ठरलं तर मग! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री होणार आदेश बांदेकरांची सून…

Kamalistan Studio च्या खाणाखुणा मिटत चालल्यात…
आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढी मुंबईत रिक्षा असो, बेस्ट बस असो, लोकल ट्रेन असो, टॅक्सी असो, ओला उबेर असो, मेट्रो असो, मोनो रेल अशा कशातूनही प्रवास करत असताना कायमच व्हाॅटस अप, फेसबुकवर मान/ डोळे लावून असतात, माझी पिढी मात्र अशा प्रवासात बाहेर पाहते. जुन्या पिढीतील चित्रपट रसिक तर अजून शिल्लक असलेली जुनी सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृह आणि चित्रपट स्टुडिओवर नजर टाकत टाकत जुन्या आठवणीत रमतो. असाच परवाच जोगेश्वरी लिंक रोडने पवईकडे जात असताना सवयीनुसार श्याम नगरच्या पुढे गेल्यावर मातोश्रीजवळ डाव्या बाजूस पाहिले आणि मूळ कमालीस्तान स्टुडिओच्या जागेवर वेगाने व्यावसायिक संकुल उभे राहत असल्याचे पाहिले आणि मन फ्लॅशबॅकमध्ये गेले….

जुनी सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृहे आणि जुने चित्रपट स्टुडिओ इतिहासजमा होणे आता काहीसं शाॅक प्रूफ होत चाललयं. मुंबईचा चेहरामोहरा बदलत असताना तर त्यात ती बरीचशी पन्नास, साठ वर्ष जुनी सिंगल स्क्रीन थिएटर्स ही गरज राहिली नाही की काय? मल्टीप्लेक्स, ओटीटी युगात त्यांची फारशी गरज नाही? आता तर शहरी भागात चित्रपट ही नवश्रीमंत आणि उच्चभ्रू वर्गाचे फॅड झालेय आणि त्यांना ऑनलाईन महागडे तिकीट, असेच महाग पाॅपकाॅर्न/ साॅप्ट ड्रिंक्स आणि कार पार्किंग असलेल्या मल्टीप्लेक्सचे भारी आकर्षण आहे. मध्यमवर्गीय प्रेक्षक कधी तरी एकादा चित्रपट पाह्यला मल्टीप्लेक्सला जातोय अन्यथा मोबाईल स्क्रीन झिंदाबाद. यू ट्यूबवर पाहिजे तेवढे व तसे जगभरातील मनोरंजन आहेच. आपल्या मुंबईतील चित्रपटाच्या स्टुडिओची गोष्टच वेगळी.

दादासाहेब फाळके यांनी ३ मे १९१३ रोजी आपल्या देशातील पहिला चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ निर्माण केला तेव्हापासूनच स्टुडिओ सिस्टीम आहे. दादरच्या पूर्वेकडील फाळके मार्गावरील (हे नाव दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ दिले आहे) मथुरा भवनमध्ये फाळके यांनी एक स्टुडिओ तयार करुन तेथे शूटिंग केले. फारशा सुविधा नसताना केले हे महत्वाचे. बरीच वर्षे चित्रपट म्हणजे एखाद्या लहान मोठ्या स्टुडिओत सेट लावून चित्रीकरण करणे म्हणजे चित्रपट होय हाच समज व प्रथा होती. आपल्या देशातील चित्रपट निर्मितीची प्रमुख केन्द्रे असलेल्या मुंबई, कोल्हापूर, हैदराबाद, चैनई (तेव्हाचे मद्रास), कोलकत्ता (तेव्हाचे कलकत्ता) येथे (आणि स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी लाहोर) चित्रपट स्टुडिओ निर्माण झाले. चित्रपट निर्मितीत हळूहळू वाढ होत जाताना व हिंदीसह मराठी व अन्य प्रादेशिक भाषेतील चित्रपट निर्मिती वाढ होताना हे स्वाभाविकच होते. कालांतराने बडोदा, नॉयडा अशा काही शहरात चित्रपट स्टुडिओ उभे राहिले.
================================
हे देखील वाचा : ‘शान’ला Sholay चा फटका बसला?; होय शंभर टक्के
=================================
काळ पुढे सरकत राहिला, चित्रपट तंत्र प्रगत झाले, आता आऊटडोअर्सला शूटिंग सुरू झाले, काही काळातच विदेशात शूटिंग सुरू झाले, इतकेच नव्हे तर एकाद्या चित्रपटासाठी दीर्घकालीन सेट उभे राहू लागले. (रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले ‘साठी बंगलोरजवळच रामगढ नावाचे गाव उभे केले आणि ते कायमस्वरुपी राहिले. हा सेट आजही चर्चेत असतो), मुंबईत वांद्रे-जुहू परिसरातील बंगल्यात शूटिंग सुरू झाले. (दिग्दर्शक बी. आर. इशारा यांनी ‘चेतना ‘पासून हा ट्रेन्ड आणला. तो फारच रुजला.) आता व्हीएफएक्स, एआय, एआय रिमिक्स यांच्या तांत्रिक प्रगतीत आता तंत्रज्ञानाला महत्व आले आहे. या प्रगतीत ‘स्टुडिओची गरज ‘ हळूहळू कमी होत गेली.

मालाडच्या बॉम्बे टॉकीजपासून ग्रॅन्ट रोडच्या ज्योती स्टुडिओपर्यंत मुंबईतील अनेक स्टुडिओ एकेक करीत बंद होत गेले. काहींच्या खाणाखुणाही शिल्लक राहिल्या नाहीत तर काही स्टुडिओ बंद पडल्याची काहीही प्रतिक्रिया उमटली नाही. यातील काही स्टुडिओ खूप वैशिष्ट्यपूर्ण होते. मालाडला आता बस स्टॉपपुरती बॉम्बे टॉकीजची खूण राहिलीय. खरं तर चाळीसच्या दशकातील हा प्रतिष्ठित स्टुडिओ. दिलीपकुमारला रुपेरी पदार्पणची संधी याच बॉम्बे टॉकीजच्या ‘ज्वार भाटा’ ( १९४४) या चित्रपटात दिली. त्यानंतर बॉम्बे टॉकीजच्याच ‘प्रतिमा’ ( १९४५) आणि ‘मिलन’ ( १९४६) या चित्रपटात दिलीपकुमारची भूमिका आहे.

असो. कालांतराने मुंबईतील अंधेरीतील नटराज स्टुडिओ बंद झाला तसाच आंबोलीतील फिल्मालय स्टुडिओ केवढा तरी आक्रसलाय. त्याची मूळ शान नाहीशी होऊन एक कोपरा स्टुडिओ राहिलाय. या दोन्ही स्टुडिओत बराच काळ नवीन चित्रपटाचे मुहूर्त, शूटिंग कव्हरेज, मुलाखती यासाठी जाण्याचा योग आला, त्यामुळेच या स्टुडिओचे नसणे आठवणीत राहण्यापुरतेच नव्हे, तर या व्यवसायात होत गेलेल्या बदलाची जाणीव होती. अनेक स्टुडिओ अगदी मोक्याच्या जागी आणि मुंबईत जागेचे वाढते भाव याचा या स्टुडिओ संस्कृतीला फटका बसला. एकीकडे चित्रपटाचा इतिहास जपावा असे वाटते खरे, पण त्याच वेळेस वाढता व्यवहारवादही दुर्लक्षित करता येत नाही. जागेची अवाढव्य वाढलेले भाव हेदेखील एक महत्वाचे कारण आहेच.
पण आर. के. स्टुडिओची विक्री हा चित्रपट रसिकांना खूपच मोठा धक्का ठरला. या स्टुडिओची ओळख आणि इतिहास खूप वेगळा असल्याने अनेक जण भावूक झाले. राज कपूरने उभे केलेले हे साम्राज्य त्याच्यानंतर त्याच्या मुलांना सांभाळता आले नाही अशीही एक शक्यता वर्तवली गेली. खरं तर ऋषि कपूर दिग्दर्शित ‘आ अब लौट चले ‘( १९९९) नंतर आर.के.फिल्मची चित्रपट निर्मिती थांबली. तेव्हाच मनात शंकेची पाल चुकचुकली. केवळ गौरवशाली इतिहासावर एवढी मोठी वास्तू जगवता येत नसते.

स्टुडिओची देखभाल, अनेक प्रकारचे कर आणि कामगारांचे पगार या ओढाताणीत स्टुडिओकडे अन्य चित्रपट निर्मात्यांचा कामाचा ओघ आटला की अडचणी वाढतात. त्यामुळेच या वैभवशाली आणि ऐतिहासिक स्टुडिओच्या विक्रीचा निर्णय घेताना ह्रदयावर दगड ठेवला ही ऋषि कपूरची प्रतिक्रिया अतिशय प्रामाणिक ठरते. विक्रीनंतर या स्टुडिओच्या पाडकामाला सुरुवातही झाली आणि ऐंशी टक्के भाग पाडून झाल्यावर मी एकदा आवर्जून भेट दिली असता ते पाडकाम पाहणे दुःखदायक वाटत होते. आर.के.च्या चित्रपटातील अतिशय भव्य सेट लागणारा सेट नंबर वन पूर्ण पाडलेला दिसला. रणधीर कपूर दिग्दर्शित ‘हीना’ (१९९१) साठी येथेच लागलेल्या भल्या मोठ्या सेटवर अश्विनी भावेवरील देर ना हो जाए कही… हे गीत संगीत व नृत्य चित्रीत केलेले आठवले.
आर.के.फिल्मच्या रुपाने या भव्य स्टुडिओचा इतिहास पडद्यावर आणि पडदाभर कायमच राहिल इतकेच. तेवढेच समाधान. या धक्क्यातून चित्रपट रसिक सावरण्यापूर्वीच अंधेरीच्या महाकाली विभागातील कमाल अमरोही स्टुडिओच्या जागी (जुने नाव कमालीस्तान स्टुडिओ) मोठे व्यावसायिक केन्द्र सुरु होणार आहे असे वृत्त आले. आणि आता तर तेथे नवीन बांधकाम सुरु झाल्याचेही दिसतेय. निर्माता आणि दिग्दर्शक कमाल अमरोही यांनी १९५८ साली एकूण पंधरा एकर जागेवर हा भव्य स्टुडिओ उभारला. त्या काळात मुंबईची सीमा वांद्रेपर्यंत होती, त्यामुळे हा स्टुडिओ मुंबईबाहेरच्या विस्तीर्ण जागेवर आहे असे मानले गेले.
================================
हे देखील वाचा : Sholay म्हणजेच मिनर्व्हा, मिनर्व्हा म्हणजेच शोले
=================================
आज तेथून जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड जातोय, नव्वदच्या दशकापर्यंत तो नव्हता. महाकालीवरुन स्टुडिओत जावे लागे. मी अंधेरी पूर्वेकडील बसस्थानकावर ३३३ क्रमांकाची बस पकडून महाकालीला जात असे आणि उतरल्यावर मधल्या रस्त्यातून खाली उतरताना सावध रहावे लागे. अथवा तुमच्याकडे चार चाकी वाहन हवे. वा रिक्षा परडवायला हवी. अतिशय देखणा आणि भरपूर मोकळी जागा असणारा स्टुडिओ म्हणून याची पहिली ओळख. या स्टुडिओत रेल्वे स्टेशन, गाव, कोर्ट, पोलीस स्टेशन, जेल, गार्डन याचे हुकमी सेट हे विशेषच. दिग्दर्शकाने गरजेनुसार त्यात काही बदल करायचे आणि शूटिंग सुरू करायचे इतकेच. चित्रपट स्टुडिओ निर्मितीत दिग्दर्शक दिसे वा त्याला गरजा समजत असे कौतुकाने म्हणता येईल. त्या काळात निर्माता व दिग्दर्शक यांचे स्वतःचे स्टुडिओ असत हेही उल्लेखनीय. चित्रपती व्ही.शांताराम यांचा राजकमल कलामंदिर स्टुडिओ ( परेल), राज कपूरचा आर. के. स्टुडिओ (चेंबूर), मेहबूब खान यांचा मेहबूब स्टुडिओ (वांद्रा) ही काही ठळक उदाहरणे.

खुद्द कमाल अमरोही यांच्या ‘दिल अपना और प्रित पराई’ (१९६०), ‘पाकिजा’ (१९७२), ‘रझिया सुल्तान’ ( ९८३) या चित्रपटांचे भव्य सेट कमालीस्तान स्टुडिओत लागले. ज्यांनी ‘पाकिजा पाहिलाय त्यांना त्यातील भव्य सेटवरुन या स्टुडिओची खासियत लक्षात यावी. ‘पाकिजा’, ‘रझिया सुल्तान’ या भव्य दिमाखदार चित्रपटात आकर्षक सेटची देखणी नजाकत पाहायला मिळते. इतरही अनेक चित्रपटांचे येथे शूटिंग झालेय. ‘धरमवीर’, ‘अमर अकबर अॅन्थनी’, ‘कालिया’, ‘खलनायक’, ‘हनिमून’, ‘दिल तो पागल है’, ‘कोयला’, ‘दिव्यशक्ती’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘राम जाने’ अशा अनेक चित्रपटांचे येथे शूटिंग झालेय. महेश मांजरेकरने येथेच ‘तेरा मेरा साथ रहे’साठी येथे चाळीचा भला मोठा सेट येथे लावला असताना सेटवर जाण्याचा योग आला असता लंच ब्रेकमध्ये महेश मांजरेकर आपल्या युनिटसोबत क्रिकेट खेळत होता. शूटिंगच्या तणावावर ही छान मात्र होती. हा तयार सेट एकाद्या चित्रपटासाठी वापरता येईल असा विचार करतच याच चाळीच्या सेटवर ‘जान जाए पर शान न जाए’ हा चित्रपट निर्माण केला.
या स्टुडिओत मराठी चित्रपटांचेही शूटिंग झालेय. किरण शांताराम निर्मित आणि सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘अशी ही बनवाबनवी’ मधील ह्रदयी वसंत फुलताना… या गाण्यातील अशोक सराफ व अश्विनी भावे यांचा भाग येथेच चित्रीत झाला. त्याशिवाय या स्टुडिओत ‘फटाकडी’, ‘खरं कधी बोलू नये’, ‘मामला पोरीचा’, ‘रेशीमगाठी’, ‘किस बाई किस’, ‘भुताचा भाऊ’, ‘दे टाळी’, ‘येडा का खूळा’, ‘विधिलिखित’ अशा काही मराठी चित्रपटांचे शूटिंग झालेय. कोरोना काळात अक्षयकुमारने सोशल डिस्टंन हा नियम पाळत एका जाहिरातीचे येथे चित्रीकरण केले. सोशल मीडियात त्या चित्रीकरणाचे फोटो व्हायरल झाले. कमालीस्तान स्टुडिओ पूर्वी होळीदेखिल साजरी होई. हे मी अनुभवलयं. याच स्टुडिओतील कॅन्टीनमध्ये झणझणीत तिखट मिसळ पाव नेहमीच एक्स्ट्रा पाव घेण्यास मजबूर करे.

दिग्दर्शक दीपक बलराज वीज यांनी आपल्या ‘बॉम्ब ब्लास्ट’ या चित्रपटातील पत्रकार परिषदेचे येथेच चित्रीकरण करताना आम्हा सिनेपत्रकारांनाच त्यात संधी दिली. ही एक आठवण. किशोरी शहाणे महाकाली विभागातील तक्षशीला येथे राहत असताना आपल्या कुटुंबासह याच कमालीस्तान स्टुडिओत शूटिंग पाह्यला जात असे. तिचे ते महाविद्यालयीन वय होते. एकदा अशीच ती तिकडे गेली असतानाच तिला सुभाष घई दिग्दर्शित ‘कर्मा’ (१९८६) या चित्रपटात नसिरुद्दीन शाहसोबत प्रेयसीची छोटीशी भूमिका साकारायची छान संधी मिळाली. या स्टुडिओतील मेकअप रुम्सही अतिशय उत्तम.
या स्टुडिओचा स्पॉट अगदी मोक्याच्या जागी आहे, मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम या दोन्हीला जोडणारा आहे. हा स्टुडिओ उभारला तेव्हाची मुंबई आणि आजची साठ वर्षानंतरची मुंबई यात केवढा तरी फरक पडलाय. त्यासह मनोरंजन क्षेत्रातही अनेक बदल होत गेले. ओशिवरा येथे अतिशय प्रशस्त आणि सुव्यवस्थित/अत्याधुनिक यशराज स्टुडिओ उभा राहिला. कर्जतचा एन. डी. स्टुडिओ उपयुक्त ठरला. मुंबई परिसराबरोबरच मीरा रोड, काशिमिरा, वसई, सफाळे, पनवेल येथे असंख्य छोटे मोठे स्टुडिओ उभे राहिले. मालिका, वेबसिरीज, जाहिरातपट, अल्बम यांच्या सततच्या चित्रीकरणाने ते सतत बिझी असतात.
असे बदल होतच राहतात आणि ते वास्तव नाकारता येत नाही. आजची चित्रपटसृष्टी भावनेपेक्षा व्यवहारवाद आहे. जुने स्टुडिओ जपण्यापेक्षा नवीन स्टुडिओचे ते स्वागत करतात. युएफओच्या काळात तर चित्रपटात तांत्रिक करामती वाढल्यात, त्या प्रगतीकडे आजच्या डिजिटल पिढीचे जास्त लक्ष आहे. जुन्या स्टुडिओचा वैभवशाली इतिहास कौतुकाचा मानतानाच नव्याचे स्वागत करणे त्यांना योग्य वाटतेय.
================================
हे देखील वाचा: अगदी खरं खरं सांगा, Saiyaara पाहून रडलात की नाही?
=================================
भविष्यात मुंबईतील आणखीन काही स्टुडिओ एकेक करीत बंद होत गेल्यास फारसे आश्चर्य नकोच. माझ्यासारख्या अशा अनेक चित्रपट स्टुडिओत नवीन चित्रपटांचे मुहूर्त, शूटिंग रिपोर्टींग, फिल्मी मुलाखत यासाठी सतत जा ये केलेल्याला मात्र नक्कीच वाईट वाटेल. आर. के. स्टुडिओ, फिल्मालय स्टुडिओ, फिल्मीस्तान स्टुडिओ, कमालीस्तान स्टुडिओ… इत्यादी इत्यादी. मुंबईत चित्रपट स्टुडिओ होते असे म्हणायची वेळ तर आली आहे… जुने चित्रपट पाहताना श्रेयनामावलीत अशा अनेक जुन्या काळातील चित्रपट स्टुडिओची नावे मात्र वाचायला मिळतील. तर मुंबईतील काही बस स्टॉपना या स्टुडिओचे नाव दिलेले आहे (मालाडचा बॉम्बे टॉकीज स्टुडिओ, परेलचा कारदार स्टुडिओ वगैरे) तितकेच चित्रपट रसिकांना समाधान.