दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
गोल्डी ’विजय आनंद’: मास्टर ऑफ सॉंग पिक्चरायझेशन
हॉलीवूडशी तुलना करता चित्रपटात गाणी असणे हे आपल्या भारतीय चित्रपट सृष्टीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. या गाण्यांचे चित्रीकरण करण्यात राजकपूर, व्ही शांताराम, गुरुदत्त आणि गोल्डी तथा विजय आनंद यांचे कसब वादातीत होते. आज इतकी वर्षे झाली तरी ही गाणी एखाद्या शिल्पासारखी तुमच्या आमच्या मनात कोरली गेली आहेत. गोल्डी तथा विजय आनंद यांचा २२ जानेवारी हा जन्मदिवस त्या निमित्ताने त्याने चित्रित केलेल्या काही गीतांचा आढावा घेवूयात.
चेतन आनंद आणि देव आनंद यांचा धाकटा भाऊ विजय आनंद हा साठ आणि सत्तरच्या दशकातील अनेक यशस्वी चित्रपट ट्रेंड सेटर सिनेमांचा दिग्दर्शक होता. सिनेमा या माध्यमावरची त्याची पकड मजबूत होती. सिनेमातील गाणी प्रेक्षकांना अधिक भावतात त्यामुळे गाण्यांची दृष्यात्मक परिणामकारकता वाढवताना त्याने सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने त्याकडे पाहत ती आणखी खुलवली.
नवकेतनचा ‘तेरे घर के सामने’ (१९६३) हा चित्रपट आजही एक ‘कल्ट क्लासिक’ म्हणून ओळखला जातो. या चित्रपटातील टायटल सॉंग ‘इक घर बनाऊंगा तेरे घर के सामने’ ज्या पद्धतीने त्याने चित्रित केलं होतं त्याला तोड नाही. यातील ’इक घर बनाऊंगा तेरे घर के सामने’ या टायटल सॉंगमध्ये व्हिस्कीच्या फेसाळ प्याल्यातील अभिनेत्री नूतनची प्रतिमा काय अप्रतिम होती. विशेषत: देव आनंद जेव्हा प्याल्यात बर्फाचे खडे टाकतो त्या वेळचं तिचं शहारणं,लटक्या रागाने पाहणं रसिक अजूनही विसरले नाहीत.
यातील ‘दिल का भंवर करे पुकार प्यार का राग सुनो’ या रफीच्या गाण्याच्या चित्रीकरणाचा किस्सा अफलातून आहे. गोल्डीला हे गाणे दिल्लीच्या कुतुबमिनार मध्ये शूट करावयाचे होते. त्याने रीतसर परवानगी पण घेतली. चिंचोळ्या गोल गोल जिन्यावर चित्रीकरण सुरू झालं, पण देव आनंदच्या सिनेमाचं शूटींग कुतुब मिनार मध्ये चालू आहे ही वार्ता (मोबाईल नसताना देखील) वार्यासारखी पसरली आणि परीसरात प्रचंड गर्दी जमा झाली. शेवटी प्रशासनाला शूटींग थांबवावं लागलं. गोल्डी विजय आनंद थोडा नाराज झाला पण त्याने आयडीया लढवली. मुंबईच्या मेहबूब स्टुडिओत त्याने कलादिग्दर्शक बीरेन नाग यांना कुतुबमिनार उभारायचा आदेश दिला आणि तिथे उरलेलं गाणं शूट केलं.
गोल्डीच्या सिनेमात कथानक हे दृश्य आणि गाण्याच्या माध्यमातून पुढे नेण्याची त्याची शैली जबरदस्त होती. ‘गाईड’ (१९६५) मधील ‘पिया तोसे नैना लागे रे’ हे गाणे चित्रित करताना राजस्थान मधील उदयपूरच्या नाट्यगृहात त्याने तब्बल नऊ सेटस उभारले होते.
वहिदाच्या नृत्य शैलीला त्याने एक वेगळा आयाम देत गाणे चित्रित केले. या चित्रपटातील ‘मोसे छल किये जाये’ हे गाणे आणि त्याच्या पाठोपाठ येणारे ‘क्या से क्या हो गया बेवफा तेरे प्यार में’ या दोन्ही गाण्यांचं चित्रीकरण त्याने फार कलात्मक पद्धतीने केलं होतं.
उदयपूरपासून दहा किलोमीटर असलेल्या एका सरोवराजवळ त्याने ‘तेरे मेरे सपने अब एक रंग है’ हे गाणं चित्रित केलं होतं. गोल्डी मोठा परफेक्शनिस्ट होता. मनासारखा शॉट मिळेपर्यंत त्याचे समाधान होत नसे. या गाण्यात त्याला जो ‘लाईट इफेक्ट’ हवा होता त्याकरीता त्याने या गाण्याचे चित्रीकरण टप्प्या टप्प्यात केले. तिथे सूर्यास्ताच्या वेळचा संधीप्रकाश फार कमी मिनिटे असायचा. तोच लाईट इफेक्ट गोल्डी ला हवा असायचा. आजही या गाण्यातील भावनेला हवा असलेला संधी प्रकाश, त्याचे चित्रीकरण आणि गाण्यातील समर्पणाच्या भावनेला साथ देणारे सेक्सोफोन (मनोहारी सिंग यांचे) सूर रसिकांच्या मनात घर करून आहेत. हा खास ‘गोल्डी’ टच म्हणता येईल.
तिसरी मंझिल मधील ‘ओ हसीना जुल्फो वाली’ गाण्याच्या वेळी गोल्डीने खास सेट बनवला होता. हेलनच्या मेकअप, वेषभूशा आणि केशभूषेवर त्याचे बारीक लक्ष होते. गाण्याची परिणामकारकता आणि प्रेक्षकांच्या मनात गाण्याने घर करायला हवे याकडे गोल्डीचे विशेष लक्ष असायचे. निर्जीव वस्तूला देखील त्याच्या गाण्यात महत्व असायचे
“ओ मेरे सोना रे सोना रे” या गाण्यातील प्रवासी बॅग आठवा. कलावंतांचा कम्फर्ट देखील तो नेहमी पाहायचा. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान शम्मीकपूरची पत्नी गीताबालीचे निधन झाले होते. त्यानंतर जेव्हा चित्रिकरणासाठी शम्मी आला त्यावेळी अर्थातच तो खूप दु:खी होता. गोल्डीने त्याचा मूड बघून त्या दिवशी ‘तुमने मुझे देखा होकार मेहरबान’ या गाण्याचे शूट केले. शम्मीचा त्या दिवशीचा मूड अलगदपणे गाण्यात उतरला.
‘ज्वेल थीफ’ मधील ‘होठो में ऐसी बात’ या गाण्यात तर त्याने पन्नासहून अधिक ताल वाद्य वापरली होती. ‘जॉनी मेरा नाम’ सिनेमातील ‘पल भर के लिये कोई हमे प्यार करले’ या गाण्यातील खिडक्यांच्या वापराची अभिनव कल्पना अफलातून होती. याच सिनेमातील ‘वादा तो निभाया’ या गाण्यात पोलिसाला गुंगारा देण्याची त्याने वापरलेली क्लुप्ती झकास होती.
=====
हे ही वाचा: तर किशोरकुमार झाले असते ‘आनंद’!!!
हे ही वाचा: बाळासाहेबांनी केलेलं कौतुक मला तमाम पुरस्कारांपेक्षा श्रेष्ठ आहे! – मिलिंद गुणाजी
=====
याच सिनेमातील ‘हुस्न के लाखो रंग’ हा तोवरचा सर्वात हॉट कॅब्रे चित्रित करताना त्याने पद्मा खन्नाचे मादक भाव, एकेक करून अंगावरचा कपडा टाकण्याची अदा आणि प्रेमनाथ चेहऱ्यावरील लिंग पिसाट भाव जबरदस्त टिपले होते. ‘ब्लॅकमेल’ मधील ‘पल पल दिल के पास’ या सदाबहार गाण्यातील रोमँटिक मूडला मस्तपैकी जोजवत गाण्याला कलात्मक उंची दिली. पण मला याच सिनेमातील ‘मिले मिले दो बदन’ या गाण्याचे चित्रीकरण बेहतरीन वाटते. शत्रूच्या कचाट्यात सापडल्यानंतर कुठल्याही क्षणी जीव जावू शकतो या प्रचंड तणावाच्या वातावरणात हे गीत येते.
गोल्डीच्या प्रत्येक गाण्यातील सौंदर्य स्थळ शोधून काढायची तर मोठा ग्रंथ होईल. त्याच्याकडे कल्पकता अफाट होती. गोल्डीच्या चित्रित गाण्यांवर त्याचा स्वत:चा ठसा असायचा.