Heer Ranjha या सिनेमाचे सर्व संवाद काव्यात्मक शैलीत (Poetic Form)

Dine In Film Theatre आणखीन एक पुढचं पाऊल
चित्रपट संस्कृतीतील एक महत्वाचा फंडा म्हणजे, चित्रपट पडद्यावर सुरू असताना काही तरी खा प्या. मजा करा. पोट भरा. कर्नाटकातील बैगलारु (बंगलोर) येथील पीव्हीआर आयनॉक्स या मल्टीप्लेक्सचे आणखी एक पुढचं पाऊल, डाईन इन चित्रपटगृह. आपल्या देशातील हे पहिले डाईन इन चित्रपटगृह आहे. पडद्यावर चित्रपट सुरू असतानाच समोर खाण्या पिण्याचसाठी टेबल. दोन खुर्च्याच्या टेबलाचे तिकीट ४९० रुपये व चार खुर्च्याच्या टेबलाचे तिकीट ९९० रुपये असे आहे. अर्थात खाण्या पिण्याचे पैसे वेगळे. कोणी चित्रपट पाहण्यासाठी जाईल आणि खाण्याची ऑर्डर देईल तर कोणी खावो पिओ मजा करो यासाठी जाईल आणि चित्रपट पाहिल. (खाण्यातील चव आणि चित्रपटाची आवड यांचा मेळ बसायला हवा). या मल्टीप्लेक्समध्ये कन्नड तमिळ, तेलुगू, मल्याळम चित्रपटासह विदेशी चित्रपट एन्जॉय करता येतील, त्यासह कॉमेडी शो, कार्पोरेट नाईटस यांचेही शो आहेत. वाढदिवस पार्टीसाठीही उत्तम स़ोय आहे. एकूण आसन क्षमता सत्तर इतकी आहे. म्हणजे शो लवकर हाऊसफुल्ल होण्याची खात्री जास्त आणि लगोलग सोशल मीडियात पोस्ट देखिल.
माझ्यासाठी ही एक फ्लॅशबॅकमध्ये जाण्याची संधी. गिरगावात मी लहानपणी मॅजेस्टिक चित्रपटगृहात ब्लॅक अॅण्ड व्हाईट अर्थात कृष्ण धवल मराठी चित्रपट पाहण्यासाठी जाताना साबुदाणा खिचडी अथवा कांदे पोह्याचा डबा आणि प्लॅस्टिकच्या बाटलीत पाणी न्यायचो असे म्हटलं तर तुमच्या मनात प्रश्न आला असेल, इतके काय पैसे वाचवत होता? तरी बरं तेव्हा तिकीट स्वस्त होते असेही म्हणाल. (आज स्वस्त दराचे वाटणारे तिकीट त्या काळातील आर्थिक दरानुसार होते हे विसरु नका हो.)
अहो, पिक्चरला जाताना घरचा डबा नेण्याची पध्दतच होती तेव्हा आणि पिक्चरचा जाणे म्हणजे एक प्रकारची कौटुंबिक सहलच असे. गिरगावातील तेव्हाच्या सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृहात आणि बाहेरही वेफर्स, बटाटा वडा, समोसा, वडापाव, सॅन्डवीच, पॉपकॉर्न, चहा आणि आईस्क्रीम, सॉफ्ट ड्रिंक्स मिळत असले तरी आम्हा मध्यमवर्गीयांचे ‘पहिले लक्ष्य’ पिक्चर आणि मग मध्यंतरात घरचा डबा हेच असे. श्रावण महिन्यात पौराणिक चित्रपट पाहण्याची पध्दत होती आणि डब्यात अळूवडी, साबूदाणा वडा येई. मध्यंतर होता क्षणीच सॉफ्ट ड्रिंक्सच्या बाटल्यांवर ओपनर फिरवल्याने येणारा आवाज काही वेगळाच. तो आजही कानात घुमतोय. ते दिवस वेगळे होते. आजही आठवणीत आहेत.आणि त्या काळात मॅजेस्टीक, इंपिरियल या थिएटरमध्ये पाणी पाच पैसे ग्लास मिळे. एक भला मोठा काळा माठ घेऊन एक पाणी विक्रेता बसलेला असे हे आजही डोळ्यासमोर येतेय. तरी घरची पाण्याची बाटली सांभाळून वापरली जाई. सर्वांना पाणी पुरायला हवे ही कौटुंबिक भावना. एकत्र कुटुंब पद्धतीतील ही एक कौतुकास्पद गोष्ट.
================================
हे देखील वाचा : जया, रेखा यांच्याआधी ‘या’ मुलीवर होतं Amitabh Bachchan यांचं प्रेम
=================================
कॉलेजमधील मित्रांसोबत पिक्चरला जाताना अर्थात घरचा डबा पुढील येणाऱ्या पिढीत गेलेला असे. थिएटर्समधले आणि बाहेरचे खाणे मात्र तेच होते. बाहेर दहा पैशात चणे, शेंगदाणे मिळत. खिसा भरायचा. ‘भरलेला खिसा, भरलेले मन’. तरीदेखील मध्यंतरमध्ये काही खायलाच पाहिजे असेच काही नसे. पिक्चर महत्वाचा. मध्यंतरनंतर पिक्चरमध्ये काय असेल याचे विचारचक्र माईंडमध्ये सुरु असे. सस्पेन्स पिक्चर असेल तर ‘खूनी हा की तो’ यावर विचार हेच इंटरव्हलमधले खाद्य. चांगला पिक्चर पाहून पोट भरते असे मनापासून बोलणारे फिल्म दीवाने त्या काळात होते. कॉलेज मित्रांसोबत मॅटीनी शो एन्जाॅय केल्यावर एकाद्या इराणी हॉटेलमध्ये गप्पांचा फड रंगायचा. ब्रून मस्कापासून बुरजी, आमलेट पावापर्यंत, ताव मारताना ‘नुकत्याच पाहिलेल्या पिक्चरचे बरे वाईट उभे आडवे ऑपरेशन ठरलेले.’ देव आनंद, शम्मी कपूरचे जुने म्युझिकल हिट मॅटीनाला हमखास पाहणे होई. राजेश खन्नाचा एकादा पिक्चर पाह्यला असेल तर पिक्चरपेक्षा त्याच्या मॅनॅरिझमवर बोलणे जास्त होई. ज्यूक्स बाॅक्स असलेल्या इराणी हॉटेलमध्ये असलो की ज्यूस बॉक्समध्ये. आठ आठ आण्यांची किती नाणी टाकून किती गाणी ऐकून होत हे मोजले जात नसे. असं कोणी मोजून मापून चित्रपट, त्याचे स्टार, त्याची गाणी यावर प्रेम करते काय? कधी सहाचा अथवा सेकंड शो पाहिल्यावर कधी तरी बिअर हेदेखील चित्रपट संस्कृतीचे तरुणपणातील देणे.
अनेक पिढ्या हेच सुरु होते. हळूहळू घरचा डबा मागे पडला. खरं तर तो एकत्र कुटुंब पध्दतीत होता. ती एकीकडे मागे पडली. नव्वदच्या दशकात आपल्या देशात आर्थिक उदारीकरण, खुली अर्थव्यवस्था रुजत जाताना एकूणच बाहेरच्या खाण्याला महत्व येत गेले तसेच ते मुव्हीजच्या इंटरव्हललाही खाणे हवेसे झाले. (या काळातील पिढी चित्रपटाला मुव्हीज म्हणू लागली. हीसुध्दा प्रगतीच.) मल्टीप्लेक्स युगात समोसा, पॉपकॉर्न आणि सॉफ्ट ड्रिंक्स असे समिकरण आले. एकत्र पॅकेज घ्या हेही आलेच. हे महाग असूनही ते सहज परवडणारा क्लासही निर्माण झाला. आणि पाण्याची महागडी बंद बाटलीही मिळू लागली. एखाद्या बिग बजेट मुव्हीजच्या वेळी मल्टीप्लेक्समधील फूड मार्केट जबरा बिझनेस करु लागले.
या खाद्यसंस्कृतीत मग केवढी तरी पदार्थांची वाढ झाली. मला तरी अनेकांची नावेच समजत नाही, चव काय समजणार? अनेक प्रकारचा आईस्क्रीम मिळू लागला. यात हात आणि तोंड इतके आणि असे बिझी झाले की एकाद्या भारी डायलॉगला टाळ्या देता येईना (खरं तर हमखास टाळ्या वाजवाव्यात असे आजच्या मुव्हीजमध्ये संवाद असतात का? त्यासाठी हिंदी व उर्दू भाषेवर प्रभुत्व हवे.) फार पूर्वी काही फिल्म दीवाने खुर्चीवर बसल्या जागेवरुन पडद्यावरच्या हीरोला सल्ला देत अथवा तेही हिरोसह बोलत. पण आता जिभेवर समोसा, पॉपकॉर्न असल्याने कसं बोलणार?
================================
हे देखील वाचा : अभिनेत्री रेखाने नववीत असतानाच का शाळा सोडली?
=================================
मुव्हीज आणि खाणे ही संस्कृती अधिकाधिक घट्ट होत जाण्यास मॉल मल्टीप्लेक्समधील अनेक प्रकारची देश विदेशी खाद्य पदार्थांची फूड सेंटर, रेस्टॉरंट्सनी प्रचंड ‘हात’भार लावला. अनेकांसाठी मुव्हीज व नंतर हायफाय खाना हे हुकमी समीकरण असते. काही हरकत नाही. कारण मुव्हीज पाहण्याचे बजेट वाढल्याच्या फॅमिलीज शहरात खूप आहेत. ते कार्ड्स पेमेंट करतात. पण थाई अथवा इटालियन, रशियन फूड खाताना नुकत्याच एन्जाॅय केलेल्या मराठी अथवा हिंदी चित्रपटावरही थोडी तरी चर्चा करा. यात त्यांचाही दोष नाही. मुव्हीज कसा आहे यापेक्षा त्याने किती कोटी कमावले, या मुव्हीजमधील नटीचा घटस्फोट झाला का अशाच विशेष गोष्टींवर चवीचवीने बोलण्याची सवय नेमकी कोणी लावलीय हे समजलेच नाही. सर्वस्तरीय बदल झालाय हो.
अर्थात, ऐंशीच्या दशकातील व्हिडिओ, नव्वदच्या दशकातील चॅनेल, मग लॅपटॉप, मोबाईल स्क्रीनवर मुव्हीज आणि आता ओटीटीवर हवी तेवढी विविधता यात आणखीन एक गोष्ट रुजलीय. जवळपास प्रत्येक वेळी बाहेरचे हवं ते खाणे घरी मागवायचे आणि ते खात खात मुव्हीज पाह्यचा. आपलेच घर होम थिएटर आणि आपण निवडू त्या भाषेतील चित्रपट (तेलगू, तमिळही चालेल) आणि आपण मागवू तो खाना/पिना असे घट्ट समिकरण रुजलयं.

चित्रपट आणि खाद्य संस्कृतीचा बदलत्या चवीचा प्रवास असा अनेक वळणे घेत चाललाय. मला मात्र आठवतेय, ऑपेरा हाऊस थिएटरला समोसा तर इरॉस थिएटरबाहेर टोस्ट सॅण्डवीच आणि मिनर्व्हा थिएटरबाहेर वडापाव चांगलाच मिळे. कॅपिटॉलचा आराम वडापाव अनेकदा पिक्चरपेक्षा आवडे. त्या काळात मध्यंतरला थिएटरबाहेर यायला मिळे (तरी पुन्हा पडद्यासमोर कधी जाऊन बसतोय असे होई.) मिनर्व्हा थिएटरबाहेरच्या वडापाव, सॅण्डवीच, समोसा विकणारे ‘शोले’ अक्षरश: धो धो हाऊसफुल्ल गर्दीत सुरु असतानाच्या काळात आर्थिकदृष्ट्या ‘गब्बर ‘ झाल्याच्या कथा दंतकथा पसरल्या. काही थिएटरबाहेरचे असे विक्रेते ब्लॅक मार्केटवाल्यांची तिकीटे सांभाळत असेही म्हटले जाई आणि अनेकदा तरी फर्स्ट डे फर्स्ट शोचा पब्लिक रिपोर्ट कसा आहे हे याच खाद्य पदार्थ विक्रेत्यांना मध्यंतरातील पब्लिकच्या कॉमेन्टसमधून समजे…..
चित्रपटाचा प्रवास असा प्रेक्षकांच्या पोटातूनही झाला आहे आणि हा सर्वकालीन रसिकांचा उत्तम अनुभव आहे. चित्रपट संस्कृतीतील हीदेखील एक महत्त्वाची गोष्ट. चित्रपट अभ्यासात ही गोष्ट नसेल पण चित्रपटगृह संस्कृतीत ती बदलत बदलत डाईन इन चित्रपटगृहापर्यत आली आहे. ही चवच वेगळी.