणि पार्श्व गायक याचे नामांकन मिळाले.या चित्रपटाची जादू संपूर्ण भारतभर पडली. अनेक ठिकाणी चित्रपटाने रौप्य महोत्सव साजरा केला. याचा रीमेक कन्नड, तेलगू, मल्याळम मध्ये बनला. खुद्द राजश्रीने २००३ साली ‘मै प्रेम की दिवानी हूं’ हा चित्रपट चितचोर चा रीमेक बनविला. सुभाष घई यांचा ‘परदेस’ (१९९७) याच स्टोरी लाईनवर बनला होता.