
“तुमच्या मिठीत मला कायम सुरक्षित वाटायचं”; Esha Deol हिची धर्मेंद्रंसाठी भावूक पोस्ट
पद्मभूषण धर्मेंद्र (Dharmendra) यांचं २४ नोव्हेंबर २०२५ रोजी निधन झालं. बॉलिवूडच्या ही-मॅनची एक्झिट त्यांच्या चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेली. धरमजींच्या निधनाने संपूर्ण बॉलीवूडवर शोककळा पसरली. आज धर्मेंद्र यांच्या जयंतीनिमित्त जगभरातील चाहते आठवणींना उजाळा देत आहेत. अशातच त्यांची लेक ईशा देओल (Isha Deol) हिने सोशल मिडियावर वडिलांच्या निधनानंतर पहिली पोस्ट केली आहे. “तुम्ही कायमस्वरुपी माझ्या हृदयात असाल. आपल्या दोघांच्या असंख्य आठवणी मी कायम जपून ठेवेन”, अशा शब्दांत भावूक पोस्ट केली आहे.
ईशा देओल हिने धर्मेंद्र यांच्या जयंतीदिनी पोस्ट करत लिहिलं आहे की,“माझे प्रिय पप्पा…आपलं नातं खरंच खूप खास आहे. हे जग, आयुष्य या सगळ्या पलीकडचं आपलं हे नातं आहे. पप्पा…आपण कायम एकत्र असू मग ते स्वर्गात असो वा पृथ्वीतलावर…तुम्ही कायमस्वरुपी माझ्या हृदयात असाल. आपल्या दोघांच्या असंख्य आठवणी मी कायम जपून ठेवेन. एक मुलगी म्हणून तुम्ही दिलेले जीवनाचे धडे, तुम्ही केलेलं मार्गदर्शन, तुम्ही घेतलेली माझी काळजी, माझ्यावर असलेलं तुमचं प्रेम….या सगळ्याची तुलना कधीच होऊ शकत नाही, त्या आठवणी मी आयुष्यभर जपेन. पप्पा…आज तुमची खूप आठवण येतेय. तुमच्या मिठीत मला कायम सुरक्षित वाटायचं…तुमचा हात धरल्यावर एक वेगळीच ऊर्जा मिळायची. तुम्ही दिलेली शिकवण मी कायम लक्षात ठेवेन. “नेहमी नम्रपणाने वागेन, आनंदी राहीन तसेच आरोग्याची काळजी घेईन”. (Entertianment)

पुढे तिने लिहिलं आहे की, “तुमचा वारसा अभिमानाने आणि आदराने असाच पुढे चालवू असं वचन तुम्हाला देते…तुम्ही दिलेली प्रेमाची भावना मी लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. आय लव्ह यू पप्पा. तुमची लाडकी मुलगी…तुमची ईशा…तुमचीच बिट्टू!”
================================
================================
बॉलिवूडमध्ये ६५ वर्ष सातत्याने विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. लवकरच त्यांचा अभिनय असणारा इक्कीस हा शेवटचा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. त्यांनी १९५४ मध्ये म्हणजेच वयाच्या १९ व्या वर्षी प्रकाश कौर यांच्याशी पहिलं लग्न केलं होतं. त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. नंतर विवाहित असतानाच धर्मेंद्र हे अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले. प्रकाश कौर यांना घटस्फोट न देता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी दुसरं लग्न केलं. ४५ वर्षांच्या सुखाच्या संसारात त्यांनी एकमेकांची साथ कधीच सोडली नाही…’शोले’, ‘सीता और गीता’, ‘नसीब’, ‘अंधा कानून’, ‘छोटी सी बात’, ‘भागवत’, ‘राजा जानी’, ‘सम्राट’, ‘किनारा’, ‘ड्रिम गर्ल’ अशा अनेक चित्रपटांची दोघांनी एकत्र काम केलं होतं… (Dharmendra and Hema Malini)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi