Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    indian cinema

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    bollywood big star amitabh bachchan

    नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून का डच्चू दिला होता?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Sachin Pilgoankar :  ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

War 2 x Coolie : बॉक्स ऑफिसवर कुणी मारली बाजी?

Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन

“Ramayana चित्रपट हॉलिवूडपेक्षा कमी नसणार”; सनी देओलची प्रतिक्रिया चर्चेत

Mahesh Manjrekar : डॉन बॉस्कोचा विद्यार्थी ते सिनेसृष्टीतला बेस्ट आर्टिस्ट

Supriya Pilgoankar : सबनीस ते पिळगांवकर होण्यापर्यंतचा फिल्मी प्रवास…

Sholay सिनेमात हि कव्वाली का समाविष्ट होऊ शकली नाही?

Shah Rukh Khan : लेक सुहाना खानसोबतचा ‘किंग’ चित्रपट पुढे

Independence Day : वीकेंडला बॉलिवूडचे ‘हे’ ब्लॉकबस्टर देशभक्तीपर चित्रपट नक्की

Maharashtrachi Hasyajatra टीमचा गोविंदा आला रे…!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Rajinikanth : सामान्य माणसाचा बुलंद रुपेरी आवाज!

 Rajinikanth : सामान्य माणसाचा बुलंद रुपेरी आवाज!
कलाकृती विशेष

Rajinikanth : सामान्य माणसाचा बुलंद रुपेरी आवाज!

by दिलीप ठाकूर 14/08/2025

जास्त नाहीत. फक्त आणि फक्त पन्नास वर्ष. रजनीकांत यांच्या मेहनती, अष्टपैलू, यशस्वी, चौफेर वाटचालीच्या प्रगती पुस्तकातील एक टप्पा. लोकेश कनागराज दिग्दर्शित ‘कुली’ हा त्याची भूमिका असलेला चित्रपट याच महत्वाच्या टप्प्यावर प्रदर्शित होतोय.  रजनीकांतचा चित्रपट म्हणजे सबकुछ रजनीकांत. कारकिर्दीच्या एवढ्या प्रवासानंतर स्वतःला असे केंद्रस्थानी ठेवण्यात यशस्वी ठरलेली दोन हुकमी नावे. अमिताभ बच्चन व रजनीकांत.

वय त्यांच्यासाठी केवळ एक आकडा. कौन बनेगा करोडपतीचा आणखीन एक मौसम सुरु झाला आणि पहिल्याच दृश्यापासून बीग बी यांनी आपला कमालीचा आत्मविश्वास, शुध्द हिंदी भाषेवरची विलक्षण पकड, स्पर्धकाला कन्फर्ड झोन देणे व छोट्या पडद्याच्या माध्यमाची योग्य जाण या गुणांवर पुन्हा यशस्वी घौडदौड सुरु केली. केबीसीचे हे पंचवीसावे तर बीग बींचे कारकिर्दीचे पंचावन्नावे वर्ष सुरु आहे.

बीग बी काय, रजनीकांत काय, कमल हसन काय किस चक्की का आटा खाता है? असाच प्रश्न पडावा. एखाद्या व्यवसायात यशस्वी कसे ठरावे यासाठी ते आदर्श आहेत. त्यांनीही आपल्या कारकिर्दीत चढउतार अनुभवलेत. आपले चित्रपट फल्प होणें पचवलंय. समाजकारण, राजकारण यांचा अनुभव घेतलाय. या सगळ्यातून जावून ते टॉपवर राहिलेत. मानलं. हे केवळ नशीबाची साथ आहे म्हणून घडत नाही. उलट आपल्या गुणवत्ता, मेहनत, सकारात्मक दृष्टिकोन व व्यावसायिक डावपेच यातून ते यशस्वी ठरले.

रजनीकांत यांच्या वाटचालीत महत्वाचे टप्पे खूपच. दादासाहेब फाळके पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले हा देखील क्षण महत्वाचा. कौतुकाचा. गौरवाचा. रजनीकांत यांचा धमाकेदार चित्रपट मुंबईत प्रदर्शित होतो ती शुक्रवारची पहाट त्यांच्या चाहत्यांसाठी मोठा सणच. एक जबरदस्त सेलिब्रेशन. ‘कबाली’, 2.O’ , ‘काला’ अशा मसालेदार मनोरंजक चित्रपटांचे आगमन असेच तर झाले. हे चित्रपट मूळ तमिळ भाषेतील पण दक्षिणेकडील अन्य प्रादेशिक भाषा व हिंदीत डब करुन ते देशभर/ जगभर प्रदर्शित झाले. ‘कुली’साठी दक्षिणेकडील अनेक शहरातील थिएटर्सवर भव्य दिव्य दिमाखदार कटआऊटस लागल्याचे फोटो सोशल मिडियात पाहायला मिळतात.

माटुंग्याचे अरोरा थिएटर असो अथवा सायन वा वडाळ्याचे आयनॉक्स मल्टीप्लेक्स. रजनीकांत यांच्या नवीन सिनेमाचा फस्ट डे फर्स्ट शो भल्या सकाळी सहा वाजता असतो आणि त्यासाठी पाच वाजल्यापासून त्यांचे भक्त (होय भक्तच म्हणायला हवे. फॅन्स आणि फॉलोअर्स अनेक स्टार्सना असतात. रजनीकांत त्याहीपेक्षा मोठा आहे) वाजत गाजत नाचत येतात. अरोरा बंद झालंय. शांत उभे आहे. त्याच्या आसपास गेलो तरी तेथे ॲक्शनपॅक्ड असा साऊथचा चित्रपट सुरु आहे असा भास होतो. चित्रपटगृह व चित्रपट यांचे नाते असे घट्ट जुळायला हवे.

थिएटरवरील रजनीकांत यांच्या तब्बल ६८ अथवा ७२ फूटी भव्य कटआऊटला दूधाने आंघोळ घालणार. आणि पडद्यावरील त्यांच्या एन्ट्रीला, एखाद्या डायलॉगला, जबरा अॅक्शनला, त्यांच्या डान्स स्टाईलला टाळ्या शिट्ट्या वाजवत स्टॉलपासून बाल्कनीपर्यंतचा पब्लिक थिएटर डोक्यावर घेणारच. हे जणू आपले कर्तव्य आहे अथवा हक्क/हट्ट आहे या थाटात ते करणार. मल्टीप्लेक्समध्येही हीच जबरा क्रेझ. हैद्राबाद, बंगलोर, चेन्नईत म्हणजे त्याच्या होमपिचवर हे झाले तर समजू शकते. पण ते मुंबईतही होतेय हेच विशेष. मुंबईत साठच्या दशकापासून साऊथचा चित्रपट रुजायला लागला. ड्रीमलॅन्ड थिएटरमध्ये प्रत्येक रविवारी सकाळी नऊ वाजता असा दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपट पाह्यला हमखास गर्दी होई. त्यानिमित्त दक्षिणेकडील नागरिक एकमेकांना भेटत. त्यात सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात रजनीकांत यांचेही चित्रपट आले. त्या काळात मूळ भाषेत हे चित्रपट असत. मग हिंदीत डब करीत येवू लागले.

================================

हे देखील वाचा : आणीबाणी उठली आणि Dada Kondke यांनी आपल्या पिक्चरचे नाव ठेवले ‘रामराम गंगाराम’

=================================

रजनीकांत यांना मिळालेला दादासाहेब फाळके पुरस्कार आणि त्यांच्या रुपेरी पडद्यावरील पन्नाशी या गोष्टी त्यांच्या एकनिष्ठ चाहत्यांना प्रचंड आनंद देणार्‍या गोष्टी. त्यांचा चाहतावर्ग त्यांच्याशी  भावनिकदृष्ट्या जोडणारा आहे आणि याची जाणीव खुद्द रजनीकांत यांनी ठेवलीये. फाळके पुरस्कार  एका व्यक्तीला नव्हे तर तो जणू या गर्दीला आहे. या पुरस्काराचे वेगळेपण काय असेल तर ते हेच आहे. त्यांच्या पन्नास वर्षाच्या वाटचालीतील हा सर्वोच्च बिंदू.

रजनीकांत यांनी आपल्या स्टाईल आणि क्रेझने आपला असा हुकमी क्राऊड निर्माण केला आहे आणि त्यांची ही मिळकत अगदी वेगळी आहे. रजनीकांत यांच्या चित्रपटांची संस्कृती ती काय असाही काहींचा प्रश्न असेल. त्यांचे चित्रपट कलात्मक नसतात.  वेगळ्या प्रवाहातील नसतात. चित्रपट महोत्सवात स्थान मिळवू शकत नाहीत. त्यावर परिसंवाद होत नाहीत अशीही त्यांच्या चित्रपट संस्कृतीवर झोड उठवली जाऊ शकते. पण आपल्या देशात कष्टकरी, स्वप्नाळू, आशावादी मेहनती वर्गाने सिनेमा जगवला, वाढवला, रुजवला. हा वर्ग मागील काही दशके रजनीकांत यांच्याशी जोडला गेला आहे, त्यांच्यात त्यांना ‘आपला हीरो’ दिसतो, तारणहार दिसतो. त्यांच्या जागी ते स्वतःला पाहतात.  हेच मास अपिल त्याचा चित्रपट प्रदर्शित झालेल्या थिएटरवर सहज चक्कर मारली तरी लक्षात येते. चित्रपटगृहाच्या भोवतीचे जग असे अनेक वैशिष्ट्यांनी, छोट्या छोट्या तपशीलातून भरलेले.

रजनीकांत यांच्या चित्रपटात अनेकदा तरी भरपूर अतिशयोक्ती असतेच (अपवाद ‘काला’ या चित्रपटाचा आशय. धारावीतील जागेवरूनचा एक राजकारणी व एक करडा समाजसेवक यांच्यातील तीव्र लढा त्यात होता. रजनीकांत व नाना पाटेकर यांच्यातील अभिनयाचा सामना त्यात पाहायला मिळाला. उत्तरोत्तर रंगत गेलेला हा चित्रपट).   ‘2.O’ या चित्रपटाचे मध्यवर्ती सूत्रच बघा ना, एके दिवशी अचानक एका शहरातील सगळ्यांचेच मोबाईल वार्‍याने हवेत उडतात आणि गायब होतात. हे कसे होते? का होते? या प्रश्नाने पोलीस आणि मंत्री सगळेच हैराण होतात. हे प्रकरण ते एका शास्त्रज्ञाकडे (रजनीकांत) सोपवतात. तो आपली सेक्रेटरी नीला (अॅमी जॅक्शन) हिच्यासह या गोष्टीचा शोध घेऊ लागतो. नीला रोबोट आहे. याचा शोध घेताना लक्षात येते की पक्षीराजन (अक्षयकुमार) हा रोबोट हे सगळे एका सूडापोटी करतोय. त्याला राग कसला असतो? तर तो बालपणापासून पक्षीप्रेमी असतो. पण मोबाईल आणि मग त्याचे टॉवर आल्यापासून त्याच्या रेडीएशनने पक्षी मृत पाऊ लागतात. हळूहळू पक्षी ही जमातच नष्ट होईल की काय अशी त्याला भीती वाटते. तो पक्षी वाचवण्यासाठी सर्वच स्तरांवर प्रयत्न करतो….. अशी ही “२.Oची गोष्ट आकार घेत जाते. आणि भरभरुन आधुनिक टेक्नॉजी/टेक्नोसॅव्हीने हा  चित्रपट पडदाभर आकार घेतो. व्हीएफएक्सचा खचाखच वापर यात आहे. ‘रोबोट’ या चित्रपटाचा हा सिक्वेल  आहे. या चित्रपटात भरपूर अॅक्शन आणि तांत्रिक करामती आहेत.

रजनीकांत यांनी पस्तीस एमएमचा चित्रपट ते सिनेमास्कोप चित्रपट, त्रीमिती (थ्रीडी) चित्रपट असा प्रवास केलाय. सिंगल स्क्रीन थिएटर्स ते मल्टीप्लेक्स, ओटीटी अशी त्यांची झेप आहे. पण दक्षिणेकडील राज्यात आजही पारंपरिक एकपडदा चित्रपटगृहांची चलती आहे. त्यात रजनीकांत यांच्या यशस्वी चित्रपटांचा मोठाच आधार आहे. रजनीकांत फक्त पडद्यावर अतिरंजित कारागिरी करीत नाही तर त्यांची अफाट लोकप्रियता अशा अनेक घटकांच्या पथ्यावर पडते. तुम्ही रजनीकांत यांचे चाहते असाल तर त्यांचे अनेक तांत्रिकदृष्ट्या भरगच्च चित्रपट नक्कीच एन्जॉय कराल. खरं तर रजनीकांत यांच्यावरील प्रेमाखातर त्यांचे जुने नवे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरही पाहत असताच.

कोणी म्हणते, रजनीकांत म्हणजे एकूणच भारतीय चित्रपटसृष्टीतील महाचमत्कार आहे. ते पडद्यावर कोणतीही करामत करु शकतात. त्यांना कोणी ट्रीक सीन्स वा हातचलाखीही म्हणतात. पण तीच त्यांची स्टाईल वा खासियत असेल…. कोणी म्हणते, रजनीकांत म्हणजे गल्ला पेटीवरील हुकमी क्राऊड पुलर हिरो आहे…ते जास्त महत्वाचे. चित्रपट हाऊसफुल्ल गर्दीत एन्जॉय केला जाणे चित्रपट माध्यम व व्यवसायासाठी अतिशय महत्वाचे. त्यांच्या केवळ नावावर चित्रपटाची तिकीटे काढली जात आहेत हे प्रचंड मोठे यशच. मराठीत अशा स्टारची आवश्यकता आहे.

कोणी म्हणते, दक्षिण भारतीय माणूस जगात जेथे जेथे गेला, तेथे तेथे त्याने कमल हसन व रजनीकांत यांचा दक्षिणेकडील प्रादेशिक चित्रपटही नेला. चित्रपट संस्कृतीतील हीदेखील एक महत्वाची गोष्ट. चित्रपटाचा अभ्यास अशा दृष्टिकोनातूनही व्हायला हवा. विदेशातही त्यांचे तमिळ, तेलुगू चित्रपट धो धो यशस्वी ठरले. अगदी जपानमध्येही रजनीकांत मॅनिया आहे. तेथेही त्यांचे चित्रपट रेकॉर्ड ब्रेक यश मिळवतात. आता रजनीकांत मूळचे शिवाजीराव गायकवाड म्हणजे आपला महाराष्ट्रीयन. म्हणजे त्यांच्या प्रगतीचा मराठी माणसाला आनंद होणे स्वाभाविक आहेच. तसा तो ‘आपला माणूस’.  पण दक्षिणेवर राज्य केलं. मला आठवतंय पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित ‘एक फुल चार हाफ’ या मराठी चित्रपटाचा मुहूर्त रजनीकांत यांच्या शुभ हस्ते फिल्मीस्तान स्टुडिओत झाला. लक्ष्मीकांत बेर्डे व प्रिया अरुण यांच्यावर मुहूर्ताचे दृश्य चित्रीत झाले. यानिमित्त आपला मराठीतील व दक्षिणेकडील (तसा तोही आपलाच) सुपर स्टार एकत्र पाहायला मिळाले. मिडियात असल्यानेच असे सुखद योग अनुभवता येतात.

कोणी म्हणते, रजनीकांतचे चित्रपट म्हणजे, अतिरंजित, अतिशोयोक्तीपूर्ण महामनोरंजन असते. त्यात कसलाही सामाजिक आशय, गांभीर्य वगैरे नसतं. ते कायमच महापराक्रमी नायक साकारतात. सत्तरच्या दशकात अमिताभ बच्चनने तेच तर केले. त्याचा ‘ॲन्ग्री यंग मॅन’ अर्थात सूडनायक असाच होता. अमिताभने चित्रपटातील ढिश्यूम ढिश्यूम ढिश्यूमला जणू प्रतिष्ठा दिली. रजनीकांतने तोच आपला हुकमाचा एक्का केला आणि त्यात व्हीएफएक्सची जोडणी घेतली. हा एक प्रकारचा पडद्यावरचा प्रवास आहे. जो साठच्या दशकात दारासिंगच्या स्टंटपटाने रुजवला. चित्रपट अभ्यासक्रमात हादेखील मुद्दा महत्वाचा.

कोणी म्हणते रजनीकांत यांचे चित्रपट जनसामान्यांचे प्रतिनिधीत्व करीत असले तरी त्याचा निर्मिती खर्च अबब म्हणावा असा व इतका प्रचंड का? कारण आज चित्रपट निर्मिती स्वस्त राहिली आहे कुठे? पै पैचा हिशेब करुन वा ठेवून चित्रपट निर्मिती शक्यच नाही. एक सामाजिक मराठी चित्रपट निर्माण करण्यासही किमान दोन कोटीचा खर्च आहे. अर्थात चित्रपट निर्मितीतील खरा आकडा निर्माता व निर्मिती संस्थाच सांगू शकते. हे सर्वकालीन सत्य. ‘२.० रोबोट”चे बजेट चक्क ५४० कोटी? तांत्रिक करामतीने, व्हीएफएक्सने बजेट वाढले की रजनीकांतच्या चित्रपटाला इतके भारी मार्केट आहे? रजनीकांतला तेवढे आणि तसे भारी मार्केट आहे. फरक इतकाच की त्याचे काही चित्रपट कमी प्रमाणात यशस्वी ठरतात तर काही भारी प्रमाणात ठरतात. दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपटांचे बजेट अवाढव्य असते आणि तेथे निर्मितीवर अफाट अचाट मेहनतही घेतली जाते. चित्रपट निर्मिती म्हणजे जादूचा खेळ वा टाईमपास गोष्ट नाही हे त्यांचे वैशिष्ट्य. काही चित्रपट आशय विषयात फसतही असतात.

रजनीकांत आणि त्यांचे चित्रपट हा कायमच विविध स्तरांवर चर्चेचा विषय असतोच, (त्यांना लाभलेला दादासाहेब फाळके पुरस्कार असो आणि त्यांच्या कारकिर्दीची खणखणीत पन्नास वर्ष हे देखील निमित्त आहे) आणि हीच त्याची मोठी मिळकत आहे.  एस. शंकर दिग्दर्शित ‘२.० रोबोट’ ‘ हे त्यांच्या स्वतंत्र चित्रपट संस्कृतीचे एक उदाहरण दिले. हा त्रीमिती (अर्थात थ्री डी) होता. हा चित्रपट सेटवर किती चित्रीत केला आणि त्यात तांत्रिक करामत किती असाही प्रश्न पडू शकतो. पण रजनीभक्तांना असा कोणताही प्रश्न पडत नाही. त्यांना फक्त आणि फक्त रुपेरी पडद्यावर रजनीकांत यांना ‘महाविजेता’, ‘महानायक’, ‘सुपर मॅन’, ‘सुपर हिरो’, ‘बलाढ्य शक्तीशाली नायक’ म्हणूनच पाहायचे असते. तीच त्यांची मानसिक, भावनिक गरज आणि सवय आहे. असे चित्रपट समिक्षकाना फारसे कधी आपलेसे वाटत नाहीत. पण ते त्यांच्यासाठी अनेकदा तरी नसतातच.

रजनीकांत यांचा फॅन हा प्रामुख्याने कष्टकरी कामगार वर्ग आहे. घाम गाळणारा, स्वप्न पाहणारा, आजचे जगणे आजच एन्जॉय करणारा (उद्या जे काही होईल ते उद्या बघू अशाच वृत्तीचा) आहे. ते रजनीकांत यांच्या चित्रपटात आशयघनता शोधत नाही, ती त्यांची गरज नाहीये. याचा अर्थ रजनीकांत यांचा प्रत्येक मसालेदार मनोरंजक चित्रपट गर्दी खेचणारा ठरला असेही नाही. एखाद्या त्यांच्या फसलेल्या चित्रपटाला रसिकांनी नाकारलेही. हे अपयश रजनीचे नसते, तर त्या चित्रपटाच्या पटकथा व दिग्दर्शक यांचे असते. रजनीकांत यांच्या ‘पडद्यापेक्षाही मोठा’ या वस्तूस्थितीला विचारात न घेताच त्यांनी ते चित्रपट साकारले असेच म्हणावे लागेल. रजनीकांत यांच्या चित्रपटाचा अभ्यास करताना अथवा त्यावर फोकस टाकताना त्या चित्रपटाची गुणवत्ता विचारत न घेता, त्या चित्रपटांच्या प्रेक्षकांच्या आवडीनिवडींविषयी भाष्य करायला हवे. रजनीकांतसारखा अगदी साध्या रुपाचा माणूस सिनेमाचा आणि त्यातूनच जनसामान्यांचाही हिरो ठरला हे विशेषच कौतुकाचे आहे. याचा अर्थ असाही होऊ शकतो की, आपल्या आसपास असणारा माणूस रुपेरी पडद्यावरही आपलाच वाटू शकतो. आपल्या देशात चित्रपट हे सर्वसामान्य माणसाचे मनोरंजन म्हणून रुजले. ते रजनीकांत चित्रपट संस्कृती टिकवून आहे.

अॅमिनेटेड टेक्नॉलॉजी हा आजच्या चित्रपटाचा महत्वाचा घटक झाला आहे. त्यातही रजनीकांत फिट्ट बसले आहेत. अशाच त्याच्या Kochadaityaan ( २०१४) या तमिळ  चित्रपटाने उत्तम यश प्राप्त केले. तर ‘चंद्रमुखी ‘ ( २००५) हा कॉमेडी हॉरर तमिळ चित्रपट चेन्नईतील शांती चित्रपटगृहात तब्बल १२६ आठवडे चालला. अलिकडच्या काळात एकादा लोकप्रिय चित्रपटही शंभर दिवस चालत नाही यावरुन रजनीकांत यांचा झपाटा लक्षात येईल. ‘शिवाजी’ ( २००७), ‘लिंगा’ (२०१४), ‘कबाली’ (२०१६) हे रजनीकांत यांचे  काही महत्वपूर्ण चित्रपट आहेत. आता तर त्यांचा मूळ तमिळ चित्रपट हिंदी, तेलुगू व मल्याळम भाषेतही डब होऊन जगभरच्या प्रेक्षकांपर्यंत पोहचतोय. हे जास्त महत्वाचे आहे बरं का?   त्यासह तो मराठीतही डब करण्यात यावा अशी काही चित्रपट प्रेमींची सोशल मिडियात पोस्ट असतेच. त्यांचेही बरोबरच आहे, डब वा सबटायटल्सने कोणत्याही भाषेतील चित्रपट अन्य भाषेतील प्रेक्षकांपर्यंत पोहचत असतो. एक प्रकारे हा कलेचा विस्तारवाद आहे. रजनीकांतचे मसालेदार मनोरंजक चित्रपट मराठीत डब होऊन आले तर त्याची मराठी चित्रपटाला स्पर्धा जाणवेल हे खरे पण मराठी चित्रपट पाहिला जातोय ही गोष्ट अधोरेखित होत राहिल हेदेखील महत्वाचे.

रजनीकांत यांचा माझा सर्वाधिक आवडता  चित्रपट म्हणजे  ‘काला’. आशय, त्याची मांडणी, अभिनय व पूर्वप्रसिध्दी अशा सगळ्याच गोष्टीतून हा चित्रपट प्रभावी झाला.  धारावीच्या जमिनीवरील सामाजिक व राजकीय कडव्या संघर्षाची ही गोष्ट अस्वस्थ करणारी आहे. या चित्रपटात रजनीकांत आणि नाना पाटेकर यांच्या अभिनयाचा जबरदस्त सामना पाहायला मिळाला. विशेष म्हणजे रजनीकांत यांच्या चित्रपटाची मूळ संस्कृती, रजनीकांत यांची प्रतिमा हे सर्व उपयोगात आणून एक सामाजिक वास्तव त्यात मांडल्याचे पाह्यला मिळाले. या चित्रपटाला उत्तम व्यावसायिक यश प्राप्त केले. ओटीटीवर असेल तर नक्कीच बघा.

================================

हे देखील वाचा: अगदी खरं खरं सांगा, Saiyaara पाहून रडलात की नाही?

=================================

रजनीकांत यांची हिंदी चित्रपटसृष्टीतील वाटचाल एक स्वतंत्र गोष्ट आहे. येथील त्यांचे प्रगती पुस्तक असे,  ‘जॉन जानी जनार्दन’ (यात तिहेरी भूमिका), ‘त्यागी’, ‘ असली नकली’, ‘उत्तर दक्षिण’ (या चित्रपटात ते जॅकी श्रॉफ आणि माधुरी दीक्षितसोबत आहेत), ‘अंधा कानून’ (यात अमिताभ विशेष भूमिकेत आहे), ‘फूल बने अंगारे’ (रजनीकांत यांची नायिका रेखा आहे), ‘इन्सानियत के देवता’ (या चित्रपटात रजनीकांत आणि वर्षा उसगावकर यांच्यावर कव्वाली गीत आहे) वगैरे अनेक हिंदी चित्रपटात ते चमकले.  मुकुल आनंद दिग्दर्शित ‘हम’चा मेहबूब स्टुडिओतील मुहूर्त आजही आठवतोय. एका भव्य स्टेजवर अमिताभ बच्चन, गोविंदा आणि रजनीकांत या तिघांनी अतिशय नाट्यमय असे दृश्य साकारत आम्हा उपस्थितीतांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या जबरा एनर्जीला तेव्हा प्रत्यक्षात अनुभवले.  रजनीकांत यांच्या नावाने विनोद, टवाळी, मिम्सही एआय रिमिक्स बरेच. यशस्वी माणसाबद्दलच ते होत असते. रजनीकांत येथेही स्टार. येथेही त्याचा प्रभाव. पन्नास वर्षांची चौफेर वाटचाल हा त्यांच्या चौफेर वाटचालीतील माईलस्टोनच म्हणायचा. आपल्या माणसाचे अभिनंदन आपण करायलाच हवे. पन्नास वर्षानंतरही ते हीरो आहेत. प्रत्यक्षात अतिशय साध्या रुपात राहणारे रजनीकांत एकदा का मेकअप करुन भूमिकेत शिरले की प्रेक्षकांशी जोडले गेलेच म्हणून समजा. रजनीकांत येथेच वेगळे ठरतात. आपल्यातीलच एक वाटतात. ते केवळ पडद्यावर राहत नाही.

दिलीप ठाकूर : कलाकृती विशेष

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood News Coolie movie latest entertainment news Rajinikanth rajinikanth movies rajinikanth superstar of indian cinema superstar of tollywood tamil movies thalaiva rajinikanth
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.