
Kishore Kumar यांनी एकही पैसा मानधन न घेता ‘हे’ गाणे गायले!
भारतीय चित्रपट संगीतातील किशोर कुमार हे एक अजब रसायन होतं. कुठल्या क्षणी तो कसा वागेल याचा काही अंदाज कोणाला येत नसे. किशोर कुमार बाबत खूप दंतकथा देखील त्या काळात (आणि आजही!) प्रचलित होत्या. ते खूप मनी माइंडेड आहेत, पैशाचा सर्वात आधी विचार करतात. पैसा घेतल्याशिवाय गाणं गात नाहीत. अशा अनेक दंतकथा त्यांच्याबाबत त्या काळात लोकप्रिय होत्या. मीडियामध्ये देखील असंच काही छापून येत होतं. पण यात खरेच तथ्य किती होतं? दुसऱ्या बाजूला असे अनेक उदाहरणं आहेत जेव्हा किशोर कुमारने एक पैसाही न घेता गाणे गायलेले दिसते. अनेक व्यक्तींना मदत केल्याची उदाहरणे आहेत. ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या चित्रपटात त्यांनी स्वखुशीने गाणे गायले होते. त्याचा एक पैसाही मोबदला त्यांनी घेतला नव्हता. त्यांच्या ‘पाथेर पांचाली’ या चित्रपटासाठी किशोर कुमारने आर्थिक मदत केली होती. त्यामुळेच ही कलाकृती जगापुढे येऊ शकली. त्याच वेळी किशोरने अनेक निर्माते, संगीतकार यांना कसे छळले याच्या देखील भरमसाठ स्टोऱ्या सांगितल्या जातात. हे दोन्ही किशोर एकाच का? असा संभ्रम पडतो.
त्यामुळे किशोर कुमार हे कधीही न उलगडणार असं कोडं होतं. कुठल्या क्षणी ते कसे वागतील याचा अंदाज ब्रह्मदेवाला देखील येत नसायचा. एकदा एका गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या ओळी त्यांनी त्या चित्रपटाच्या नायकाला बघितलं आणि गाणं तर गायलं पण त्याचा मोबदला म्हणून एक पैसा देखील घेतला नाही! काय कारण होतं अशा वागण्याचे? खूप इंटरेस्टिंग असा हा किस्सा आहे. ऐंशीच्या दशकाच्या मध्यावर यश चोप्रा एक चित्रपट बनवत होते ‘फासले’. या चित्रपटात त्यांनी फ्रेश चेहऱ्यांना ब्रेक दिला होता. नायक नायिकांचा तो पहिलाच चित्रपट असणार होता. चित्रपटाची गाणी गीतकार शहरयार यांनी लिहिली होती तर संगीत शिवहरी यांचे होते. या सिनेमात किशोर कुमारला लता मंगेशकर सोबत चार युगल गीते गायची होती.

रेकॉर्डिंग करिता जेव्हा किशोर कुमार यांना बोलावले गेले तेव्हा त्यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक यश चोप्रा यांना विचारले “तुमच्या चित्रपटाचा हिरो कोण आहे?” किशोर कुमार हे कायम त्या सिनेमाच्या नायकाच्या बॉडी लँग्वेजला सूट होईल असा प्लेबॅक देत असत. त्यामुळेच किशोर कुमार यांचे शत्रुघन सिन्हावरचे गाणे ( चोर मच गया शोर आया माखण चोर) राजेश खन्नासाठी गायलेले गाणे (चिंगारी कोई भडके) आणि अमिताभ बच्चन करता गायलेले गाणे ( जहा तेरी ये नजर है मेरी जा मुझे खबर है) आपल्याला सर्वस्वी वेगळे वाटतात. किंबहुना हे गाणे हिरोच गात आहे असे पब्लिकला वाटत असायचे! ही किमया किशोर कुमार यांच्या प्लेबॅकची होती.
जेव्हा यश चोप्रा यांनी किशोर कुमार सांगितले,” थोडं थांबा. आता आमच्या सिनेमाचा हिरो येईलच. आणि तुम्ही त्याला ओळखता!” किशोरला वाटले की सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील बहुतांश नायकांसाठी त्यांनी प्लेबॅक दिलेला आहे त्यापैकी कोणीतरी असावा. तरी त्यांनी विचारले की ,”या सिनेमाचा हिरो कोण आहे?” तेव्हा यश चोप्रा म्हणाले ,” अरे किशोरजी, तुम्ही त्याला ओळखता. रोहन आहे.“ किशोर कुमारच्या काही लक्षात आले नाही . तो म्हणाला “ रोहन नावाच्या कुठल्या हिरोला मी ओळखत नाही.” तेव्हा यश चोप्रा म्हणाले,” असे काय करता? तुम्ही त्याला चांगले ओळखता!” तितक्यात समोरून एक हँडसम हसतमुख तरुण त्यांना येताना दिसला. तो आला आणि आल्या आल्या त्याने किशोर कुमारला वाकून नमस्कार केला. किशोर कुमार म्हणाले,” अरे हा तर रोहन आहे. महेंद्र कपूरचा मुलगा. मी याला लहानपणापासून ओळखतो.“

पुढे यश म्हणाले की,” मी तेच तर सांगत होतो. या सिनेमात मी त्याला हिरो म्हणून ब्रेक देत आहे.” किशोर कुमार म्हणाला,”अरे वा मस्त. “ त्यानी रोहन कपूरला शुभेच्छा दिल्या आणि या सिनेमाची चारही गाणी रेकॉर्ड झाली. संपूर्ण रेकॉर्डिंग झाल्यानंतर जेव्हा या गाण्याचा चेक किशोर कुमारला दिला तेव्हा किशोर कुमारने तो चेक घ्यायला नकार दिला तो म्हणाला,”रोहन हा मला माझ्या मुलासारखा आहे. महेंद्र कपूरचा मुलगा म्हणजे माझा मुलगा. उद्या अमित कुमारसाठी जर प्लेबॅक द्यायचा असेल तर मी त्याचे पैसे घेईल का? त्यामुळे या गाण्याचा एकही पैसा मी घेणार नाही. रोहनची ही पहिलीच मुव्ही आहे. माझे आशीर्वाद आहेत.” असे म्हणून नम्रपणे त्यांनी चेक परत केला.
================================
हे देखील वाचा: ….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!
=================================
‘फासले’ हा चित्रपट 27 सप्टेंबर 1985 या दिवशी प्रदर्शित झाला. या सिनेमात सुनील दत्त ,रेखा, दीप्ती नवल, फारुख शेख यांच्या देखील भूमिका होत्या, पण चित्रपटाला अजिबात व्यावसायिक यश मिळाले नाही. रोहन कपूर देखील हिरो म्हणून अजिबात चालला नाही. ‘फासले’ या चित्रपटातील गाणी मात्र त्या काळात चांगली लोकप्रिय झाली होती विशेषता लता आणि किशोर चे ‘हम चुप है के दिल सुन रहा है..’ या गाण्याने तर चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. फराह मात्र या चित्रपटापासून जबरदस्त हिट झाली. किशोर कुमारच्या बाबत जे कायम सांगितलं जातं त्याच्या उलट इथे आपल्याला किशोर कुमारचे वर्तन दिसते. रोहन कपूरने रेडीओ वरील एका कार्यक्रमात ही आठवण सांगितली होती.