
Raj Kapoor : ‘दुनिया की सैर…’ आपल्याकडील पहिला सत्तर एमएम चित्रपट
‘शोले’च्या पन्नास वर्षाचे देश विदेशात जोरदार शोरदार सेलिब्रेशन सुरु असतानाच एक विशेष उल्लेखनीय गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे पांछी दिग्दर्शित ‘दुनिया की सैर’ (अराऊंड द वर्ल्ड) हा १९६७ सालचा चित्रपट आपल्याकडील पहिला सत्तर एमएमचा चित्रपट आहे.
फरक इतकाच की, ‘शोले’ने भरभक्कम व्यावसायिक यश मिळवताना सामाजिक, सांस्कृतिक, माध्यम वातावरण अक्षरश: ढवळून काढले. पन्नास वर्षांनंतर आजही ‘शोले’चा खणखणीत प्रभाव कायम आहे. ‘दुनिया की सैर’ हा चित्रपट पडद्यावर आला तोच फ्लॉप झाला. तुम्हालाही माहित आहे, यशाच्या गोष्टींना फारच वजन व वलय असते. चित्रपटाच्या जगात तर यश हेच चलनी नाणे. दुनिया की सैर यशस्वी ठरला असता तर तो आपल्या देशातील पहिला सत्तर एमएम चित्रपट म्हणून कायमच फोकसमध्ये असता.

‘दुनिया की सैर’ या चित्रपटाचे दिग्दर्शक पांछी हे अभिनेते ओम प्रकाश यांचे बंधु. त्यांनीच या चित्रपटाची पटकथा लिहिली व संवाद जगदीश कंवल यांचे आहेत. एका ओळीत या चित्रपटाचे कथासूत्र सांगायचे तर, चित्रपटाचा नायक राज सिंग (राज कपूर) हा पाच हजार रुपये खर्च करण्यासाठी जगातील काही देशांचा फेरफटका करतो. त्यात त्याला आलेले बरे वाईट अनुभव म्हणजेच हा चित्रपट. या चित्रपटात राजश्री, अमिता, ओम प्रकाश, मेहमूद, प्रेम चोप्रा आणि प्राण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. म्हणजेच या चित्रपटात प्रेम आहे, विनोद आहे व काले कारनामे देखील आहेत.
================================
हे देखील वाचा : Kamalistan Studio च्या खाणाखुणा मिटत चालल्यात…
=================================
त्या काळातील चित्रपटात जे जे हवे ते सगळेच भरले. तरी हा प्रवासी चित्रपट रसिकांना आवडला नाही. असे कथासूत्र पाहण्यास प्रेक्षकांना विशेष रस वाटला नाही. राजा सिंग वेस्ट इंडिजच्या बेटावर फिरायला गेल्यावर त्याची तेथे क्रिकेटर फ्रॅन्क वाॅरेल यांची भेट होते असेही एक विशेष दृश्य या चित्रपटात आहे. वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू केव्हाच हिंदी चित्रपटात चमकला आहे. या चित्रपटाला शंकर जयकिशन यांचे संगीत असून या चित्रपटात एकूण नऊ गाणी आहेत. त्यातील मुकेश व शारदा यांनी गायलेले दुनिया की सैर करलो हे गाणे लोकप्रिय झाले.
मुंबईत हा चित्रपट दोन चित्रपटगृहात सत्तर एमएम असा भव्य दिमाखदार पडद्यावर होता… नॉव्हेल्टी त्याचे मेन थिएटर होते आणि जोगेश्वरी येथील हंजर चित्रपटगृहातील हा पहिलाच चित्रपट. या चित्रपटाच्या वृत्तपत्रीय जाहिरातीत याच दोन चित्रपटगृहांच्या नावाखाली सत्तर एमएम असे म्हटलय. (आज ही दोन्ही चित्रपटगृह काळाच्या पडद्याआड गेली आहेत.) मुंबईत इतरत्र हा चित्रपट पस्तीस एमएम स्वरुपात प्रदर्शित झाला. १९६७ साली म्हणजेच अठ्ठावन वर्षापूर्वीच असा सत्तर एमएम चित्रपट म्हणजे कुतूहल व कौतुक आहेच. एक प्रकारचे हे मोठेच व्यावसायिक धाडस. कारण तोपर्यंत हिंदीत काही चित्रपट कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट स्वरुपात पडद्यावर येत होते. ‘शोले’ पडद्यावर येईपर्यंत हिंदी चित्रपट अधिक प्रगत झाला होता. आणि एव्हाना चित्रपट रसिकांची पुढची पिढी आली होती.

‘दुनिया की सैर’ हा चित्रपट राज कपूर अभिनित, निर्मित व दिग्दर्शित ‘संगम’ (१९६४ ) च्या खणखणीत यशापासून प्रभावित होऊन निर्माण केला असावा असे वाटणे स्वाभाविक आहेच. ‘संगम’ मध्ये प्रेमाचा त्रिकोण (राज कपूर, वैजयंतीमाला व राजेंद्रकुमार) असतानाच युरोपातील अतिशय मोठ्याच प्रमाणावर चित्रीकरण होते. सिनेमाच्या एकाच तिकीटावर बसल्या जागी युरोप पाहायला मिळतोय ही एकसष्ट वर्षापूर्वी विशेष उल्लेखनीय गोष्ट होती.
पांछी यांनी नेमके तेच पाहिले व अमेरिका, कॅनडा, जपान, स्वित्झर्लंड, टोबॅको, त्रिनिदाद वगैरे देशात फिरणारे/ घडणारे/ पळणारे कथासूत्र तयार केले. आणि विदेशातील अनेक पर्यटन स्थळांवर भरपूर चित्रीकरण केले. त्यामुळेच चित्रपटाची लांबी वीस रिळांपर्यत पोहचली. नॉव्हेल्टीत या चित्रपटासाठी वेळा होत्या, दुपारी दोन, संध्याकाळी साडेपाच व रात्री नऊ वाजता. पण चित्रपट प्रवाही व म्हणूनच प्रभावी ठरला नाही. राज कपूर स्वतः उत्तम दिग्दर्शक व संकलक असला तरी अन्य दिग्दर्शकांच्या चित्रपटात भूमिका साकारत असताना तो काहीच ढवळाढवळ करीत नसे. आपलं काम चोख करीत असे. याला अस्सल व्यावसायिकता म्हणतात. ती जपणे महत्वाचे असते.
================================
हे देखील वाचा : Ramesh Sippy यांचे ‘न आलेले चित्रपट’ ही मोठेच
=================================
‘दुनिया की सैर’ हा आपल्याकडील पहिलाच सत्तर एमएम चित्रपट. तर शोलेच्या खणखणीत अफाट लोकप्रियतेनंतर हिंदीत सत्तर एमएम सिनेमास्कोप व स्टीरिओफोनिक साऊंड सिस्टीम असे अनेक चित्रपट निर्माण होऊन गेले. चित्रपट पडद्यावर आकाराने मोठा होत गेला. कृष्ण शहा दिग्दर्शित ‘शालिमार’, रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शान’ वगैरे चित्रपटांचा त्यात उल्लेख करायला हवा…. या सगळ्यात महत्वाचे काय तर आपल्या देशातील पहिला हिंदी चित्रपट कोणता? तर ‘दुनिया की सैर’….