
‘सारी सारी रात तेरी याद सताये..’ हे Roshan यांचे गाणे नौशाद यांनी का रेकॉर्ड केले?
भारतीय चित्रपटाच्या सुवर्णकाळात अनेक संगीतकार होऊन गेले; ज्यांनी भारतीय चित्रपट संगीत आपल्या दर्जेदार सुरावटींनी समृद्ध केलं. त्या काळात कलावंतांना परस्परांच्या कलेबाबत कामाबाबत कमालीचा आदर असायचा. त्या काळात स्पर्धा नक्कीच असायची पण ती निकोप असायची. कुठेही कुणी कुणावर कुरघोडी करत नसे. त्यामुळे सर्वोत्कृष्ट असं कलेचे रूप रसिकांच्या पुढे यायचं. एकदा एस एम नायडू या दक्षिणात्य निर्मात्याने त्याच्याच एका तमिळ चित्रपटाचा (चित्रपट: Malaikkallan) हिंदी रीमेक बनवायचा ठरवले.
साउथ कडील चित्रपटसृष्टी पूर्वी पासूनच अतिशय डिसिप्लिन आणि वेळेचे गणित कटाक्षाने पाळणारी होती. त्या निर्मात्याला झटपट एक महिन्यात चित्रपट बनवायचा होता. सेट तयारच होता. स्क्रिप्ट हातात होती. त्यासाठी त्याला चित्रपटातील गाणी देखील तितक्याच जलद गतीने बनवून हवी होती. चित्रपट होत 1955 सालचा ‘आझाद’. या चित्रपटाचा नायक दिलीप कुमार तर नायिका मीनाकुमारी होती. दिलीप कुमार नायक आहे म्हटल्या नंतर संगीत स्वाभाविकपणे नौशाद यांच्याकडे जाणं अपेक्षित होतं. निर्माते नायडू नौशाद यांना भेटले आणि त्यांनी आपल्या चित्रपटासाठी संगीत देण्याची विनंती केली तसेच सिनेमातील सर्व गाणी एका महिन्याच्या आत पूर्ण करून द्यायला सांगितले.

तेव्हा नौशाद अली हसले आणि त्यानी नायडू साहेबांना सांगितले की,” माझी काम करण्याची पद्धत वेगळी आहे. मी एक – एक गाणं बनवायला एकेक महिना घेतो. त्यामुळे इतक्या जलद गतीने माझ्याकडून हे काम होणे शक्य नाही. तुम्ही हे काम संगीतकार सी रामचंद्र यांना द्या. ते अतिशय सुंदर संगीत देत असतात. त्यांची काम करण्याची स्टाईल वेगळी आहे. माझी वेगळी आहे. ते कमी वेळात दर्जेदार संगीत देवू शकतात. “ स्वत: नौशाद यांनी सांगितल्याने तो निर्माता संगीतकार सी रामचंद्र यांच्याकडे गेला आणि अशा प्रकारे आझाद या सिनेमाचे संगीत त्यांच्याकडे गेले!
ही परस्परांविषयीची स्नेहभावना त्या काळात असायची. संगीतकार रोशन 1957 साली ‘अजी बस शुक्रिया’ या चित्रपटाला संगीत देत होते. या चित्रपटात गीता बाली, सुरेश, जॉनी वॉकर सनई शुभा खोटे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटातील गाणी फारुख कैसर यांनी लिहिली होती. गाण्यातील सिच्युएशन फारुख कैसर यांना सांगितली गेली. त्यानुसार त्यांनी गाणी लिहिली. या सिनेमात एक गाणं होतं ‘सारी सारी रात तेरी याद सताये..’ हे विरह गीत लता गाणार होती. या गाण्याला म्युझिक देताना संगीतकार रोशन यांनी भैरवी हा राग निवडला होता या रागात हे गाणे लता मंगेशकर यांच्याकडून गाऊन घ्यायचे त्यांनी ठरवले. या गाण्याची चाल त्यांना सर्व सामन्यांच्या ओठावर सहज बसेल अशी हवी होती. त्या मुळे ही ट्यून तयार करताना ते अक्षरश: तहान भूक विसरून काम करत असायचे. त्यांचे पुत्र संगीतकार राजेश रोशन यांनी ही आठवण एका मुलाखतीत सांगितली होती.
================================
हे देखील वाचा : तेरी दुनिया से दूर चले होके मजबूर – Mahipal
================================
ज्या दिवशी गाण्याचे रेकॉर्डिंग होते त्या दिवशी त्या स्टुडिओमध्ये ज्येष्ठ संगीतकार नौशाद हे आले होते. रोशन यांना खूप आनंद झाला. त्यांनी नौशाद यांना सांगितले ,” आज माझे भाग्य थोर आहे की माझ्या गाण्याच्या रेकॉर्डिंग च्या वेळेला आज आपण उपस्थित आहात. माझ्यासाठी आपण एक काम कराल का ? मी हे गाणे भैरवी रागात बांधले आहे. या गाण्याचे रेकॉर्डिंग तुमच्या मार्गदर्शनाखाली व्हावे अशी माझी इच्छा आहे!” नौशाद यांनी देखील आपल्या मित्राचा हा आग्रह पूर्ण केला रोशन यांनी गाण्याला चाल अतिशय सुंदर लावली होती या संपूर्ण गाण्याचे रेकॉर्डिंग संगीतकार नौशाद यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले. या गाण्यात ढोलकीचा जो प्रॉमीनंट ठेका आहे तो संगीतकार दत्ताराम यांनी वाजवलेला आहे.

दत्तू का ठेका म्हणून त्या काळात तो खूप लोकप्रिय होता. या ढोलकी मुळे या गाण्याला चार चाँद लागले होते. हे गाणे त्या काळात खूप अफाट लोकप्रिय झाले होते बिनाका गीतमाला मध्ये या गाण्याने वार्षिक कार्यक्रमात हे गाणे झळकले होते! या गाण्याच्या चालीवर पुढे अनेक भजन रचली गेली. संगीतकार कल्याणजी आनंदजी यांनी ‘जब जब फुल खिले’(1966) या चित्रपटातील ‘परदेसी यो से ना अखिया मिलाना..’ या गाण्याला देखील याच चालीवर संगीतबद्ध केले होते. त्या काळातील निकोप आणि हेल्दी वातावरणाच्या मुळे जी गाणी बनत होती ती आज 60-70 वर्षानंतर देखील आपल्याला त्या गाण्यातील म्युझिक पिसेस सहित आपल्याला जशी च्या तशी आठवतात हे त्या काळाचे यश आहे!