
Mahashivratri Vishesh: कलर्स मराठीवर रंगणार महाशिवरात्रीचा विशेष सोहळा; प्रकटणार बारा ज्योतिर्लिंगे
मराठी टेलिव्हिजनवर यंदाची महाशिवरात्र एक अद्वितीय आध्यात्मिक सोहळा घेऊन येत आहे. भक्ती, अध्यात्म आणि शिवतत्त्वाचा भव्य अनुभव प्रेक्षकांना देण्यासाठी कलर्स मराठी ( Colors Marathi) वाहिनीने दोन विशेष भागांची पर्वणी सादर केली आहे. ‘आई तुळजाभवानी’ (Aai Tulja Bhavani) आणि ‘जय जय स्वामी समर्थ’ (Jai Jai Swami Samarth ) या मालिकांमधील हे विशेष एपिसोड्स केवळ कथानकापुरते मर्यादित नसून, ते प्रेक्षकांना एका दिव्य आध्यात्मिक प्रवासावर घेऊन जाणार आहेत.(Colors Marathi Mahashivratri Vishesh)

महाशिवरात्र (Mahashivratri) ही शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि ऊर्जेने परिपूर्ण अशी रात्र मानली जाते. या दिवशी शिवतत्त्व अधिक जागृत होते, अशी श्रद्धा आहे. या पार्श्वभूमीवर ‘आई तुळजाभवानी’ मालिकेचा विशेष भाग रविवारी, १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता प्रसारित होणार आहे. या भागात ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ या गूढ आध्यात्मिक संकल्पनेचा उलगडा करण्यात येणार आहे. महादेवांच्या विराट आणि ब्रह्मांडरूपाचे दर्शन प्रभावी दृश्यांमधून घडवले जाणार असून, त्यामागील तत्त्वज्ञानही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जाईल. देवी यमाई आणि आई तुळजाभवानी यांच्या कथानकातून शिवतत्त्वाशी असलेला सूक्ष्म संबंध अधोरेखित केला जाईल. भक्ती आणि तत्त्वज्ञान यांचा सुरेख संगम या भागात अनुभवायला मिळेल.

यानंतर सोमवारी, १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७:३० वाजता ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेचा २६ मिनिटांचा विशेष भाग सादर होणार आहे. स्वामी समर्थांच्या जीवनप्रवासातील एक महत्त्वपूर्ण प्रसंग यात उलगडणार आहे. भाऊसाहेब जहागीरदार यांच्या आयुष्यातील निर्णायक क्षणातून शिवतत्त्वाची अनुभूती प्रेक्षकांना दिली जाणार आहे. शिवतांडव स्तोत्राच्या गजरात स्वामी समर्थांच्या अंतःकरणातून प्रकट होणारी बारा ज्योतिर्लिंगे हा प्रसंग विशेष आकर्षण ठरणार आहे. प्रत्येक ज्योतिर्लिंगाचे आध्यात्मिक महत्त्व आणि त्यातील दैवी संकेत भव्य दृश्य रचनेतून साकारले जातील.(Colors Marathi Mahashivratri Vishesh)
==================================
==================================
या दोन्ही विशेष भागांसाठी आधुनिक तंत्रज्ञान, नेत्रदीपक सेट्स, प्रभावी पार्श्वसंगीत आणि कलाकारांचा दमदार अभिनय यांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे हा अनुभव केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता, तो भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण करणारा ठरणार आहे. यंदाची महाशिवरात्र प्रेक्षकांसाठी श्रद्धा, भक्ती आणि दिव्यतेचा अनोखा संगम घेऊन येत आहे. कुटुंबासमवेत हा आध्यात्मिक सोहळा अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना या विशेष भागांमधून मिळणार आहे.