
Bollywood Retro Movie : दुल्हन वही जो पिया न भाये….
‘लग्नाच्या गाठी स्वर्गात पडतात’ अशा आशयाची एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. लग्न दोन जीवांचं होत असलं तरी संसार हा सर्व कुटुंबासोबत करायचा असतो हि आपली भारतीय संस्कृती. त्यामुळेच विवाहाला एक पवित्र बंधन समजले जाते. पण लग्न होतानाच्या गमती जमती, दोन परस्परांना न आवडणाऱ्या जीवांचं एक होणं, प्रेमा पेक्षाही त्यागाला अधिक महत्व देणं या साऱ्या मूल्य शिक्षणाची गंगोत्री एकेकाळी राजश्री प्रॉडक्शनचे चित्रपट होते. संपूर्ण कुटुंबाचे रंजन करताना आपल्या परंपरा ,रीती आणि संस्काराला अग्रस्थानी ठेवत मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोचविण्याची चोख व्यवस्था या चित्रसंस्थेने केली होती आणि त्यांच्या या प्रयत्नात ते चांगलेच यशस्वी झाले होते. लग्नाचा विषय घेऊन १९७७ साली त्यांनी एक चित्रपट बनविला होता ‘दुल्हन वही जो पिया मन भाये’. या चित्रपटाने त्या वर्षी अमिताभच्या मारधाड आणि मल्टीस्टारर युगात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करून चांगले यश मिळविले.
राजश्री च्या चित्रपटाची कथा तशी छोटीशीच असायची पण त्याचे सादरीकरण अफलातून असायचे. फ्रेश चेहरे हे त्यांच्या सिनेमाचे आणखी एक वैशिष्ट्य. यात प्रेम किशन आणि रामेश्वरी हे दोन तरुण चेहरे त्यांनी रसिकांपुढे आणले. अभिनेता प्रेमकिशन हा अभिनेता प्रेमनाथ आणि अभिनेत्री बीना रॉय यांचा चिरंजीव होता.आज हा सिनेमा पाहताना पूर्वी इतकाच ताजा वाटतो याचे कारण राजश्री च्या शैली कडे जाते. चित्रपटाचे कथानक तसे अगदी साधे होते. हरकिशन (मदनपुरी) हा धनाढ्य उद्योगपती असतो. त्याचा एकुलता एक नातू प्रेम(प्रेम किशन) हा गुलछबू प्रवृत्तीचा तरूण असतो.

वाडवडलांची संपत्ती त्याला आळशी बनवत असते. डॉ फरीद (इफ्तेकार) हा हरकिशन यांचा बालमित्र आणि फॅमिली डॉक्टर. आजोबांना आता एकाच ध्यास असतो नातवाचे लग्न करून सर्व व्यवसाय त्याच्या हाती सोपवणे आणि निवृत्त जीवन जगणे.प्रेम चे एका मॉडेल रीटा वर (श्यामली) प्रेम असते. आपली निवड आजोबा स्वीकारतील का याबाबत तो साशंक असतो.पण आजोबा आणि डॉक्टर यांना जेंव्हा रीटा बाबत कळते तेंव्हा ते खूष होतात. आणि तिला भेटायला बोलावतात.
पण त्या पूर्वीच आजोबांना हार्ट अॅटक येतो. डॉ फरीद त्यांना त्यातून वाचवतो पण आता आजोबांनी सुनेचा ध्यास घेतलेला असतो. तिला भेटायला घेवून ये याचा ते लकडा लावतात. रिटा त्या वेळी नेमकी श्रीनगर ला गेलेली असते. आणि तिथे बर्फ वृष्टी चालू झाल्याने तिचे परतीचे सर्व मार्ग बंद होतात. इकडे आजोबा सुनेच्या येण्याकडे डोळे लावून बसलेले असतात. काय करावे या पेचात प्रेम असताना तो त्याचा मित्र जगदीश ला विचारतो. जगदीश चुटकी सारखा प्रश्न सोडवतो. तो एका फुले विकणाऱ्या मुलीला कम्मोला (रामेश्वरी) रिटा बनवून आजोबांसमोर उभी करतो. हि कम्मो तीच असते जी रस्त्यात फुले विकत असते आणि प्रेम नेहमी तिच्याकडून फुले घेत असताना तिच्या अंगावर गाडीच्या टायरने खड्ड्यातील पाणी उडवत असतो.

प्रेमचा हा श्रीमंती माज तिला अजिबात आवडत नसतो. त्यावरून त्यांचे तू तू मै मै झालेले असते.अशा मुलीला जेंव्हा जगदीश रिटा बनवून आणतो तेंव्हा प्रेम आणि कम्मो दोघेही चिडतात. पण नाईलाज असतो. कम्मो गरीबाघरची लेक असली तरी संस्काराला अधिक महत्व देणारी असल्याने ती आव्हान स्वीकारते. आणि आजोबांची मनोभावे सेवा करते. मरणाच्या दारात उभे असलेले आजोबा आपल्या भावी सुनेच्या शुश्रुषेने बरे होवू लागतात.घरातील सर्वच व्यक्तीवर आणि घटनांवर तिचे लक्ष असते आणि प्रत्येकाला ती आपलसं करीत जाते. अत्यंत निस्वार्थ पणे काम करणाऱ्या कम्मोला ठावूक असते आपली हि तात्पुरती भूमिका आहे आपल्याला एक न एक दिवस जावे लागणार. आपण वृद्ध पित्यासमान व्यक्तीला फसवतो आहोत्त का याचे शल्य ही तिला बोचत असते.
================================
हे देखील वाचा: ….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!
=================================
पण नियती वेगळेच खेळ खेळत असते. हळू हळू कम्मो आणि प्रेमच्या मनात प्रीतीचा अंकुर फुलू लागतो.प्रेमाच्या भावना तयार होवू लागतात. मात्र कथेत ट्वीस्ट येतो ओरीजनल रिटा परत येते. तिच्या सोबत तिची आई (शशिकला) देखील असते. मग संघर्ष सुरू होतो. एका मोक्याच्या क्षणी रिटा कम्मोचे बिंग फोडते. मग खानदान की इज्जत, अमीर गरीब संघर्ष हे नेहमीचे प्रश्न उपस्थित होतात. शेवट अर्थातच गोड होतो.
दिग्दर्शक लेख टंडन यांनी चित्रपटाला राजश्रीच्या सिनेमाचा फ्लेवर जपत चित्रपटाला छान फ्लो दिला. अभिनेत्री रामेश्वरी चा हा पहिला हिट सिनेमा. खरं तर दिग्दर्शकाच्या मनात या भूमिकारीता अभिनेत्री तनुजा ला घ्यायचे होते. टपोऱ्या डोळ्यांची रामेश्वरी या भूमिकेला परफेक्ट शोभली. प्रेम किशन हा अभिनेता तसा दिसायला रूवाबदार (अभिनेता प्रेमनाथ आणि अभिनेत्री बीना रॉय चा मुलगा) पण अभिनयात बोंबाबोंब. त्यामुळे चित्रपटात लक्षात राहिली ती रामेश्वरी.यातली तिची फुले विकणाऱ्या मुलीची भूमिका शेक्सपियर च्या ‘माय फेयर लेडी ‘ वरून घेतली असावी. ही भूमिका राजश्री वाल्यांना इतकी आवडली की त्यांच्या १९७९ सालच्या ‘सुनयना’ (हा चित्रपट चार्ली चॅप्लीन च्या ‘सिटी लाईट’ चा रीमेक होता.) या चित्रपटात सेम भूमिका दिली फरक फक्त त्यात ती अंध तरुणी दाखवली.
================================
हे देखील वाचा : अमिताभ आणि जया यांना हनिमूनहून तातडीने का परत यावे लागले?
================================
मदनपुरी ,इफ्तेकार, जगदीप , शशिकला यांचा ही अभिनय चांगला होता. शशिकला आपल्या छोट्या रोल मध्ये तिच्या संवाद फेकीने लक्षात रहाते. यातील संवाद व्रजेंद्र गौर तर पटकथा आपल्या मधुसूदन कालेलकर यांनी लिहिली होती. दोघानांही त्या वर्षीचे फिल्म फेयर पुरस्कार मिळाले. चित्रपटाची गाणी आणि संगीत रवींद्र जैन यांचे होते.ले तो आये हो हमे सपनोकी गाव में (हेमलता),खुशिया हि खुशिया हो दामन में (येसुदास,हेमलता) हि गाणी गाजली.लेख टंडन यांचा राजश्री कडचा हा पहिलाच चित्रपट होता. राजश्री च्या चित्रपटातून पुढे आलेले कलावंत बाहेर फारसे गाजत नाहीत हे अनेकदा सिद्ध झाले आहे. रामेश्वरी देखील पुढे सुनयना, आशा वगैरे सिनेमात आली पण फारसे यश नाही मिळवू शकली. आता ती परफ्यूम बनविणाऱ्या एका उद्योगाची धुरा सांभाळते आहे. काही तेलगु (तिची मातृभाषा) चित्रपटातून तिने अलीकडे भूमिका केल्यात. अभिनेता प्रेमकिशन ने देखील अभिनयात आपला जम बसणे अवघड आहे समजल्यावर सिनेविस्टा या कंपनीचा तो मालक बनला अनेक यशस्वी चित्रपट , मालिका ची निर्मिती या प्रॉडक्शन हाउस कडून केली जाते.