
Mohammad Rafi यांनी आपल्या ड्रायव्हरला पन्नास हजाराची कार का गिफ्ट केली?
ज्येष्ठ पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या गाण्याबद्दल, त्यांच्या दिलदारपणा बद्दल आज देखील खूप बोललं जातं. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही प्रसंगांवर आज देखील सोशल मीडियावर खूप चर्चा होत असते. मोहम्मद रफी जितके चांगले पार्श्वगायक होते तितकेच किंबहुना त्याहून जास्त ते दरियादिल इन्सान होते. चित्रपट संगीत गाताना कधीही त्यांनी छोटा संगीतकार / मोठा संगीतकार किंवा छोटा अभिनेता / मोठा अभिनेता असा भेदभाव केला नाही. त्यांच्या दृष्टीने संगीत ही खुदाची इबादत होती. त्यामुळे त्यांनी गाणी गाताना कधीच पैशाचा विचार देखील केला नाही. कित्येक छोट्या संगीतकारांकडे त्यांनी अक्षरशः एकही पैसा न घेता गाणी गायली याचे अनेक किस्से आज देखील जुन्या चित्रपट रसिकांमध्ये सांगितले जातात. खरंतर ‘खुदा का नेक बंदा’ या शब्दात मोहम्मद रफी यांचे वर्णन करावे लागेल.

संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना १९६१ साली कल्पतरू दिग्दर्शित करीत असलेला ’छैला बाबू’ हा चित्रपट संगीत नियीजनासाठी मिळाला होता. आपल्या पहिल्याच सिनेमाकरीता रफीने गावं अशी त्यांची मनापासून इच्छा होती.ते दोघे रफी कडे गेले. ’हमारी इस पहली फिल्म मे हम आपसे गवाना चाहते है लेकीन आपको देनेके लिए हमारे पास पर्याप्त धन नही है’असं पहिल्या भेटीतच त्यांनी सांगून टाकलं.रफीला त्यांनी त्या गजलेची ट्यून ऐकवली.रफीला ती चाल खूप आवडली पण त्या पेक्षा ही त्यांना या दोघांची जिद्द,संगीताविषयीची जाण आणि स्वभावातील प्रामाणिक निरागसता जास्त स्पर्श करून गेली. रफीने सांगितले ’ जो आप मुनासिब समझे. कब रेकॉर्डींग करनी है?’लक्ष्मी-प्यारे दोघे खूष झाले.
असद भोपाली यांच्या गीताचे बोल होते.“तेरे प्यार ने मुझे गम दिया, तेरे गम की उम्र दराज हो” हि गजल रफी अगदी तन्मयतेनं गायला.(दुर्दैवाने हा सिनेमा पुरा व्हायला सात आठ वर्ष लागली व कसातरी रडत खडत १९६७ साली प्रदर्शित झाला) निर्मात्याकडून मिळालेल्या पैशातून त्यांनी रफीला एक हजार रूपये दिले.रफीने पैशाचा स्विकार केला व परत त्यांच्या हातात पैसे दिले.’ ये आप ही रखलो और आइंदा जिंदगी में इसी तरह मिल बाटकर खाओ’ रफीच्या मुखातून साक्षात परमेश्वरच बोलत होता. रफीचा आशिर्वाद त्यांनी आयुष्यभर पाळला.रफीने या जोडीकडे थोडी थोडकी नाही तर १७३ सिनेमातून ३६९ गाणी गायली.या दोघांची जोडी फोडण्याचा हितशत्रूंनी बराच प्रयत्न केला पण रफीचा आशिर्वाद त्यांच्या पाठीशी खंबीर होता त्या मुळेच लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर आणि प्यारेलाल रामप्रसाद शर्मा ६३५ चित्रपटांना संगीत देणारे हे ‘जिगरी दोस्त’ १९६३ ते १९९८ म्हणजे तब्बल ३५ वर्षे एकत्र काम करीत होते.

म.रफी त्यांच्या सोबत काम करणाऱ्या छोट्या छोट्या व्यक्तींची देखील खूप काळजी करत असत. मोहम्मद रफी यांना कारचा खूप शौक होता. ते कायम नवनवीन इम्पॉर्टंट गाड्या खरेदी करत असत. सत्तरच्या दशकात एकदा त्यांनी अमेरिकेच्या शेवरलेट कंपनीची इम्पाला ही अलिशान कार घेतली. ही कार लेफ्ट हॅन्ड ड्राईव्ह होती. त्यांच्याकडे जो सुलतान नावाचा ड्रायव्हर होता त्याला लेफ्ट हॅन्ड ड्राईव्हच्या कार वापरण्यात चा अनुभव नव्हता. त्यामुळे तो ही कार चालवू शकत नव्हता. त्याने बराच प्रयत्न केला पण त्याला शक्य झाले नाही. शेवटी नाईलाजाने त्याला कामावरून कमी करावे लागले आणि त्याच्या जागी इम्पाला लेफ्ट हॅन्ड ड्राईव्ह कार चालवणाऱ्या नवीन ड्रायव्हर ला घेण्यात आले. त्या रात्री मात्र म. रफी यांना खूप वाईट वाटले. “आपल्या स्वत:च्या एका शौका पायी एका गरीब ड्रायव्हरची नोकरी जात आहे.
यात खरं तर त्याचा काहीच दोष नाही. तो तर बेकार झालाच पण त्याचे कुटुंबीय त्यांचे काय?” पुढचे दोन दिवस रफी याच बेचैनी मध्ये होते. त्यांचे मित्र त्यांना म्हणाले,” रफी साब, काळजी करू नका. मुंबई मोठी नागरी आहे सुलतान ला नक्की काम मिळेल!” पण रफीचे मन आतून दुखावले होते. शेवटी त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. पन्नास हजार रुपये खर्च करून त्यांनी एक टॅक्सी घेतली आणि ती त्या सुलतान ड्रायव्हरला गिफ्ट केली. आणि सांगितले,” आता आजपासून ही गाडी तू वापरून तुझा व्यवसाय सुरू कर. काही कमी जास्त लागले तर मी आहेच. असं अजिबात समजू नको की आज तू माझ्याकडे काम करत नाहीस म्हणून. आपले संबंध पूर्वीसारखेच राहतील. तू केव्हाही माझ्याकडे येऊ शकतोस!” तो ड्रायव्हर अक्षरशः रडायला लागला आणि रफीच्या पायावर डोके ठेवले. रफीने त्याला उचलून आपल्या छातीशी घेतले आणि त्याला शुभेच्छा दिल्या.
================================
================================
त्या ड्रायव्हरने देखील ती टॅक्सी चालवत प्रामाणिक पणे आपला बिजनेस एवढा वाढवला की पुढे त्याचे मुले देखील याच व्यवसायात आले आणि नंतर त्याच्याकडे तब्बल 12 टॅक्सी झाल्या. रफी यांनी ड्रायव्हरचे दुःख ओळखून त्याला टॅक्सी गिफ्ट केली आणि त्याचे कुटुंबच नाही तर त्या अन्य व्यक्तींना देखील व्यवसाय मिळवून दिला.