स्टार प्रवाहच्या ‘काजळमाया’ मालिकेत होणार ‘या’ सुप्रसिद्ध नायिकेची एंट्री !

Gulzar : हॅप्पी बर्थडे गुलजार सर!
आज १८ ऑगस्ट. प्रतिभासंपन्न लेखक, कवी, गीतकार, दिग्दर्शक, स्क्रीन रायटर गुलजार यांचा वाढदिवस. भारतीय सिनेमाला आणखी समृध्द करणारा कलावंत आज आपल्या वयाची ९१ वर्षे पूर्ण करून ९२ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. आपल्या सर्व चित्रपट रसिकांसाठी ही खूप आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे त्यांना शतायुषी आरोग्यमय आयुष्यासाठी शुभेच्छा देताना त्यांच्या चित्रपट गीतांमधील इंद्रधनुष्य आपण आज पाहूया.
‘हमने देखी है, इन आँखोकी महकती खुशबू ,हाथसे छुके इसे रिश्ते का इलजाम न दो ,सिर्फ एहसास है ये, रुहसे महसूस करो,प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो…’या गीतात ’प्यार कोई बोल नही प्यार आवाज नहीं’ ही ऒळ झाल्यावर मनातील भावनांचा अव्यक्त मूकसंवाद साधण्यासाठी कवी/गीतकार गुलज़ार यांनी वापरलेले शब्द काय अप्रतिम होते पहा . उर्दू आणि हिंदी शब्दांची जडणघडण किती वेगवेगळ्या पातळीवर वावरत आहे, हे बघण्यासारखे आहे. ’ नूर की बूंद ’ आणि ’सदियो से ’ या शब्दांचे संदर्भ उर्दू भाषेशी निगडीत ; पण तरीही ’न ये रुकती है न , ठहरी है कहीं ’ या हिंदी शब्दांची साथ मिळाल्याने तो श्रीमती भाषिक अलंकार दृष्टीस पडतो.

’मुस्कुराहट सी खिली रहती है आंखो में कहीं, और पलको के उजाले से झुके रहते है;होठ कुछ कहेते नहीं कापते होठो पे मगर,कितने खामोश से अफसाने रुके रहते है.’ प्रेमाचं इतकं हळुवार इतकं अलगद इतकं अलवार वर्णन गुलज़ार शिवाय कोण करू शकेल? गुलज़ार यांच सिनेसृष्टीतील बहुआयामी योगदान फार मोठ आहे कवी, गीतकार, कथाकार, पटकथाकार , संवादलेखक, दिग्दर्शक. चित्रपटसृष्टीत वावरणार्या गुलजार यांची नेमकी ओळख तरी कोणती ? २०१३ साली त्यांना सिनेमाच्या दुनियेतील सर्वोच्च असा हा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर झाला आणि एका योग्य व्यक्तीला योग्य सन्मान दिल्याचा मनाला आनंद झाला. गुलज़ार च्या गीतांचा मनात पाऊस कायम आनंद देत असतो.
================================
हे देखील वाचा: ….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!
=================================
गुलजार यांची काव्यप्रतिभा, त्यांच्या गीतांमधील ही सांकेतिकता अफलातून असायची . ‘वो यार है जो खुशबू की तरहा, जिस की जुबाँ उर्दू की तरहा’ किंवा ‘तावीज बनाके पहनूं उसे, आयत की तरह मिल जाये कहीं’ ही त्यांची अलिकडच्या काळातील गाणी देखील उर्दू भाषेतील लहजा, तिची नज़ाकत, तिची महक रसिकांना मोहून टाकणारी असते.संवेदनशीलता, तरल आणि अलवार भाव हे त्यांच्या प्रतिभेच अलौकीक लेणंच आहे. ‘जीने के लिये सोचा ही नही दर्द संभालने होंगे, मुस्कराये तो मुस्करानेके कर्ज उतारने होंगे’ असं लिहून जाणारे गुलजार ‘वक्त के सितम कम हसीं नही,आज है यहां कल कहीं नही वक्त के परे अगर मिल गये कहीं ‘ असंही लिहितात. ’ऐ जिंदगी गले लगा ले ’ आणि ‘सुरमई अंखियोंमें नन्हा मुन्हा एक सपना दे जा रे’ ही दोन्ही गाणी इलिया राजा च्या आधी तयार केलेल्या धूनवर लिहिली होती हे आता सांगूनही खरे वाटत नाही !

‘आपकी बदमाशियोंके ये नये अंदाज है’ हा गुलजार यांचा खट्याळपणा आणि लताचे लडिवाळ हास्य आणि ‘तुम जो कह दो तो आज की रात चांद डूबेगा नही रातको रोक लू ’ हा अबोल प्रेमभाव तुमच्या आमच्या मनात कायम घर करून रहतो. या गीताच्या दोन कडव्याच्या मधील संजीव कुमार आणि सुचित्रा सेन यांच्यातील संवाद त्यांच्या स्वरात ऐकताना मन आजही शहारून जातं! ’ये जो फूलोंकी बेले नजर आ रही है ना ये दर असल बेले नहीं हैं, अरबी में आयते लिखीं हुयी है. इसे दिन के वक्त देखना चाहिये… दिन के वक्त ये सारा पानी से भरा रहा रहता है…’ यावर तिचं उत्तर असतं ’ कहां आ पाऊंगी मै दिन में ’…. ये जो चांद हैं ना इसे रातमें ही देखना ये दिनमे नही निकलता…’ ’ये तो रोज निकलता होगा …’ ’हां…लेकीन बीचमे अमावस आ जाती हैं वैसे तो अमावस पंधरा दिन की होती हैं लेकीन इसबार बहुत लंबी रही..’ नौ बरस लंबी थी न..’
गुलजार यांच्या गीतांमध्ये साहीर प्रमाणेच रात , सपना , चांद , ख्वाब यांचे उल्लेख अनेकवेळा येतात. कधी सलील चौधरींच्या सुरावटीवर मुकेश ‘कभी कभी तो आवाज देकर मुझको जगाया ख्वाबोंने’ गातो तर कधी भूपेंद्र च्या स्वरात ‘बीती ना बीताये रैना’ म्हणतो तर कधी किशोर लताच्या युगल गीतात ’चांद चुराके लाया हूं चल बैठे चर्च के पीछे ’ तर कधी ‘फिर वही रात है ख्वाबकी’ म्हणत स्वप्नाच्या दुनियेतील वातावरणात नेतो ! गुलजार यांच्या पहिल्यावाहिल्या गीतातही ‘छुप जाउंगी रात ही में, मोहे पी का संग दई दे’ आहे आणि ‘बदरी हटाके चंदा, छुपकेसे झाके चंदा’ हेही आहे! रस्ता, वळण हीही गुलजार यांची आवडती प्रतिमा. ‘मै मुड गया तो साथ साथ, राह मुड गयी’ हा तो खास गुलजार मिडास टच! ‘इस मोडसे जाते है, कुछ सुस्त कदम रस्ते, कुछ तेज कदम राहे’ इथे ही रस्ते आहेतच ,पण ‘इन रेशमी राहोंमें, इक राह तो वो होगी, तुम तक जो पहुंचती है’ यातला हळुवारपणा न्याहळा! मिर्ज़ा गालीबचा ’मिस्रा ’ घेऊन लिहीलेलं ’दिल ढूंढता हैं फिर फुरसतके रात दिन’ मधील ’अल्फाज’ मनाला किती स्पर्शून जातात!

त्यांच्या गाण्यांनी हरेक पीढीला मनस्वी आनंद दिला. हवाओं पे लिख दो हवाओ के नाम, दो दूनी चार (१९६८) तुम पुकार लो तुम्हारा इंतजार है, वो शाम कुछ अजीब थी- खामोशी (१९६९), बोले रे पपीहरा- गुड्डी (१९७१), मुझे जां न कहो मेरी जां – अनुभव (१९७१) कोई होता जिसको अपना- मेरे अपने (१९७१), मुसाफिर हूं यारों न घर है ना ठिकाना, परिचय (१९७२), ना जिया लागेना , मैंने तेरे लिये हीं सात रंग के सपने चुने, आनंद (१९७०), रूके रूके से कदम, मौसम (१९७५), दो नैनो में आंसू भरे हैं, ओ मांझी रे अपना किनारा खूशबू (१९७५), तुम आ गये हो नूर आगया हैं आंधी (१९७५), आपकी आंखोमें कुछ महके हुए से ख्वाब है – घर , एक अकेला इस शहर मे – घरौंदा , नाम गुम जायेगा किनारा (१९७७), आने वाला पल जाने वाला है गोलमाल (१९७९) ये साये है – सितारा, हजार रांहे मुड़ के देखी, थोड़ी सी बेवफाई (१९८०), सिली हवा छू गयी -लिबास (१९८१) रोज रोज डाली डाली क्या लिख जाय – अंगूर , तुजसे नाराज नहीं जिंदगी- मासूम (1983), राह पे रहते है , फिर से आयीयो बदरा बिदेसी – नमकीन (१९८४) कतरा कतरा मिलती है इजाजत (1987), यारा सिली सिली बीरहा की रात का जलना लेकिन (1990), दिल हुम हुम करे, रूदाली (1993) .
================================
हे देखील वाचा : Rakesh Roshan: पित्याच्या गाण्याच्या चालीतून बनवले ‘हे’ सुपर हिट गीत!
================================
मागच्या पीढीतील हेमंतकुमार, सलील चौधरी,मदनमोहन.बर्मन पितापुत्रा पासून अलिकडच्या ए आर रहमान,विशाल भारद्वाज सार्यांपर्यंत त्यांचे सूर जुळले.साठच्या दशकात बिमल रॉय प्रॉडक्शन्समध्ये गुलजार असिस्टंट डायरेक्टर म्हणून दाखल झाले. बिमल रॉय हे बहुआयामी प्रतिभेचे धनी होते. गुलजारांनी या सुवर्णसंधीचा पुरेपूर फायदा करून घेतला. कवितेवरील प्रेमामुळे त्यातील अनेकांशी अत्यंत घनिष्ठ संबंध निर्माण झाले. बिमलदांच्या मृत्युनंतर गुलजारांनी हृषीकेश मुखर्जीसोबत काम करावयास सुरुवात केली. हृषीदांच्या अनेक अविस्मरणीय चित्रपटांच्या पटकथा व गीते गुलजारांनी लिहिली. बिमल रॉय स्कूलच्या या दिग्दर्शकानी बिमलदांच्या साहित्यविषयीचे प्रेम, मानवतावाद, उच्च मूल्यांवरची निष्ठा, जीवनविषयक सकारात्मक दृष्टिकोन आणि निरोगी मनोरंजन या वैशिष्ट्यांचा वारसा पुढे नेण्याचे कार्य मनापासून केल्याची जाणीव त्यांच्या चित्रपटातून व्यक्त होते.गुलज़ार यांच्या प्रतिभेचा हा सन्मान त्याच्या चाहत्यांना मनापासून सुखावत असतो!