मराठी नाटक पाहून भारावली Tabu, कलाकारांचं केलं तोंडभरून कौतुक!

Dastak : राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा मदनमोहन यांचा चित्रपट
राजिंदर सिंह बेदी हे नाव हिंदी सिनेमाच्या दुनियेत पन्नास आणि साठ च्या दशकामध्ये खूप मशहूर होतं. उर्दू साहित्यातील ते नामवंत लेखक होते. सिनेमाच्या दुनियेतील ते उत्तम पटकथाकार आणि संवाद लेखक होते. सोहराब मोदी, अमिया चक्रवर्ती, बिमल रॉय. ऋषिकेश मुखर्जी यांच्या अनेक चित्रपटांच्या कथा, पटकथा राजिंदर सिंह बेदी यांच्या होत्या. दिलीपकुमार च्या ‘दाग’, ‘देवदास’, ‘मधुमती ‘, सोहराब मोदी यांच्या ‘मिर्जा गालिब’, हृषिकेश मुखर्जी यांच्या ‘अनुराधा’, ‘अनुपमा’ ,’अभिमान’ ‘सत्यकाम’ चे संवाद त्यांनी लिहिले होते.
सत्तरच्या दशकात त्यांनी पहिल्यांदा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल टाकले आणि त्यांच्या पहिल्याच चित्रपटावर राष्ट्रीय पुरस्काराची मोहोर उमटली! त्यांनी दिग्दर्शित केलेल्या १९७० सालच्या ‘दस्तक’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट नायक (संजीव कुमार) सर्वोत्कृष्ट नायिका (रेहाना सुलतान) आणि सर्वोत्कृष्ट संगीत (मदन मोहन) असे तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. ‘दस्तक’ हा चित्रपट समांतर सिनेमातील एक माईल स्टोन ठरला. चांगले साहित्यिक मूल्य असणाऱ्या कथानकावर उत्कृष्ट कलाकृती बनवता येते हे त्यांनी सिद्ध केले. त्या काळात हा सिनेमा फारसा चालला नाही पण त्याचे कथानक, अभिनय, दिग्दर्शन आणि संगीत या बाबतीत तो सिनेमा जबरदस्त बनला होता. ३१ डिसेंबर १९७० रोजी प्रदर्शित झालेला हे हा चित्रपट कृष्णधवल होता. त्या मुळेच कदाचित यातील दु:ख अधिक गहिरे वाटले असणार. हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनावर अमीट छाप सोडून जातो हे नक्की. आज हा सिनेमा प्रदर्शित होवून ५५ वर्ष पूर्ण होत आहेत.

मुंबईमधील जागेचा प्रश्न आणि त्यामुळे एका नव विवाहित दांपत्यापुढे निर्माण झालेले मोठ्ठे संकट फार प्रभावीपणे दिग्दर्शकाने या चित्रपटात दाखवले होते. अभिनेत्री रेहाना सुलतान हिचा हा पहिलाच चित्रपट होता. चित्रपटाचे कथानक राजेंद्र सिंह बेदी यांनीच १९४४ साली लिहिले होते. लाहोरच्या रेडिओवर त्याचे सादरीकरण देखील झाले होते. त्या कथेचे नाव होते ‘नक्ल- ए – मकानी’ याचाच अर्थ नव्या घरातील प्रवेश. मुंबईमधील जागांचा प्रश्न तेव्हा देखील आजच्या इतकाच तीव्र होता.
=============
हे देखील वाचा : Bappi Lahiri : पंचम यांच म्युझिक असलेल्या चित्रपटाला बप्पी लहरी यांच बॅकग्राऊंड म्युझिक !
=============
उत्तर प्रदेशातील एक नवविवाहित मुस्लिम दांपत्य हमीद आणि सलमा (संजीव कुमार आणि रेहान सुलतान) मुंबईत झोपडपट्टीत राहत असतात. ते आर्थिकदृष्ट्या गरीब असले तरी इमानदार आणि खानदानी संस्कारी असतात. त्यांचं वैवाहिक जीवन त्या कुबट वातावरणात काही फुलत नसतं म्हणून ते मुंबई सेंट्रल च्या जवळ दोन खोल्या भाड्याने घेतात. परंतु त्यांना कल्पना नसते की त्या खोल्यांमध्ये पूर्वी एक तवायफ राहत असते. हा सर्व रेड लाइट एरिया असतो. सलमा आणि हमीद आपल्या नव्या संसाराची सुरुवात तिथे करतात. परंतु रोज रात्री त्यांच्या दारावर अनेक गिऱ्हाईक ‘दस्तक’ देत असतात. त्यांना असे वाटत असते की तिथे अजूनही नाच गाणारी शमशाद बेगम (शकीला बानू भोपाली) राहते आहे. हे दोघेही या त्रासाला खूप वैतागतात. परंतु महागड्या मुंबईत त्यांना तिथे राहण्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नसतो.
हमीद ऑफिसला गेल्यानंतर सलमा एकटीच घरात असते. आजूबाजूच्या मोहल्ल्यातील लोक खिडकीतून आपल्या आंबटशौकीन नजरेने तिला पाहत असतात.सर्वांच्या कामुक आणि घाणेरड्या नजरा सलमाला असह्य होत असतात. तिचं पहिलं प्रेम संगीतावर असतं. ती तंबोरा घेऊन गाणे गाऊ लागते. तिच्या या कृतीने आता मोहल्यातील लोकांची खात्री पडते की ही ‘गाणारी’ च आहे! आता सलमा आणि हमीदचे जीवन अक्षरशः नरक बनते. अशा समाजात ‘शरीफ’ लोकांच ‘जिणं’ किती लाचार असतं याचे प्रत्यंतर इथे येते. या सर्व प्रकाराने हमीद आणि सलमा यांच्या वैयक्तिक नात्यात कटूता येवू लागते. येते. ’हालात से मजबूर’ होवून ते परिस्थितीला शरण जातात का? मोहल्ल्यातील पुरुषी वासनांधता कोणत्या टोकाला जाते ? या तणावात त्या दोघांचा संसार टिकतो कां? चित्रपटाच्या शेवटी काय होते हे सांगून मी कोणताही स्पॉंयलर देवून तुमचा रसभंग करीत नाही.
दिग्दर्शक राजिंदर सिंह बेदी यांनी नवदांपत्याची भावनिक होरपळ या सिनेमातून खूप प्रभावीपणे दाखवली आहे. अभिनेत्री रेहाना सुलतान ही पुण्याच्या एफटीआयची पास आऊट स्टुडन्ट. तिचा हा पहिलाच चित्रपट पण काय अप्रतिम अभिनय केला आहे! संजीव कुमारचा तर प्रश्नच नाही. तो कोणत्याही भूमिकेमध्ये फिट असायचा. सिनेमातील प्रमुख पात्र ही दोनच. पण इतर भूमिकातील अंजू महेंद्रू, अन्वर हुसैन, मनमोहन कृष्ण , कमल कपूर, शकीला बानू भोपाली यांचा देखील अभिनय सुंदर झाला होता. सिनेमाचे आणखी एक प्लस पॉईंट म्हणजे संगीतकार मदन मोहन यांनी चित्रपटाला दिलेले सुंदर संगीत.

लता मंगेशकर यांनी गायलेले चारुकेशी रागावरील ‘बैय्या ना धरो रे बलमा’ हे गाणे आज देखील एक क्लासिक म्हणून ओळखले जाते. तसेच ‘हम है मता-ए- कुचा बाजार’ की तरह आणि ‘माई रे मै कासे कहू…’ ही मजरूह सुलतानपुरी यांच्या लेखणीतून उतरलेली गाणी अप्रतिम होती. संगीतकार मदन मोहन हा खरंतर फ्लॉप चित्रपटांचा हिट संगीतकार होता. अप्रतिम संगीत देऊन त्याच्या सिनेमाला फारसे पारितोषिक मिळाली नाहीत पण ‘दस्तक’ त्याला अपवाद ठरला. या सिनेमासाठी संगीतकार मदन मोहन यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.या चित्रपटाचे छायाचित्रकार कमल बोस यांना त्या वर्षीचे फिल्मफेअर अवार्ड मिळाले. या चित्रपटाचे एडिटिंग ऋषिकेश मुखर्जी यांनी केले होते.
================================
हे देखील वाचा: Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?
=================================
जाता जाता: थोडंस या सिनेमाच्या दिग्दर्शकाबद्दल: राजिंदर सिंह बेदी यांचा जन्म सियालकोट पाकिस्तान येथे १ सप्टेंबर १९१५ रोजी झाला. त्यांचं बालपण आणि शिक्षण(उर्दू भाषेत) लाहोरला झालं . ते पुरोगामी विचारांचे तरक्की पसंद साहित्यिक होते. सदाहत मंटो त्यांचे खास दोस्त होते. सुरुवातीला लाहोर आकाशवाणी नंतर जम्मू आणि स्वातंत्र्यानंतर ते मुंबईत आले.वर उल्लेख केलेल्या चित्रपटा बरोबरच ‘गर्म कोट’ हा त्यांच्या कथानकावरील सिनेमा पन्नास च्या दशकात लक्षणीय ठरला. त्यांच्या ‘एक चादर मैलीसी’ या कलाकृतीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्यावर गीताबालीला घेऊन १९६५ साली त्यांनी चित्रपट काढायचे ठरवले होते पण गीताबालीचा मृत्यू झाल्याने तो प्रोजेक्ट बारगळला. पुढे ऐंशी च्या दशकात याच कलाकृतीवर याच नावाने एक चित्रपट आला होता. पाकिस्तानात देखील या कथानकावर चित्रपट आला होता. राजिंदर सिंह बेदी याना १९७२ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १ नोव्हेंबर १९८४ रोजी त्यांचे निधन झाले. एकूणच प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारा असा हा अप्रतिम ‘दस्तक’ सिनेमा होता!