‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Red Soil Stories च्या शिरीष गवसला नेमकं काय झाल होत? अखेर पत्नी पूजाने सगळचं सांगितलं…
कोकणी आणि मराठी प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या रेड सॉइल स्टोरीज या यूट्यूब चॅनेलने काही महिन्यांपूर्वी सर्वांना हादरवून टाकलं होतं. कारण या लोकप्रिय चॅनेलचा निर्माता, कोकणचा लाडका चेहरा आणि असंख्य चाहत्यांच्या मनातील कलाकार शिरीष गवस अचानक कायमचा दूर गेला होता. वयाच्या अवघ्या ३३व्या वर्षी शिरीषने घेतलेली ही अकाली एक्झिट आजही प्रत्येक चाहत्याला पोकळीची जाणीव करून देते. त्याने अथक परिश्रमांनी उभं केलेलं हे चॅनेल अजूनही त्याचं नाव जिवंत ठेवतंय.(Red Soil Stories Shirish Death)

अलीकडेच रेड सॉइल स्टोरीजवर शिरीषच्या पत्नी पूजा गवस हिने एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने पहिल्यांदाच पतीच्या निधनामागचं सत्य सर्वांसमोर आणलं. पूजाने सांगितलं की, काही महिन्यांपूर्वी शिरीषला सर्दी आणि डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला होता. सुरुवातीला त्याला साधा सायनस आहे असं समजून उपचार सुरू झाले. पण नंतर त्याच्या किडनीमध्ये दगड असल्याचं निदान झालं. सर्जरीनंतर तो ठीक झाला आणि आयुष्य पुन्हा नेहमीसारखं चालू झालं. त्यांनी मुलीच्या पहिल्या वाढदिवसाची तयारीसुद्धा केली. पण याच काळात शिरीषची प्रकृती अचानक बिघडू लागली. उलट्या, चक्कर आणि पित्ताच्या त्रासामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

उपचारादरम्यान त्याला अचानक फिट्स येऊ लागल्या. डॉक्टरांनी तातडीने सीटी ब्रेन तपासणी केली आणि त्यात धक्कादायक गोष्ट समोर आली — शिरीषच्या मेंदूत गाठ होती आणि त्यात पाणी भरलं होतं. मुंबईपर्यंत नेणं शक्य नसल्याने त्याला गोव्यातील जीएमसी बंबोळी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. तिथे तज्ज्ञ डॉक्टरांनी तत्काळ मेंदूतली सूज आणि पाणी काढण्यासाठी शस्त्रक्रिया केली. सहा तासांच्या दीर्घ सर्जरीनंतर डॉक्टरांना त्याला स्थिर करण्यात यश आलं. काही दिवसांनी शिरीष शुद्धीवर आला आणि त्याच्या तब्येतीत सुधारणा दिसू लागली. मात्र मेंदूमधील ट्यूमर अजूनही धोकादायक स्थितीत असल्याने दुसरी मोठी सर्जरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ती अत्यंत जोखमीची होती. सात-आठ तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांना फक्त काही भाग काढता आला, कारण ट्यूमर मेंदूच्या अतिसंवेदनशील भागात होता. थोडासा धक्का बसला असता तरी चालणे, बोलणे किंवा स्मृती हरवण्याचा धोका होता. तरीही शिरीष बरा होत होता, व्यायाम आणि औषधांना तो सकारात्मक प्रतिसाद देत होता.पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. काही दिवसांनी त्याला ताप आणि संसर्ग झाला. चाचण्यांनंतर समजलं की त्याच्या लघवी आणि मेंदूतील द्रवात इन्फेक्शन झालं आहे. डॉक्टरांनी पूर्ण प्रयत्न केले, पण शेवटी काहीच उपयोग झाला नाही. फक्त पाच दिवसांत शिरीषने अखेरचा श्वास घेतला.
===========================
===========================
नंतरच्या तपासणीत स्पष्ट झालं की, शिरीषला हा ट्यूमर लहानपणापासूनच होता, पण तो शांत अवस्थेत असल्याने लक्षणं दिसली नव्हती. शेवटच्या क्षणीसुद्धा त्याने लढा दिला, पण नशिबाच्या लढाईत तो हरला. पूजाने भावुक होत सांगितलं “अंथरुणावर खिळून राहणं शिरीषच्या वाट्याला नव्हतं, म्हणूनच तो हसत-खेळत गेला.” शिरीष गवस गेल्यानंतरही रेड सॉइल स्टोरीज त्याचं अस्तित्व जिवंत ठेवतंय. प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक संवादात त्याचा आत्मा अजूनही जाणवतो कोकणचा हा लाल मातीचा मुलगा आजही प्रत्येकाच्या हृदयात जिवंत आहे.