ब्लॉग: गाॅसिप्सची (Filmy Gossips) चवदार चंगळ मंगळ…
हिंदी चित्रपटसृष्टीच्या गाॅसिप्सची (Filmy Gossips) मिडियातील जागा, गरज, चव आणि अस्तित्व हे सणासुदीला जेवणाच्या ताटातील चटणी, लोणचे आणि कोशिंबीर इतकेच मर्यादित होते. उर्वरित ताटात मात्र ‘सिनेमा एके सिनेमा’ असे. त्यात चित्रपटविषयक लेख, विश्लेषण, दीर्घ मुलाखत, जुन्या आठवणी अर्थात फ्लॅशबॅक, जुने एक्स्ल्युझिव्हज फोटो, नवीन चित्रपटाचे खोलवर सविस्तर परीक्षण, बातम्या, फोटो, वाचकांची विविध दृष्टिकोनातील वैचारिक पत्रे असे अनेक घटक असत.
आता याबाबतही ‘गेले ते दिन गेले” (कधी बरं गेले, समजलेच नाही) असं म्हणायची वेळ आली आहे. ताटात अनेक प्रकारची कोशिंबिर, चटणी आणि लोणचे हवेसे झाले आहेत जणू. अगदी रशियन अथवा इटालियन सॅलड वगैरे चविष्ट असते.
आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल काळात पारंपरिक मुद्रित माध्यमे, चॅनल आणि नवीन युगातील डिजिटल अशा तीनही माध्यमातून भरपूर गाॅसिप्स आणि ग्लॅमर असतं आणि त्यांना तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर फॅन्स आणि फाॅलोअर्सकडून भरपूर लाईक्स मिळताहेत, यावरुन ते अधिकाधिक एस्टॅब्लिज होत चाललयं. तेच म्हणजे चित्रपटाचे जग असे वाटू लागले आहे.
गाॅसिप्सची काही रिळे (संदर्भ अशा अर्थाने) अशी,
– कैतरिना कैफच्या मंगळसूत्राची किंमत किती? (त्यावरुन तिची श्रीमंती समजणार की काय?)
– नवीन घरात रहायला जाताच पहिल्या दिवशी कैतरिना कैफने शिरा केला आणि विकी कौशल व त्याच्या कुटुंबियांनी तो अतिशय आवडीने खाल्ला. सोशल मिडियावर तिने तसे फोटो पोस्ट केले आणि ते व्हायरलही झाले.
– सैफ अली खानना करिना कपूरसमोर प्रश्न विचारला, “आजची सर्वाधिक हाॅट अभिनेत्री कोण? यावर त्याने क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिले, कैतरिना कैफ.”किती चपखल उत्तर हो!
– आयुष्यमान खुरानाने मुंबईत आपल्या मालकीचे घर पहिल्यांदा घेतले.
– अर्जुन कपूरने मलैका अरोरासोबतचे नवीन फोटो सोशल मिडियात पोस्ट करत, आपले आजही चांगले संबंध आहेत असे स्पष्ट केले. म्हणजे आम्ही दुरावलेलो नाही.
वगैरे वगैरे वगैरे…
मनोरंजन क्षेत्र आज इतके आणि असे वाढले आहे की, कोणत्याही प्रकारच्या गाॅसिप्सचा तुटवडा अजिबात नाही. त्याचे अफाट पीक येत आहे आणि त्यासाठी अनेक लहान मोठ्या गोष्टींचे खतपाणी घातले जात आहे. एखादे प्रेम प्रकरण, ब्रेकअप, लग्न, विवाहबाह्य संबंध असे कुठे ना कुठे सुरु असतेच. सर्वच क्षेत्रात मोकळे वातावरण आले आहे आणि मनोरंजन क्षेत्रात तर ते अगदी स्वाभाविक आहे. तो तिथल्या सिस्टीमचा महत्वाचा भाग आहे.
असे गाॅसिप्स (Filmy Gossips) म्हणजेच आजचे मनोरंजन क्षेत्र अशी प्रतिमा अर्थात इमेज अधोरेखित होत आहे हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न पडू शकतो. पण अशा प्रश्नांच्या जंजाळात अडकून पडण्यासाठी कोणाकडेही वेळ नाही.
मराठी असो अथवा हिंदी अशा दोन्ही भाषेत (आणि देशभरातील सर्वच प्रादेशिक भाषेत) ‘चित्रपट निर्मितीची फॅक्टरी’ अगदी जोरात सुरु आहे. केवढे तरी चित्रपट बनताहेत. कोरोनामुळे निर्मितीच्या संख्येला ओहोटी लागल्याचे वरकरणी तरी चित्र नाही.
अर्थात सत्य काय ते वर्षभरात समोर येईल. तूर्तास चित्रपट निर्मिती जोरात सुरु आहे. चित्रपट प्रदर्शित होताहेत. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ’83’ चे वारेमाप कौतुक झालं (तसा तो चित्रपट निश्चित आहे. रणवीर सिंगने अतिशय मेहनतीने कपिल देव साकारला आहे), तर ‘पुष्पा’ चित्रपटाला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. मराठीतही ‘झिम्मा’, ‘पांडू’ यांनी अतिशय उत्तम रितीने काही कोटींची कमाई केल्याची सकारात्मक बातमी आहे. एकीकडे हे सगळं होत असताना गाॅसिप्सही जोरात आहे.
हे ही वाचा: सोशल मीडिया आणि रसिकांच्या उलटसुलट प्रतिक्रिया, सुचना, सल्ले वगैरे वगैरे….
पूर्वीच्या तुलनेत आजच्या युथला अशा गाॅसिप्समध्ये अतिशय खमंग आणि चविष्ट असं काही-बाही मिळतयं. ते त्यांना जास्त आवडतंय, जवळचं वाटतंय आणि सवयीचंही झालं आहे. याचं कारण म्हणजे आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक जगात त्यांच्याकडे ‘सिनेमा कसा असावा, सिनेमा कसा पहावा’ यावर लक्ष देण्यासाठी खरंच वेळ नाही.
एखाद्या चित्रपटासाठी अमूकच थीम का निवडली असेल, दिग्दर्शन कसे आहे, अभिनय किती दर्जेदार आहे, या चित्रपटाचा सामाजिक प्रभाव कसा आहे, याचा विचार ते करत नाहीत अथवा त्यांना त्याची आवश्यकता वाटत नाही. आज फास्ट फूड आणि जिभेला सुखावणारे चमचमीत खाण्याचं युग आहे, जे कुठूनही मागवता येतं, अगदी ऑफिसमध्येही ते आणलं जातं.
इतकंच नव्हे तर, जर कोणी शोध घेतलाच, तर लक्षात येईल, सिनेमा थिएटरपेक्षा कोणत्याही प्रकारच्या हाॅटेलमध्ये जाण्यास आजचा युथ वर्ग अधिकाधिक उत्साही असतो. अगदी ओटीटी प्लॅटफॉर्मवर घरबसल्या चित्रपट पाहतानाही घरी ‘टेस्टी फूड’ मागवून त्याचा आस्वाद घेण्याची मानसिकता बळावत चालली आहे.
दुसरीकडे पहावं, तर व्हाॅटसअपवर मेसेजेसचे युग आहे (तोही कमीत कमी शब्दात असावा), इन्स्टाग्रामवर फोटो पाहताक्षणीच लाईक्स करण्याची घाई आहे. कोणी फोन केलाच आणि आपण उचलालच तर, ‘सिधे पाईंट पे आ जावो’ असा थेट संवाद प्रकार रुळलाय. अशा आजच्या जीवनशैलीत, झटपट गाॅसिप्स अतिशय फिट बसलयं आणि ते अगदी हिट आहे.
ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटच्या काळात गाॅसिप्सचे चौकार, रिव्हर्स स्वीप, उत्तुंग षटकार हवेहवेसे वाटत आहेत. प्रियांका चोप्रा आणि निकी जोन्समध्ये खटके उडण्याची घटना असो अथवा विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या मुलीचा – वामिकाचा पहिला वाढदिवस असो, याच “आजच्या ठळक फिल्मी बातम्या (Filmy Gossips)” असतात.
हे सुद्धा वाचा: ‘83’ चित्रपटाच्या निमित्ताने
बाॅलीवूडमध्ये असं कुठे काय चाललंय (Filmy Gossips), हे अगदी कमीतकमी शब्दात समजलं की, ते आज पुरेसं होतं आहे. फार पूर्वी कसोटी क्रिकेटचे दिवस होते. पाच दिवसाच्या कसोटी सामन्यात तीन दिवस झाले की सुट्टी असे आणि मग उर्वरित दोन दिवस सामना चाले. म्हणजे जवळपास आठवडाभर एकाच कसोटी सामन्यावर सगळीकडे चर्चा होत असे आणि त्यासाठी जनसामान्यांकडे भरपूर वेळ होता. ते एकेका खेळाडूवर सविस्तर बोलत.
त्या काळात चित्रपटविषयक मोठ मोठे लेख, मुलाखती छापल्या जात आणि वाचल्याही जात. आज डिजिटल पिढीला जास्तीत जास्त आठ ते दहा मिनिटांच्या व्हिडिओत चित्रपटविषयक माहिती, आठवणी अथवा भाष्य हवे असते. त्यात जर आठ मिनिटात चटपटीत अशी सहा गाॅसिप्स असतील, तर तो व्हिडिओ सुपरहिट झालाच समजा! त्याचे व्ह्युज भराभर वाढतात. याचे कारण म्हणजे हे ऐकण्यात रिलीफ आहे. कसलीही कटकट नाही. ऐकलं आणि सोडून दिले असा झटपट मामला.
अगोदरच रोजच्या धकाधकीच्या जीवनात एकाच वेळेस अनेक गोष्टींचा विचार करणं सुरु असतं. त्यातच आशयपूर्ण चित्रपट पहा, बौद्धिक चित्रपट आवर्जून पहा याची युथला फारशी गरज वाटत नाही. चाळीशीपार आयुष्यात एखादा चित्रपट पाहताना सखोल विचार करता येईल. तेव्हा जगण्याची गती थोडी कमी होत जाते.
आज नवीन आठवड्याचा सोमवार सुरु होतो आणि तेवढ्यात शुक्रवार शनिवार कधी येतो हे लक्षात येत नाही. अशावेळी, रुपेरी पडद्यावरील वेगळे प्रयोग कधी बरं पाहणार? बरं पाहिले तरी त्यावर चर्चा नको. आम्ही कोणता चित्रपट पाहायचा हे आम्हाला समजते, असाच आजच्या युथचा अप्रोच आहे. म्हणून तर समिक्षकांनी चार साडेचार स्टार दिलेले चित्रपटही ही डिजिटल पिढी अगदी सहजपणे नाकारतेय.
आज जवळपास कोणत्याही चित्रपटावर पूर्वीप्रमाणे रोखठोक भाष्य होत नाही, टीका होत नाही. पूर्वी त्यातच क्रेडिबिलीटी होती. त्यापेक्षा झटपट गाॅसिप्स उत्तम. तेही गरमागरम आणि टेस्टी. त्यामुळे मेंदूला अपचन वगैरे होत नाही. कारण तिथपर्यंत ते गाॅसिप पोहचेपर्यंत काहीतरी वेगळं समोर येतं .
बाॅलीवूडमधील ही ‘गाॅसिप्स परंपरा’ पन्नास वर्षांपूर्वी रुजायला सुरुवात झाली. तत्पूर्वी, राज कपूर आणि नर्गिस यांच्या नात्यावर अथवा देव आनंद आणि सूरय्या यांच्या प्रेम प्रकरणावर केवळ कुतूहल म्हणून चर्चा होत असे. परंतु, त्यापेक्षा जास्त रस राज कपूरच्या दिग्दर्शनातील चित्रपट, त्याचा अभिनय, देव आनंदची स्टाईल, रोमॅन्टीझम, दिलीप कुमारचा ट्रॅजेडी किंग (खरं तर दिलीप कुमारने कमालीची विविधता दाखवली आहे) यावर कितीही वाचण्यात आणि त्यावर तासन तास चर्चा करण्यात रसिकांना आनंद वाटत असे.
आजही जुन्या हिंदी चित्रपटातील गीत- संगीतावर बेहद्द प्रेम करणारे बरेचजण आहेत. अतिशय दुर्मिळ अशी गाणी ते सांगतात. अशा फिल्म दीवान्यानी वेगळ्या प्रकारे जुना चित्रपट जगवला, टिकवला. आजच्या युथला अशा जुन्या चित्रपटाबाबत उत्सुकता आहे आणि ते त्याबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. यू ट्यूबवर एखादा जुना चित्रपट आवर्जून पाहतात. पण जेव्हा चित्रपट जगताबाबत जाणून घ्यावेसे वाटते तेव्हा त्यांना ग्लॅमर, गाॅसिप्सच लागते. त्याबद्दल ते भावूक होत नाहीत.
‘गाॅसिप्स’ हा आपल्या एकूणच वाटचालीतील एक महत्त्वाचा भाग आहे, हे हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकताच सरावाचे होतं. स्वभावावर जणू हे कायमचं कोरलं जातं. मराठी चित्रपटसृष्टीबाबत गाॅसिप्स होऊ शकतं, अगदी असतंही. अर्थात अजून तरी ते उघडपणे चघळले जात नसले, तरी आजच्या माध्यमांचा वेग आणि एखाद्या वादग्रस्त गोष्टीची बेधडक बातमी करण्याची आजची परिस्थिती पाहता भविष्यात मराठी सेलिब्रेटिजबाबतही गाॅसिप्स रंगल्यास अजिबातच आश्चर्य वाटायला नको.
हे देखील वाचा: ‘रिपीट रन संस्कृती’ ते ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्म – चित्रपटसृष्टीचा अनोखा प्रवास
तसं पाहिलं तर, डिजिटल मिडियावर तसा कोणाचा कन्ट्रोल नाही आणि त्यांना किंचित जरी मसाला मिळाला तरी ते छान फोडणी लावून ते गाॅसिप्स (Filmy Gossips) भारी ‘टेस्टी’ करु शकतात.
मिडिया म्हणजे फक्त आणि फक्त नवीन चित्रपटाचे प्रमोशन नाही. यामध्ये इतर चटपटीत गोष्टी, शेरेबाजी यांचा समावेश भविष्यात सर्रासपणे केला जाईल. आजच्या युथला त्यात जास्त रस असल्याने ते द्यायला हवे. जे विकले जाते तेच पिकले जावे, असाच ‘मार्केटचा नियम’ आहे आणि तोच कळत नकळतपणे रुजत जातोय. हिंदी चित्रपटसृष्टीतील गाॅसिप्स आणि ग्लॅमरचे तेच तर झाले आहे.