
Asha Kale : हा खेळ सावल्यांचा; गोमू संगतीनं माझ्या तू येशील का?
मराठी चित्रपटामध्ये भयकथा किंवा सायकॉलॉजिकल थ्रिलर असे चित्रपट फारसे दिसत नाही काही अपवाद नक्की आहेत पण या जॉनवरचे सिनेमे मराठीत कमी आहेत हे नक्की. यावर्षी ‘जारण’ हा एक चित्रपट या कॅटेगरीतील आला आणि प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. मराठी सिनेमाच्या भूतकाळात जर बघितलं तर अशा चित्रपटांची संख्या बोटावर मोजण्या इतकी आहे. यातील एक चित्रपट आहे १९७६ साली प्रदर्शित झालेला ‘हा खेळ सावल्यांचा’ हा चित्रपट खऱ्या अर्थाने भयकथा हा जॉनर अधोरेखित करणारा होता. उत्तम कथानक, बंदिस्त पटकथा, कलाकारांचे उत्तम अभिनय,अप्रतिम गाणी आणि त्याला साजेसे सदाबहार संगीत यामुळे या चित्रपटाला त्या काळात चांगली लोकप्रियता मिळाली होती.

आज ‘जारण’ च्या निमित्ताने या चित्रपटाची आठवण होणे स्वाभाविक आहे. ‘हा खेळ सावल्यांचा’ हा चित्रपट १९७६ साली प्रदर्शित झाला. खरं तर त्या काळात मराठी सिनेमा विकसनशील अशा अवस्थेत होती. रंगीत चित्रपटांचे मराठीतील युग नुकतेच (‘पिंजरा’ च्या यशानंतर) सुरू झाले होते. या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक वसंतराव जोगळेकर यांनी तब्येतीने हा चित्रपट बनवला होता. कथा त्यांची पत्नी सुमती गुप्ते यांची असली तरी नारायण धारप यांच्या ‘काजळी पौर्णिमा’ या कथेची थोडसं साम्य आढळतं. चित्रपटात काशिनाथ घाणेकर, आशा काळे, धुमाळ, लालन सारंग आणि राजा गोसावी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटातील रहस्य शेवटपर्यंत कायम टिकवण्यामध्ये दिग्दर्शकाला यश आले होते. यातील हॉरर सीन बऱ्यापैकी प्रेक्षकांना घाबरवणारे होते! वातावरण निर्मिती, उत्कंठा, रहस्य ठासून भरलं होतं.

हा सिनेमा आज देखील आठवला जातो त्यातील गीत आणि संगीतासाठी. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी अतिशय सुंदर असं संगीत या चित्रपटाला दिला होता यातील सर्वात गाजलेले गाणं हेमंत कुमार आणि आशा भोसले यांनी गायलं होतं. ‘गोमु संगतीने माझ्या तू येशील का?’ काशिनाथ घाणेकर यांच्या डान्स स्टेप्स बऱ्यापैकी विनोदी वाटत होत्या पण त्या काळात ते चालून गेले. अभिनेत्री आशा काळे यांच्यासाठी या चित्रपटातील भूमिका एक चॅलेंजिंग होती आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ती भूमिका निभावली. या सिनेमात काही प्रसंगात त्या पॅन्ट शर्ट मध्ये दाखवल्या होत्या.

नेहमी नऊवारी साडीत पाहणाऱ्या आशा काळेंना या पेहरावत पाहणं एक वेगळा अनुभव होता. या चित्रपटातील टायटल सॉंग महेंद्र कपूर यांनी गायलं होतं. या चित्रपटातील गाणी सुधीर मोघे यांनी लिहिली होती. सुधीर मोघे यांचे खरोखरच कौतुक कारण यातील टायटल सॉंग मधील गाण्यांचे शब्द पहा ‘ हा चंद्र ना स्वयंभू रवितेज वाहतो हा ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा ….’इतक्या अप्रतिम शब्दांना संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी सुंदर चाल लावली होती. आशा भोसले आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील ‘आला आला वारा संगे पावसाच्या धारा पाठवणी करा सया निघाल्या सासुरा….’ फार सुंदर जमून आले होते. ‘काजळ राती ने ओढून नेला…’ हे गाणं देखील चित्रपटात योग्य प्रसंगात टाकले होते!
दिग्दर्शक वसंतराव जवळेकर यांचे स्नेही अशोक कुमार यांचे देखील दर्शन या चित्रपटात घडते तसेच हास्य अभिनेता देवाण वर्मा याची देखील या चित्रपटात छोटी भुमिका आहे. राजा गोसावी यांना आपण कायम विनोदी भूमिका पाहिलं पण या चित्रपटात त्यांना खल प्रवृत्तीची भूमिका करताना दिसतात. डॉ. काशिनाथ घाणेकर खरंतर रंगभूमीवरचे सुपरस्टार पण सिनेमाशी त्यांचं फारसं कधी जमलं नाही तरी या चित्रपटात त्यांनी चांगला अभिनय केला होता. (या सिनेमात राजा गोसावी यांना एक डॉयलॉग होता ते म्हणतात “ आजकाल गल्ली बोळातला कोणीही उठतो आणि नटसम्राट करतो. पण खरा नटसम्राट एकच बालगंधर्व!” हा डायलॉग खरंतर चित्रपटात असण्याची गरज नव्हती. पण डॉक्टर काशिनाथ घाणेकर आणि डॉक्टर श्रीराम लागू यांच्यातील शीतयुद्ध त्या काळात जोरात चालू होतं. त्यामुळे कदाचित घाणेकरांच्या आग्रहामुळेच डॉक्टर लागू यांना चिडवण्यासाठी हा डायलॉग टाकला होता का?)

या सिनेमाचे बरेचसे शूटिंग पुण्यातल्या मुळा मुठा संगमावरील सीओईपीच्या मागच्या नाईक बेटावर झाले होते. चित्रपटात सर्वच कलावंतांची कामे अतिशय सुंदर झाली होती. विशेषत: धुमाळ आणि राजा गोसावी हे कॉम्बिनेशन जबरदस्त होते. चित्रपटाचा क्लायमॅक्स जबरदस्त होता. प्रेक्षकांना एक अनपेक्षित धक्का यातून मिळत होता. दिग्दर्शकाचे हे यश म्हटले पाहिजे वन टाइम वॉच मूवी नक्की आहे. युट्युब वर हा सिनेमा नि: शुल्क उपलब्ध आहे. मराठी सिनेमांमध्ये देखील एकेकाळी चांगले प्रयत्न आणि प्रयोग घडत होते हे या निमित्ताने आपल्याला जाणवते!