
चला Mehboob Studio मध्ये…
मुंबईतील जुनी सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृह आणि चित्रपट चित्रीकरण स्टुडिओ एकेक करत बंद होत असतानाच जे कार्यरत आहेत त्यांच्यावर विशेष ‘फोकस’ हवाच… वांद्र्यातील मेहबूब स्टुडिओ असाच एक चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीतील एक विशेष उल्लेखनीय स्टुडिओ. मिडियात आल्यावर या मेहबूब स्टुडिओत अनेकदा जाण्याचा मला योग आला यात आश्चर्य नाही.
देव आनंदचा हा खास आवडता स्टुडिओ. त्याच्या अनेक चित्रपटांचे मुहूर्त याच मेहबूब स्टुडिओत झाले आणि देव आनंदच्या निधनानंतर श्रध्दांजली सभादेखिल याच मेहबूब स्टुडिओत झाली तेव्हादेखील त्याच्या चित्रपटाच्या मुहूर्ताला असते तेवढीच गर्दी या श्रध्दांजली सभेला होती.

निर्माता व दिग्दर्शक मेहबूब खान यांनी १९५४ साली वीस हजार स्वेअर जागेवर (म्हणजेच ४०२ एकर) हा मेहबूब स्टुडिओ उभारला. जुन्या काळातील चित्रपट स्टुडिओवर फोकस टाकताना लक्षात येईल की, अनेक चित्रपट निर्मात्यांनीच चित्रीकरणासाठीच्या भव्य स्टुडिओची उभारणी केली. चित्रपती व्ही.शांताराम यांचा परेल येथील राजकमल कलामंदिर स्टुडिओ, राज कपूरचा चेंबूर येथील आर. के. स्टुडिओ, ए. आर. कारदार यांचा परेल येथील कारदार स्टुडिओ, शशधर मुखर्जी यांचा गोरेगाव पश्चिमेकडील स्वामी विवेकानंद मार्गावरील फिल्मीस्तान स्टुडिओ वगैरे वगैरे अनेक. मेहबूब खान यांच्या निधनानंतर त्यांची मुले अयूब, इक्बाल व शौकत खान यांनी अनेक वर्ष या स्टुडिओची जबाबरारी सांभाळली.
मेहबूब स्टुडिओत फार पूर्वी गुरुदत्त दिग्दर्शित कागज के फूल, विजय आनंद दिग्दर्शित गाईड, सुनील दत्त दिग्दर्शित रेश्मा और शेरा, मोहन सैगल दिग्दर्शित सावन भादों अशा अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले. मी मिडियात आल्यावर सर्वप्रथम मेहबूब स्टुडिओत पाऊल टाकले ते सोहराब मोदी दिग्दर्शित ‘गुरुदक्षिणा’ या चित्रपटाच्या मुहूर्ताला! १९८३ सालची ही गोष्ट. पद्मिनी कोल्हापुरे या चित्रपटात नायिका होती. दुर्दैवाने हा चित्रपट मुहूर्तालाच बंद पडला.

मेहबूब स्टुडिओतील माझ्या आठवणी अनेक. मला आठवतय एकदा मला निर्माते सतिश कुलकर्णी यांचा फोन आला, आपल्या गंमत जंमत या चित्रपटासाठी किशोरकुमार गातोय, मेहबूब स्टुडिओतील रेकॉर्डिंग स्टुडिओत ये. किशोरकुमार माझा अतिशय आवडता कलाकार (नायक व पार्श्वगायक). आपल्याला किशोरकुमार प्रत्यक्षात गाताना अनुभवायला मिळणे म्हणजे माझं जणू भाग्यच उजळले. वेळेपूर्वीच मी मेहबूब स्टुडिओतील रेकॉर्डिंग स्टुडिओत पोहचलोही आणि किशोरकुमार व अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील अश्विनी तू ये ना… या गाण्याचे लाईव्ह रेकाॅर्डिंग अनुभवले. आजही याबाबत मी निर्माते सतिश कुलकर्णी यांचे आभार मानतो. हे गाणे अन्य एकाद्या पार्श्वगायकाकडून गावून घ्यायचे ठरत होते. पण संगीतकार अरुण पौडवाल म्हणाले, आपण किशोरकुमारसाठी यशस्वी प्रयत्न करु. आणि त्यांच्या प्रयत्नातून किशोरकुमार पहिल्यांदाच मराठीत गायला. हे या मेहबूब स्टुडिओत घडले. यावेळेस गीतकार शांताराम नांदगावकर व दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांना झालेला आनंद आजही माझ्या आयुष्यात आहे.

मेहबूब स्टुडिओतच मी विजय आनंद दिग्दर्शित ‘मै तेरे लिए’ या चित्रपटाच्या मुहूर्ताला चेतन आनंद, देव आनंद व विजय आनंद या आनंदबंधुंना प्रत्यक्षात एकत्र पाहिले. अनुभवले. या चित्रपटात देव आनंद पुत्र सुनील आनंद व मीनाक्षी शेषाद्री यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट बराच काळ निर्मितीवस्थेत रखडला. याच मेहबूब स्टुडिओत अनेक चित्रपटांच्या मुहूर्ताना एक सिनेपत्रकार म्हणून हजर राहण्याचे मला अनेक सोनेरी चंदेरी रुपेरी योग आले. त्यातील काही चित्रपट पडद्यावर आले तर काही काही कारणास्तव येवू शकले नाहीत. मुकुल आनंद दिग्दर्शित ‘हम’ (अमिताभ बच्चन, रजनीकांत व गोविंदा मुहूर्त दृश्यात होते), मुकुल आनंद दिग्दर्शित ‘अग्निपथ’ ( अमिताभ बच्चन), सुभाष घई दिग्दर्शित ‘कर्मा’ (मुहूर्त दृश्यात दिलीपकुमार, नसिरुद्दीन शाह, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ व अनुपम खेर होते हे आठवतेय), अवतार भोगल दिग्दर्शित ‘जख्मी औरत’ (डिंपल कापडिया), यश जोहर निर्मित व महेश भट्ट दिग्दर्शित ‘ड्युप्लीकेट’ (मुहूर्त दृश्यात शाहरुख खान, जुही चावला व रमय्या होते.
काही दिवसानंतर रमय्याच्या जागी सोनाली बेद्रे आली), हे मेहबूब स्टुडिओतील गाजलेले काही मुहूर्त. तर याच मेहबूब स्टुडिओत एस. रामनाथन दिग्दर्शित ‘रुद्रा’ (अमिताभ बच्चन शंकराच्या देवळात मूर्तीशी बोलतोय असे दृश्य होते.), के. बापय्या दिग्दर्शित ‘रास्ता’ (मुहूर्त दृश्यात दिलीपकुमार व अनुपम खेर होते आणि दिलीपकुमारनी मुहूर्त दृश्यासाठीही भरपूर रिहर्सल घेतली होती हे आठवतेय), कंवल शर्मा दिग्दर्शित ‘लव कुश’ (अमिताभ बच्चन व मिथुन चक्रवर्ती) या चित्रपटांचे मुहूर्त मेहबूब स्टुडिओत झाले पण हे चित्रपट बनलेच नाही.

मेहबूब स्टुडिओतील सर्वात गाजलेला मुहूर्त राजेश खन्ना निर्मित व कमाल अमरोही दिग्दर्शित ‘मजनून’ या चित्रपटाचा! २९ डिसेंबर १९७९ हा तो दिवस. राजेश खन्नाचा वाढदिवस. बापरे बाप असे कौतुकाने म्हणायला हवेच असाच सगळा कलरफुल माहौल. वांद्रे रेल्वेस्थानकावर पश्चिमेकडे उतरल्यावर समोरच मोठे बॅनर होते. त्यावर म्हटले होते, हा रस्ता मेहबूब स्टुडिओत ‘मजनून’ या चित्रपटाच्या मुहूर्ताला जातो. मेहबूब स्टुडिओ येईपर्यंत हेच सगळीकडे. डिंपल कापडिया प्रत्येकाचे छान हसून स्वागत करीत होती. मुहूर्त दृश्यासाठी प्रचंड मोठा देखणा सेट. विशेषत: लक्षवेधक मेणबत्ती. मुहूर्त दृश्यात राजेश खन्ना व राखी गुलजार यांचा सहभाग. आणि एक उर्दू शेरोशायरी. या भव्य दिमाखदार मुहूर्ताची बरेच दिवस चित्रपटसृष्टी व मिडियात चर्चा रंगली. पण पुढे काहीच झाले नाही.
================================
हे देखील वाचा : Bollywood Gossips : घटस्फोट हाच मार्ग? वेगळेही राहता येते….
=================================
मेहबूब स्टुडिओत अनेक मराठी चित्रपटांचेही चित्रीकरण रंगले आहे. विशेष उल्लेखनीय चित्रपट ट्रॉयका फिल्म निर्मित व राजदत्त दिग्दर्शित ‘पुढचं पाऊल’ या चित्रपटाचे! याच चित्रपटाच्या शेजारच्या सेटवर ‘स्वर्ग से सुंदर’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असतानाच मुंबईतील आम्हा चित्रपट पत्रकारांना शूटिंग रिपोर्टींगसाठी सेटवर बोलावते असता जितेंद्र व जयाप्रदा यांच्यावर काही दृश्ये चित्रीत होत होती. दोन दृश्यांच्या मधल्या काळात जितेंद्र जयाप्रदाला घेऊन ‘पुढचं पाऊल’च्या सेटवर घेऊन गेला आणि राजदत्त यांची ओळख करुन देताना त्यांना वाकून नमस्कार करायचे सुचवले. आणि या गोष्टीवर बरेच काही लिहिले गेले.
या चित्रपटाचे निर्माते विनय नेवाळकर, मधुकर रुपजी व सुधा चितळे होते. या चित्रपटात यशवंत दत्त, आशालता, सुमंत मस्तकार, इर्शाद हाश्मी, प्रशांत दामले, मानसी, सागर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मेहबूब स्टुडिओत जैत रे जैत, फटाकडी, सावली प्रेमाची, कैवारी, सुंदरा सातारकर अशा काही मराठी चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. सुषमा शिरोमणी निर्मित व दिग्दर्शित ‘मोसंबी नारंगी’ या चित्रपटातील जितेंद्रवरचे गाणे आणि गुलछडी चित्रपटातील रति अग्निहोत्रीवरील पब्लिकला मी दिलं आमंत्रण या आयटेम साँगचे चित्रीकरण याच मेहबूब स्टुडिओत चित्रीत झाले. सुषमाने अतिशय आग्रहाने सेटवर बोलावले हे सांगायलाच हवे.

मेहबूब स्टुडिओत कालांतराने मालिकांचे चित्रीकरण तसेच जाहिरातपट, ब्रॅण्डचे शूटिंग, फॅशन डिझायनरचे माॅडेलला सजवून चित्रीकरण, नेटफ्लिक्स, अमॅझाॅन प्राईम, डिस्ने हाॅटस्टार यांच्या वेबसिरीज, चित्रपट प्रमोशन, यू ट्यूब चॅनलसाठी हाय प्रोफाईल मुलाखती, रिऍलिटी शोज, सेलिब्रिटीज पोर्टफोलियो, सांस्कृतिक शोज, इव्हेन्टस, म्युझिक लाॅन्च असे करता करता एका वर्षी मामी चित्रपट महोत्सवाचेही येथेच आयोजन करण्यात आले. चित्रपटासाठी पस्तीस एमएमचे पडदे लागले आणि देशविदेशातील चित्रपटांचेही खेळही दाखवले गेले. या दिवसातील मेहबूब स्टुडिओत वेगळाच होते. याच मेहबूब स्टुडिओत एकदा इंग्लिश पुस्तकांचा मेळा आयोजित करण्यात आला होता. आणि त्या काळात सोनाली बेन्द्रे इंग्लिश लेखकाची मुलाखत घेत असे, त्याचेही येथेच आयोजन केले असता मीदेखील हा अनुभव घेतला. माझ्यासाठी मेहबूब स्टुडिओचे हे वेगळेच रुप अनुभवायला मिळाले.
काळासोबत बदलायला तर हवेच. चित्रपटसृष्टीत अनेक घटक कार्यरत झालेत आणि त्यानुसार मेहबूब स्टुडिओतील चहलपहलही बदलत बदलत गेली आहे. हा बदल स्वीकारण्यात गंमत आहे. मेहबूब स्टुडिओत मुहूर्त, शूटिंग रिपोर्टींग, एकादी मुलाखत अथवा गाण्याच्या रेकाॅर्डिंगला गेलो आणि कॅन्टीनमध्ये गेलो नाही असे कसे होईल? डबल हाफ फ्राय अंडा आम्लेट मंगताच है. गंमत म्हणे बरीच वर्ष या कॅन्टीनमध्ये पाठ नसलेली बाकडी होती. पण म्हणून काय फरक पडतोय? खाण्यात मन लावले की झाले. कालांतराने त्यात बदल झालाच म्हणा.

मेहबूब स्टुडिओत मध्यभागी असलेली हिरवळ लक्षवेधक. विशेषत: प्रेस फोटोग्राफर्सच्या अतिशय आवडती. कलाकार कितीही लहान मोठा असू देत. त्याला सेटवरुन या गार्डनमध्ये बोलावणार वा आणणार आणि त्याचे भरपूर फोटो काढणार. राजश्री प्रॉडक्शन्स निर्मित व सूरजकुमार बडजात्या दिग्दर्शित ‘हम आपके है कौन?’ चे येथे बरेच दिवस चित्रीकरण सुरु होते. आणि अनेकदा तरी फोटोग्राफर्सच्या विनंतीला मान देऊन माधुरी दीक्षित या गार्डनमध्ये येवून फोटोग्राफर्सना भरपूर सहकार्य केल्याचे मी अनुभवलेय. कोणताही कलाकार उगाच मोठा होत नाही. त्याच्या वागण्यात असा सकारात्मक दृष्टिकोन हवा. याच गार्डनमध्ये असरानी दिग्दर्शित ‘दिल ही तो है’ या चित्रपटाचा मुहूर्त झाला. जॅकी श्रॉफ डबल रोलमध्ये होता.
मेहबूब स्टुडिओच्या मुख्य इमारतीत तीन मजले मेकअप रुम्स आहेत. पूर्वी या मुख्य इमारतीत शिरताच समोरच चित्रीकरणाचा तक्ता वाचायला मिळे. त्यावरुन आज कोणत्या चित्रपटाचे चित्रीकरण आहे हे समजे. इतकेच नव्हे तर सेटची उभारणी होत असेल तर तसा तपशील देताना त्यावर कला दिग्दर्शकाचे नाव दिलेले असे. या गोष्टीचे मला कायमच कौतुक वाटत आले आहे. चित्रपटसृष्टी अशा अनेक बारकाव्यानिशी वाटचाल करतेय. कला दिग्दर्शक टी. के. देसाई, सुधेन्द्रु रॉय यांची याच स्टुडिओत कार्यालय होती. तेथेच त्या काळात मुलाखती घेतल्या. टी. के. देसाई हे नवकेतन फिल्मचे हुकमी कला दिग्दर्शक. देव आनंद दिग्दर्शित देस परदेसच्या चित्रीकरण काळात विदेशात चित्रीकरणास बंदी होती म्हणून टी. के. देसाई यांनी मेहबूब स्टुडिओत लंडनची घरे, रस्ते, बार यांचे चकाचक सेट लावले. त्या काळातील ही बहुचर्चित गोष्ट.
====================================
हे देखील वाचा : Famous Studio आता पडद्याआड चालला!
====================================
मेहबूब स्टुडिओ म्हटलं की बरेच काही सांगता येण्यासारखे. येथील रेकॉर्डिंग स्टुडिओ मात्र केव्हाच बंद झाला आहे. मध्यंतरी या स्टुडिओच्या विक्रीची बातमी चर्चेत आली आणि धस्स झाले. आजही मेहबूब स्टुडिओ कार्यरत आहे, त्यात मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक गोष्टीं घडल्यात. एखादे पुस्तक, मालिका, वेबसिरीज यावी असाच या मेहबूब स्टुडिओचा सत्तर वर्षांचा बहुरंगी बहुढंगी चौफेर व अनेक गोष्टींसह प्रवास सुरु आहे….