हृतिक-फरहान-अभय देओलची पुन्हा गट्टी जमणार! ZNMD चा सीक्वल कन्फर्म

Padosan : ‘एक चतुर नार करके सिंगार..’ या गाण्यात आणखी कोणत्या दोन लोकप्रिय गाण्यांच्या ट्यूनचा समावेश होता?
29 नोव्हेंबर 1968 रोजी हास्य अभिनेता मेहमूद यांचा आयकॉनिक सिनेमा प्रदर्शित झाला होता ‘पडोसन’. हा सिनेमा भारतीय सिनेमातील कॉमेडी मुव्हीज चा बाप होता. किशोर कुमार मेहमूद यांच्या जुगलबंदीने सिनेमाला अफाट यश मिळवले. या चित्रपटाची गाणी राजेंद्र कृष्ण यांनी लिहिले होते तर संगीत राहुल देव बर्मन यांचे होते. या सिनेमात एक मुकाबला गीत होते . सुनील दत्त आणि मेहमूद परस्परांच्या समोर खिडकीत बसून गाणे गातात अशी ही एक जुगलबंदी होती. जी मन्नाडे आणि किशोर कुमार यांनी गायली होती. मन्ना डे मेहमूद साठी प्लेबॅक देत होते तर किशोर कुमार सुनील दत्त यांच्यासाठी! हे गाणे म्हणजे विनोदाचा कहर होते.
पूर्वी रेडिओ सिलोन वर हास्य गीत नावाचा एक कार्यक्रम असायचा. त्याचे टायटल म्युझिक याच गाण्याच्या पीसेस मधून बनले होते. वस्तुत: हे गाणे 1941 साल च्या बॉम्बे टॉकीज च्या ‘झुला’ या चित्रपटातील गाण्या वरुन घेतले होते. ‘झुला’ चित्रपटातील हे गाणे अशोक कुमार यांनी गायले होते तर त्याला संगीत सरस्वती देवी यांनी दिले होते. गाण्याचे बोल होते. ‘एक चतुर नार कर करत शिंगार थारे आपणे ही जाल मे ..’ गीतकार राजेंद्र कृष्ण यांनी याच ओळी घेऊन ‘पडोसन’ या चित्रपटासाठी गाणे तयार केले. ही गोष्ट तुमच्या पैकी अनेक लोकांना ठाऊक असेल पण याच गाण्यातील अंतऱ्यातील दोन ओळी आणखी दोन वेगळ्या गाण्यांवरून घेतल्या होत्या हे तुम्हाला ठाऊक आहे का?

आपल्याला आठवत असेल ‘एक चतुर नार’ या गाण्यांमध्ये जुगलबंदी च्या वेळी दोन अंतऱ्यांमध्ये किशोर कुमार आपल्या गाण्याची मूळ लाइन आणि स्टाईल डायव्हर्ट करून दुसरेच गाणे सुरू करतो! मेहमूद ओरडतो ‘ये सूर बदल दिया.. ये सूर भटकाया..ये गडबड किया ’ तो असे का ओरडतो? कारण ही गाणी टोटली वेगळी आहेत. ही जी दोन गाणी होती ती देखील दोन वेगवेगळ्या जुन्या गाण्यांवर प्रेरित होती. ही दोन जुनी गाणी कोणती होती? पहिल्या कडव्यात किशोर कुमार गातो ‘काला रे जा रे जारे अरे नाले मे जा के तू मुंह धोके आ रे काला रे जा रे जारे..’ या ओळी कोणत्या गाण्यावरून घेतले होत्या ? आठवतं? लता मंगेशकर यांनी गायलेल्या ‘जिद्दी’(1948) या चित्रपटातील ‘चंदा रे जा रे जा रे पिया से संदेसा मोरा कही यो जा..’ या गाण्यावरून घेतल्या होत्या!
तर दुसऱ्या कडव्यात जेव्हा किशोर कुमार पुन्हा आपल्या गाण्याची मूळ पट्टी / सुर डायव्हर्ट करून वेगळच गाणे सुरू करतो ते गाणं होतं ‘ अरे देखी तेरी चतुराई तुझे सूर की समझ नही आयी तुने कोरी घास ही खाई अरे देखी तेरी चतुराई..’ या ओळी प्रेरीत होत्या 1939 सालच्या ‘संत तुलसीदास ’ या चित्रपटातील ‘बन चले राम रघुराई और संग चले जानकी माई ..’ गाण्यावरून ! आर डी बर्मन यानी मोठ्या खुबीने या दोन गाण्यावरून प्रेरीत होवून या गाण्यात टाकल्या होत्या! आर डी बर्मन बाप संगीतकार होता. पडोसन सिनेमाच्या संगीताने त्याचा भाव वधारला. भूत बंगला (1965) तिसरी मंजिल (1967) च्या पाठोपाठ हा त्यांचा सुपर हिट सिनेमा होता. खरं तर या सिनेमात सुनील दत्त ने जी भूमिका केली होती ती आधी आर डी ला ऑफर झाली होती. कारण ‘भूत बंगला ‘ या सिनेमात आर डी ने एक भूमिका केली होती आणि ती मेहमूद ला प्रचंड आवडली होती. पण आर डी यांच्या वडीलांनी म्हणजे सचिन दा यांनी आर डी ला फक्त म्युझिकवर लक्ष केंद्रित करायला सांगितले आणि मग आर डीच्या जागी सुनील दत्तची वर्णी लागली!
================================
हे देखील वाचा : Rajesh Khanna आणि सायरा बानो हे दोन समकालीन कलाकार का एकत्र येऊ शकले नाही?
================================
अभिनेता कमल हासन यांचा हा अत्यंत आवडता सिनेमा आहे. या सिनेमाच्या आठवणी सांगताना ते म्हणाले होते की,” हिंदी लादण्याच्या विरोधात झालेल्या आंदोलनामुळे अनेक वर्षे चेन्नई मध्ये हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले नव्हते!” ‘पडोसन’ चित्रपटाबद्दलच्या आठवणी सांगताना ते म्हणाले, “जेव्हा मी ‘पडोसन’ पाहण्यासाठी गेलो, तेव्हा मी त्याचा निषेध करण्यासाठीच गेलो होतो – आम्हाला सांगण्यात आले होते की हा असा चित्रपट आहे ज्यात दक्षिण भारतीयांची खिल्ली उडवली गेली आहे. आम्ही आंदोलन करण्यासाठी आत गेलो, पण मेहमूद साहेबांचे चाहते बनून, त्यांची नक्कल करत, हसत-हसत बाहेर आलो. अनेक वर्षांनंतर जेव्हा मी मेहमूद साहेबांना भेटलो, तेव्हा मी त्यांना ही गोष्ट सांगितली होती!