
राष्टीय पुरस्कार सोहळ्यात Vidhu Vinod Chopra यांनी लाल कृष्ण अडवाणींसोबत वाद का घातला होता?
सुरुवातीपासूनच आपल्या अनोख्या दिग्दर्शन कौशल्यामुळे क्लासेस आणि मासेस दोन्हीकडील प्रेक्षक वर्गांना भुरळ घालणारे व्यक्तिमत्व म्हणजे दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा. आजची पिढी त्यांना ट्वेल्थ फेल चे डायरेक्टर म्हणून ओळखते. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘पी के’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘परिंदा’ या सर्व यशस्वी चित्रपटाच्या मागे विधू विनोद चोप्रा होते. पण अगदी सुरुवातीला त्यांच्या एका शॉर्ट फिल्मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता आणि हा पुरस्कार घेण्यासाठी ते दिल्लीला गेले होते. तिथे स्टेजवर त्यांचा वाद झाला होता थेट तत्कालीन माहिती आणि प्रसारण मंत्री लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबत! त्या वेळी स्टेजवर राष्ट्रपती आणि इतर मान्यवर गणमान्य व्यक्ती असताना त्यांच्या देखत हा वाद झाला होता. हा वाद नक्की कशामुळे झाला होता आणि तो कसा मिटला? याची खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे.

अलीकडेच त्यांनी एका यु ट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. विधू विनोद चोप्रा यांनी पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट मधून डायरेक्शनचा कोर्स पूर्ण केला. या काळातच १९७६ साली त्यांनी एक शॉर्ट फिल्म बनवली होती ‘मर्डर ॲट मंकी हिल’. या शॉर्ट फिल्म मध्ये अंजली पैंगणकर,दिलीप धवन यांची प्रमुख भूमिका होती. चोप्रा यांच्या पहिल्याच शॉर्ट फिल्म ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.हा पुरस्कार घेण्यासाठी ते दिल्लीला गेले . त्यावेळी या पुरस्काराचे स्वरूप एक ट्रॉफी आणि चार हजार रुपये असे होते. पुरस्कार सोहळ्यामध्ये जेव्हा चोप्रा यांचे नाव पुकारले गेले तेव्हा ते स्टेजवर गेले. महामहीम राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांच्या हस्ते त्यांनी ट्रॉफी स्वीकारली आणि एक एनवलप स्वीकारला. पुरस्कार घेऊन परत जाताना त्यांनी स्टेजवरच एनवलप उघडून पाहिला आणि स्टेजवर बसलेल्या माहिती आणि प्रसारण मंत्री लालकृष्ण अडवाणी यांच्याशी ते बोलायला लागले!

अडवाणी त्यांना हर तर्हेने उत्तर द्यायचा प्रयत्न करत होते. पण चोप्रा मात्र ऐकून घ्यायला तयार नव्हते. प्रेक्षकांना स्टेजवर नेमके काय चालू आहे कळत नव्हते. जोपर्यंत विधू विनोद चोप्रा खाली उतरत नव्हते ; तोपर्यंत दुसरा पुरस्कार वितरित केला जाऊ शकत नव्हता. शेवटी राष्ट्रपती यांनीच मध्यस्थी केली आणि त्यांनी लालकृष्ण अडवाणी यांना विचारले की “ काही प्रॉब्लेम आहे का ?”त्यावर चोप्रा थेट राष्ट्रपतींना म्हणाले,” मला असे सांगितले गेले होते की चार हजार रुपये कॅश पुरस्कार मिळणार आहे. तो पुरस्कार घेण्यासाठी मी इथे आलो. इथे मात्र मला एनवलप मध्ये एक पोस्टल सर्टिफिकेट दिले आहे. ज्यात सात वर्षानंतर मला डबल पैसे मिळतील. हा काय प्रकार आहे?” राष्ट्रपतींनी लाल कृष्ण आडवाणी यांच्याकडे पाहिले.
=============
हे देखील वाचा : Bappi Lahiri : पंचम यांच म्युझिक असलेल्या चित्रपटाला बप्पी लहरी यांच बॅकग्राऊंड म्युझिक !
=============
अडवाणी चोप्रांना म्हणाले की “तुम्ही उद्या मला माझ्या शास्त्री भवन ऑफिसमध्ये येऊन भेटा. मी बोलतो.” यावर विधू विनोद चोप्रा यांचे काही समाधान झाले नाही. ते सरळ थेट राष्ट्रपतींना म्हणाले,” मला तुमचा फोन नंबर मिळू शकेल का? कारण मी इथे कोणाला ओळखत नाही. उद्या जर यांनी मला पैसे नाही दिले तर मी तुम्हाला फोन करेल!” आता मात्र लालकृष्ण अडवाणी यांनी उभे राहून हात जोडूनच विधू विनोद चोप्रा यांना स्टेजवरून खाली जायला सांगितले. आता सिक्युरिटी सुद्धा आले. दुसऱ्या दिवशी विधू विनोद चोप्रा शास्त्री भवनमध्ये लालकृष्ण अडवाणी यांना भेटायला गेले. तिथे गेल्यानंतर लालकृष्ण अडवाणी चिडून म्हणाले,” मला आता तुमच्या वडिलांचा फोन नंबर द्या. मला त्यांच्याशी बोलायचं आहे. एवढ्या मोठ्या कार्यक्रमात चार हजार रुपयांसाठी असे बोलतात का? राहेच आहे का आपल्या देशाचे भविष्य? काळाचा कार्यक्रम शासकीय होता. तिथे काही नियम असतात. एवढं तुम्हाला समजत नाही? आजची तरुण पिढी अशी असेल तर या देशाचे भवितव्य काय?”.
================================
हे देखील वाचा: Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?
=================================
यावर चोप्रा म्हणाले,” तुम्हाला माझी परिस्थिती माहिती नाही. आमच्या भवितव्याचा एवढा विचार करताय तर आमची बाजू देखील ऐकून घ्यावी लागेल. हा चित्रपट मी कसा बनवला हे माझं मला माहित आहे. अक्षरशः नातेवाईक, मित्रांकडून उधार पैसे घेऊन हा चित्रपट मी बनवला. दिल्लीला पुरस्कार सोहळ्याला येण्यासाठी देखील माझ्याकडे पैसे नव्हते. एका मित्राकडून मी बाराशे रुपये घेतले. त्यातूनच मी रेल्वेचे तिकीट, माझे कपडे खरेदी केले. आता मला त्याचे पैसे परत द्यायचे आहेत. मी विचार केला होता; चार हजार रुपये ते कॅश मिळणार आहे. त्यातून मी लोकांची उधारी पूर्ण देवून टाकेन. आता लोकांना काय सांगू? सात वर्षानंतर माझ्याकडे या. मग पैसे देतो!” चोप्रा बोलताना थरथरत होते. त्यांचा संताप योग्य होता. लालकृष्ण अडवाणी यांना चोप्रा यांच्या भावना लक्षात आल्या. त्यांनी त्याला शांत केले. त्यांच्यासाठी नाश्ता मागवला. आणि लगेच त्यांच्याकडची ती पोस्टल सर्टिफिकेट घेऊन त्यावर सही करून ती रद्द केली. आणि जवळच्या गोल्ड डाक पोस्ट ऑफिसमधून चार हजार रुपये कॅश देण्याची सोय केली! आज विधू विनोद चोप्रा म्हणतात, “तेव्हा माझं वय अवघं पंचवीस होतं. मॅच्युरिटी अजिबात नव्हती. आता वाटतं शुध्द गाढवपणा होता पण भावना सच्च्या होत्या!”