
Bigg Boss Marathi 6: सोशल मीडिया स्टार करण सोनवणेची घरात एन्ट्री; ‘फोकस्ड इंडियन’ घरात किती फोकस्ड राहणार?
मोबाईलवर स्क्रोल करताना अचानक चेहऱ्यावर हसू आणणारा, आपल्या अतरंगी निरीक्षणांनी आणि मिश्कील शैलीने लाखो लोकांना आपलंसं करणारा करण सोनवणे (Karan Sonawane) आता थेट Bigg Boss Marathi च्या घरात पोहोचला आहे. सोशल मीडियावर ‘फोकस्ड इंडियन’ म्हणून ओळखला जाणारा करण आज, ११ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८ वाजता सुरू झालेल्या बिग बॉस मराठी ६ चा भाग बनला असून, त्याची एंट्री आधीपासूनच चर्चेचा विषय ठरली आहे. या पर्वाचा शानदार शुभारंभ अभिनेता रितेश देशमुखने केला. करण सोनवणेचा प्रवास झपाट्याने घडलेला वाटत असला, तरी त्यामागे अनेक वर्षांची मेहनत आहे. सोशल मीडिया आजइतका प्रभावी नव्हता, त्या काळातच म्हणजे २०१४-१५ च्या सुमारास करणने थिएटर आणि स्टँड-अप कॉमेडीच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण करायला सुरुवात केली. सामान्य मराठी माणसाचं दैनंदिन जगणं, त्यातल्या विसंगती, छोट्या आनंदाच्या क्षणांवर केलेली त्याची मार्मिक टिप्पणी लोकांना भावली.(Bigg Boss Marathi 6)

हळूहळू सोशल मीडियावर त्याचा प्रभाव वाढत गेला आणि आज त्याच्या नावावर १.५ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. ‘फोकस्ड इंडियन’ ही ओळख आता केवळ टोपणनाव न राहता एक ब्रँड बनला आहे. बिग बॉसच्या घरात जाण्याआधी करणला निरोप देण्यासाठी त्याची खास ‘ऑरेंज ज्यूस’ मंडळी एकत्र आली होती. मित्र, सहकारी आणि जवळच्या लोकांनी त्याला मनापासून शुभेच्छा दिल्या. चाहत्यांनीही सोशल मीडियावरून त्याला पाठिंबा देत, या प्रवासात पूर्ण ताकद लावणार असल्याचं जाहीर केलं.

याचकाळात आणखी एक सोशल मीडिया चेहरा, प्रभु शेळके यानेही बिग बॉसच्या घरात प्रवेश केला. दोघांनाही दार निवडण्याची संधी देण्यात आली. प्रभुने मेहनतीचा मार्ग स्वीकारला, तर करणने शॉर्टकटचं दार निवडत खेळाच्या सुरुवातीलाच धाडसी निर्णय घेतला. यामुळे करणकडे काही विशेष अधिकार असणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. करण केवळ रिल्स किंवा विनोदी व्हिडिओंपुरता मर्यादित नाही. त्याने अभिनय क्षेत्रातही स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. ‘ब्लॅकआउट’, ‘१२३४’ आणि ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ यांसारख्या प्रोजेक्ट्समधील त्याच्या भूमिकांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरात तो केवळ कंटेंट क्रिएटर म्हणून नव्हे, तर अनुभवी कलाकार म्हणूनही उतरला आहे. (Bigg Boss Marathi 6)
============================
हे देखील वाचा: Mirzapur 4 कधी येणार? श्रिया पिळगावकरने खास फोटो शेअर करत दिली गुडन्यूज!
============================
आता करन ची विनोदी शैली घरात सकारात्मक वातावरण निर्माण करेल की तीच शैली वादाचं कारण ठरेल, हे येणाऱ्या दिवसांत स्पष्ट होईल. मात्र एक गोष्ट नक्की करण सोनवणेची एंट्री बिग बॉस मराठी ६ ला एक वेगळी रंगत देणारी ठरली आहे.