
जेव्हा किशोर कुमारांच्या प्लेबॅकसाठी Randhir Kapoor आणि विनोद खन्ना दोघेही हटून बसले!
सिनेमाच्या निर्मितीच्या वेळी दिग्दर्शकापुढे कधी कधी मोठा पेच प्रसंग निर्माण होतो याचं कारण असतं चित्रपटात काम करणाऱ्या कलावंतांचे इगो प्रोब्लेम. कुणीच मागे हटायला तयार नसतं. या कसोटीच्या क्षणी बऱ्याचदा दिग्दर्शकालाच कठोर होऊन काही भूमिका घ्याव्या लागतात. असाच काहीसा प्रसंग दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांच्या समोर उभा राहिला होता. त्यांच्या चित्रपटात काम करणाऱ्या दोन्ही हिरोंनी आपल्याला किशोर कुमार यांचाच प्लेबॅक हवा असा हट्ट धरला होता. सत्तरच्या दशकामध्ये किशोर कुमार यांचा स्वर सर्वच कलावंतांना हवा होता. त्यामुळे या दोन हिरोंनी देखील आपल्यावर चित्रित होणारी गाणी किशोर किशोर कुमार यांच्याकडून गाऊन घ्यावी असे दिग्दर्शकाला सांगितले. दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांनी मात्र व्यवस्थितरित्या टॅकल करून हा प्रश्न सोडवला. कोणता होता तो चित्रपट आणि काय होता तो नेमका किस्सा?

१९७४ साली ए के नडियादवाला यांनी ‘हाथ की सफाई’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटाच्या दिग्दर्शक होते प्रकाश मेहरा. या सिनेमाचे जबरदस्त डायलॉग (बेटा, जिस स्कूल मे तुम पडते हो उस स्कूल के हम हेडमास्टर है ) सलीम जावेद यांनी लिहिले होते. चित्रपटाची गाणी गुलशन बावरा यांनी तर संगीत कल्याणजी आनंदजी यांचे होते. हा चित्रपट १९५९ साली आलेल्या ’दो उस्ताद’ या सिनेमाचा रिमेक होता. त्या चित्रपटात राज कपूर , शेख मुख्तार आणि मधुबाला यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ओ पी नय्यर यांच्या संगीतासाठी तो सिनेमा आज देखील आठवला जातो.

‘हाथ की सफाई’ या चित्रपटामध्ये रणधीर कपूर आणि विनोद खन्ना हे प्रमुख भूमिकेत होते तर हेमामालिनी आणि सिम्मी गरिबाल या नायिका म्हणून चित्रपटात काम करत होत्या. रणधीर कपूरला या मसाला चित्रपटापासून खूप अपेक्षा होत्या. त्याचा ‘जवानी दिवानी’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्यामुळे त्याचे नाव त्या काळात बॉलीवूड गाजत होते. या चित्रपटाच्या गाण्यांच्या बाबत जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा त्याचे स्क्रॅच व्हर्शन कल्याणजी आनंदजी त्यांनी रणधीर कपूरला ऐकवले. रणधीर कपूरला ते खूप आवडले. त्यांनी विचारले,” ही गाणी आपण कुणाकडून गाऊन घेणार आहोत?” त्यावेळेला कल्याणजी यांनी सांगितले ,” ही गाणी किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यांच्याकडून आपण गाऊन घेणार आहोत.”
================================
हे देखील वाचा : Manoj Kumar : माला सिन्हा यांनी मनोज कुमार यांचा पाणउतारा केला होता.
=================================
तेव्हा रणधीर कपूर तत्काळ म्हणाला,” माझ्यावर चित्रित असणारी गाणी किशोर कुमार यांच्याकडूनच गाऊन घ्या. कारण त्याचा आवाज मला परफेक्ट सूट होतो.” त्यावर कल्याणजी आनंदजी हसले. रणधीर कपूर ला थोडी शंका आली. त्यांनी विचारलं,” अंकल, आप हंस क्यू रहे हो?” त्यावर तिथे उपस्थित असलेले प्रकाश मेहरा म्हणाले ,” या सिनेमाची गाणी आधीच रेकॉर्ड झालेली आहे. तू मला आधी सांगायला पाहिजे होतंस!” आता मात्र रणधीर म्हणाला,” म्हणजे? माझ्यावर चित्रित असलेले गाणं तुम्ही कुणाकडून गाऊन घेतली आहेत?” आनंदजी रणधीरच्या खांद्यावर थोपटत म्हणाले,” तुझ्यावर चित्री गाणी किशोर कुमार यांनीच गायलेली आहेत!” रणधीर कपूर ने सुटकेचा नि:श्वास सोडला.
पण जेव्हा हीच वार्ता विनोद खन्ना यांना कळाली तेव्हा ते म्हणाले,” माझ्यावर चित्रित गाणी तुम्ही किशोर कुमार यांच्याकडूनच गाऊन घ्यायला पाहिजे.” त्यावर संगीतकारांनी पुन्हा तेच सांगितलं. “आम्ही गाणी ऑलरेडी रेकॉर्ड केलेली आहेत आणि तुझ्यावर चित्रीत असलेले गाणं मोहम्मद रफी यांनी गायलेलं आहे.” त्यावर विनोद खन्ना म्हणाला,” हे असे कसे शक्य आहे? तुम्ही माझ्यावर चित्रित असलेले गाणं किशोर कुमार यांच्याकडून गाऊन घ्या” कल्याणजी आनंदजी म्हणाले,” तू एकदा ते गाणे ऐकून तर बघ.” आणि त्यांनी ते गाणं ऐकवलं. विनोद खन्नाला गाणे तितकं आवडलं नाही कारण त्याच्या डोक्यामध्ये आपल्यासाठी किशोर कुमारचा आवाज हेच सेट झालं होतं. तो प्रकाश मेहरा यांच्याकडे गेला आणि म्हणाला,” माझ्यावर चित्रित होणारे रफीचे गाणं तुम्ही किशोर करून गाऊन घ्या.”

आता मात्र प्रकाश मेहरा यांचा पारा चढला ते म्हणाले,” हा काय वात्रटपणा आहे? रफी हे श्रेष्ठ गायक आहेत आणि रफीने गायलेलं किशोर पुन्हा जाणार नाही कारण या दोन्ही गाण्यांचे रेकॉर्डिंग एकाच दिवशी झाले आहे. दोन्ही युगलगीत आहेत आणि दोन्ही मध्ये लता मंगेशकर यांचा स्वर कॉमन आहे. त्यामुळे आता यात काहीही बदल होणार नाही. समजलं?” विनोद खन्नाने देखील मग आपला स्वर कमी केला. कारण त्याच्या लक्षात आलं होतं की या चित्रपटांमध्ये खरंतर तो चौथा चॉईस होता. या भूमिकेसाठी आधी महेंद्रसंधू , शत्रुघ्न सिन्हा आणि नवीन निश्चल यांना विचारले होते. तिघांनी नकार दिल्यानंतर ही भूमिका विनोद खन्नाला मिळाली होती. त्यामुळे विनोद खन्नाने फारसा विरोध केला नाही. पण कल्याणजी आनंदजी विनोद खन्ना म्हणाले,”काळजी करू नकोस हे गाणं आणि तुझी भूमिका सुपरहिट होणार मी आत्ताच सांगतो.”
================================
हे देखील वाचा : Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!
=================================
‘हाथ की सफाई’ या चित्रपटात रणधीर कपूर आणि हेमा मालीनीवर वर चित्रीत होणारं युगल गीत गाणं ‘हमको मोहब्बत हो गई है तुमसे तुमको मोहब्बत हो गई है हमसे…’ आणि त्याच दिवशी रेकॉर्डिंग झालेलं दुसरं युगल गीत होतं जे विनोद खन्ना आणि सिम्मी गरेवाल वर चित्रित होणार होतं. त्या गाण्याचे बोल होते ‘वादा करले साजना तेरे बिना मै न रहू मेरे बिना तू न रहे ये वादा रहा…’ हे गाणे मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलं होतं. दोन्ही गाणी गाजली पण रफी-लताचे गाणे प्रचंड गाजले. या चित्रपटात किशोर कुमार आणि हेमामालिनी यांनी देखील एक गाणं गायलं होतं ‘पीने वालो को पीने का बहाना चाहिए…’ हा कम्प्लीट मसाला चित्रपट होता. लास्ट अँड फाउंड चा फॉर्मुला होता. त्यामुळे सिनेमा सुपर डुपर हिट झाला. ज्या गाण्यासाठी विनोद खन्ना थोडा नाराज होता ते गाणं देखील प्रचंड गाजलं किशोर कुमार ने गायलेल्या गाण्यापेक्षा पेक्षा जास्त. ते गाणं आणि या भूमिकेसाठी विनोद खन्ना यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक नायकाचा फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला. ३० ऑगस्ट १९७४ रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि बम्पर हिट झाला. दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांनी खूप केअरफुली हे प्रकरण हाताळलं आणि इगो क्लॅश टाळला!