
थांबणं Arijit Singh याचं….
वीस एकवीस वर्षांची कारकीर्द आणि वय वर्षे अडतीस. इतकेच नव्हे तर, आजही लोकप्रिय आहे, फाॅर्मात आहे, फॉलोअर्स आहेत, मागणीही आहे आणि तरीही अरिजीत सिंगने आपण आता थांबत आहोत असे एक पोस्ट करत सोशल मीडियातून सांगावं हे वेगळे निश्चित आहे. आजच्या ग्लोबल युगातील ती एक गरज आहे का? त्याच्यापासून सांस्कृतिक क्षेत्रातील काहींनी प्रेरणा घ्यावी का की हे एक अपवादात्मक उदाहरण ठरावे?
अरिजित सिंगने हिंदी, मराठीसह बंगाली, तमिळ इत्यादी भाषांमध्ये मिळून तीनशेहून जास्त गाणी गायली आहेत. त्यातील बरीचशी लोकप्रिय आहेत म्हणून तर तो इतकी वर्षे वाटचाल करु शकला. आज स्वतंत्र संग्रहासाठीचे ( अल्बम) गायन आणि पार्श्वगायन यांसह देश विदेशातील अनेक लहान मोठ्या कॉन्सर्टमध्ये गायचे असते, त्यासह भरपूर पैसा, प्रसिद्धी, लोकप्रियता मिळते. त्यातून प्रशस्त घर, नवीनमॉडेलची चकाचक गाडी, खंडाळा अथवा अलिबागला सेकंड होम, वर्षभरातून एक विदेश दौरा हे सगळे मिळत जाते अथवा ते हवं म्हणून ‘नॉन स्टॉपन’ काम.

यातून शारीरिक आणि मानसिक भावनिक दमछाक. एखाद्याचा हे सगळे मिळवण्यासाठीचा वेग फार फार तर एखाद्याला यासाठीची गती पकडता येत नाही म्हणून चिडचिड. तर एखाद्याला या सगळ्याच मोहापासून दूर राह्यचेय. हे म्हणजेच खरे यश नाही, त्यासह आपलं कुटुंब आणि आपल्या आवडीनिवडीलाही पुरेसा वेळ द्यायचा आहे, तेही जीवनावश्यक आहे असे वाटते. मनोरंजन क्षेत्र म्हणजेच सगळे जग नाही. त्यापलिकडे जाऊन असलेल्या भल्या मोठ्या जगाचाही अनुभव घ्यावा.
================================
हे देखील वाचा : एकावन्न वर्षे झाली, ये Deewar तुटेगी नहीं…
================================
एकादा कलाकार अतिशय विचारपूर्वक आपलं काम कमी करतो. त्याला आता मोकळेपणा हवा असतो. सायलेंन्स, ॲक्शन, कॅमेरा यातून लांब रहावेसे वाटते. अशातच आपल्या घराच्या सोसायटीतील कोणी तरी लिफ्टमध्ये भेटतो आणि विचारतो, हल्ली मी पाहतोय, तुम्ही असे लिफ्टमध्ये भेटता. तुमच्याकडे फार काम नाही वाटतं…. हे पचवण्याची मानसिक ताकद असावी लागते.
मनोरंजन क्षेत्रात असे सगळ्या प्रकारचे कलाकार, पार्श्वगायक, संगीतकार आहेत. त्यात आपल्या कारकिर्दीबाबतचा प्रत्येकाचा दृष्टिकोन, त्यामागची मानसिकता, भावना आणि भूमिका बरोबरच असते. आपण अधूनमधून आपली आपल्या कारकिर्दीबाबतची भूमिका तपासायला काय हरकत आहे? कदाचित एखाद्याला ते गरजेचे वाटत नसेलही.
अरिजित सिंगला जे जमलं ते प्रत्येकाला जमेलच असे नाही आणि जमायला हवं असेही नाही. कारण प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या असतात. मनोरंजन क्षेत्रात सगळ्यांनाच आपल्या कामाची उत्तम बिदागी मिळते असे नाही. मराठी चित्रपटांतून भूमिका साकारत असतानाच पूर्वी अनेक नामवंत कलाकाराचेही पैसे बुडत, पण अभिनयाशी असलेल्या बांधिलकी आणि निष्ठा यामुळे ते गप्प राहत. आजही.मराठी मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या.
सगळ्याच कलाकारांना घसघशीत मानधन मिळते अथवा ते वेळेत मिळते असेही नाही. कधी असेही होते, सतत काम मिळत राहीलच याची खात्री नसते. एक मालिका संपल्यावर रिचार्ज होण्याइतपत काम नसेल तर ठीक आहे, पण बराच काळ कॅमेराशिवाय राहताना तगमग होते. फक्त आणि फक्त अभिनयावरच अवलंबून राहणे योग्य नाही, जोडीला एकादा लघुउद्योग असलेला बरा असे वाटल्यानेच एकादा कॉफी कॉर्नर अथवा फूड पॉईंट सुरू करावेसे वाटते. मनोरंजन क्षेत्रातील आर्थिक असुरक्षितता त्यात डोकावते. आणि त्यातूनच आर्थिक सुरक्षितता शोधावी लागते.

तरीदेखील ‘आपण आपल्या कामाचा वेग कमी कधी करायचा?’ याचं आकलन होणे आवश्यक आहे. आपण आता चित्रपट, मालिका आणि वेब सिरीज यातून फार फार कमी प्रमाणात दिसलो तर प्रेक्षक आपल्याला विसरतील अशी भीती नसावी. सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील आघाडीची अभिनेत्री राखी गुलजारने नायिका ते चरित्र भूमिका असा यशस्वी प्रवास केला. नंतरच्या काळातील चित्रपटसृष्टीची कार्यशैली आपणास रुचत नाही असे लक्षात येताच स्वतःहून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आणि कुठेही कसलेही भाष्य न करता आपलं वेगळं आयुष्य जगणं सुरु केले. काय होते ते आयुष्य? रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील तारा गावाच्या जवळील एका फार्म हाऊसवर राखीने राहण्याचा निर्णय घेतला. आणि मग एकेक करत अनेक पक्षी आणि प्राणी यांचा छान सहवास राखीला लाभला. अधूनमधून गुलजार आणि मुलगी मेघना गुलजार येथे राखीला भेटायला येत आणि काही दिवस राहत.
================================
================================
२०१४ सालापर्यत राखी गुलजारने या फार्म हाऊसवर छान मुक्काम केला. त्यात २०१२. साली एका दिवाळी अंकासाठी राखी गुलजारच्या एक्सलुझिव्ह मुलाखतीचा योग आला असता, चित्रपटसृष्टीत पहिल्यासारखे वातावरण राहीले नाही, एकूणच बदललेली कामाची पध्दत आपणास आवडली नाही म्हणून आपण बाजूला झालो. पण येथे एकटे असलो तरी एकाकी नाही असे राखी गुलजारचे म्हणणं होते. एक अतिशय वेगळी मुलाखत घेतल्याचे समाधान तेव्हा मला वाटले. तो एक वेगळा अनुभव होता, शोध होता.
कलेच्या क्षेत्रात कधी थांबायचे हा जसा प्रश्न आहे, तसेच मागणी ओसरली तरी थांबायचे का नि कशाला यादेखील प्रश्न आहे…. ग्लॅमर, गाॅसिप्स, फिल्मी गप्पा आणि उत्पन्नाचे भले मोठे मोठे आकडे या पलिकडे जाऊन हे क्षेत्र म्हणजे बरेच काही आहे. काहीना आपण केव्हाच थांबलोय, बदलत्या परिस्थितीने आपल्याला थांबविले आहे हेच लक्षात येत नाही…. विषय हार्ड आहे हेच खरे. कारकिर्दीच्या सुरुवातीला आपण लोकप्रिय व्हावं असं मनोमन वाटते आणि कारकिर्दीच्या उतारात आपली लोकप्रियता कायम रहावी यासाठी प्रयत्न करावासा वाटतो. हा खेळ मेळ विचित्र आहे. अधूनमधून त्यावर फोकस हवाच. ती एक आत्मपरिक्षणासाठीची संधी असते.