VIROSH चं लग्न! विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने अखेर आपल्या नात्याची

Manna Dey :‘आओ ट्विस्ट करे….’ गाण्याच्या मेकिंग चा भन्नाट किस्सा!
भारतीय चित्रपट संगीतामध्ये वेस्टर्न म्युझिक चा अंतर्भाव चाळीसच्या दशकापासूनच होत होता. परंतु मुख्य संगीत धारेत त्याचं प्रमाण खूप कमी होतं. सी रामचंद्र यांनी काही पाश्चात्त्य ट्युन्सला हिंदीमध्ये आणले होते. गोरे गोरे ओ बांके छोरे, इना मीना डिका, मेरी जान मेरी जान संडे के संडे… ओ पी नय्यर यांच्या संगीतात देखील वेस्टर्न म्युझिकचा खरा प्रभाव दिसला. पण खऱ्या अर्थाने पाश्चात्य संगीत भारतीय चित्रपट संगीतात साठच्या दशकापासून दिसू लागले. आर डी बर्मन तथा पंचम यांनी वेस्टर्न म्युझिक ला भारतीय संगीताच्या प्रवाहात खूप चांगल्या तऱ्हेने अंतर्भूत केले.
पन्नास आणि साठ च्या दशकामध्ये पाश्चात्त्य देशांमध्ये रॉक अँड रोल,जाझ,डिस्को संगीताने बहार उडून गेली होती. अनेक म्युझिकल बँड्स तेव्हा जगभर लोकप्रिय झाले होते. या सर्वांचा प्रभाव भारतीय सिने संगीतावर दिसू लागला. १९६५ साली हास्य अभिनेता मेहमूद यांनी एक चित्रपट दिग्दर्शित केला होता दिग्दर्शनातील त्यांचा हा पहिलाच प्रयोग होता चित्रपटाचं नाव होतं ‘भूत बंगला’. या चित्रपटाला आर डी बर्मन यांचे संगीत होते. यातील त्यांच्या चमकदार संगीताने रसिकांचे लक्ष वेधून घेतले. कारण या चित्रपटात त्यांनी वेस्टर्न म्युझिकचा मुबलक वापर केला होता. यात एक गाणे होते ‘आओ ट्विस्ट करे….’ हे गाणं १९६१ साली आलेल्या चब्बी चेकर यांच्या या ‘lets do it again ‘ गाण्यावरून प्रेरणा घेऊन बनवले होते.

आर डी बर्मन यांना हे गाणं खूप आवडलं होतं त्यांनी स्वतःच्या आवाजात ते रेकॉर्ड देखील केलं होतं. चित्रपटासाठी जेव्हा हे गाणं रेकॉर्ड करायची वेळ आली तेव्हा आर डी बर्मन यांनी हे गाणे मन्ना डे यांच्याकडे सोपवले. मन्नाडे यांनी हे गाणं गायला सुरुवातीला नकार दिला. त्यांचे म्हणणे होते की ,”मी अशा प्रकारचे गाणे गात नाही!” शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी त्या काळात मन्ना डे गात असे. ती त्यांची स्पेशालिटी ठरली होती . असे असताना वेस्टर्न मूडचे हे डान्स सॉंग कसे गाणार? पण पंचम यांना मन्नाडे यांचा च स्वर या गाण्यासाठी हवा होता. त्यांनी मन्ना डे ला सांगितले,”तुम्ही स्वतःला एकाच टाईप मध्ये बंदिस्त करू नका. तुमच्या आवाजामध्ये व्हेरिएशन आहे. तुम्ही हे गाणे नक्की गाऊ शकता. आणि मुख्य म्हणजे जर मी हे गाणे गाऊ शकतो तर तुम्ही का नाही गाऊ शकणार? तुम्ही नक्कीच हे गाणे चांगल्या पद्धतीने गाणार. मला खात्री आहे.”
================================
हे देखील वाचा: अभिनेता अशोक कुमार यांनी चाळीस दशकात घेतली होती फेरारी कार!
=================================
पंचमच्या या आश्वासक बोलण्याने मन्ना डे यांना हुरूप आला. मनातील किंतु परंतू बाजूला पडले. आणि त्यांनी या गाण्याची भरपूर प्रॅक्टिस केली. रेकॉर्डिंग च्या वेळेला पंचमने त्यांना व्यवस्थित टिप्स दिल्या आणि गाणे रेकॉर्ड झाले. चित्रपट प्रदर्शित झाला. हे गाणे चित्रपटात मेहमूद वर चित्रित झाले होते. या गाण्याने एकच धमाल उडून दिली. त्या काळात या गाण्याला प्रचंड मोठी लोकप्रियता मिळाली होती. विशेषत: तरुणाई मध्ये या गाण्याचा विशेष बोलबाला होता. हे गाणं हसरत जयपुरी यांनी लिहिलं होतं. या गाण्याला त्या वर्षी एवढी प्रचंड लोकप्रियता मिळाली की त्या वर्षीच्या बिनाका गीत्मालाच्या वार्षिक कार्यक्रमात हे चक्क दुसऱ्या क्रमांकावर होते!

‘भूत बंगला’ सिनेमा सुपर हिट ठरला म्युझिक साठी. किशोरकुमारच्या स्वरातील ‘जागो सोनेवालो सुनो मेरी कहानी’ मस्त जमून आले होते. मला स्वत:ला यातील लताच्या स्वरातील ‘काफी’ रागावर आधारीत ‘ओ मेरे प्यार आजा …’ प्रचंड आवडते. या सिनेमात आर डी बर्मन यांनी अभिनय केला होता. महमूद ला हा अभिनय इतका आवडला की ‘पडोसन’ मधील सुनील दत्त चा रोल आधी पंचम ला ऑफर केला होता! ‘आओ ट्विस्ट करे….’ हे गाणे गायल्यानंतर मन्ना डे कोणत्याही प्रकारचे गाणे जाऊ शकतात हे यातून सिद्ध झालं!