‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
जेव्हा खुद्द दिलीपकुमार खजील झाले…
कलाकारांचे आत्मचरित्र म्हणजे फक्त त्यांच्या कौतुकाचे, अभिमानाचे किस्से नव्हेत तर काही वेळा त्यांची झालेली फजितीसुद्धा तितकीच रंगवून सांगितली जाते. हा किस्सा सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांच्या आत्मचरित्रातील आहे.
दिलीपकुमार तेव्हा प्रसिद्धीच्या शिखरावर होते. अशावेळी कलाकारांना त्यांच्या चाहत्यांकडून मिळणारं प्रेम, कौतुक याची इतकी सवय झालेली असते की यापेक्षा थोडी वेगळी प्रतिक्रिया त्यांना अस्वस्थ करून जाते.
दिलीप कुमार (Dilip Kumar) एकदा विमान प्रवास करत होते. इतका मोठा कलाकार सोबत प्रवास करतो आहे म्हटल्यावर सहप्रवासी उत्सुकतेने दिलीपकुमार यांना पाहण्यासाठी, फोटो काढण्यासाठी, सही घेण्यासाठी लगबग करत होते. कोणत्याही कलाकाराला सुखावणारी ही गोष्ट! मात्र या कौतुकापेक्षा दिलीप कुमार यांना त्यांच्या सहप्रवाशाचा कोरडेपणा खटकत होता. त्यांच्या बाजूच्या सीटवर बसलेली व्यक्ती शांतपणे विमानाच्या खिडकीतून बाहेर पहात होती. इतका मोठा सुपरस्टार आपल्या शेजारी बसलाय याची त्यांना कल्पनाही नसल्यासारखे त्यांचे वागणे होते.
न राहवून दिलीप कुमार यांनी त्या व्यक्तीशी बोलायला सुरुवात केली. आपण चित्रपट पाहत नाही का? असा प्रश्न त्यांनी आपल्या सहप्रवाशाला विचारला. त्यावर त्यांनी आपण फारसे चित्रपट पहात नाही असे शांतपणे सांगितले. दिलीपकुमार यांनी मग आपण चित्रपटात काम करतो याची माहिती दिली. सहप्रवाशाने पण ‘आपण कोणते काम करता?’ असे विचारले.
‘आपण अभिनेता आहोत’ असं दिलीप कुमार यांनी अभिमानाने सांगितले. आणि ओळख करून देत म्हटले,
“मी दिलीप कुमार”.
सहप्रवाशाने स्वतःची ओळख करुन दिली,
“मी जे.आर.डी. टाटा”.
ते ऐकताच दिलीपकुमार अक्षरशः उडालेच. इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वाला आपण ओळखू शकलो नाही याबद्दल ते खजील झाले आणि त्यासाठी त्यांनी जे. आर.डी. टाटा (J. R. D. Tata) यांची माफीही मागितली.
कलाकार पडद्यावर दिसतात त्यामुळे त्यांना लोकप्रियता लाभते. पण उत्तुंग काम करूनही प्रसिद्धीपासून दूर राहणा-या व्यक्ती या लोकप्रियतेपासून कशा विन्मुख राहतात याचं उत्तम उदाहरणच हा किस्सा देतो.