Phula Movie Poster: लोकपरंपरेच्या सावलीत उमलणारी एका मुलीची वेदनादायी कहाणी

Amitabh Bachchan : ‘कभी कभी’ चित्रपटाची ५० वर्ष पूर्ण!
माझ्या मते ‘कभी कभी’ ची तीन खास वैशिष्ट्ये. दिग्दर्शक यश चोप्रा यांची ‘रोमान्सचा बादशहा’ (किंग ऑफ रोमान्स) ही प्रतिमा बळकट करण्यास या चित्रपटाच्या सुपर डुपर हिटचा फायदा झाला. ‘दाग’ (१९७३) ने त्याची सुरुवात झाली होती. यश चोप्रा यांनी आपल्या यशराज फिल्म्स या बॅनरची स्थापना केल्यानंतरचा पहिला चित्रपट ‘दाग’. त्यांच्या तोपर्यंतच्या कारकिर्दीतील बी. आर. फिल्म निर्मित ‘धुल का फुल’ (१९५८), ‘वक्त’ (१९६५), ‘इत्तेफाक’ (१९६९) अशा अन्य चित्रपटांपेक्षा ‘दाग’ तसा वेगळा. त्यानंतर यशजींनी दिग्दर्शित केलेले ‘जोशीला’ (१९७३ दिवाळीत प्रदर्शित), ‘दीवार’ (१९७५) हे चित्रपट त्रिमूर्ती फिल्मचे गुलशन रॉय यांच्या निर्मिती संस्थेसाठी दिग्दर्शित केले. विशेष उल्लेखनीय गोष्ट, ‘ दीवार’ प्रदर्शित होतोय तोच यशजींनी ‘कभी कभी’ वर सगळे लक्ष केंद्रित केले आणि वर्षभरातच ‘कभी कभी’ पडद्यावर आला देखिल. ‘दीवार’ २४ जानेवारी १९७५ रोजी प्रदर्शित झाला तर तेरा महिन्यांतच २६ फेब्रुवारी १९७६ रोजी ‘कभी कभी’ मुंबईतील मेट्रो चित्रपटगृह आणि २७ फेब्रुवारी रोजी उपनगरात प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रदर्शनास पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. (Kabhi Kabhie Movie 1976)

अमिताभ बच्चनच्या प्रियकर नायकाला चित्रपट रसिकांनी स्वीकारले. प्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘जंजीर’ (१९७३), यश चोप्रा दिग्दर्शित ‘दीवार’ (१९७५) आणि रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ (१९७५) या सलिम जावेद यांची पटकथा आणि संवाद लेखन असलेल्या चित्रपटांच्या यशाने अमिताभ बच्चनची सूडनायक (ॲन्ग्री यंग मॅन) ही चित्रपट रसिकांना भरभरून आवडत असलेल्या प्रतिमेपेक्षा वेगळा असा, कवि मनाचा प्रियकर आणि मग एका युवतीचा पिता अशी त्याची भूमिका चित्रपट रसिक कसे बरे स्वीकारतील अशी असलेली शंका चित्रपटाच्या खणखणीत यशाने दूर केली. चित्रपटाचे यश हे अनेक प्रश्नांवरचे उत्तम उत्तर असते. या भूमिकेसाठी आपणास विचारले होते असे राजेश खन्नाने कालांतराने एका फिल्मी मुलाखतीत सांगितले तरी हुकलेल्या संधीबद्दल हळहळण्यात काय अर्थ? (Yash Chopra Movies)
संगीतकार खय्याम यांना पुन्हा चित्रपटसृष्टीत कार्यरत राहण्याची संधी मिळाली. यश चोप्रा यांना ‘कभी कभी’ साठी लक्ष्मीकांत प्यारेलाल संगीतकार असावेत असे वाटत होते. कारण अगदी स्पष्ट आहे, ‘दाग’ ची सगळीच गाणी लोकप्रिय, आणि तेव्हा गीतकार साहिर आणि संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे सूर जुळले होतेच. (तत्पूर्वी बी. आर. चोप्रा दिग्दर्शित ‘दास्तान’ साठीही हीच गीतकार आणि संगीतकार जोडी जमली होती.) साहिर लुधियानवी यांचे म्हणणे होते की, आपल्या ‘कभी कभी’ या कवितेवर आधारित (आणि त्यावरुनच कथा सुचली म्हणून) खय्याम यांना संगीतकार म्हणून निवडावे. खय्याम हे लहरी म्हणून ओळखले जात. साहिर यांची ‘कभी कभी’ ही कविता आणि दत्तक मुलाचा शोध घेणारी आई असे वृत्त यांचा नाट्यमय ताळमेळ घालत पामेला चोप्रा यांनी ‘कभी कभी’ ची पटकथा लिहिली आणि सागर सरहादी यांनी संवाद लिहिले. त्या काळातील हा मल्टी स्टार कास्ट चित्रपट. यशराज फिल्म्सची निर्मिती यंत्रणा, योग्य नियोजन आणि गुलशन रॉय यांची मॉडर्न मुव्हीज ही वितरण व्यवस्था यामुळे चित्रपट वेळेत बनून पडद्यावर आला. (Amitabh Bachchan)
================================
हे देखील वाचा : Sholay थांबला नाही, थांबणारही नाही….
================================
वहिदा रेहमान यांनी साकारलेल्या भूमिकेसाठी नूतनजीना विचारले असता त्यांनी आपण नीतू सिंगच्या आईच्या भूमिकेत अवघड ठरु असे वाटल्याने त्यांनी नकार दिल्याचे गॉसिप्स मॅगझिनचे वृत्त होते. पण आपणास या भूमिकेसाठी विचारले नव्हते असे नूतनजी कालांतराने म्हणाल्या. नीतू सिंगच्या भूमिकेसाठी सर्वप्रथम परवीन बाबीच्या नावाचा विचार झाला ( बरं झालं तसं घडले नाही) , मग बिंदीया गोस्वामीच्या नावाची चर्चा होती. नीतू सिंगने होकार दिला आणि याच चित्रपटाच्या काश्मीर येथील चित्रीकरणाच्या वेळी तिचं आणि ऋषी कपूर हे प्रेमाचा अभिनय करता करता खरोखरच प्रेमात पडले.एक चित्रपट घडता घडता अनेक गोष्टी आकार घेतात त्या अशा. ऋषि कपूरने आपल्या अतिशय बिझी शूटींग शेड्युलमुळे यशजींना अगोदर नाहीच म्हटले. त्याला आणण्याची जबाबदारी शशी कपूरने यशस्वी केली. यशजी अतिशय फोकस्ड दिग्दर्शक असल्याने ऋषी कपूरवरची काही दृश्ये आणि प्रेम गीत चित्रीत झालीदेखिल. ‘येथे निर्माता आणि दिग्दर्शक असे दोन्ही दिसतात.’ चित्रपट निर्मितीत असे पक्के नियोजन हवे.

‘कभी कभी’ निर्मितीवस्थेत असताना या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळेल याबाबत या चित्रपटाचे वितरक गुलशन रॉय साशंक होते. ते चित्रपट वितरणातील मोठे प्रस्थ. अजून ‘शोले’ च्या क्रेझची अक्राळविक्राळ लाट होती. राजकुमार कोहली निर्मित आणि दिग्दर्शित ‘नागिन’ ( २३ जानेवारी १९७६ ला रिलीज), सुभाष घई दिग्दर्शित ‘कालीचरण’ ( ६ फेब्रुवारी १९७६ रिलीज) सुपर डुपर हिट ठरले होते. अशा वातावरणात प्रेम आणि नातेसंबंधांची दोन पिढ्यांची गोष्ट चित्रपट रसिक स्वीकारतील का अशी शंका चुकीची नव्हती. ‘कभी कभी’ श्रवणीय गाण्यांनी वातावरण बदलून टाकले. कभी कभी मेरे दिल मे, मै पल दो पल का शायर हू, तेरे चेहरे से नजर नहीं हटती, तेरे फुलो जैसा रंग, मेरे घर आयी एक नन्ही परी…या गाण्याच्या रेकाॅर्डसची विक्री वाढली, बिनाका गीतमालामध्ये कभी कभी मेरे दिल मे अतिशय वेगाने वरच्या क्रमांकावर आले, याचा सकारात्मक परिणाम झाला आणि चित्रपटाची गर्दी वाढत वाढत गेली. कभी कभी मेरे दिल मे हे गाणे पन्नासच्या दशकात चेतन आनंद दिग्दर्शित ‘ काफिर ‘ या चित्रपटासाठी खय्याम यांनी रचले होते. पण तो चित्रपट बंद पडल्याने ती चाल या चित्रपटासाठी वापरली असाही एक किस्सा सांगितला जातो. (Rakhee Gulzar)
================================
हे देखील वाचा : NFDC : राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाची वैशिष्ट्यपूर्ण पन्नाशी….
================================
१९७६ साली प्रदर्शित झालेल्या दस नंबरी, हेरा फेरी, चरस, नागिण, लैला मजनू, कालीचरण या चित्रपटाच्या स्पर्धेत कभी कभी चित्रपटानेही मोठ्या शहरात रौप्य महोत्सवी यश प्राप्त केले. त्यातील गाणी आजही लोकप्रिय आहेत, आणि म्हणूनच चित्रपटही लोकप्रिय आहे. दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या वाटचालीतील हा अतिशय महत्त्वाचा चित्रपट. आणखी एक विशेष म्हणजे या चित्रपटाचे इंग्रजीत नाव Kabhi Kabhie असे स्पेलिंग केले. कारण काय तर फिल्मी ज्योतिषाचा सल्ला इंग्रजी अक्षरे अकरा व्हायला हवीत… एक चित्रपट अनेक गोष्टी या अशा. (Rishi Kapoor & Neetu Singh)