…आणि पं. भीमसेन जोशी यांनी दोन तासात सादर केला नवा अभंग!
२४ जानेवारी भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचा स्मृती दिन! त्या निमित्ताने त्यांच्या एका गाजलेल्या अभंगाच्या मेकिंगचा हा भन्नाट किस्सा. काही तासात स्वरबध्द झालेल्या या अभंगाच्या बनण्याची अविश्वसनीय कहाणी!
कधीकधी अजरामर ठरलेल्या गीतांच्या जन्मकथा आपण जेव्हा ऐकतो तेव्हा अक्षरशः थक्क होऊन जातो. वर्षानुवर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या या रचना बनवताना बऱ्याचदा काही वर्ष लागतात, तर काही रचना अगदी क्षणात तयार होतात. पंडित भीमसेन जोशी यांच्या एका अभंगाच्या बाबतीत हा किस्सा तुम्हाला अक्षरशः थक्क करणारा आहे.
त्यावेळी आकाशवाणीवर ‘परंपरा’ नावाचा एक संगीतमय कार्यक्रम होता. एक गायक आपल्या दोन रचना तिथे सादर केली असे. या साप्ताहिक कार्यक्रमात मान्यवर कलावंत हजेरी लावत असत. एकदा पंडित भीमसेन जोशी यांना आकाशवाणीवर या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले होते. संगीतकार होते पंडित गजेंद्रगडकर आणि संगीतकार राम फाटक. दोन्ही संगीतकारांनी पंडितजींकडून जी गाणी गौण घ्यायची होती ती तयार होती.
पं. भीमसेन जोशीजी आकाशवाणीच्या स्टुडिओत आले. संगीतकार राम फाटक यांनी कवी काव्यविहारी यांची एक रचना त्यांच्यासाठी निवडली होती. त्यांच्यासोबत गप्पा चालू असताना त्यांच्या मनात एक वेगळेच नाट्य जन्म घेत होते. त्यांनी ठरवलेले आधीचे गाणे बदलावे असे त्यांना वाटले. ते संगीतकार अरविंद गजेंद्रगडकर यांना म्हणाले “आधी तुम्ही तुमचे गाणे करून घ्या, मी आलोच!” असे म्हणत ते आकाशवाणीच्या खालच्या मजल्यावरील ग्रंथालयात गेले.
खरंतर हा मोठा अवघड असा बाका प्रसंग होता. पं भीमसेन जोशी सारखा ख्यातकीर्त गायक समोर बसलेला आहे. आपल्या हातात असलेले गाणे आपल्याला बदलायचे आहे. ते गाणे शोधण्यासाठी आपण ग्रंथालयात जात आहोत गाणे कुठून आणणार? काय करणार? पुढच्या दोन तासात हे सर्व उरकायला हवे. पण संगीतकार राम फाटक यांचा मात्र स्वत:पेक्षा जास्त विश्वास भीमसेन जोशींवर होता.
हे ही वाचा: ‘ये गलीया ये चौबारा’ या गाण्यात राजकपूरने नकळत सांगितली आपली ‘मन की बात’
जेव्हा माणूस हिमंत करतो तेव्हा दैवसुद्धा त्याच्या पाठीशी उभे रहाते. संगीतकार राम फाटक ग्रंथालयात आले. त्यांनी समोरचा सेल्फवरचे ‘सकल संत गाथा’ हे पुस्तक काढले आणि संत नामदेवांच्या एका अभंगाने त्यांचे लक्ष वेधून घेतले. हा अभंग वाचता वाचताच त्याची चाल त्यांच्या मनात उमटू लागली. जिन्यावरून येताना जवळपास त्यांनी ही चाल फायनल केली. तोवर पंडितजींचे अरविंद गजेंद्रगडकर यांचे गाणे झाले होते.
राम फाटक यांनी पंडित भीमसेन जोशी यांना हा अभंग सांगितला आणि सहज गुणगुणून दाखवला. फक्त आठ ओळींचा हा संत नामदेव महाराज यांचा अभंग भीमसेन जोशींना खूप आवडला. ते राम फाटक यांना म्हणाले, “राम भाऊ, तुम्ही अप्रतिम चाल बांधली आहे आता मी त्यात कसे रंग भरतो ते बघा.”
राम फाटक यांनी अहिर भैरव या रागात या अभंगाची रचना केली. अभंग छोटा असल्यामुळे भीमसेन जोशींच्या आलापाला इथे खूप वाव होता. या आलापमुळे या अभंगात आणखी रंग भरला गेला आणि पुढच्या पंधरा मिनिटांमध्ये त्याची रिहर्सल होऊन तो अभंग रेकॉर्ड देखील झाला.
हे ही वाचा: गाॅसिप्सची (Filmy Gossips) चवदार चंगळ मंगळ…
दोन तासापूर्वी कुणाच्या ध्यानीमनी नसलेला हा अभंग पुढच्या दोन तासात रेकॉर्ड देखील झाला. हा अभंग होता ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल’. कमाल म्हटली पाहिजे पं भीमसेन जोशी आणि संगीतकार राम फाटक यांची. पुढे एच एम व्ही ने हाच अभंग त्यांच्या ‘अभंगवाणी’ या रेकॉर्ड मध्ये समाविष्ट केला. पं भीमसेन जोशी नंतर देशात आणि परदेशात ज्या ज्या मैफीलीत गायले तिथे तिथे हा अभंग गाण्याची रसिक फर्माईश करायचे.