
Lagnacha Shot Movie Teaser: लग्नघरात उडालेला गोंधळ, हशा आणि धमाल दाखवणाऱ्या सिनेमाचा टीझर लॉन्च!
लग्न हा केवळ दोन व्यक्तींचा सोहळा नसून तो आनंद, परंपरा, उत्साह आणि थोड्याशा गोंधळाचा उत्सव असतो. अशाच एका लग्नात जर अचानक काही अनपेक्षित घडलं, तर काय होईल? हाच मजेशीर विचार केंद्रस्थानी ठेवून येणाऱ्या मराठी चित्रपट ‘लग्नाचा शॉट’ (Lagnacha Shot) चा टीझर लाँच सोहळा नुकताच अतिशय जल्लोषात पार पडला. ढोल-ताशांचा निनाद, लग्नघरातली लगबग, पारंपरिक विधी आणि उत्साही वातावरण यामुळे हा कार्यक्रम एखाद्या खऱ्याखुऱ्या लग्नासारखाच भासला. या सोहळ्यात चित्रपटातील नवरा-नवरी अभि आणि क्रितिका म्हणजेच अभिजीत आमकर आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांचा केळवणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. दोघांनीही एकमेकांसाठी उखाणे घेत वातावरणात आणखी रंगत भरली. (Lagnacha Shot Movie Teaser)

या सगळ्या जल्लोषात सर्वांचे लक्ष वेधून घेतलं ते ‘लग्नाचा शॉट’ च्या टीझरने. पहिल्याच झलकित प्रेक्षकांना चित्रपटातील गोंधळ, विनोद आणि लग्नातल्या धावपळीची झटपट ओळख करून देण्यात आली. पोस्टरमध्ये दाखवलेला गोंधळ टीझरमध्ये अधिकच मजेशीर आणि रंजक पद्धतीने उलगडतो. लग्नाच्या तयारीतील घाई, चुकून घेतलेले निर्णय, वेळेचा मेळ न बसणं, नशिबाचे खेळ आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गंमतीदार प्रसंगांची झलक टीझरमध्ये पाहायला मिळते. चित्रपटाच्या नावासारखाच हा टीझरही अचानक घडणाऱ्या घटनांचा, वळणावळणाच्या प्रसंगांचा आणि लग्नात उडणाऱ्या गोंधळाचा धमाल अनुभव देतो.

प्रियदर्शिनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) आणि अभिजीत आमकर (Abhijit Amkar) यांची जोडी टीझरमध्ये अतिशय सहज आणि ताजी वाटते. त्यांच्यातील संवादांची टायमिंग, हावभाव आणि एकमेकांशी असलेली केमिस्ट्री प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी आहे. त्यामुळे ही जोडी चित्रपटातही लक्षात राहील, असं नक्कीच वाटतं. टीझरवरून हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासोबत पाहता येईल असा हलकाफुलका, स्वच्छ आणि मनोरंजक अनुभव देणारा असल्याचं स्पष्ट होतं.(Lagnacha Shot Movie Teaser)
=============================
=============================
चित्रपटाचे दिग्दर्शक अक्षय गोरे यांच्या मते, ‘लग्नाचा शॉट’ हा केवळ लग्नसोहळ्यावर आधारित चित्रपट नसून त्यातील भावना, गोंधळ आणि विनोद यांचं मजेशीर प्रतिबिंब आहे. अभिजीत आणि प्रियदर्शिनी यांनी त्यांच्या भूमिका अत्यंत नैसर्गिकपणे साकारल्या आहेत. कोणताही संदेश ठासून न देता, प्रेक्षकांनी दोन तास मनमुराद हसावं आणि आपल्या लग्नघरातील आठवणींशी जोडून घ्याव्यात, हाच आमचा उद्देश आहे. हा चित्रपट म्हणजे शुद्ध, प्रामाणिक आणि कौटुंबिक मनोरंजनाचा एक धमाकेदार शॉट आहे.’ ६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘लग्नाचा शॉट’ या चित्रपटात प्रियदर्शिनी इंदलकर, अभिजीत आमकर, प्रभाकर मोरे, अभिजीत चव्हाण, राजन ताम्हाणे, लीना पंडित, संजय कुलकर्णी, विजय पवार, मनोहर जाधव आणि संजीवनी पाटील यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.