
अमिताभ- गोविंदाचा सुपर हिट Bade Miyan Chote Miyan
क्रिकेटमध्ये नर्व्हस नायंटीज नावाची टर्म आहे. जेव्हा एखादा फलंदाज नव्वद च्या पेक्षा जास्त धावा बनवतो आणि शतकापासून काही पावलं मागे असतो त्यावेळी तो प्रचंड नर्वसनेस चा सामना करत असतो. यातून बऱ्याच खेळाडूंना आपलं शतक पूर्ण करता येत नाही. असाच काहीसा प्रकार अमिताभ बच्चन यांना वेगळ्या स्वरूपात नव्वदच्या दशकामध्ये आला होता. हे दशक हे त्यांच्यासाठी अतिशय संघर्षाचे होते. क्षणाक्षणाला कसोटी पाहणारे होते. या दशकामध्ये अमिताभ बच्चन यांनी जितकी लोकप्रियता त्या आधी पाहिली होती तितकाच पराभव, तितकीच उपेक्षा आणि तितकीच हाताशा या दशकात बघितली होती.पण एक सिनेमा या दशकात अमिताभ ला पुन्हा त्याचा हरवलेला आत्मविश्वास देऊन गेला. कोणता होता तो सिनेमा आणि नेमकं अमिताभच्या जीवनात असं काय घडलं होतं या दशकामध्ये?

याची सुरुवात नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीलाच… ‘हम’ तिकीट बारीवर बऱ्यापैकी चालला होता पण त्यानंतर मात्र या चित्रपटानंतर अमिताभ बच्चन यांच्यावर एकामागून एक संकट यायला सुरुवात झाली. त्यांच्या कोणत्याही चित्रपटाला यश मिळत नव्हतं. ‘अजूबा’, ‘इंद्रजीत’ आणि ‘अकेला’ या तीनही सिनेमांनी बॉक्स ऑफिस वर मान टाकली. ‘इंद्रजीत’ अमिताभचा शंभरावा सिनेमा होता. नव्वद च्या दशकातील सिनेमाचा जॉनर बदलला होता. नवीन खेळाडू मैदानात आले होते. प्रेक्षकांची टेस्ट बदलत होती. त्यांच्याशी कॉप अप करून घेणे अवघड होत होते. १९९२ साली आलेल्या ‘खुदा गवाह’ ने थोडी फार हवा निर्माण केली पण तो लोकप्रिय अमिताभ हरवत चालला होता हे नक्की.

१९९३ साली आलेल्या ‘इन्सानियत’ या सिनेमाने फ्लॉप सिनेमाचा इतिहास रचला. खरं हा सिनेमा खूप उशिरा रिलीज झाल्याने त्याच्यातील रया गेलीच होती. त्यानंतर अमिताभ बच्चन पुरता आर्थिक दुष्ट चक्राच्या वादळात बुडाला गेला. त्यावेळी त्यांनी स्वतःची अमिताभ बच्चन कार्पोरेशन लिमिटेड ही ए बी सी एल नावाची कंपनी सुरू केली. पासष्ट कोटी रुपये गुंतवून त्याने हि कंपनी निर्माण केली. १९९६ साली’ तेरे मेरे सपने’ हा या कंपनीचा पहिला चित्रपट देखील बऱ्यापैकी यशस्वी झाला. पण याच वर्षी मिस वर्ल्ड या सौंदर्य स्पर्धेच्या आयोजनात भाग घेतल्यामुळे कंपनीला प्रचंड मोठे नुकसान झाले ‘सात रंग के सपने’ आणि ‘ए बी बी बी ‘ हे म्युझिक अल्बम सुपर फ्लॉप झाल्यामुळे कंपनीचा तोटा आणखी वाढत होता आणि कंपनीचा तोटा चक्क 90 कोटी रुपयांवर गेला!
================================
हे देखील वाचा : Manoj Kumar : माला सिन्हा यांनी मनोज कुमार यांचा पाणउतारा केला होता.
=================================
आता एबीसीएल कंपनी दिवाळखोरीत निघत होती. अमिताभच्या ‘प्रतीक्षा’ या बंगल्यावर कोर्टाच्या जप्तीच्या नोटीस येऊ लागल्या होत्या. काही सावकारांकडून अमिताभ बच्चन यांना चक्क धमक्या देखील येत होत्या. त्यातच या कंपनीचा ‘मृत्यूदाता’ हा सिनेमा डिझास्टर बनला. या सिनेमाच्या फ्लॉपने कंपनीची उरली सुरली सगळी पत निघून गेली. आता अमिताभ बच्चन यांच्यावर वर्तमानपत्रात आणि मीडियामध्ये प्रचंड टीका सुरू झाली. इंडिया टुडेने तर ‘लुटा पीटा शहेनशहा’ या नावाने एक आर्टिकल प्रकाशित केले. अतिशय शेलक्या शब्दांमध्ये अमिताभ बच्चन यांच्या दारिद्र्याचे धिंडवडे सरे आम काढले जाऊ लागले.

पण याच काळात निर्माता वासू भगनानी आणि दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी अमिताभ बच्चन यांना ‘बडे मिया छोटे मिया’ या चित्रपटात कास्ट केले. यात अमिताभ बच्चन यांचा डबल रोल होता त्यांच्यासोबत गोविंदा यांचा देखील डबल रोल होता. कंप्लिट कॉमेडी एंटरटेनमेंट असा हा चित्रपट. हा सिनेमा कॉमेडी ऑफ एरर आणि बॅड बॉईज वर आधारित होता. पण जेव्हा अमिताभ बच्चन बाबतच्या बातम्या मीडियामध्ये येऊ लागल्या तेव्हा वासू भगनानी यांना काळजी खूप वाटू लागली. त्यांना वाटलं हा चित्रपट देखील आता फ्लॉप होणार. पण डेव्हिड धवन यांनी त्यांना धीर दिला आणि सांगितलं,” जर हत्ती पाळला आहे तर हत्ती एवढं काळीज देखील ठेवा!” आणि त्यांनी शांतपणे सिनेमा पूर्ण करायला सुरुवात केली. या सिनेमांमध्ये त्यांनी अमिताभच्या अँग्री यंग मॅन या इमेजला बाजूला करून अमिताभ बच्चन कॉमेडी सेन्स चा मोठा वापर केला. गोविंदा त्या काळातील चलनी नाणे होते. गोविंदाला स्टार बनवण्यामध्ये डेव्हिड धवनचा मोठा हात होता. ‘आंखे’,’कुली नंबर वन’ हे त्यांचे चित्रपट त्या काळात प्रचंड गाजत होते.
अमिताभ बच्चन यांनी देखील परिस्थिती काळजीपूर्वक हाताळली. त्यांना ठाऊक दहा वर्षांपूर्वी १९८७ जेव्हा बोफोर्स प्रकरणामध्ये संपूर्ण देशात त्यांच्या विरुध्द लाट आली होती; त्यांचा नवीन चित्रपट प्रदर्शित होणे दूर राहिलं पण त्यांचे जुने चित्रपट देखील लोक प्रदर्शित होऊ देत नव्हते. अशा कठीण प्रसंगांमध्ये ते ताऊन सुलाखून निघाले होते आणि त्यातून बाहेर देखील आले होते! तो आत्मविश्वास त्यांच्या मनात कुठेतरी जागा झाला होता. आणि या परिस्थितीतून सुद्धा आपण बाहेर येऊत याची त्यांना खात्री होती. म्हणून त्यांनी सगळं लक्ष या सिनेमावर केंद्रित केलं.

अमिताभ बच्चनची क्रेज देशात आणि परदेशात जबरदस्त होती त्यामुळे डेव्हिड धवन यांनी पंजाबी तडका असलेलं ‘मेरे प्यार का चखना ओय मखना…’ हे गाणं टाकलं. या गाण्यांमध्ये माधुरी दीक्षितचा कॅमियो होता. तोपर्यंत अमिताभ आणि माधुरी यांनी एकत्र स्क्रीन शेअर केलाच नव्हता. या चित्रपटाला संगीत कल्याणजी आनंदी यांचे पुत्र विजू शहा यांनी दिलं होतं. तर गाणी समीर यांनी लिहिली होती. 1998 साली ‘बडे मियां छोटे मियां’ हा चित्रपट पूर्ण झाला. १६ ऑक्टोबर १९९८ या दिवशी हा सिनेमा वासू भगनानी यांनी प्रदर्शित केला. त्यांच्या मनात प्रचंड भीती होती पण पहिल्याच दिवशी या सिनेमाने जबरदस्त ओपनिंग दिले. दिल्ली, मुंबई, बेंगलोर, हैदराबाद या मेट्रो सिटीमध्ये या सिनेमाचे प्रचंड मोठे स्वागत झाले. मुंबईला तर १४ थेटर्स मध्ये या सिनेमाने शंभर दिवस पूर्ण केले.
करण जोहर यांच्या ‘कुछ कुछ होता है’ या सिनेमाला या ‘बडे मिया छोटे मिया’ या चित्रपटाने चांगली टक्कर दिली. अमिताभ बच्चन हा संपला नाही हे या सिनेमाने दाखवून दिले. या सिनेमा नंतर अमिताभने लीड रोल करायच्या ऐवजी मध्यवर्ती भूमिका करण्याचा निर्णय घेतला. कोहराम, लाल बादशहा या सिनेमाला अपयश जरी आले असले तरी अमिताभ बच्चन यांच्या बाबतचे निगेटिव्ह पब्लिसिटी आता कमी झाली. २००० साली ‘मोहब्बते’ या सिनेमाने मात्र सर्वांचे तोंडे बंद केली. अमिताभ बच्चन काय क्वालिटीचा कलाकार आहे हे पुन्हा रसिकांना दिसले. २००१ सालापासून ‘कौन बनेगा करोडपती’ या माध्यमातून अमिताभ बच्चन याने आपले एक वेगळे विश्व निर्माण केले. आज २००५ साली देखील ‘कौन बनेगा करोडपती’ मोठ्या दिमाखात चालू आहे. एकूणच नर्वस नायंटीज मध्ये अमिताभ बच्चन ला बाहेर काढण्यामध्ये डेविड धवन च्या ‘बडे मिया छोटे मिया’ या चित्रपटाचा मोठा हात होता हे नक्की!