दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
साक्षात्कार लता नावाच्या स्वर संस्काराचा!
माणसाच्या मनाची तयारी कशी असते पहा. लता मंगेशकर गेल्याची बातमी आली, ती काही आकस्मित वा अकाली नव्हती. गेल्या काही दिवसांपासून लता दिदी आजारी होत्या. आदल्याच दिवशी त्या पुन्हा एकदा क्रिटिकल झाल्याचं कळलं होतं. जवळपास २९ दिवस दिदी रुग्णालयात होत्या.
दरम्यान त्यांना कोरोना, न्यूमोनियाचं निदान झालं आणि वाटून गेलं. आता सगळं संपण्याच्या उंबरठ्यावर आलं आहे की काय..? तशात कोरोना बरा झाल्याची बातमी आली आणि पुन्हा एकदा मन प्रफुल्लित झालं. पण रुग्णालयातही त्यांचा आलेख चढता-उतरताच होता. अर्थात, बातमी आली. दिदी गेल्या.
खरं सांगतो, दिदी केल्याचं कळल्यापासून व्यक्त व्हावं वाटत होतंच. पण काय बोलणार? अचानक शब्दांनी पाठ फिरवली. व्यक्तिश: सोशल मीडियावरही मी जे काही व्यक्त झालो ते ग्रेस यांच्या कवितेच्या आधारानेच. लता मंगेशकर या एकमेवाद्वितीय प्रतिभावंत सूर साम्राज्ञीबद्दल काय बोलणार आपण? खरंतर, त्या गेल्याचं कळल्यानंतर काही लिहावं वाटत जरूर होतं. पण इतक्या मोठ्या उंची गाठलेल्या भारतरत्नाबद्दल आपण काय लिहिणार?
तरी वाटत होतं, लिहायला हवं. काहीतरी आतून येणारं असं. मनाला वाटेल ते. तेव्हा मग थोडी बैठक तयार झाली आणि लेख लिहायला घेतला.
दिदींनी ७० वर्षं रसिकांना मंत्रमुग्ध केलं. अमुक हजार गाणी गायली वगैरे ठिक आहे. पण पुढे काय? असा प्रश्न जेव्हा मी मला विचारला तेव्हा, मला उत्तर मिळालं, की आज जे काही गाणं मला कळतं.. जे काही सूर मी लावतो… जे काही ऐकतो त्या सगळ्याचे संस्कार माझ्यासारख्या कोट्यवधी लोकांवरे केले ते लता मंगेशकर यांनी.
संस्कार एकदा करून होत नाही. तो पिढ्यानपिढ्या करावा लागतो. लता मंगेशकरांच्या गाण्यांनी माझ्या पिढीवर असेच संस्कार केले. जे माझ्या वडिलांच्याही पिढीवर झाले आणि माझ्या आजोबांच्या पिढीवरही. तब्बल तीन पिढ्या सातत्याने हा आवाज महाराष्ट्रासह भारतीयांच्या कानावर पडत होता. म्हणत होता, बघ गाणं असं गायचं असतं. अशानं खरंतर आपली फार गोची झाली आहे राव.
लता-आशा-उषा-ह्दयनाथ या मंगेशकर कुटुंबियांनी आपल्या कानांवर असे काही उत्तमोत्तम, अस्सल स्वरसंस्कार घडवले आहेत, की अशानं इतर काही ऐकताना पहिल्यांदा त्यातल्या चुका कानांना टोचायला लागतात.. माझं तरी होतं असं.
खरंच सांगतो. हा संस्कार फार महत्वाचा आहे. अगदी पटकन समजेल असं सांगू? गेल्या साधारण दहा वर्षांत अनेक संगीताचे रियालिटी शोज झाले. हिंदी, मराठी असे अनेक प्रादेशिक भाषांमधून शेकडो नवे गायक-गायिकांना लोकांनी ऐकलं. इतर भाषांमधल्या गायनाबद्दल इथे नकोच बोलायला. आपल्या महाराष्ट्रात कितीतरी गुणवान गायक-गायिका आहेतच.
आवाजाचं म्हणाल, तर काही कलाकारांचा आवाज लता मगेशकरांइतकाच सुरेल आहे. पण हाच आवाज जेव्हा गाणं गाऊ लागतो तेव्हा मात्र लता मंगेशकरांनी इतक्या वर्षांच्या मेहनतीने मारून ठेवलेली मोठ्ठी लाईन दिसू लागते. कारण, बाईंचा आवाज ही दैवी देणगी होतीच. पण त्याही पलिकडे, गाणं गाताना करावे लागणारे शब्दांचे उच्चार.. त्याची आस.. त्याचा अर्थ.. त्याचा भाव या सगळ्याचा परिपूर्ण विचार या गाण्यातून दिसतोच, शिवाय, या सगळ्याला साथ असते ती त्यांच्या श्वासाची.
दिदींनी गायलेलं कोणतंही गाणं घ्या. दिदींसारखा उत्तम आवाज असलेली गायिका गायला उभी राहिली की, तिने पहिल्या आलापासाठी लावलेल्या दमसासातून माझ्यासारख्या बऱ्या कानसेनाला त्या गायिकेचा परीघ दिसू लागतो. माझ्यासारखे य कानसेन महाराष्ट्रात आहेत. ते तयार झाले याला लता दिदींचा संस्कार कारणीभूत आहे. या संस्कारानेच आपल्याला चांगलं गाणं कसं असतं हे शिकवलं. मग भले, “अजीब दास्तां है यह..” असू दे किंवा “पैल तो गे काऊ कोकताहे..” असो किंवा अगदी “ऐरणीच्या देवा..” असो. गात असलेल्या गीतात येणारा कोणता शब्द भावनांचा किती कल्लोळ घेऊन आला आहे, हे दिदींनी दाखवून दिलं.
====
हे देखील वाचा: संगीत क्षेत्रातील एका सुरेल नक्षत्राचा अंत: लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड
====
अर्थात, अत्यंत नकळत केलेले संस्कार आहेत हे. म्हणजे, गाणं कसं गायचं असतं..? तर ते लता मंगेशकर यांच्यासारखंच गायचं असतं हे आपल्या कानांवर या “भारतस्वरा”ने अदृश्य गोंदवून ठेवलं आहे त्याला आता आपला ना इलाज आहे. म्हणूनच, एखादं लता मंगेशकरांनी गायलेलं गाणं तसंच किंवा दिदींनी घेतलेल्या तानांसहीत एखादी मुरलेली गायिका गात जरी असली तरी ते गाणं दिदींनी दिलेली आत्मिक तृप्ती देऊ शकत नाही. कारण, ती गायिका व्याकरण आणि तांत्रिकदृष्ट्या जरी ते गाणं अचूक गात असली तरी त्या गाण्यातल्या गीतात दडलेल्या भावाचं काय करणार? तो आपल्या गाणं गाता गाता दिदींनी आपल्या श्वासांमधून उच्चारांमधून.. जो आपल्या पार आतपर्यंत नेऊन ठेवला आहे. हा संस्कारांचाच भाग असतो.
इतकं कशाला, इतक्या वर्षातलं एक निरीक्षण सांगतो. आपल्याकडचे जे जे गायक भावगीत गातात, ते हळूहळू फेमिनाईन पॅटर्नकडे झुकू लागलेले दिसतात. काय कारण असावं? कारण, प्रत्येकाला गायचं कसं, तर लता मंगेशकर यांच्यासारखं असा संस्कार आपोआप मिळाला असतो. एखादी तान, एखाद्या शब्दाचा गाण्यातला उच्चार.. अत्यंत तरल भाव.. आदींचं सादरीकरण करताना, तो होणं स्वाभाविक आहेच. कारण, आपल्यापुढे या एकमेवाद्वितीय स्वराने इतकं काम करून ठेवलं आहे, की त्या स्वराच्या मागे धावायला सुरूवात केली तरी आपण फार मोठं अंतर गाठू असं प्रत्येकाला वाटतं. माझ्या ओळखीतले भावगीत गायन शिकवणाऱ्या गुरूंना उच्चारांतली ही फेमिनाईन शेड काढायला विशेष मेहनत घ्यायला लागते, असं एकदा ते बोलता बोलता म्हणालेही होते.
====
हे देखील वाचा : आनंदघन – लता मंगेशकर यांची अविस्मरणीय आठवण
====
अर्थात, ते गाण्याची मिमिक करणाऱ्यांच्या बाबतीत जास्त होतं. अशाने अनेक गायकांचीही गोची होतेच. लताबाईंची आवडती गाणी कोणीही गायक गाऊ लागतो तो आपोआप फेमिनाईन पॅटर्नकडे आपसूक ओढला जातो कारण, बाईंच्या आवाजातली मॅग्नेटिक पॉवर एक्टिव झालेली असते. हे सगळं कमाल मेस्मरायझिंग असतं.
खरंतर ज्या भूमीत लता मंगेशकर आणि एकूणच मंगेशकर कुटुंबीय जन्माला आले त्या महाराष्ट्रात आपणही जन्मलो हे आपलं भाग्य आहे. म्हणूनच केवळ हिंदी नव्हे, तर मराठी भावगीत, चित्रपट गीत, भक्तीगीत, लोकगीत आदी गानप्रकारांमधून हा आवाज आपल्याला, आपल्या कानांना घडवत गेला.
लता मंगेशकर गेल्यानंतर जवळपास ५० तास उलटून गेल्यानंतर विमनस्क मानसिकतेचा धुरळा खाली बसल्यागत झालं आहे, आणि आता जाणवतं आहे, की स्वरांचं हे विद्यापीठ माझ्या मनात कैक एकरांवर पसरलं आहे. अर्थात, हे विद्यापीठ मनात चिरकाल आबाधित असणार आहेच. पण, या विद्यापीठाची संस्थापिका, जिने एक हाती त्याची निर्मिती माझ्या मनात केली ती आता या पृथ्वीतलावर नसणार आहे.
दिदींचं जाणं अकाली नव्हतं त्यामुळं त्या जाण्याने धक्का बसला नाही. पण तीव्र पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्यानं विचित्र मौन आलं आहे. या मौनाला शांत करण्याचं सामर्थ्य केवळ याच भारतस्वरात आहे. कारण तेच तर संस्कार आहेत आपल्यावर. एकदा हे मौन शांत झालं की, मनातल्या स्वरांच्या पिद्यापीठात या स्वरसरस्वतीची प्रतिष्ठापना होईल, हे सत्य आहे. दिदींच्या स्वर-संस्कारांचाच भाग आहे तो.
संस्कारांचाच पुढे स्वभाव होतो. आणि स्वभावाला औषध नसतं.