
तब्बल १६ वर्षांनंतर अभिनेत्री Suruchi Adarkar ची छोट्या पडद्यावर एंट्री; ‘या’ मालिकेत साकारणार महत्वाची भूमिका !
Star Pravah वरील लोकप्रिय मालिका ‘मुरांबा’ (Muramba) गेली तीन वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. साधी कथा, भावनिक नातेसंबंध आणि दमदार अभिनय यामुळे या मालिकेने घराघरात आपलं स्थान निर्माण केलं आहे. विशेषतः रमा आणि अक्षय या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मात्र, आता या कथेत एक महत्त्वाचं आणि अनपेक्षित वळण येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आता प्रेक्षकांना रमा-अक्षयऐवजी स्वरा-अक्षय ही नवी जोडी पाहायला मिळणार आहे. या नव्या पात्रामुळे मालिकेची कथा अधिक रंजक आणि भावनिक होणार आहे. ‘स्वरा’ ही भूमिका सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरुची अडारकर (Suruchi Adarkar) साकारणार असून, तब्बल १६ वर्षांनंतर ती स्टार प्रवाहच्या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी ठरणार आहे. (Actress Suruchi Adarkar)

स्वरा या भूमिकेबद्दल बोलताना सुरुची अडारकरने आपला आनंद व्यक्त केला आहे. ती म्हणाली की, “साधारण १६ वर्षांपूर्वी ‘ओळख’ या मालिकेमुळे मला अभिनेत्री म्हणून खरी ओळख मिळाली आणि ती मालिका देखील स्टार प्रवाहवरच होती. त्यामुळे पुन्हा एकदा या चॅनेलच्या कुटुंबात परत येताना खूप छान वाटत आहे.” स्वरा हे पात्र अतिशय सकारात्मक असून, ती सुंदर, हुशार आणि आत्मविश्वासाने भरलेली मुलगी आहे. मात्र, तिचा स्वभाव तितकाच हळवा असल्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टींनीही तिच्या डोळ्यांत पाणी येतं. खरं प्रेम करणारी माणसं कधीही एकमेकांपासून दूर जाऊ नयेत, असा तिचा ठाम विश्वास आहे. याच विचारांमुळे रमा आणि अक्षयच्या नात्यात तिच्या आगमनानंतर नेमकं काय घडणार, हे पाहणं अत्यंत उत्सुकतेचं ठरणार आहे.

स्वराच्या एन्ट्रीमुळे रमा-अक्षयच्या नात्यात दुरावा येणार का, की या नात्याला नवा अर्थ मिळणार, असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहेत. त्यामुळे आगामी भागांमध्ये भावनिक संघर्ष, नात्यांची गुंतागुंत आणि नवे ट्विस्ट पाहायला मिळणार यात शंका नाही. (Actress Suruchi Adarkar)
=============================
=============================
तेव्हा या सगळ्या घडामोडींचा साक्षीदार होण्यासाठी ‘मुरांबा’ ही मालिका पाहायला दररोज दुपारी १.३० वाजता, फक्त स्टार प्रवाहवर वाहिनीवर पाहता येईल.