‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
कलाकारांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, अर्वाच्च भाषा, राजकीय हस्तक्षेप आणि सोशल मीडिया….. चुकत चाललंय सगळं!
केवळ राजकीय टिप्पणी केली म्हणून मालिकेतून काढण्यावरून सध्या रणकंदन माजलं आहे. या प्रकरणामुळे इतरांना फायदा होवो ना होवो अभिनेता किरण माने हा सर्वदूर पसरला आहे. हिंदी, मराठी चॅनल्सनी त्याच्या एग्झिटची दखल घेतली आणि रातोरात किरण माने नावाचा एक नट मराठी मनोरंजनसृष्टीत काम करतोय हे लोकांना कळलं. काही वाहिन्यांनी तर किरणची तुलना थेट प्रकाश राज यांच्यासोबत केली आहे. प्रकाश राज आणि किरण यांच्यात दोन महत्वाचे कॉमन फॅक्टर आहेत. पहिला असा की ते दोघेही अभिनेते आहेत. दुसरा फॅक्टर असा की ते दोघेही भाजप द्वेष्टे आहेत.
पण एक फरक आहे, प्रकाश राज यांनी कधीच आपली पातळी सोडून केंद्रावर टिका केलेली नाही. उलट, त्यांच्या विरोधात सोशल मीडियावर त्यांची यथेच्छ टिंगल झाली. जी सर्वांची होते. पण प्रकाश राज यांनी मात्र कधीच विरोधी नेत्यांना अपशब्द वापरलेले दिसत नाहीत. ते त्यांच्या डिग्निटीनं आजवर वागले आहेत. असो.
आता कुणाही राजकिय पक्षाची भूमिका न पटणं यात काही गैर नाही. लोकशाहीचा पुरस्कार करणाऱ्या देशात आपण राहतो. काही लोकांना भाजपची विचारधारा आवडत नाही. तशीच काहींना राष्ट्रवादीची आवडत नाही. काही लोक शिवसेनेला दोष देत कॉग्रेसी विचारधारेला आपलं मानतात, तर काही लोकांना डावी विचारसरणी आपली वाटते. हे होत राहतं. भारतासारख्या देशात अशी मतांतरं नवी नाहीत. पण किरण मानेच्या बाबतीत जे घडलं ते खरंतर नीट पाहाणं गरजेचं आाहे.
सगळ्यात गमतीदार भाग हा की, किरणचं प्रकरण समोर आल्यावर इंडस्ट्रीतले अनेक कलाकार गप्प झाले आहेत. याला कारणीभूत ठरला आहे तो राजकीय पक्षांचा आयटी सेल. किरणच्या बाजूने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा आयटी सेल खंबीरपणे उभा आहे, तर किरण माने सातत्याने भाजपवर आपल्या पोस्टीतून ताशेरे ओढत असल्यामुळे भाजपचा आयटी सेल त्याच्यावर दात खाऊन आहे. त्यामुळे किरणची बाजू घ्यावी, तर इकडचा आयटी सेल आपली आई-बहीण काढेल आणि किरणच्या विरोधात जावं, तर तिकडचा आयटी सेल आपल्याला सोलेल अशी खात्री मनोरंजनसृष्टीला वाटते. या दोन्ही आयटी सेलमध्ये कॉमन फॅक्टर असा की ही मंडळी ट्रोल करताना अर्वाच्च भाषा वापरतात. अपशब्द वापरतात. त्या पातळीवर कलाकार म्हणून उतरणं अशक्य असतं. त्यामुळे ‘भीक नको पण कुत्र आवर’ अशी अवस्था होऊन बसण्यापेक्षा यावर न बोललेलं बरं, असा सध्या पवित्रा कलाकारांनी घेतला आहे.
किरणच्या म्हणण्यानुसार, त्याने राजकिय पोस्ट केली म्हणून त्याला मालिकेतून काढलंय. हा त्याने निष्कर्ष काढलाय अभिजीत खाडेने त्याला दिलेल्या इनपुटनुसार. त्याने अभिजीतला कारण विचारल्यावर ‘तुझ्याविरोधात एका महिलेने तक्रार केली आहे. तू ज्या पोस्ट करतोस त्यावरून हे घडलं आहे’ अशा आशयाची माहिती दिली.
त्यादरम्यान किरणने ‘छाती’चा संदर्भ घेऊन केलेल्या पोस्टमध्ये कुणाही नेत्याचा उल्लेख नव्हता. तरीही ट्रोलकर त्याच्यावर तुटून पडले. केवळ त्याच्यावरच नाही, तर स्टार प्रवाह या वाहिनीच्या पेजवरही किरणला काढून टाकण्याबद्दल पोस्ट लिहिल्या गेल्या. त्याच्या दबावात येऊन चॅनलने आपल्याला बाहेरचा रस्ता दाखवल्याचं किरण सांगतो.
किरणने आपल्यापुरता राजकिय पोस्ट असा निष्कर्ष काढला. किरणच्या म्हणण्यानुसार, सेटवरचं त्याचं आचरण उत्तम होतं. त्याने कधीच कुठली तक्रार केली नाही. अमुक हवं म्हणून हट्ट केला नाही. कन्व्हेन्स मागितला नाही. निर्माता जे देईल त्यात तो काम करत होता. असं असतानाही प्रॉडक्शन हाऊस जेव्हा कलाकाराला तडकाफडकी काढतं तेव्हा त्याचं कारण दुसरं असूच शकत नाही, असं किरणचं मत. बरं हे त्याचं मत त्याने माझ्याशी व्यक्तिश: बोलताना तर नोंदवलं आहेच. शिवाय, अनेक वृत्तवाहिन्यांवरही तो हे बोलला आहे. फेअर इनफ!
आता दुसरी बाजू –
तो ज्या मालिकेत काम करत होता, त्या सेटवरच्या कलाकारांनी किरण विरोधात मोहीम उघडली. त्याला दिलेला डच्चू हा राजकिय दबावामुळे नसून महिला सहकलाकाराने त्याच्या आचरणाविरोधात केलेल्या तक्रारीवरून आहे, असं कलाकार म्हणतात. त्याला यापूर्वी प्रॉडक्शन हाऊसने दोनदा ताकिद दिल्याचंही यात कलाकार नमूद करतात. आता ही बाजू सेटवरल्या कलाकारांची आहे. विशेष बाब अशी की, मलिका बंद करा म्हणून दबाव आणणाऱ्या ‘गुळुंब’ गावानेही आपला हट्ट मागे घेत चित्रिकरणाला परवानगी दिली आहे. ही इकडची बाजू.
आता या बाजूवर किरण आपलं काहीतरी म्हणणं मांडेल यात शंका नाही. त्याच्या म्हणण्यावर पुन्हा मालिकेच्या लोकांकडून काहीतरी स्टेटमेंट येईल. ते होत राहील. आता कोणताही राजकिय खांदा न घेता काही गोष्टी पडताळून पाहाणं गरजेचं आहे.
किरणच्या पोस्ट मी सातत्याने वाचत असतो. त्याच्या काही पोस्ट मला आवडतात, तर काही अकारण पसरट वाटतात. अर्थात ते माझं व्यक्तिगत मत आहे. त्याच्या पोस्ट पाहताना वाटतं, जगातली प्रत्येक गोष्ट प्रो-भाजप आहे की अगेन्स्ट भाजप आहे हे ताडून बघायची इतकी गरज त्याला का वाटते?
कित्येकदा माझ्या व्यक्तिगत अनुभवांवर आधारित पोस्टवर कमेंट करताना किरणने त्यात राजकिय रंगाचा ब्रश बुडवलेला मी पाहिला आहे. त्यामुळे हळूहळू किरणच्या पोस्टींवर व्यक्त होणं, कमेंट करणं मी कमी केलं. कारण, तो ज्या पद्धतीने प्रत्येक घटनेचं, पोस्टीचं ‘राष्ट्रवादी’ नजरेनं विश्लेषण करतो ते मला नको असतं. किंबहुना देशातल्या एखाद्या घटनेबद्दल मी काही निरिक्षण नोंदवलं, तर त्यावर भाजपद्वेष्टी फुंकर मारून त्यात विखार पेटवणं मला अभिप्रेत नसतं. कारण, ती पोस्ट लिहिताना मला काय वाटतं इतकंच मी लिहितो. त्या पोस्टला कोणताही राजकीय संसर्ग नसतो. कारण, विशिष्ट पक्षाची विचारधारा घेऊन निदान मी जगत नाही.
किरणच्या पोस्ट.. त्याचं त्या पोस्टीतून आक्रमक असणं.. याचा मला उबग आला. हे म्हणजे, टोकाची भाजपची विचारधारा अवलंबणाऱ्या लोकांना जर आपण अंध म्हणत असू, तर राष्ट्रवादी पक्षाची भूमिका घेऊन सोशल मीडियावर प्रत्येकाला नडणारा किरण मला तसाच वाटू लागतो.
माध्यमांनी भाजपची बाजू घेतली की, माध्यमांना ‘गोदी मीडिया’ म्हणून संबोधायचं. हरकत नाही. तुला वाटतं तू म्हण बाबा. पण माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्यासारख्याला तू त्यात ओढतोस.. चार बोल सुनावतोस.. तेव्हा मला ते नको असतं, कारण, हाताची पाचही बोटं सारखी नसतात.. आणि शेवटी पत्रकार हा नोकर असतो. तीच माध्यमं पवारसाहेबांची पावसातली सभाही तितक्याच जोरदार ब्रॉडकास्ट करतात. इतकं कशाला, आज किरण माने हे नाव सर्वमुखी होण्यामागचं कारणही माध्यमांनी तुला वाटत असलेल्या अन्यायाची दखल घेतली हेच आहे. ज्या माध्यमांच्या नावानं किरणने बोटं मोडली, त्याच माध्यमांच्या बुमने त्याची बाजू मांडली हे विसरून कसं चालेल?
शेवटी प्रत्येकजण कुणाला तरी बांधिल असतो. प्रत्येक जण कुणाला तरी आन्सरेबल असतो. मग तो मुख्यमंत्री असो वा विरोधीपक्ष किंवा आणखी कुणी…
किरण माने चांगला कलाकार आहे. त्याचे काही व्हिडिओज खरंच चांगल्या अर्थाने फार खतरनाक आहेत. पण त्यापलीकडे किरणशी सोशल मीडियावर बोलावंसं वाटेनासं होतं. हे एकदम झालेलं नाही. महिनोंमहिने त्याच्या पोस्ट्स पाहिल्यानंतर हळूहळू बनत गेलेलं ते मत आहे. कारण, मला प्रत्येकवेळी राजकारण नको असतं आणि तो त्याशिवाय बोलत नाही. तो व्यक्त होणारी भाषा मला नको असते. भाषा रांगडी, गावरान असायला आक्षेप नाही, पण केवळ ते विरोधक आहेत, म्हणून त्यांची असभ्य भाषेत टिंगल करणं मला झेपेना होतं. शत्रूलाही आदर देऊन वागवण्याची शिवरायांनी घालून दिलेली रीत आपली. अशावेळी, त्याचं हीन भाषेत व्यक्त होणं मला बौद्धिक दिवाळखोरीत यथेच्छ न्हाऊन आनंदून गेलेल्या सोशल मीडिया मॅनेजरसारखं वाटू लागतं. इथं, किरण लांब जाऊ लागतो.
आज एकिकडे असं गृहित जरी धरलं की, किरणची राजकीय दबावामुळेच मालिकेतून हकालपट्टी झालीय, तर याचं मला वाईट वाटतं. पण त्याच्या खांद्याला खांदा लावून त्याच्यासाठी भिडावं असं वाटत नाही. कारण, आज समोरचा चुकतोय हे तू दाखवून देत असलास तरी गड्या, माझ्या नजरेत तू कित्येकदा चुकलेलाच आहेस. मुद्दा तू कुठल्या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतोस हा नाहीच मुळी. मुद्दा हा आहे, की तू ज्या पातळीवर सोशल मीडियावर उतरला आहेस, त्या पातळीवर मला उतरता येणं शक्य नसतं. मग मी तुझ्यापासून लांब होतो.
खरं सांगायचं, तर कोणत्याही चॅनलला तुम्ही किती ट्रोल झाला.. तुम्हाला कुणी किती ट्रोल केलं याचा फार फरक पडत नाही. चॅनलची गणितं.. त्यांची कामं फार वेगळ्या लेव्हलवर चालू असतात. जुळून आलेल्या टीममधून लोकप्रिय कलाकाराला डच्चू देणं ही चॅनलसाठीही रिस्क असते. पुन्हा नव्या कलाकाराला लोक स्वीकारतील का, हा प्रश्नही असतो. अशावेळी पाच पन्नास ट्रोलर्सनी वाहिनीच्या पेजवर एखाद्या कलाकाराला ट्रोल केलं म्हणून त्याला तडकाफडकी काढून टाकणं असं आजवर झालेलं नाही. शिवाय, किरणने केलेली पोस्टही तुलनेत फारच सौम्य होती. यापूर्वी त्याने यापेक्षा कैक पटींनी जहाल पोस्ट्स केल्या आहेतच. तेव्हा चॅनलला काहीच फरक पडला नव्हता.
बाकी ठिक आहे. पण, आपल्याबद्दल आपल्या इंडस्ट्रीत लोकं फार बरं बोलत नाहीयेत हे किरणसारख्या कलाकारानं लक्षात घ्यायला हवं. आज या लेखातून चार गोष्टी त्याला सांगितल्यावर त्याचा आसूड त्यापेक्षात तीव्र शब्दात माझ्यावर ओढेल यात शंका नाही. पण तो कॉल त्यानं घ्यावा.
आज मालिकेतले लोक एकत्र येऊन त्याच्याबद्दल तक्रारी करू लागतात तेव्हा सगळ्या गोष्टी एका बाजूला, पण कलाकार म्हणून हे फार बरं नाहीये. आज किरणचं विमान आकाशात झेपावलं होतं. भूमिका उत्तम गाजत होती. अशात नुकसान किरणचं झालं. आज किरणच्या नावानं बोटं मोडणारे आणि ‘आय स्टॅंड विथ किरण माने’ म्हणणारे उद्या त्याच्या घरची चूल चालवणार नाहीत. तुम्ही जिथे नोकरी करता तिथे तुम्हाला काही मॅनर्स पाळावे लागतात. यातून पंतप्रधान मोंदींचीही सुटका नाही आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही. ‘ता र त म्य’ या चार अक्षरी शब्दांची बात आहे सगळी.
किरणच्या जहाल पोस्ट पाहून मला भीती एकच वाटते की, उद्या कर्मधर्म संयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि भाजप एकत्र आलेच, तर किरणसारखा कार्यकर्ता काय करेल? आपल्याकडे विरोध करायला ना नाही. पण आपण तो कुठल्या भाषेत करतो.. आपण त्यासाठी कुठली पातळी गाठतो याला हद्द असायला हवी.
हे ही वाचा: बाळासाहेबांनी केलेलं कौतुक मला तमाम पुरस्कारांपेक्षा श्रेष्ठ आहे! – मिलिंद गुणाजी
‘रिपीट रन संस्कृती’ ते ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्म – चित्रपटसृष्टीचा अनोखा प्रवास
आता गंमत म्हणून एक करून बघा,
समजा, मालिकेतल्या महिला कलाकाराने हा माझा मालिकेत बाप झालेला कलाकार मला टोमणे मारतो, मला भूमिका कापण्यावरून ब्लॅकमेल करतो, अशी तक्रार माध्यमात केली असती, तर काय झालं असतं मानेंचं? असो.
हा लेख वाचून झाल्यावर अनेक राजकीय आयटी सेल कंबर कसून तुटून पडणार आहेत याची मला कल्पना आहे. आता जाता जाता एक महत्वाचं. या लेखातला ‘मी’ आणि “मला” यांची नावं आणि यांचे हक्क गोपनीय आहेत. पटतंय तेवढं घ्या. बाकीचं द्या सोडून.
=====
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. कलाकृती मीडिया याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.