हे राम..! आता अमोल कोल्हे आणि नथुराम
आपल्याला नेमकं कशाचं भांडवल करायचं हे कळलं नाही की, आपण दिसेल त्या गोष्टीचं भांडवल करू लागतो, असं मानसशास्त्र सांगतं. सध्या काही अंशी तसंच चालू आहे. काहीही झालं तरी मनोरंजनसृष्टीला टारगेट करण्याचं प्रमाण वाढताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी किरण मानेच्या हकालपट्टीमुळे वाद ओढवला होता. त्यात राजकीय दबावामुळे असा प्रकार झाल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर पुढे चार दिवस तोच गदारोळ चालला होता. पण त्यात आत्ता आपण जायला नको. कारण तो आजचा विषय नाही. आजचा विषय मनोरंजनसृष्टीशीच संबंधित आहे. त्याला कारणीभूत ठरले आहेत खासदार, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे.
अमोल कोल्हे यांनी ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या ओटीटीवर येणाऱ्या सिनेमात नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. त्याचा ट्रेलर काल प्रदर्शित झाला आणि सर्व वृत्तवाहिन्यांवर एकच हलकल्लोळ माजला. डॉ. अमोल हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत, लोकनेते आहेत. असं असतानाही त्यांनी नथुराम साकारणं कसं चूक आहे आणि नथुरामच्या विचारधारेचं ते कसं समर्थन आहे, असे मुद्दे मांडले गेले. त्यानंतर सोशल मीडियावरही बरीच चर्चा रंगली. अनेकांनी डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर यथेच्छ तोंडसुख घेतलं. अमोल यांनी जेव्हा शिवराय साकारले तेव्हा याच सगळ्या लोकांनी त्यांना मुजरा केला होता. आता ते नथुराम साकारतायत, तर त्यावरून त्यांना टारगेट केलं जातं आहे.
खरंतर आपण एक लक्षात घ्यायला हवं, की अमोल यांनी शिवरायांची भूमिका साकारल्यावर त्यांना मुजरा करणं जसं चूक आहे, तसंच नथुरामाची भूमिका साकारल्यावर त्यांना यथेच्छ लाखोल्या वाहाणं निषेधार्ह आहे. कारण, या दोन्ही भूमिका साकारताना त्यांनी केवळ आणि केवळ अभिनय केला आहे.
शिवरायांची भूमिका साकारल्यावर त्यांच्या अभिनयाचं कौतुक झालं. नथुरामाची भूमिका साकारली असेल, तर एकतर त्याचं कौतुक व्हायला हवं किंवाा त्या भूमिका वठवण्यावर ताशेरे ओढले जावेत. अर्थात, ती भूमिका पाहून हा निर्णय घेता येईल. पण हा सगळ्या प्रतिक्रिया केवळ त्यांच्या अभिनयाशी निगडित असायला हव्यात. डॉं. अमोल यांची जगण्याची, विचाराची पद्धत हा वेगळा मुद्दा आहे. जो त्यांनी वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केला आहे.
अनेक लोकांना अमोल यांनी ही भूमिका वठवणं चुकीचं वाटतंय. ते राष्ट्रवादीचे खासदार आहेत, लोकनेते आहेत, अशावेळी भूमिका स्वीकारताना त्यांनी विचार करायला हवा, असं अनेकांचं मत आहे. ते तार्किकदृष्ट्या बरोबर आहे. पण कोल्हे यांनी साकारलेली ही भूमिका २०१७ ची आहे. त्यावेळी अमोल लोकनेते नव्हते. त्यातूनही अभिनेता म्हणून त्यावेळी त्यांना ती साकारावीशी वाटली, तर त्यात गैर काय?
आता त्यांना ती भूमिका का घ्यावीशी वाटली, याची अनेक कारणं असू शकतात. शिवाय जी काही कारणं असतील ती २०१७ ची असतील. यात अगदी आर्थिक, कौटुंबिक, व्यावसायिक अशा कोणत्याही गरजेपोटी त्यांनी ही भूमिका स्वीकारली असूच शकते. पण २०१७ मध्ये केलेलं काम आत्ता येत असताना थेट अमोल कोल्हे यांच्यावर गांधीविरोधी भूमिकेचा आरोप करणं निश्चित चूक आहे. त्यात आता आणखी एक ‘बावचा’ झाला आहे.
अमोल यांच्या नथुरामाच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. पण आता तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच अमोल यांचं समर्थन केलं आहे. त्यांनीही मुद्दे मांडताना कलाकाराच्या भूमिका आणि त्याचं व्यक्तिगत आयुष्य या दोन्ही वेगळ्या बाबी असल्याचं अधोरेखित केलं आहे. असं सगळं असताना अमोलच्या या भूमिकेवर रणकंदन माजवणं हा निव्वळ बालीशपणा आहे.
बरं, एक गंमत अशी की पवारांनी कोल्हे यांचं समर्थन केल्यावर एकाही राष्ट्रवादीच्या नेत्यानं नवं स्टेटमेंट दिलेलं नाही. ते अपेक्षितही नाही. खरंतर अमोल ही भूमिका साकारत असेल, तर या नेतेमंडळींनी आधी थेट अमोलशी संपर्क साधून ही भूमिका करण्यामागच्या घडामोडी समजून घ्यायला हव्यात. तसं न होता, सोशल मीडियावर ही गोष्ट आल्याने याचा थेट फायदा ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या सिनेमाला होणार आहे.
सिनेमा हा सिनेमा असतो. भारतात जसं नायकाला आपली बाजू मांडायची संधी दिली जाते, तशीच ती खलनायकालाही मिळते. हा सिनेमा ती बाजू उलगडून दाखवतो, असं म्हणायला हरकत नाही. हां.. आता हा सिनेमा पाहून झाल्यानंतर नथुरामची मांडलेली बाजू पटू शकते किंवा न पटणारीही असूच शकते. अशाही वेळी नथुरामची भूमिका साकारणारा अभिनेता आणि त्याचा अभिनय हा ‘तिसरा कोन’ आहे, हे लक्षात घ्यायला हवं.
आपल्याकडे हे सातत्याने घडत आलं आहे. मी वर म्हटल्याप्रमाणे अरूण गोविल यांनी राम साकारल्यावर त्यांना देवघरात नेऊन बसवणारे आपल्याकडे कमी नाहीत. अशाने अरूण गोविल यांचं कौतुक झालं. पण त्यांच्यातला उरला-सुरला अभिनेता आपण मारून टाकला. गोविल यांच्यावर राम साकारल्याचं ओझं इतकं आलं की, त्यांनी पुढे इतर कुठल्याच भूमिका केल्या नाहीत किंवा त्यांनी तो निर्णय अपवाद वगळता स्वखुशीने घेतला असेल. हरकत नाही.
=====
हे ही वाचा: गाॅसिप्सची (Filmy Gossips) चवदार चंगळ मंगळ…
=====
हे ही वाचा: सोशल मीडिया आणि रसिकांच्या उलटसुलट प्रतिक्रिया, सुचना, सल्ले वगैरे वगैरे….
=====
आपण नेहमी कलाकारांवर मग तो कुठल्याही कलेत निपुण असेल वा निपुण होऊ पाहात असेल त्याच्यावर त्याने आधी केलेल्या सर्वोत्तम कामाचं ओझं टाकत असतो. त्या जबाबदारीचं भान त्या कलाकाराला नसतं असं नाही. पण ते सतत जाणवून दिल्यामुळे त्याच्या धाडसाची ‘डेन्सिटी’ कमी होण्याची शक्यता असते.
त्या हिशोबाने उद्या शिवाजी महाराज साकारणाऱ्या अमोल कोल्हे यांना समजा एसएस राजामौली यांच्या बिग बजेट सिनेमात जर औरंगजेब साकारण्याची संधी आली, तर एरवी कदाचित त्यांनी ती आनंदाने स्विकारली असती. पण आता मात्र कालच्या प्रकारानंतर अशी काही संधी आली तर त्यांना ती घ्यावीशी वाटते की नाही, यापेक्षा पक्षश्रेष्ठींना काय वाटतं आणि लोकांना काय वाटेल याचा विचार ते आधी करतील. याचाच अर्थ कलाकार म्हणून आपण त्यांना एक पायरी खाली खेचलेलं असतं. याचा आपण विचार करायला हवा.
आणखी एक महत्वाचं…
नथुरामाची भूमिका अभिनेते शरद पोंक्षे यांनीही साकारली होती. त्या नाटकाचे कित्येक प्रयोग झाले. इथेही तीच बाब. शरद पोंक्षेंना नथुराम पटतो की नाही हा वेगळा मुद्दा आहे. पण नाटक म्हणून आणि नाटकातलं प्रमुख पात्र म्हणून ती भूमिका आपल्याला आवडते की नाही हे पाहायला हवं होतं. पण पोंक्षेंच्या बाबतीतही हाच घोळ झाला. इथेही जो नियम अमोल यांना तोच पोंक्षे यांना. त्यांची व्यक्तिगत विचारधारा न पटणारी असेलही, पण कलाकार म्हणून त्यांनी वठवलेला नथुराम बघणं ही अस्सल प्रेक्षकाची जबाबदारी बनते. असो.
=====
हे ही वाचा: मं. रफी ‘हे’ गाणं अर्धवट सोडून का निघून गेले?
=====
मुद्दा इतकाच आहे की, कलाकार म्हणून एखाद्याला एखादी भूमिका करावीशी वाटत असेल, तर त्याने ती जरूर साकारावी. त्याला ती मोकळीक समाज म्हणून आपण द्यायला हवी.
आणखी एक,
अमोल कोल्हे यांनी नथुराम कसा काय साकारला, असा प्रश्न विचारून आपण त्यांना अत्यंत उर्मट भाषेत संबोधत असू, तर आपण आपल्या मनातला द्वेषाचा नथुराम पहिला काढून टाकायला हवा. बघा विचार करून. आज इतकंच!
=====
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. कलाकृती मीडिया याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.