Kishore Kumar याच्या आयुष्यात ‘चार’ या क्रमांकाचे काय महत्व होते?
किशोर कुमार यांचं खरं पाळण्यातलं नाव होतं आभास कुमार गांगुली. ४ ऑगस्ट १९२९ या दिवशी मध्य प्रदेश मधील खंडवा येथे त्यांचा जन्म झाला. वडील कुंजीलाल गांगुली वकील होते तर आई गौरी देवी घर सांभाळत होत्या. पुढे किशोर कुमारने मुंबईत जेव्हा बंगला घेतला तेव्हा त्याचं नाव त्याने गौरीकुंज ठेवले होते. किशोर कुमार यांच्या आयुष्यात चार या क्रमांकाला खूप महत्त्व आहे. चार ऑगस्ट ला त्यांचा जन्म झाला. घरातील बहीण भावंडात ते चौथ्या क्रमांकाचे होते. सर्वात मोठे होते दादामुनी अशोक कुमार. त्यानंतर त्यांची बहीण सती देवी. तिसऱ्या नंबरवर एक भाऊ अनुप कुमार आणि सर्वात लहान शेंडेफळ म्हणजे आभास कुमार! किशोरकुमार ने चार लग्ने केली होती. पहिले रुमा घोष सोबत, दुसरे मधुबाला सोबत, तिसरे योगीताबाली सोबत आणि चौथे लीना चंदावरकर सोबत. किशोरचा मृत्यू १३ तारखेला झाला. एक आधी तीन चार!

किशोर कुमार जेव्हा एक वर्षाचे होते त्याच वेळेला अशोक कुमार शिक्षणासाठी घराबाहेर पडले. या दोघांमध्ये तब्बल १८ वर्षाचे अंतर होते. त्यामुळे लहानपणी किशोर कुमारला आपण फक्त तिघंच बहिण भावंड आहोत असं वाटायचं. कारण अशोक कुमार चार-पाच वर्षे घरापासून बाहेरच होते. एकदा जेव्हा किशोर कुमार पाच वर्षाचे होते तेव्हा अशोक कुमार घरी आले. बऱ्याच वर्षानंतर आपला मुलगा घरी आल्यानंतर साहजिकच आईने त्याच्या आवडीचे पदार्थ करायला सुरुवात केली. एक दिवस तिने भरपूर सुकामेवा घेतलेली गोड खीर तयार केली.
हि खीर किशोर कुमारला देखील खूप आवडायची. पण बालक किशोर कुमारच्या डोळ्यासमोर एक भला मोठा कटोरा ज्यात मस्त खीर होती ती अशोक कुमारला दिली गेली! ते पाहून किशोर कुमार प्रचंड नाराज झाला. चिडला. तो आईला म्हणाला,” खीर तर मला खूप आवडते हे तुला माहिती आहे. मला न देता तू या कोणत्या माणसाला किती देते आहे? हा कोण आहे? कालपासून आपल्या घरी आला आहे आणि त्याचे एवढे लाड होत आहेत!” तेव्हा आईने बालक किशोर कुमार सांगितले,” अरे हा तुझा मोठा भाऊ आहे. अशोक कुमार. शिक्षणासाठी बाहेर गेला होता.” अशोक कुमारने मग बालक किशोरला जवळ घेतले आणि बागेत फिरायला घेऊन गेला. त्याला आईसक्रीम खायला दिली. तेव्हापासून दोघांची चांगली मैत्री झाली!

किशोर कुमार जेव्हा एक वर्षाचा होता तेव्हा त्याचा आवाज अतिशय खराब होता. पण एका अपघाताने हा आवाज अचानक सुधारला! एकदा त्याची आई स्वयंपाक घरात भाजी चिरत होती एक वर्षाचा बालक किशोर कुमार पळत पळत आईकडे आला आणि त्याचा पाय भाजी चिरत असलेल्या विळीवर पडला. त्याची करंगळी चिरली गेली. भळा भळा रक्त वाहू लागले. सगळे घाबरून गेले. वेदनेच्या दुःखाने किशोर कुमार जोरजोरात रडू लागला. घरातले सगळे घाबरले ताबडतोब त्याला दवाखान्यात नेले. तिथे त्याच्या पायाला टाके घातले गेले. त्याकाळी पेन किलर जास्त वापरत नसल्यामुळे पुढचे पंधरा दिवस किशोर कुमारला प्रचंड वेदना होत होत्या आणि तो त्या वेदनेने रात्रभर अखंड रडत होता. पंधरा-वीस दिवस रडल्यानंतर थोड्या वेदना कमी झाल्या. पण या रडण्याचा एक फायदा असा झाला त्याचे व्होकल कॉर्ड एकदम मोकळे झाले आणि किशोर कुमारचा हस्की साऊंड तयार झाला. याच आवाजाने त्याने हिंदी सिनेमातील संगीताला अजरामर करून टाकले!
================================
हे देखील वाचा : Bappi Lahiri ने संगीत दिलेल्या गाण्याला किशोर कुमारने कसे इम्प्रोवाइज केले?
================================
खांडव्याला असताना बालक किशोरकुमारला लहानपणी एक स्वप्न पडायचे. त्यात तला एक चर्च दिसायचे. त्याच्या पुढे एक कबर असायची. वारंवार हे स्वप्न पडल्याने त्याला हे चारच चांगले ओळखीचे झाले. एकदा खंडव्यात फिरताना त्याला एक चारच दिसले. हे बऱ्यापैकी स्वप्नातल्या चारच सारखेच होते. त्या चर्चच्या पुढे एक कबर होती. उत्सुकतेने किशोरने ती कबर बघितली. हि कबर बिशप ची होती. किशोर ने उत्सुकतेने ती कबर बघितली तर त्या वर बिश च्या मृत्यूची तारीख ४ ऑगस्ट होती. तेंव्हा पासून किशोरला वाटू लागले तो पूर्वजन्मी खंडव्याचा बिशप होता. आणि आता त्याचा पुनर्जन्म झाला आहे! आपल्या मृत्यू आपल्या जन्मगावी व्हावा अशी त्याची इच्छा होती. म्हणूनच किशोर आपण खांडव्याला जावू असे लीना चंदावरकरला म्हणत असायचा. किशोरचा १३ ऑक्टोबर १९८७ ला मुंबईत मृत्यू झाला पण अंत्यसंस्कार मात्र खांडव्याला करण्यात आला.