
‘खूबसूरत’; अभिनेत्री Rekha हिला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळवून देणारा चित्रपट
ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘खूबसूरत’ (१९८०) हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील एक ‘कल्ट क्लासिक’ मानला जातो. या सिनेमाने अभिनेत्री रेखा चा संपूर्णपणे मेक ओव्हर केला. गुलजार यांच्या ‘घर’ या सिनेमा पासून तिचा अभिनेत्री बनण्याचा यशस्वी प्रवास सुरू झाला होता. त्या पूर्वी रेखा सिनेमात एक शो पीस, सेक्स डॉल समजली जायची. पण या सिनेमा पासून रेखा ला बॉलीवूड सिरियसली घेवू लागले . या यानंतर पुढच्याच वर्षी तिचा ‘उमराव जान‘ हा सिनेमा आला होता जो तिच्या कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला. गंमत म्हणजे ‘उमराव जान’ या सिनेमासाठी रेखाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पण फिल्मफेअर पुरस्कार मिळाला नाही! ‘खूबसूरत’ या सिनेमासाठी रेखाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ‘फिल्मफेअर’ पुरस्कार मिळाला. रेखासाठी हा फार महत्वाचा पुरस्कार होता कारण तिला मिळालेला हा पहिला ‘फिल्मफेअर’ पुरस्कार होता.
‘खूबसूरत ‘ हा चित्रपट केवळ मनोरंजक नाही, तर तो कौटुंबिक शिस्त आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांच्या तील संघर्षावर अतिशय हलक्या-फुलक्या शैलीत भाष्य करतो. चित्रपटाची कथा ‘निर्मला गुप्ता ‘ (दिना पाठक) यांच्या कडक शिस्तीत चालणाऱ्या एका कुटुंबाभोवती फिरते. या घरात हसण्यावर, गाण्यावर आणि आनंदी राहण्यावर जणू अघोषित बंदी असते. अशा वातावरणात ‘मंजू‘ (रेखा) नावाच्या एका खेळकर, अवखळ मुलीचे आगमन होते आणि ती आपल्या उत्साहाने संपूर्ण घराचा कायापालट कशी करते, हे ऋषिकेश मुखर्जी यांनी अतिशय सुंदरपणे मांडले आहे.

रेखा यांनी साकारलेली ‘मंजू’ ही व्यक्तीरेखा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाच्या भूमिकांपैकी एक आहे. या सिनेमा पूर्वी रेखा यांची प्रतिमा एका ‘ग्लॅमरस’ अभिनेत्रीची होती, पण या चित्रपटात रेखा चा वावर अतिशय साध्या ( दोन वेण्या घातलेली the girl at next door टाइप) होता पण तितकाच प्रभावी अभिनय होता . दोन वेण्या आणि कॉटन च्या साड्यांमधील रेखा प्रेक्षकांना कमालीच्या भावल्या. रेखा ची यातली व्यक्तीरेखा उत्साहाने रसरसलेली आहे. तिचा अभिनयातील उत्स्फूर्तपणा तिने आपल्या देहबोलीतून आणि डोळ्यांतून अचूक व्यक्त केला आहे. ‘सारे नियम तोड दो’ या गाण्यातील तिची मस्ती आजही तितकीच ताजी वाटते. केवळ खोडकरपणाच नाही, तर चित्रपटाच्या शेवटी जेव्हा कौटुंबिक पेच निर्माण होतो, तेव्हा तिच्या भूमिकेतील समजूतदारपणा आणि भावूक अभिनय तिच्या अभिनयाची खोली सिद्ध करतो.

गुलजार यांनी लिहिलेले संवाद चित्रपटाचा आत्मा आहेत. त्यात साधेपणा आणि मिश्किलपणाचा सुरेख संगम आहे. आर. डी. बर्मन यांचे संगीत आणि ‘सुन सुन सुन दीदी तेरे लिए’ सारखी गाणी आजही लोकप्रिय आहेत.दिना पाठक यांनी कडक शिस्तीची आई आणि अशोक कुमार यांनी हळव्या वडिलांची भूमिका उत्तम वठवली आहे. राकेश रोशन यांच्यासोबतची रेखा यांची केमिस्ट्री खूप नैसर्गिक वाटते. ‘खूबसूरत’ या सिनेमातून मिळणारा संदेश महत्वाचा होता शिस्त आयुष्यात महत्त्वाची असली, तरी माणसाने आपले ‘माणूसपण’ आणि ‘आनंद’ गमावता कामा नये.
================================
हे देखील वाचा : Manoj Kumar : माला सिन्हा यांनी मनोज कुमार यांचा पाणउतारा केला होता.
=================================
रेखाला या चित्रपटासाठी तिचा पहिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला ज्याने तिच्यातील अभिनेत्रीवर शिक्कामोर्तब केले आणि तिच्या अभिनय यात्रेचा मार्ग प्रशस्त झाला. या सिनेमात रेखाने गाणे गायले होते.(कायदा कायदा) गायन कारकीर्दीचा तो शुभारंभ होता.अभिनेता डेव्हिड खरं तर भारतीय सिनेमातून संन्यास घेवून कॅनडा मध्ये स्थायिक झाले होते पण भारतात सुट्टीत आल्याचे ऋषीदा यांना कळले आणि त्यानी या सिनेमात डेव्हिड यांना खास भूमिका दिली. डेव्हिड यांची ही अखेरची लोकप्रिय भूमिका ठरली. ‘खूबसूरत या सिनेमाला फिल्म फेअर ची सहा नामांकने मिळाली होती. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (रेखा) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (ऋषिकेश मुखर्जी) सर्वोत्कृष्ट चित्रपट , सर्वोत्कृष्ट कॉमेडी यन (केश्टो मुखर्जी ) सर्वोत्कृष्ट कथा (डी एन मुखर्जी) सर्वोत्कृष्ट सह नायिका (दिना पाठक) त्या पैकी रेखा, ऋषिकेश मुखर्जी, केश्टो मुखर्जी यांना पारितोषिके मिळाली.