
The Great Gambler : अमिताभ बच्चनचा चांगला पण अंडर रेटेड सिनेमा!
दिग्दर्शक शक्ती सामंत हिंदी सिनेमातील ब्लॉकबस्टर हिट सिनेमाचे बादशाह! सुरुवातीला शम्मी कपूर सोबत त्यांनी साठच्या दशकामध्ये चायना टाऊन, काश्मीर की कली, एन इव्हिनिंग इन पॅरिस असे सुपर डुपर सिनेमे डीलर. त्यानंतर राजेश खन्नाला घेऊन त्यांनी सत्तरच्या दशकात ‘आराधना’, ‘कटी पतंग’, ‘अमरप्रेम’, ‘मेहबूबा’, ‘अनुरोध’ हे सिनेमे दिले. त्यानंतर मात्र त्यांनी काळाची पावलं ओळखत अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक सिनेमा सुरू केला. हा सिनेमा होता ‘द ग्रेट गॅम्बलर’ खरंतर ‘डॉन’ या सुपरहिट सिनेमाच्या तोडीस तोड सिनेमा बनवायचा त्यांचा प्लॅन होता. त्या पद्धतीने त्यांनी तसे प्लॅनिंग देखील केले होते.

चकाचक लोकेशन्स, फडकते संगीत, सुटा बुटातील खलनायक आणि कथानकातील जबरदस्त वेग त्यांनी पकडला होता. पण दुर्दैवाने सिनेमाला फारसे यश मिळाले नाही. पण आज जेव्हा आपण हा सिनेमा इतक्या वर्षानंतर बघतो; त्यावेळी शक्ती सामंत यांनी घेतलेल्या मेहनतीचे नक्कीच ऍप्रीसिएशन करावे वाटते. भले त्या वेळेला या चित्रपटाला त्याच्या गुणवत्ते इतके यश मिळाले नसले तरी आज हा सिनेमा अमिताभचा एक कल्ट सिनेमा म्हणून आपण त्याकडे बघू शकतो. अमिताभ बच्चन हा त्या काळातील सुपरस्टार होता त्यामुळे त्याच्या सिनेमाला यश हे हमखास मिळणार याची खात्री असल्यामुळे हा चित्रपट देखील यशस्वी होईल असंच प्रत्येकाला वाटत होतं. पण या चित्रपटाने ऍव्हरेज कॅटेगिरी मधील यश मिळाले होते. अर्थात त्यानंतर पुढची दहा वर्षे या सिनेमाने रिपीट रनला चांगला बिझनेस केला.

हा चित्रपट सेटवर १९७७ साली गेला होता. त्या वेळी त्यांची स्टार कास्ट होती अमिताभ बच्चन, झीनत अमान, नीतू सिंग आणि अमजद खान. पण अमजद खान यांना हा चित्रपट सुरुवातीपासूनच अनलकी ठरला. कारण ज्या दिवशी त्यांनी हा सिनेमा साइन केला त्याच दिवशी त्यांच्या वडिलांचे जयंत यांचे निधन झाले आणि या चित्रपटाच्या शूटिंगसाठी अमजद खान जेव्हा पहिल्यांदा गोव्याला चालले होते तेव्हा त्यांच्या कारचा सावंतवाडीला भीषण अपघात झाला. हा अपघात इतका डेंजर होता कि अमजद खान पुढचे काही महिने कोमात आणि नंतर वर्षभर हॉस्पिटलमध्ये होते. त्यांच्या जागी उत्पल दत्त यांची एन्ट्री झाली. चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा डबल रोल होता. परदेशात शूट केलेला हा अमिताभ बच्चन यांचा पहिला चित्रपट होता.
================================
================================
चित्रपटाचे निर्माते सीव्हीके शास्त्री होते. हा चित्रपट बनवताना त्यांनी खुलेआम खर्च केला होता . या चित्रपटाचे शूट गोवा, रोम, कैरो, लिस्बन आणि इतर मिडल इस्ट देशात झाले. होते सिनेमा एक जबरदस्त ॲक्शन पॅक सस्पेन्स स्पाय मुव्ही होता. मसाला ठासून भरला होता. चित्रपटातील गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली होती तर संगीत आर डी बर्मन यांचे होते. चित्रपटातील सर्वात गाजलेलं गाणं म्हणजे ‘दो लब्जो की है दिल की कहानी या है मुहोब्बत या है जवानी….’ हे गाणं एका इटालियन फोक ट्यूनवर आधारित होते. या गाण्याच्या सुरुवातीचा जो पीस आहे जो नावाड्यावर चित्रित आहे ते इटालियन गीत शरद कुमार यांनी गायलं होतं. हे गाणं त्या काळातील प्रचंड गाजलेलं गाणं होतं. आशा भोसले यांचे हे अत्यंत लाडकं गाणं. त्यानंतर त्यांनी हे गाणं स्वतःच्या स्वरात पुन्हा एकदा नव्वदच्या दशकात एका अल्बम करीता गायलं होतं.

‘पहले पहले प्यार की मुलाकाते याद है’ हे अमिताभ आणि नीतू सिंग यांच्यावर चित्रित गाणं देखील त्या काळात चांगलंच लोकप्रिय झालं होतं. चित्रपटात स्टायलीश खलनायकांची मोठी फौज होती. प्रेम चोप्रा, मदन पुरी, उत्पल दत्त , रुपेश कुमार सुजीतकुमार ,,, यातील मारधाड ॲक्शन जबरदस्त होती. यातील अमिताभ आणि शेट्टी यांचा मटन शॉप वरील फाईट सीन सेन्सर बोर्डाने अति हिंसक म्हणून काढून टाकला होता.

चित्रपटाचे कथानक बंगाली साहित्यिक विक्रमादित्य यांच्या कलाकृतीवर आधारित होते सिनेमाची पटकथा शक्ती सामंत आणि रंजन बोस यांनी लिहिली होती तर सिनेमाचे संवाद व्रजेंद्र गौर यांनी लिहिले होते. चित्रपटाचे नाव ‘द ग्रेट गॅम्बलर’ असल्यामुळे उत्तरेकडील ग्रामीण भागात हा इंग्रजी सिनेमा आहे की काय अशी शंका निर्माण झाल्याने चित्रपट पाहायला लोक येत नव्हते परंतु जेव्हा निर्मात्यांना ही गोष्ट कळली त्यावेळेला त्यांनी याचे पोस्टर्स वेगळे छापून ‘सबसे बडा जुआरी’ या नावाने सिनेमा पुन्हा रिलीज केला आणि सिनेमाला गर्दी वाढू लागली. झीनत अमान त्या काळातील हॉट स्टार होती. १९७९ या वर्षी तिचा हा एकमेव मोठा सिनेमा होता.
================================
हे देखील वाचा : अमिताभ बच्चन आणि Kamal Haasan यांचा हा सिनेमा अर्धवटच राहीला!
================================
१९७८ साली तिचे ‘डॉन’ ‘शालीमार ‘ आणि सत्यं शिवम सुंदरम’ हे तीन सिनेमे आल्याने तिला अनेक भूमिका ऑफर झाल्या होत्या.अमिताभ-नीतू सिंग यांच्या तीन सिनेमांपैकी हा दुसरा होता या पूर्वी १९७६ साली ‘अदालत’ आणि १९८१ साली ‘याराना’ मध्ये एकत्र आले होते. सिनेमातील गाण्यांचे लोकेशन्स जबरदस्त होते.’दो लब्जो की है …’ हे रोमांटिक गाणे इटली च्या व्हेनिस स्थित ग्रँड कॅनल इथे शूट झाले होते. तर ‘पहले पहले प्यार की मुलाकाते…’ हे गाणे पोर्तुगाल च्या लिस्बन येथी एडूवार्डो सेवन इथे शूट केले होते. सिनेमाचे डोळ्यांना सुखावणारे छायाचित्रण अलोक दास गुप्ता यांनी केले होते. एवढं सगळं जबरा असून सिनेमाने हवा तेवढा बिझिनेस पहिल्या रन ला नाही केला. ६ एप्रिल १९७९ रोजी प्रदर्शित झालेला ‘द ग्रेट गॅम्बलर’ अमिताभचा एक अंडर रेटेड सिनेमा असंच या सिनेमाबाबत म्हणावे लागेल.