Prarthana Behare आणि Shreyas Talpade पुन्हा झळकणार एकत्र; नव्या प्रोजेक्टची केली घोषणा

Sholay म्हणजेच मिनर्व्हा, मिनर्व्हा म्हणजेच शोले
इटलीतील बलोनियामधील ‘शोले’ चा अतिशय भव्य दिमाखदार प्रीमियरला जवळपास अडीच हजार प्रेक्षक. त्यात साठ टक्के इटालियन, वीस टक्के युरोपियन व वीस टक्के भारतीय. आता टोरॅन्टो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात १८०० आसन क्षमता असलेल्या थॉमसन हॉलमध्ये प्रीमियर. आणखीन काही देशांत असाच हाऊसफुल्ल गर्दीत प्रीमियर…. ‘शोले’ला पन्नास वर्ष पूर्ण निमित्ताने जगभरातील अनेक देशांत त्याचे प्रीमियर रंगत असतानाच आपले मिनर्व्हा चित्रपटगृहदेखिल डोळ्यासमोर येतेय.

मी नेहमीच म्हणतो, आज मिनर्व्हाची इमारत पाडण्यात आली आहे, तरी आजही तेथून जाताना मला रहिमचाचा (ए.के.हनगल) यांचा कापरं भरलेल्या आवाजातील “इतना सन्नाटा क्यू है भाई” हा संवाद ऐकायला येतो. तर कधी गब्बरसिंगची दहशत जाणवते, “कितने आदमी थे…” आपल्या क्रिकेट व सिनेमावेड्या देशात आवडत्या स्टेडियमवर व चित्रपटगृहावरही भरभरुन प्रेम करणारे क्रिकेट फिल्म दीवाने खूप आहेत. चित्रपटगृहाबाबत तर अनेकांची जागाही ठरलेली असे अथवा असते. त्याचीही एक वेगळी परंपरा आणि खासियत आहे. विशेषतः एकपडदा थिएटर अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्स जेव्हा अनेक आठवडे हाऊसफुल्लचा फलक दिमाखात लावत त्या काळात तर ‘आवडता स्टार, आवडते थिएटर ‘ ही तर वेगळी संस्कृती होती आणि अशातच आपल्या अशाच एका आवडत्या पाडलेल्या चित्रपटगृहाच्या जागेच्या व्यवहाराची चक्क जाहिरात येते तेव्हा एकाद्या चित्रपटप्रेमीच्या डोळ्यात चटकन पाणी आल्यास आश्चर्य ते काय?
दक्षिण मध्य मुंबईतील डॉ. भडकमकर मार्गावरील (जुना लॅमिंग्टन रोड) मिनर्व्हा थिएटरबाबत अगदी असेच झाले आहे. काही वर्षांपूर्वीच त्याच्या विक्रीचा विषय ही व्यावहारिक बाजू झाली, पण या वास्तूचे हिंदी तर झालेच पण अगदी एकूणच भारतीय चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीत आपले एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. मूळचे जुने मिनर्व्हा थिएटर पाडून त्या जागी नवीन भव्य इमारत उभी राहिली आणि त्याच्या उदघाटनाच्या वेळेसच त्याला ‘महाराष्ट्राचे गौरवस्थान ‘ म्हटले गेले. तीच त्याची कायमस्वरूपी ओळख झाली.
जुन्या मिनर्व्हातील शेवटचा चित्रपट होता नरेन्द्र बेदी दिग्दर्शित आणि राजेश खन्ना, मुमताज आणि संजीवकुमार अभिनित ‘बंधन’ (१९७०) तर नवीन मिनर्व्हाचा पहिला चित्रपट होता, एफ. सी. मेहरा निर्मित आणि सुशील मुझुमदार दिग्दर्शित ‘लाल पत्थर ‘ ( ३१ मार्च १९७२). राजकुमार, हेमा मालिनी, राखी आणि विनोद मेहरा यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. या थिएटरची मालकीच इगल फिल्मचे निर्माते एफ. सी. मेहरा आणि अभिनेता शम्मी कपूरची असल्याने मेहरांच्याच चित्रपटाने याचे उदघाटन होणे स्वाभाविक होतेच. शम्मी कपूरचे थिएटर? एका हीरोचे सिनेमा थिएटर? याचं त्या काळात, त्या वयात केवढं कुतूहल आणि कौतुक होते. आपल्या देशातील चित्रपटवेडं व कुतूहल अशा अनेक गोष्टींसह सामावलेय.

तो मेन थिएटर संस्कृतीचा काळ होता. दक्षिण मुंबईतील थिएटरमध्ये नवीन चित्रपट यशस्वी ठरला तर पंचवीस/पन्नास ( कधी त्याहीपेक्षा जास्त) आठवडे सहज मुक्काम करे आणि समजा नवीन चित्रपट रसिकांनी नाकारला तर तीन आठवड्यात त्याची प्रिन्ट गोडावूनमध्ये जाई. या यशापयशात मिनर्व्हाचे स्थान खूपच मोठे आणि महत्वाचे होते. ते वाढवले रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ (रिलीज १५ ऑगस्ट १९७५) ने! ‘शोले आणि मिनर्व्हा ‘ एकाच नाण्याच्या दोन भक्कम बाजू आहेत. संपूर्ण मुंबईत फक्त मिनर्व्हा, न्यू एक्सलसियर ( यात पहिले मोजून काही आठवडे) आणि बसंत ( चेंबूर) येथेच ‘शोले ‘ सत्तर एमएम आणि स्टीरिओफोनिक साऊंड अशा स्वरुपात होता ( इतरत्र ३५ एमएमचा होता). मिनर्व्हात ‘शोले’ पाहण्याचा रोमांचक अनुभव घेतलेल्या नशीबवान पिढीतील मी एक आहे.
आजही मला आठवतेय, ‘शोले ‘पासून मिनर्व्हाचे तिकीट दर वाढवताना अप्पर स्टॉल चार रुपये चाळीस पैसे तर बाल्कनी तिकीट दर पाच रुपये पन्नास पैसे असे होते. पण ते वसूल होत. जय आणि वीरु यांच्यातील नाणेफेकीत नाणे जणू आपल्या आसपास पडलयं असा फिल येई. संपूर्ण चित्रपटभर असेच साऊंड सिस्टीमचे अनुभव येत आणि शोलेसाठी मिनर्व्हाची पुन्हा पुन्हा वारी करताना एकदा फक्त या साऊंडसाठी तर एकदा डायलॉगबाजीसाठी पाहणारे फिल्म दीवाने खूप होते. मिनर्व्हात शोलेने दिवसा दीड, साडेपाच आणि साडेनऊ अशा तीन शोमध्ये ३१ ऑगस्ट १९७८ पर्यंत मुक्काम केला आणि मग तेथेच तो मॅटीनी शोला शिफ्ट केल्यावर आणखीन दोन वर्षे असा एकूण पाच वर्षे खणखणीत चालताना त्याने सामाजिक, सांस्कृतिक, माध्यम वातावरण ढवळून काढले.

‘शोले ‘चा मिनर्व्हातील प्रीमियर आजही चर्चेत असतो. सत्तर एमएमची प्रिन्ट इंग्लंडवरुन आली तरी ती विमानतळावर अडवल्याने पस्तीस एमएमच्या प्रिन्टवर प्रीमियर रंगला, तर ती प्रिन्ट उशीरा पोहचल्याने रात्री उशिरा रमेश सिप्पीने आपलाच ‘शोले ‘ मोजक्याच जणांसह पहाटेपर्यंत पाहिला. ‘शोले ‘च्या अॅडव्हान्स तिकीटासाठी या मिनर्व्हावर कायमच किमान मैलभर रांग असे आणि अजिबात न कंटाळता फिल्म दीवाने त्यात उभे राहत. मीदेखील त्यात असे. त्यातही एक थ्रील होते. विजू खोटे अनेकदा तरी गप्पात रमल्यावर आपला येथील पब्लिकसोबत ‘शोले ‘ पाह्यल्याचा अनुभव रंगवून सांगे.
मिनर्व्हाच्या आणखीन काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या तर यश चोप्रा यांनी आपल्या यशराज फिल्मचा ‘दाग ‘ ( १९७३) याच मिनर्व्हात रिलीज केला. गुलशन राॅय या चित्रपटाचे वितरक होते. विशेष म्हणजे, बीबीसीच्या राजेश खन्नावरच्या डॉक्युमेंट्रीत मिनर्व्हातील ‘दाग ‘च्या प्रीमियरचे काही क्षण आहेत. तेव्हाच मिनर्व्हा जगभरात पोहचले. मिनर्व्हात अनेक चित्रपटांनी रौप्यमहोत्सवी यश संपादले, महत्वाचे चित्रपट असे, यश चोप्रा दिग्दर्शित ‘दीवार’, रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शान’ आणि ‘शक्ती’, प्रमोद चक्रवर्ती दिग्दर्शित ‘आझा ‘, मनमोहन देसाई दिग्दर्शित ‘नसिब’, राज कपूर दिग्दर्शित ‘राम तेरी गंगा मैली’, अनिल शर्मा दिग्दर्शित ‘हुकुमत’ , राकेश रोशन दिग्दर्शित ‘करण अर्जुन’, उमेश मेहरा दिग्दर्शित ‘सोहनी महिवाल’, बी. आर. चोप्रा दिग्दर्शित ‘तवायफ’, एन. चंद्रा दिग्दर्शित ‘नरसिंह’ वगैरे.
================================
हे देखील वाचा: अगदी खरं खरं सांगा, Saiyaara पाहून रडलात की नाही?
=================================
तर येथे शंभर दिवसाचे यश मिळवलेले चित्रपटही बरेच. काही नावे सांगायची तर, राजा चवाथे दिग्दर्शित ‘मनचली’, रवि टंडन दिग्दर्शित ‘झूठा कही का’, राज सिप्पी दिग्दर्शित ‘सत्ते पे सत्ता’, उमेश मेहरा दिग्दर्शित ‘अशांती’, ऋषि कपूर दिग्दर्शित ‘आ अब लौट चले’, राजीव मेहरा दिग्दर्शित ‘एक जान है हम’ वगैरे अर्थात, मिनर्व्हात अनेक चित्रपटांना प्रेक्षकांनी नाकारलेही. त्यातील काही नावे सांगायला हवीतच. ‘दिल दौलत और दुनिया’, ‘मनोरंजन’, ‘प्रेम शास्र’, ‘महान’, ‘पुकार’, ‘शरारा’, ‘बारुद’ (अक्षय कुमार व रविना टंडन), ‘कोयला’, ‘रुप की रानी चोरो का राजा’, ‘चमत्कार’, ‘जीवन एक संघर्ष’, ‘कसम’, ‘किला’ वगैरे वगैरे. काही चित्रपट रसिकांना आवडणार, अनेक चित्रपट ते नाकारणार यावर त्यांचा थिएटरमधील मुक्काम ठरतो. हे झाले दिवसा तीन खेळ याप्रमाणेचे प्रगती पुस्तक. याच मिनर्व्हातील मॅटीनी शोची गोष्ट आणखी वेगळी. अशोककुमार आणि प्राण यांनी दो बेचारे बिना सहारे देखो पुछ पुछ कर हारे गात धमाल उडवलेला ‘व्हीक्टोरिया नंबर २०३’ने येथे मॅटीनी शोला तब्बल साठ आठवडे मुक्काम केला. कागज की नाव ‘अमानुष’, ‘डिस्को डान्सर’ अशा काही फिल्मनी मॅटीनीला ज्युबिली हिट मुक्काम केला.
मिनर्व्हाच्या वाटचालीत सर्वाधिक फ्लॉप चित्रपट, मनमोहन देसाई निर्मित ‘अनमोल’ ( ऋषि कपूर व मनिषा कोईराला). हा मॅटीनीलाच रिलीज झाला पण पहिल्याच दिवशी खुर्च्या रिकाम्या राहिल्याचे खुद्द मनजीना आश्चर्य वाटले. तर राज कपूरने आपला ‘राम तेरी गंगा मैली ‘ ( १९८५) आम्हा समिक्षकांना याच मिनर्व्हात पब्लिकसोबतच दाखवला ( अन्यथा आर. के. फिल्मचा सिनेमा त्यांच्या स्टुडिओतील मिनी थिएटरमध्ये दाखवत). विशेष म्हणजे, तात्कालिक समिक्षकांना हा चित्रपट राज कपूरच्या क्लासचा वाटला नाही तरी १४९९ सीटसचे हाऊसफुल्ल थिएटर या फिल्मला झक्कास दाद देत होते आणि मग येथेच या फिल्मने सुवर्ण महोत्सवी यश संपादले. ॠषि कपूर दिग्दर्शित ‘आ अब लौट चले’ आम्हा चित्रपट समीक्षकांना याच मिनर्व्हात फर्स्ट डे फर्स्ट शो दाखवला तेव्हा आमच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास चक्क शशी कपूर आला होता..आपल्या पुतण्याच्या दिग्दर्शनाचे केवढं तरी कौतुक होत होते हो त्याला …आणि का होऊ नये?
मिनर्व्हाचे थिएटर डेकोरेशन कायमच पाहण्यासारखे असे. मी गिरगावात राहिल्याने हे डेकोरेशन पाह्यला मिनर्व्हावर जाऊन येई यात आश्चर्य नको, त्या काळात असे डेकोरेशन पाहण्याचीही प्रथा होती. ‘शोले ‘च्या डेकोरेशचाही प्रभाव पडला. ‘दाग ‘च्या डेकोरेशनमधील शर्मिला टागोर आणि राखी यांच्या खांद्यावर हात ठेवलेला राजेश खन्ना असो अथवा राम तेरी गंगा… च्या डेकोरेशनमधील धबधब्याखालील मंदाकिनी असो, अतिशय भव्य कटआऊट होता. सत्ते पे सत्ताच्या मिनर्व्हावरच्या डेकोरेशनचा फोटो आजही सोशल मिडियात लाईक्स मिळवतोय. मिनर्व्हाच्या तळमजल्यावरील शोकेसमधील भरपूर शो कार्टस पाह्यची कायमच चंगळ असे.विशेषतः आगामी चित्रपटाची कार्ड्स पाहून ‘पिक्चरमध्ये दम असेल वा नसेल ‘ असेही ठामपणे सांगणारे असत. मिनर्व्हाकडून ग्रॅन्ड रोड स्टेशनकडे ये जा करण्याच्या मार्गावर हाॅरर चित्रपटाचे जणू पेटंट घेतलेल्या रामसे ब्रदर्सचे कार्यालय लक्ष वेधून घेई. याचं कारण तेथील त्यांच्या चित्रपटांची शो कार्ड व भव्य होर्डिग्ज. मिनर्व्हात चित्रपट पाह्यला गेल्यावर त्याच तिकीटावर हेदेखील. बाहेरच्या ज्युसवालाही परिचित झालेला. कलिंगडाच्या मौसमात त्याचा ज्यूस तर सफरचंदाच्या मौसमात त्याचा ज्यूस ही त्याची खासियत. आणि तेथेच कानावर पडणारे मिनर्व्हातील पिक्चरचे बरे वाईट रिपोर्टस.
कालांतराने मल्टीप्लेक्स युगात हे मेन थिएटरचे वैशिष्ट्य कालबाह्य होत गेले. २००६ साली मिनर्व्हाची विक्री झाली आणि काही दिवसातच थिएटरच पाडले गेले. सुरुवातीला वाटले, चार स्क्रीनचे मल्टीप्लेक्स उभारले जाईल, पण बातमी आली की, येथे भव्य आर्टस काॅम्प्लेक्स उभारले जाईल. पण तसे काहीही न होता पुन्हा पुन्हा याच जागेच्या विक्रीच्या जाहिराती येऊ लागल्या आणि त्या जुन्या आठवणी देऊ लागल्या. आताही तेच झाले आहे. चित्रपटगृह म्हणजे चार भिंती, एक पडदा, प्रोजेक्शन, पब्लिक, त्यांच्या टाळ्या शिट्ट्या यासह बरेच काही ना काही असते. अनेकांचे भावविश्व या वास्तूशी जोडले गेलेले असते. आणि मग कधी गप्पांचा फड रंगला की जुन्या चित्रपटाच्या आठवणीसह थिएटरचा फ्लॅशबॅकही डोळ्यासमोर येतोच. आता तर ही वास्तूच नाहीशी झाल्याने फक्त आठवणीची रिळे आहेत.

एका पिढीकडे ज्युन्या काळातील मिनर्व्हाचा अनुभव. अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक सोहराब मोदी यांच्या मिनर्व्हा मुव्हीटोन या चित्रपट निर्मिती संस्थेच्या मालकीचे ते होते. १९३०\ ३२ च्या सुमारास ते सुरु झाले. म्हणजेच मूकपट ते बोलपट असा तो प्रवास होता. प्रभातचा ‘चंद्रसेना’ (१९३५) येथेच प्रदर्शित झाला. मिनर्व्हा मुव्हीटोन निर्मित ‘पुकार’ (१९३९), ‘सिकंदर’ (१९४१), ‘पृथ्वीवल्लभ’ (१९४३), ‘एक दिन का सुल्तान’ (१९४१), ‘झांशी की रानी’ (१९४५) येथेच प्रदर्शित झाले. बी. आर. चोप्रा दिग्दर्शित ‘कानून’, ‘धुल का फूल’ यांचे प्रीमियर येथेच रंगले व चित्रपट प्रदर्शित झाले. त्यानंतरच्या काळात ‘राजकुमार’, ‘जहां प्यार मिले’, ‘मिलन’ इत्यादी. गुरुदत्त यांचा बहुचर्चित ‘साहिब बीवी और गुलाम’ हा चित्रपट लिबर्टीसह जुन्या मिनर्व्हातही प्रदर्शित झाला. म्हणजेच जुने मिनर्व्हादेखिल तितकेच वैशिष्ट्यपूर्ण.
================================
हे देखील वाचा : आणीबाणी उठली आणि Dada Kondke यांनी आपल्या पिक्चरचे नाव ठेवले ‘रामराम गंगाराम’
=================================
आज कधीही मिनर्व्हा थिएटरच्या फूटपाथवरुन जाताना प्रत्यक्षात रिकामी जागा दिसते, पत्रे लावलेले दिसतात. पण डोळ्यासमोर मिनर्व्हाच्या भव्य पडद्यावरील ‘शोले ‘च्या गब्बरसिंगची दहशत आठवते. भारी भारी डायलॉग आठवतात. महत्वाचे म्हणजे, एकदा खुद्द अमजद खान १३० व्या आठवड्यात येथे ‘शोले’ पाहायला आला त्याची बातमी झाली होती….सिंगल स्क्रीन थिएटर्स अशी बहुरंगी, बहुढंगी. एकेक करत ‘पडद्याआड ‘ गेली तरी चित्रपट रसिकांच्या मनात/मेंदूत/ ह्रदयात त्यांना कायमचे ‘शो ‘ आहेत. तेथील आठवणींचा खेळ संपणारा नाही. पिढी बदलत राहिली तरी त्या आठवणींची साठवण भारीच. शहरापासून ग्रामीण भागापर्यंत सिंगल स्क्रीन थिएटर्सशी प्रेक्षकांचे नाते असे कमालीचे घट्टच…
शोले पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मिनर्व्हा चित्रपटगृहदेखिल चर्चेत आले आहे, पण आज मिनर्व्हाकडे पहावे तर ती उंच, शानदार, डौलदार इमारतीच्या जागी केवळ बाहेरुन पत्रे लावलेली ओसाड जागा दिसतेय, इमारत तर केव्हाच पाडली आहे…. चित्रपटगृहाच्या माध्यमातून चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचतो म्हणूनच जगभरातील प्रत्येक चित्रपटगृहाचा इतिहास अतिशय महत्त्वाचा.