Dadasaheb Phalke यांच्या आधीही मराठी माणसाने चित्रपट तयार केला होता!

कथा कल्पना एकच, चित्रपट मात्र तीन, त्यात Sholay देखिल…
दूरवरच्या एका डोंगरा पलिकडच्या गावाला एका डाकूच्या टोळीने वेठीस धरलयं, गावातील गरीब शेतकऱ्यांनी अतिशय कष्ट व मेहनतीने पिकवलेले धान्य डाकूची टोळी गावात येऊन लुटतेय. त्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात भीती आहे. गावकऱ्यांना जुलमी डाकूंनी अतिशय हैराण केलेय. बंदूकीच्या जोरावर या डाकूची दहशत वाढलीय. आणि अशातच शहरातून आलेला ‘नायक’ (कधी दोन मित्र) या शेतकऱ्यांना विश्वासात घेतो. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करतो. डाकूंना पळवून लावायचे धैर्य त्यांच्यात निर्माण करतो… ही तशी सर्वसाधारण गोष्ट. एव्हाना तुमच्यासमोर सगळं पिक्चर स्पष्ट झाले असेल.

त्याचं काय आहे, पन्नास पंचावन्न वर्षांपूर्वी इंग्लिश चित्रपटातील कथासूत्र (अथवा प्लॉट) घेऊन हिंदी चित्रपट लिहिणे व दिग्दर्शित करणे असे अनेकदा होत असे. एखादा पटकथाकार व दिग्दर्शक त्यात मसालेदार मनोरंजक चित्रपटाचा भरपूर मीठ मसाला तिखट घालून ते वेगळ्या चवीचे व रंगतदार बनवत असे. तर कोणी ‘आपल्या डोक्याला ताप न देता’ मूळ चित्रपटाची ‘कॉपी टू कॉपी’ करत असे. त्यात अधेमधे एखाद्या गाण्याची फोडणी टाकत असे. त्या काळात विदेशी चित्रपट काही विशिष्ट चित्रपटगृहात प्रदर्शित होत (मुंबईत सांगायचे तर दक्षिण मुंबईतील रिगल, स्टर्लिग, इरॉस, न्यू एक्सलसियर, न्यू एम्पायर, मध्य मुंबईतील माहिमचे श्री). आणि प्रचंड टाळ्या शिट्ट्यांनी हिंदी चित्रपट एन्जॉय करताना थिएटर डोक्यावर घेणारा पब्लिक इंग्लिश पिक्चरच्या वाटेला जात नसे.

कधी कधी एकाच विदेशी चित्रपटावर एकाच वेळेस दोन तीन हिंदी चित्रपट बनत असत. अर्थात,आपल्या चित्रपटात काय मांडतोय, काय शिजवतोय हे एकमेकांना माहित असण्याची शक्यता तशी कमी. आणि कोण कशाला अगोदरच सांगेल, अमूकतमूक विदेशी चित्रपटावरुन आपण चित्रपट बनवतोय. ते चित्रपट प्रदर्शित होत गेल्यावर त्यातले काही गोष्टींचे वा दृश्यांचे साम्य चित्र स्पष्ट करीत जात असे की अमूकतमूक विदेशी चित्रपटावर हे दोन, तीन चित्रपट बेतलेत. आणि ही गोष्ट अगोदर स्पष्ट झाली तरी प्रत्येकाला वाटतेच, आपण काही वेगळे बनवतोय. आपण जे पडद्यावर आणतोय ते चित्रपट रसिकांना नक्कीच आवडेल. अकिरा कुरोसावा दिग्दर्शित ‘सेव्हन समुराई’ (१९५४) व जॉन स्टर्जेस दिग्दर्शित ‘मॅग्निफिशन्ट सेव्हन’ (१९६०) या पाश्चात्य देशातील गाजलेल्या चित्रपटातील कथासूत्रवरुन हिंदीत चक्क तीन चित्रपटांचे १९७३ साली साधारण एकाच काळात मुहूर्त झाले. आणि मग ते आपापल्या गतीने/ पध्दतीने पूर्ण होऊन पडद्यावर आले.
================================
हे देखील वाचा: Sholay : स्पर्धेत टिकले कोण? गळपटले कोण
=================================
मध्यवर्ती कथासूत्र काय? क्रूरकर्मा डाकूच्या दहशतवादातून गावाला सोडवणे, गावकऱ्यांना आनंदी करणे. आता यात पटकथाकार व दिग्दर्शक यांचे कसब, कौशल, करामत व कसब की ते ही गोष्ट कशी खुलवतात. निर्माता एन. डी. कोठारी व दिग्दर्शक नरेंद्र बेदी यांनी याच गोष्टीवर निर्माण केलेला ‘खोटे सिक्के’ सर्वप्रथम प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सेन्सॉरने फक्त प्रोढांसाठी असे प्रमाणपत्र दिले. हा चित्रपट २० फेब्रुवारी १९७४ रोजी मुंबईत प्रदर्शित झाला.

या चित्रपटात क्रूरकर्मा डाकू झांगा (अजित) याने आपल्या टोळीसह एका गावाला दहशतखाली ठेवलेले असते. अशातच शहरातून काही मित्र आपल्यातील याच गावातील एका मित्रासोबत सहलीला येतात. त्यांचा सहलीचा मूड असतो. त्यात एक मित्र (सुधीर) चंट असतो. गावातील युवतींशी फ्लर्ट करतो. अशातच एके दिवशी खौफनाक डाकू झांगा आपल्या टोळीसह या गावावर आक्रमण करतो. त्याच्या दडपशाहीला विरोध करणाऱ्यास ते बंदूकीच्या गोळीने खतम करतात. शहरातून सहलीला आलेले युवक हे क्रूर कृत्य पाहून ठरवतात आपण या डाकूंचा पूर्ण खातमा करुनच गाव सोडायचा. आणि मग हे युवक, त्यांनी गावकऱ्यांकडून मिळवलेले सहकार्य आणि झांगा व त्याच्या टोळीचा केलेला बिमोड, म्हणजे या चित्रपटाचा क्लायमॅक्स आहे. चित्रपटात फिरोज खान, अजितसिंग देओल, रणजीत, सुधीर, पेंटल असे काही मित्राच्या भूमिकेत आहे.

रणजीतच्या भेटी वा मुलाखतीचे योग मला येत असतात. या चित्रपटाची आठवण म्हणून रणजीतने मला सांगितले, “गुजरातमधील एका गावात जाऊन एक दीड महिन्याचे चित्रीकरण सत्र केले. ज्या मोठ्या घरात काही कलाकारांची राहायची व्यवस्था केली होती, तेथे दूध विक्री होत होती. रणजीतने महिनाभर संपूर्ण युनिटला रबडी खायला दिली. त्याचे बिल झाले बारा हजार आणि रणजीतला या महिन्याचा मेहनताना मिळाला दहा हजार. पण आपण इतरांना आनंदी ठेवण्यात रस घेतला”, असे रणजीतचे म्हणणे.
तर मुंबईत चांदिवली स्टुडिओत या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण केले. दिग्दर्शक नरेंद्र बेदी हा राजेश खन्नाचा खास मित्र. या चित्रपटाची अगोदर त्यालाच ऑफर होती. त्या काळात तो प्रचंड बिझी असल्यानेच त्याच्या जागी फिरोज खान आला..या चित्रपटात रेहाना सुल्तान ही गांव की छोरी आहे. या चित्रपटातील ‘जीवन मे तू डरना नही’ हे किशोरकुमारने गायलेले आयुष्याच्या तत्वज्ञानावरील गाणे लोकप्रिय ठरले. संगीत राहुल देव बर्मनचे आहे. पिक्चर देमार घेमार असा ढिश्यूम ढिश्यूम मारामारीवाला असल्यानेच गल्ली चित्रपटात मोठ्याच प्रमाणावर दाखवला गेला. मी देखील असाच गल्लीतच एन्जॉय केला.

असाच एक चित्रपट जगदीश शर्मा निर्मित व शिबू मित्रा दिग्दर्शित ‘खून की किमत’. हा चित्रपट मुंबईत ३ मे १९७४ रोजी मुंबईत प्रदर्शित झाला. डाकू ठाकूरसिंग (रुपेशकुमार) व त्याच्या क्रूरकर्मा टोळीने दहशतीखाली असलेले गाव. त्या गावात शहरातून एक युवक (महेंद्र संधु) येतो आणि गावकऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी होतो. एकरुप होतो. आणि डाकूच्या तावडीतून गावाची सुटका करतो. चित्रपटात नीलम मेहरा ही नायिका आहे. हा चित्रपट बेतास बात मनोरंजन करतो. म्हणूनच त्याला रसिकांनी नाकारले. एव्हाना चित्रपटाचे कथासूत्र तुमच्या चांगलेच लक्षात आले असेलच. पटकथाकार सलिम जावेद व दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी त्यात मनोरंजनाचा मसाला खच्चून भरला. मांडणीत फ्लॅशबॅकचा प्रभावी वापर केला.

ठाकूर बलदेवसिंग व गब्बरसिंग यांच्यातील सूडनाट्य, बसंती टांगेवाली, ती व वीरुचे प्रेम प्रकरण, वीरु व जयची मैत्रीची गोष्ट , मौसी, सूरमा भोपाली वगैरे अनेक छोट्या छोट्या व्यक्तीरेखा. मोठाच कॅनव्हास. निर्मितीचे वाढलेले बजेट. मिनर्व्हात सत्तर एमएमचा भव्य दिमाखदार पडदा व स्टीरिओफोनिक साऊंड सिस्टीम असे जे काही रंगवले/ मांडले की चित्रपट पाहताना प्रेक्षक त्यात गुंतत गुंतत जाईल. मिनर्व्हात शोले पाहणे रोमांचक अनुभव असे. मी गिरगावकर असल्यानेच मिनर्व्हात शोले एन्जाॅय करु शकलो. सामर्थ्य आहे मांडणीत असे म्हणतात ते उगीच नाही.
================================
हे देखील वाचा : Shole : ‘शोले’ १९५३ सालीही पडद्यावर आला होता…
=================================
‘शोले’ खणखणीत यशस्वी ठरल्यावर त्याची पुन्हा पुन्हा रिमेक येत राहिली. पण मुळात साधारण एकाच स्टोरी लाईनवर तीन चित्रपट अशा पध्दतीने पडद्यावर आले ही रंजक गोष्ट तुम्हाला सांगायलाच हवी. ‘शोले’ पन्नाशीचे विविध शहरात सेलिब्रेशन होत असतानाच अशा अनेक गोष्टींसह ‘शोले’ची दखल हवीच.’शोले’ ही कधीच न संपणारी गोष्ट आहे हे उगाच म्हटलं जात नाही. एक खास चित्रपट आणि अगणित विषय (अथवा विषयांची मालिका) अशी ही उल्लेखनीय गोष्ट. ‘खोटे सिक्के’ हा चित्रपट फिल्म दीवाने सांगतील की माहित आहे. ‘खून की किमत’ पडद्यावरुन उतरला तोच विस्मरणात गेला. एकाच थीमवरील तीन चित्रपटांच्या तीन तर्हा.