
Mehmood : फिर वही शाम वही गम वही तन्हाई है…..
मखमली स्वरांचा बादशहा तलत मेहमूद याची कारकीर्द उणीपुरी बारा पंधरा वर्षाची. पण या एवढ्या छोट्याशा काळात त्याने अतिशय सुंदर आणि रसिकांच्या काळजात कायम घर करून टाकणारी गाणी गायली. सूरश्री लता मंगेशकर यांनी तलत मेहमूद यांच्याबाबत बोलताना एकदा असं म्हटलं होतं की, “एखादी सुगंधी उदबत्ती अगदी अल्पकाळ जळते आणि विझून जाते पण तिचा सुगंध दीर्घकाळ त्या वास्तूमध्ये टिकून राहतो असाच काहीसा तलतच्या स्वराचा सुगंध आहे!”. तसचं, मेहमूद गझल गायकीमध्ये खूप प्रभावी वाटायचे. त्यांचे शब्दोच्चार, शब्दातील भावना आणि अभिजात मखमलीपणा त्यामुळे आज इतकी वर्ष झाली तरी त्यांनी गायलेली गाणी रसिकांच्या मनात घर करून आहे.

‘द मॅन विथ वेलवेट व्हॉइस’ असं त्यांच्या स्वराचे वर्णन केलं जातं. जिंदगी देने वाले सुन, रात मे क्या क्या ख्वाब दिखाये, जलते है जिसके लिए तेरी आंखो के लिये दिये, दिले नादान तुझे हुआ क्या है, मै दिल हु एक अरमान भरा, सीने में सुलगते है अरमा… हि आणि अशी चिक्कार गाणी आणि गजल्स तलत ने गाऊन रसिकांना हळवं दु:ख दिलं आहे. पण चित्रपट संगीतातील बदल हा स्वर ऍडॉप्ट करू शकला नाही आणि अगदी अल्पकाळ संगीताच्या दुनियेत वावरलेला तलत महमूद यांना पुढची चाळीस वर्षे मायानगरीत एकाकी आयुष्य काढावे लागले.

१९६४ साली आलेल्या ‘जहां आरा’ या चित्रपटात हा स्वर शेवटी एकदा तेजाने झळकला होता. यानंतर मात्र या स्वराची अक्षम्य अशी वंचना आपल्या संगीताच्या दुनियेत झाली. तिथून पुढे ते हिंदी चित्रपट सृष्टीतून अक्षरशः बाजूला फेकले गेले. स्टेज शोज आणि परदेशातील त्यांचे शोज यामुळे तसे ते बिझी असायचे पण नवीन गाणी त्यांना काही मिळत नव्हते. १९६४ ते १९९८ हा त्यांचा कालखंड हा त्यांच्यातील कलाकाराला असह्य करणारा होता. ‘जहांआरा’ या चित्रपटातील गाणी सुद्धा मेहमूद यांना मिळणारच नव्हती. चित्रपटाचे दिग्दर्शक विनोदकुमार यांनी या चित्रपटातील सर्व गाणी मोहम्मद रफी यांनी गावी असा आग्रह केला होता. पण चित्रपटाचे संगीतकार मदन मोहन यांनी मात्र, ”मी ही सर्व गाणी आणि गजल्स मेहमूद यांना नजरेसमोर ठेवूनच तयार केली आहेत. त्यामुळे ही सर्व गाणी तलत मेहमूदच गाणार आणि जर तलत जाणार नसेल तर मी हा चित्रपट सोडत आहे!” असा निर्वाणीचा इशाराच दिला होता.
==============
हे देखील वाचा : Sai Paranjpye यांच्या चित्रपटासाठी किशोर कुमार यांनी कलात्मक गाणे गायले!
==============
या चित्रपटाचे निर्माते होते अभिनेते ओमप्रकाश आणि चित्रपटाचे डायरेक्टर होते विनोदकुमार (त्यांचा हा पहिलाच चित्रपट होता) या चित्रपटात भारत भूषण माला सिन्हा, पृथ्वीराज कपूर, शशिकला यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट ऐतिहासिक होता. मुघल बादशहा शहाजहान याची कवयित्री मुलगी जहांआरा हिच्यावर हा चित्रपट बेतला होता. चित्रपटात संपूर्ण काव्यात्म नवाबी वातावरण होतं. त्यामुळे यातील गझल तलत मेहमूद योग्यरित्या गाऊ शकेल असं संगीतकार मदन मोहन यांना वाटत होतं. यातील सर्व गाणी गीतकार राजेंद्र कृष्ण यांनी लिहिली होती. पण चित्रपटाचे दिग्दर्शक मात्र मोहम्मद रफीच्या नावावर आग्रही होते. त्यामुळे शेवटी निर्माते ओमप्रकाश यांनी तोडगा काढला.
या चित्रपटातील प्रमुख तीन गझल्स या तलत मेहमूद गातील असे सांगितले. तसेच दोन गाणी मोहम्मद रफी गातील असे देखील सांगितले. आणखी एक युगलगीत तलत मेहमूद यांना मिळाले. संगीतकार मदन मोहन आनंदी झाले. तलत मेहमूद यांना त्यांनी कॉन्टॅक्ट करून गाण्याच्या रिहर्सल सुरू केल्या आणि तलत मेहमूदने आपल्या अप्रतिम स्वरात या तीन गझल्स गाऊन भारतीय चित्रपट संगीताच्या गझल दुनियेचा दालन अतिशय समृद्ध करून ठेवलं. या गझल्स राजेंद्र कृष्ण यांनी लिहिल्या होत्या. मदन मोहन यांनी राजेंद्र कृष्ण यांना अतिशय अभिजात उर्दूचा वापर करायला सांगितला होता. त्या पद्धतीने त्यांनी गझल लिहिल्या होत्या .

या चित्रपटातील पहिली गजल होती ‘तेरी आंख के आंसू पी जाऊ ऐसी मेरी तकदीर कहा…’ दुसरी गझल होती ‘मै तेरी नजर का सुरूर हूं तुझे याद हो के ना याद हो…’ आणि तिसरी अप्रतिम ऑल टाईम ग्रेट गझल होती ‘फिर वही शाम वही गम वही तन्हाई है दिल को समझाने तेरी याद चली आई…’ अतिशय रिच पोएट्री असलेल्या या गझल तलत मेहमूद यांनी अतिशय त्यातील भावनांशी समरस होवून गायल्या. यात तलत मेहमूद आणि लता मंगेशकर यांचे युगलगीत होते ‘ऐ सनम आज ये कसम खाले..’ एकूणच या चित्रपटात तलद मेहमूद यांच्या गाण्यांचा जबरदस्त बोल बाला होता. आणि तलत ने संपूर्ण गाणी फार सुंदर रीतीने गायली होती. या चित्रपटात लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या स्वरात एक युगलगीत होत ‘जब जब तुम्हे भुलाया तुम और याद आये..’ मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील ‘बाद मुद्दत के ये घडी आयी’ हे गीत देखील सुंदर बनले होते. या चित्रपटासाठी लता मंगेशकर, आशा भोसले उषा मंगेशकर आणि मीना मंगेशकर यांच्या या चौघ्या बहिणींच्या आवाजात एक गाणं रेकॉर्ड केलं होतं पण चित्रपटात त्याला स्थान मिळालं नाही किंवा रेकॉर्डवर देखील हे गाणं घेतलं नाही. तसं झालं असतं तर ते एक युनिक गीत तयार झालं असतं!
आता थोडंसं ‘जहांआरा’ या चित्रपटाबद्दल. मुगल बादशहा शहाजहान याची मुलगी ‘जहांआरा’ तिचे एका मिर्झावर प्रेम असते जो शायर असतो. पण त्या काळातील दरबारी वातावरण त्या दोघांना भेटू दिले जात नाही आणि अशा या कठीण काळात त्यांची फुललेली प्रेम कथा चित्रपटात खूप चांगल्या रीतीने मांडली. यात शहाजहान यांची भूमिका पृथ्वीराज कपूर यांनी केली होती. मिर्झा च्या भूमिकेत भारत भूषण होते. त्या काळात कवी म्हणून खूप चांगले शोभले. माला सिन्हाने देखील ‘जहांआरा’ भूमिका खूप चांगली केली होती. चित्रपटातली गाणी चांगली होती. संगीत चांगलं होतं. पण चित्रपटाला व्यावसायिक यश मिळालं नाही.
================================
हे देखील वाचा : Manoj Kumar : माला सिन्हा यांनी मनोज कुमार यांचा पाणउतारा केला होता.
=================================
मदन मोहन यांच्याबाबत नेहमी असंच व्हायचं. त्यांच्या चित्रपटातील गाणी चालायची पण चित्रपट चालायचं नाही. या चित्रपटानंतर मात्र तलत मेहमूद यांचा विजनवास सुरू झाला. त्यांच्या आवडीच्या संगीतकारांनी देखील त्यांना गायची संधी दिली नाही. याचं कारण चित्रपटाचा संगीताचा ट्रेंड बदलत चालला होता. तलक मेहमूद आता स्वर एजबार झाला होता. एकदा तलत मेहमूद यांनी १९७१ साली त्यांचे लाडके संगीतकार सलील चौधरी यांना फोन करून सांगितले की,” आपण ‘आनंद’ चित्रपटातील गाणी खूप चांगली बनवली आहेत. मला खूप आवडली.” आणि शेवटी फोन ठेवताना म्हणाले,” खरं तर ही गाणी मी चांगली देखील जाऊ शकलो असतो नं?” पण तसं व्हायचं नव्हतं. तलत मेहमूद यांनी रसिकांच्या मनाला दिलेलं हसरं दुःख इतकं मोठं आहे की रसिक कायम लक्षात ठेवतील!