Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Subhash Ghai यांनी संगीतकार नदीम श्रवण यांना पुन्हा आपल्या संगीतात का रिपीट केले नाही?
राज कपूर यांच्यानंतर शोमन ही उपाधी दिग्दर्शक सुभाष घई यांना मिळाली. १९७६ सालच्या ‘कालीचरण’ या चित्रपटापासून त्यांनी दिग्दर्शन क्षेत्र निवडले आणि पहिल्या सिनेमापासूनच ते यशस्वी ठरले. सुभाष घई यांच्या चित्रपटातील संगीत नेहमीच लक्षवेधक आणि लोकप्रिय ठरले. त्यांनी संगीतकार बदलत ठेवले असले तरी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी त्यांच्याकडे बरेच चित्रपट स्वरबद्ध केले होते. ‘कालीचरण’ या चित्रपटाला संगीत कल्याणजी आनंदजी यांचे होते. यानंतर आलेल्या ‘विश्वनाथ’(१९७८) या चित्रपटाला संगीत राजेश रोशन यांनी दिले होते. त्यानंतरच्या ‘गौतम गोविंदा’(१९७९) या चित्रपटाला संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे होते.

१९८० साली सुभाष घई यांचा सुपरहिट ‘कर्ज’ हा चित्रपट आला आणि तिथून मात्र लक्ष्मीकांत प्यारेलाल त्यांच्या चित्रपटाचे परमनंट संगीतकार झाले. (अर्थात 1982 सालच्या ‘विधाता’ या चित्रपटाला कल्याणजी आनंदजी यांचे संगीत होते. या सिनेमाचे निर्माते गुलशन राय होते.) ‘कर्ज’ च्या पाठोपाठ आलेला ‘क्रोधी’ हा चित्रपट देखील एल पी यांनीच संगीतबद्ध केला होता. १९८३ सालच्या ‘हिरो’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. या चित्रपटाला संगीत एल पी यांचेच होते. यानंतर ‘मेरी जंग’(१९८५), ‘कर्मा’(१९८६), ‘राम लखन’(१९८९), ‘सौदागर’(१९९१) हे चित्रपट लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीताने हे सुपर हिट ठरले.
नव्वदच्या दशकात चित्रपट संगीताचा पोत बदलला. आता नवीन संगीतकार या क्षेत्रात येत होते. त्या काळात नदीम श्रवण यांची जबरदस्त चलती होती. ‘दिल है कि मानता नही’, ‘आशिकी’, ‘साजन’ हे त्यांचे सिनेमे सुपर डुपर हिट होत होते. सुभाष घई यांच्यावर देखील आता संगीतकार बदला असा दबाव येत होता. ‘सौदागर’ या चित्रपटाच्या नंतर एच एम व्ही या रेकॉर्ड कंपनी सोबतचे संबंध सोडून टिप्स या कंपनीने सुभाष घई यांच्याशी संधान साधले. ‘खलनायक’(१९९३) या चित्रपटाला पुन्हा लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचेच संगीत होते. सिनेमातील ‘चोली के पीछे क्या है…’ या गाण्याने रेकॉर्ड ब्रेक यश मिळवले. यानंतर १९९५ साली ‘ त्रिमूर्ती’ हा सुभाष घई यांचा चित्रपट आला. याचे दिग्दर्शन मुकुल आनंद यांनी केले होते. या चित्रपटाला देखील एल पी यांचे संगीत होते. पण हा चित्रपट अयशस्वी ठरला. हा चित्रपट फ्लॉप होण्याचे कारण केवळ संगीतच नव्हते तर इतर अनेक कारणे देखील होती. पण हा चित्रपट सुभाष घई यांच्याकडील एल पी यांचा शेवटचा सिनेमा ठरला. आता त्यांच्यावरचा संगीतकार बदला असा दबाव वाढत होता. त्यांना ए आर रहमान हवे होते पण त्या काळात ते बिझी होते.

यानंतर १९९७ साली सुभाष घई यांचा ‘परदेस’ हा चित्रपट आला. या चित्रपटाला मात्र नदीम श्रवण यांचे संगीत होते. नदीम श्रवण यांची काम करण्याची स्टाईल वेगळी होती. झटपट संगीत ते तयार करत. त्यांचे संगीत बऱ्यापैकी कॉपीड असायचे. पाकिस्तानातील अनेक गैर फिल्मी गाणी आणि गझल यावरून ते आपल्या सिनेमाचे संगीत तयार करायचे. ‘परदेस’ या चित्रपटाचे संगीत बनवताना त्यांनी हाच फॉर्मुला वापरला. परंतु सुभाष घई आपल्या संगीताबाबत खूप दक्ष असायचे. त्यांना हा चोरीचा प्रकार अजिबात आवडला नाही. नदीम श्रवण यांच्या सर्व बनवलेल्या ट्युन्स त्यानी रिजेक्ट करून टाकल्या! आणि त्यांना पुन्हा नव्याने काम करायला सांगितले.
==============
हे देखील वाचा : Sai Paranjpye यांच्या चित्रपटासाठी किशोर कुमार यांनी कलात्मक गाणे गायले!
==============
नदीम श्रवण यांना आयुष्यात पहिल्यांदाच सिनेमाचे संगीत देताना एवढी प्रचंड मेहनत करावी लागेली. सुभाष घई आपल्या चित्रपटातील संगीताच्या बाबत खूप जागरूक असायचे. गाण्याचे प्रिल्यूड आणि इंटरल्युड म्युझिक देखील त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे असायचे! ‘परदेस’ या चित्रपटाची गाणी बनवताना नदीम श्रवण यांना त्यांनी खूप दमवले. तेव्हा कुठे चित्रपटाची गाणी तयार झाली. तुम्ही बघा ‘परदेस’ ची गाणी तुम्हाला टिपिकल नदीम श्रवण स्टाईलची न वाटता ती घई यांची वाटतात. चित्रपट हिट ठरला परंतु नदीम श्रवण मात्र पुन्हा सुभाष घई यांच्यासोबत कधी दिसले नाहीत! याचे कारण एक तर नदीम श्रवण यांना या सिनेमासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली. एवढी मेहनत करण्याची त्यांची अजिबात तयारी नव्हती. दुसरे कारण सुपर कॅसेट कंपनीचे मालक गुलशन कुमार यांची १९९७ साली हत्या झाली आणि त्यामध्ये नदीम यांचे नाव जोडले गेले त्यामुळे नदीम भारत सोडून परदेशात निघून गेले! १९९९ साली आलेल्या ‘ताल’ या चित्रपटासाठी सुभाष घई यांनी संगीतकार ए आर रहमान यांची निवड केली!