
Movie Review : ‘तीन पायांचा घोडा’ ठरला लंबी रेस का घोडा!
तुमचे आयुष्यात कधी घोडे लागले आहेत का ? १०० टक्के लागलेच असतील, त्यात शंका नाही. पण या ‘तीन पायांचा घोडा’ चित्रपटाची स्टोरीसुद्धा काही अशीच आहे. खर तर भाडीपा म्हणजे सारंग साठेची भारतीय डिजिटल पार्टी सिनेनिर्मितीत कधी उतरली नव्हती. पण आता उतरली आणि त्यांनी धमाकाच केला आहे. मराठीत पहिल्यांदाच काहीतरी आगळं-वेगळं आणि भन्नाट आलं आहे. एक असा प्रयोग जो याआधी कुणीच केला नव्हता. त्यात नवख्या दिग्दर्शक आणि लेखक नुपूर बोराचं व्हिजन इथे वाखाणण्याजोगं आहे. गायक राहुल देशपांडे यांचाही या चित्रपटाला हातभार लागला आहे. मुळात हा coming Age Comic ड्रामा चित्रपट जितका Realistic वाटतो तितका Relate सुद्धा होतो. चला तर जाणून घेऊया हा ‘तीन पायांचा घोडा’ कसा आहे आणि तो का बघावा….
ही गोष्ट फिरते २००१ ते २००३ या तीन वर्षांभोवती… पण ती आजच्या GenZ लोकांनाही कनेक्ट होईल अशी स्टोरी आहे … तर, अदनान, चंद्रिका आणि राठोड या तीन मित्रांची ही कथा… अदनान आणि चंद्रिका कपल आहेत… चंद्रिका थोडी धतिंगगिरी करणारी… अदनान पण चिल माणूस… घरदार लाईफ सगळ ठीकठाक आहे… तरी काही कारणांमुळे त्यांचेही आयुष्यात घोडे लागलेले आहेत. त्यामुळे त्यांना एका गोष्टीची गरज पडते आणि त्यांच्या आयुष्यात येतो एक Gambler मित्र राठोड ! शांत संयमी लाजरा पण कन्फ्युज्ड, साधे कपडे घालणारा, कमी बोलणारा, कमी हसणारा… कमी एन्जॉय करणारा… पण त्याला Gambler का म्हटलं हे तुम्हाला चित्रपटात कळेलच…

तर या तिघांची मैत्री होते… मग मित्रांची धमाल, मस्ती, मजा, दारूपार्टी आणि कांड सुरुच असतात. पण तरीही तिघांच्या आयुष्यात काही गोष्टींची कमतरता असतेच.. यासाठी तिघेही एकमेकांची मदत घेतात, पण यामध्ये ते कसे गुंफतात, मैत्रीला गालबोट कसं लागतं, यासाठी तुम्हाला थिएटर गाठलं पाहिजे. बघा, मैत्रीवर आधारित खूप सारे मराठी कमर्शिअल सिनेमे याआधी आले आहेत… पण ‘तीन पायांचा घोडा’ तुम्हाला एक खरा-खुरा अनुभव देतो, म्हणजे तुमच्या आयुष्यात कधीतरी असे प्रसंग आलेच असतील, इतके तुम्ही मुव्हीसोबत कनेक्ट होऊन जाता. त्यासोबतच मेकर्सनी एकदम २००३ चा काळच उभा केलाय… छोट्या छोट्या डीटेलिंगमुळे मुव्ही जास्तच एंगेजिंग वाटतो.
आता येऊया चित्रपटाच्या कास्टवर… तर अदनानच्या भूमिकेत आहे कुणाल शुक्ल, चंद्रिकाच्या भूमिकेत आहे रिया नलावडे आणि राठोडच्या भूमिकेत आहे अविनाश लोंढे… या चित्रपटाची एक खास गोष्ट माहितीये का? की हा चित्रपट अनेकांसाठी डेब्यू आहे. म्हणजे या तिन्ही लीड ACTORS चा तर डेब्यू आहेच… पण डिरेक्टर नुपूर बोराचाही हा डेब्यू मुव्ही आहे आणि भाडीपाचाही निर्मितीच्या बाबतीत हा पहिलाच चित्रपट आहे. पण या सर्वांनी काम असं केलं आहे की यांना सिनेमाचा कमालीचा अनुभव आहे की काय ? रिया आणि कुणाल हे दोघेही थीएटर ARTIST आहेत. अविनाश लोंढेबाबत सांगायचं झालं तर त्याला थिएटर आणि Acting कशाचाही अनुभव नाही आहे. तो एकतर फिटनेस instructor आहे… त्यात एकदा जिममध्ये काहीतरी गाणं गुणगुणत असताना त्याला निर्मात्यांनी हेरलं आणि भावाला मुव्हीचं तिकीट लागलं. यांच्याव्यतिरिक्त मराठीतले काही डेकोरेटेड कलाकर देविका दफ्तरदार, संदेश कुलकर्णी यांनीही उत्तम काम केलं आहे.
SPOILER देत नाही, पण यातला एक चोरीचा सीन आहे, त्यावेळी इतकं भारी BACKGROUND म्युझिक आहे की, तुमची उत्कंठा वाढू लागते की, पुढे काय काय होणार आहे आणि कोणाचे कसे घोडे लागणार आहेत. म्युझिक हा चित्रपटाचा खूप STRONG POINT आहे. याला म्युझिक दिलंय, भूषण मते आणि मयूर दर्डा यांनी… BACKGROUND स्कोर आणि यातली गाणी खूप ग्रीपिंग आहेत, जी तुमचा चित्रपटातला उत्साह आणखी वाढवते. ‘तीन पायाचा घोडा’ची आणखी एक सुंदर गोष्ट म्हणजे याचं एडिटिंग आणि सीनेमेटोग्राफी… या दोन्ही गोष्टींमध्ये सुहास देसले हे नाव कॉमन आहे. सुहास देसले तेच… ज्यांनी ‘अमलताश’ हा म्युझिकल ROMANTIC ड्रामा DIRECT केला होता. जो गेल्या काही वर्षांमधला मराठीतल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक आहे. देसलेंची जादू इथेही तुम्हाला दिसून येईल.

टेक्नीकली हा चित्रपट निर्मात्यांनी योग्यरीत्या प्रेजेंट केलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नुपूर बोराचं दिग्दर्शन जबरदस्त… चित्रपट खूप स्मूथली त्याने Handle केलेला आहे. खरं तर फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफ दोघांमध्ये एका सेकंदालाही बोअर होत नाही, अशी या चित्रपटाची स्टोरी आहे. फक्त चित्रपट थोडासा स्लो पेस ही एकच याची निगेटिव्ह बाजू आहे. दिग्दर्शक बोरा हे चित्रपटाचे रायटरसुद्धा आहेत. योगेश जोशी यांच्यासोबत त्यांनी हा चित्रपट लिहिला आहे. चित्रपटात असा एकही दमदार डायलॉग किंवा इन्स्पायरिंग टाईप सीन नाहीये… आणि त्याची गरजही वाटत नाही. असं म्हणतात ना… SILENCE IS LOUDER THAN THE SCREAM ! त्यामुळे चित्रपटाचे जितके साधे संवाद तितका मुव्ही बोलका जास्त वाटतोय.
================================
हे देखील वाचा : ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ – डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा चित्रपट; पण तरीही…
================================
फ्रेंडशिप, प्रेम आणि अपराध आणि या सर्वांमुळे येणारे कॉम्प्लेक्स डिरेक्टरने चांगल्या पद्धतीने खुलवले आहेत. संभ्रम, भाबड्या अपेक्षा आणि त्याच्याद्वारे एक सुंदर, हलकाफुलका, हसवणारा, थोडंसं भावुक करणारा आणि अधूनमधून अंतर्मुख करायला लावणारा असा हा तीन पायांचा घोडा आहे. मराठी इंडस्ट्रीतली ही एक बोल्ड मुव्ह आहे. अजून एक गोष्ट सांगायची झाली तर न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये चित्रपटाने बेस्ट डेब्यू फिल्म आणि बेस्ट डिरेक्टर हे अवार्ड जिंकले आहेत. याशिवाय मेलबर्न इंडियन फिल्म फेस्टिव्हल, मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हल, काला घोडा आर्ट्स फिल्म फेस्टिव्हल अशा अनेक फिल्म फेस्टिव्हल्समध्ये झळकला आहे.
भाडीपा नेहमीच मराठी प्रेक्षकांसाठी काहीतरी युनिक आणत असतं. सोबतच राहुल देशपांडे ज्याप्रमाणे गायकीत उत्तम तसेच उत्तम मराठी सिनेमेसुद्धा इंडस्ट्रीला देत आहेत. हा ‘तीन पायांचा घोडा’ पळतो, धडपडतो, पण तो उठून कसा उभा राहतो, हे तुम्हाला कळेलच… त्यामुळे निश्चितच ‘तीन पायांचा घोडा’ मराठी इंडस्ट्रीमध्ये ४ पायांच्या घोड्यांच्या स्पीडने माईलस्टोन गाठणार एवढ नक्की ! येत्या ७ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे… तर मराठीमध्ये पहिल्यांदाच आलेली ही युनिक कलाकृती थिएटरमध्ये जाऊनच बघा…
कलाकृती मीडिया ‘तीन पायांचा घोडा’ला देत आहे पाच पैकी साडे चार स्टार्स !
-सागर जाधव