दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
कमाल अमरोही आणि मीना कुमारी यांच्या प्रेमाची अधुरी एक कहाणी…
भारतीय सिनेमासृष्टीत काही जोड्या आपली अविट छाप सोडून रसिकांवर निघून गेल्या. त्यात एक जोडी होती दिग्दर्शक कमल अमरोही आणि अभिनेत्री मीनाकुमारी यांची. खरंतर मीनाकुमारी ला जाऊन आता पन्नास वर्षे होताहेत. तसेच कमाल अमरोही यांना देखील आपल्यातून जावून ३० वर्षे होताहेत. पण तरीही अजूनही या दोघांच्या नात्यात बद्दलचं कुतूहल रसिकांच्या मनात कायम आहे.
आज ११ फेब्रुवारी. दिग्दर्शक कमाल अमरोही यांचा स्मृतिदिन. ११ फेब्रुवारी १९९३ रोजी कमाल यांचे निधन झाले. कमाल अमरोही आणि मीना कुमारी या दोघांच्या नात्यांबद्दल, त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल आणि एकूणच त्यांच्या समांतर कलायुष्याबाबत मीडियामधून आज देखील खूप काही लिहून येत आहे. या लिखाणातील बराचसा सूर हा कमाल अमरोही यांना खलनायक म्हणून दाखवण्याचा असतो.
कमाल अमरोही यांनी मीनाकुमारी वर कसे अत्याचार केले, तिच्या लोकप्रियतेमुळे त्यांच्या मनात तिच्याबद्दल ‘जेलसी’ कशी निर्माण झाली, तिच्या करिअरमध्ये अडथळे आणण्याचे काम कमाल अमरोही यांनी कसे केले आणि एकूणच मीनाच्या आयुष्याच्या शोकांतिकेला पूर्णत: कमल अमरोही यांना जबाबदार धरले जाते.
आता यात किती सत्य किती असत्य हे कोणालाच माहिती नाही. त्यामुळे अनेक दंतकथा जन्माला आल्या. ज्या आज देखील मीडियामधून फिरत असतात. पण आज इतक्या वर्षानंतर तटस्थपणे जर आपण या दोघांच्या आयुष्याकडे पाहिले तर दोन कलासक्त मने एकत्र नांदू शकली नाही असे आपण conclusion काढू शकतो आणि चित्रपटाच्या मायावी दुनियेत असं बऱ्याचदा होताना दिसतं.
गुरुदत्त आणि गीता दत्त यांच्या आयुष्यातदेखील आणखी काय झालं? गुलजार आणि राखीचा संसार तरी कुठे नीट झाला? अर्थात कमाल अमरोही यांच्या कला जीवनाचा आढावा घेताना आपण मीनाकुमारीला बाजूला घेऊ शकत नाही, हे जरी खरं असलं तरी त्यांचे स्वतःचे असे कर्तृत्व आपण नजरेआड करू शकत नाही.
उत्तरप्रदेश मधील अमरोहा इथे एका जमीनदाराच्या घरी कमाल यांचा जन्म झाला. (१७ जानेवारी १९१८) कमाल हे त्यांचे ‘फिल्मी’ नाव. त्यांचे मूळ नाव सय्यद अमीर हैदर कमाल हे होते. लहानपणापासूनच त्यांना लिखाण, साहित्य, शायरी याची प्रचंड आवड. जमीनदार कुटुंबात या आवडी म्हणजे ‘पोराला भिकेचे डोहाळे लागले’ असे समजणे. यातूनच त्यांचं जमीनदाराच्या कुटुंबातील राहणं त्यांना कठीण होऊ लागलं. त्यांची सर्जनशीलता घरात कुणालाच समजणारी नव्हती.
एकदा मोठ्या भावाने एका कार्यक्रमात कमालच्या शायरीचा पाणउतारा तर केलाच शिवाय थप्पड मारून त्यांचा जाहीर अपमान केला. कवी मनाच्या कमाल यांना हा अपमान खूप जिव्हारी लागला आणि त्याच रात्री त्यांनी घर सोडलं व तडक लाहोरला निघून गेले. लाहोरला एका वर्तमानपत्रात त्यांनी काही काळ नोकरी केली. तिथून ते कलकत्त्याला गेले. कलकत्त्याला त्यांची भेट के एल सैगल यांच्यासोबत झाली.
====
हे देखील वाचा: राजा परांजपे यांच्या मराठी चित्रपटांवरून प्रेरित होते ‘हे’ हिंदी चित्रपट!
====
पुढे सैगल मुंबईत आल्यानंतर त्यांनी कमाल अमरोही यांना देखील मुंबईत बोलवून घेतलं आणि त्यांची भेट ‘मिनर्वा मूव्हीटोन’चे मालक सोहराब मोदी यांच्याशी करून दिली. सोहराब मोदी यांनी त्यांना आपल्या फिल्म कंपनीमध्ये संवादलेखक म्हणून रुजू करून घेतले. अवघ्या विशीतल्या अमरोही यांच्या पल्लेदार उर्दू संवादांनी मिनर्वा मूव्हीटोनचे जेलर (१९३८), पुकार (१९३९) हे चित्रपट प्रचंड गाजले. सैगल नायक असलेल्या अखेरच्या ‘शहाजहान’ चित्रपटाचे संवाद त्यांचेच होते.
काही वर्ष पटकथा, संवाद लेखक हे काम केल्यानंतर त्यांनी बॉम्बे टॉकीजचा ‘महल’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. हा भारतातील पहिला सस्पेन्स म्युझिकल हिट सिनेमा होता.
याच काळात फिल्मिस्तानच्या सेट वर ‘तमाशा’ या चित्रपटाच्या वेळी त्यांची भेट मीनाकुमारीशी झाली. पहिल्याच भेटीत त्यांच्या तारा जुळल्या. मीनाकुमारीपेक्षा ते तब्बल पंधरा वर्षांनी मोठे होते. पण मीनाला पहिल्या भेटीतच कमाल प्रचंड आवडले होते. कमाल अमरोही यांनी तिला आपण विवाहित असून आपल्याला तीन मुले आहेत याची कल्पना दिली होती, पण त्याचा मीनावर काही परिणाम झाला नाही कारण ती त्यांच्या प्रेमात आकंठ बुडाली होती.
१९५१ साली महाबळेश्वरहुन मुंबईला येताना मीना कुमारीच्या गाडीचा अपघात झाला आणि ती जखमी झाली. यातच तिच्या हाताची करंगळी निकामी झाली. पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये चार महिने मीनाकुमारी उपचार घेत होती. या दरम्यान कमल अमरोही तिच्या उशाशी बसून असायचे. या आजारपणात मीना आणि कमाल अमरोही जास्त जवळ आले. मीना ते आल्या शिवाय औषध घ्यायची नाही.
मीनाकुमारी प्रेमाने त्यांना ‘चंदन’ म्हणायची, तर ते तिला ‘मंजू ‘ या नावाने संबोधायचे. दोघांच्या शायरीच्या आवडीमुळे ते भावनिकदृष्ट्या खूप जवळ आले. १४ फेब्रुवारी १९५२ या ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी हे प्रेमी युगुल विवाहबध्द झालं. या निकाहला मीनाच्या अब्बाजानचा प्रचंड विरोध होता. कमाल अमरोही यांनी मीनाकुमारीला घेऊन ‘दायरा’ (१९५३) हा चित्रपट बनवला. जमाल सेन यांचे संगीत असलेल्या या सिनेमात ‘देवता तुम हो मेरा सहारा’ हे अप्रतिम गीत होतं. चित्रपट खरोखर सुंदर होता, पण व्यावसायिकदृष्ट्या तो अपयशी ठरला.
याच वर्षी आलेल्या ‘बैजू बावरा’ चित्रपटातून मात्र मीनाकुमारी रातोरात स्टार बनून रसिकांच्या हुदयाची राणी बनली. अभिनेत्री म्हणून तिचा स्वतंत्र प्रवास सुरू झाला. परिणीता, फुटपाथ, चांदनी चौक, बागबान, एक ही रास्ता, इल्जाम, आजाद …अशी तिच्या हिट सिनेमांची रंगच लागली. इथेच कमाल अमरोही यांचा इगो दुखावला गेला. मेहबूब यांच्या ‘अमर’ आणि बिमल रॉय यांच्या ‘देवदास’ चित्रपटामधील पारो च्या भूमिकेसाठी खरंतर मीनाचीच निवड झाली होती, पण अमरोही यांनी तिला या दोन्ही भूमिका करू दिल्या नाहीत.
दिग्दर्शकांनी संवाद लेखक म्हणून कमल अमरोही यांचादेखील पन्नासच्या दशकात मोठा बोलबाला होता. के आसिफ यांच्या मुगल – ए- आजम या चित्रपटाचे संवाद लेखन त्यांनी केले होते आणि यासाठी त्यांना फिल्मफेअर अवॉर्डही मिळाले होते. यातील कमाल अमरोही यांनी लिहिलेल्या शब्दांची श्रीमंती पहा –
“तकदीरे बदल जाती है, जमाना बदल जाता है, मुल्को की तारीखे बदल जाती है, शहेनशाह बदल जाते है, मगर इस बदलती हुई दुनिया में मुहोब्बत जिसका हाथ थाम लेती है, वह इन्सान कभी नही बदलता!”
खरंतर कमाल अमरोही मीनाकुमारीला घेऊन ‘सलीम-अनारकली’ हा चित्रपट बनवणार होते. पण याच विषयावरचे दोन चित्रपट (१९५३ सालचा अनारकली आणि १९६० सालचा मुगल – ए- आजम) बनत असल्याने त्यांनी हा विषय बाजूला ठेवला मीनाला घेऊन त्यांनी एका भव्य सिनेमाची निर्मिती सुरू केली हा चित्रपट होता ‘पाकीजा’.
====
हे देखील वाचा: रेहाना (Rehana) – एका अजरामर गीताच्या मेकिंगची हळवी आठवण
====
१९५६ साली या चित्रपटाची निर्मिती सुरू झाली. के असिफ यांच्या सारखाच भव्य आणि दिव्य सिनेमा त्यांना बनवायचा होता. साठच्या दशकाच्या शेवटी रंगीत सिनेमाचे युग आले आणि त्यानी ‘पाकीजा’ रंगीत बनवायचे ठरवले. पाण्यासारखा पैसा खर्च करत त्यांनी काम सुरु केले. एकीकडे हे चालू असताना दुसऱ्या बाजूला कमाल आणि मीनामध्ये भांडणे सुरु झाली. १९६४ साली मीनाकुमारी आणि कमाल अमरोही यांच्यातील मतभेद प्रचंड वाढल्याने ते वेगळे झाले त्याचबरोबर पाकीजाची निर्मिती देखील थांबली.
मीनाकुमारीच्या अभिनयाची यात्रा त्यावेळी शिखरावर होती. पण त्याच वेळी ती आतून मात्र एकटी एकटी पडत होती. व्यावसायिक यशाची चरम सीमा गाठणारा तिचा अभिनय साहिब बीवी और गुलाम, दिल अपना और प्रीत पराई, दिल एक मंदीर, आरती,चित्रलेखा, बेनजीर काजल आदी चित्रपटांमधून दिसत होता, पण वैयक्तिक आयुष्यात मात्र ती दु:खाच्या सागरात बुडत होती. त्यावेळी तिने दोन गोष्टींचा सहारा घेतला एक शायरी आणि दुसरा ‘एकच प्याला’!
इकडे कमाल तर पूर्ण उध्वस्त झाला होता. एकमेकांसाठी जीव देणारे मीनाकुमारी आणि कमाल अमरोही प्रत्यक्ष आयुष्यात मात्र जवळ आल्यानंतर दु:खाशिवाय एकमेकांना काही देवू शकत नव्हते, असं म्हटलं जाऊ लागलं. मीनाकुमारीने कमालची अनारकली व्हायचा प्रयत्न केला, पण तो तिचा सलीम बनू शकला नाही! याची अनेक कारणे असावीत पण त्यांचं वैवाहिक आयुष्य सुखी झालेलं नाही हे मात्र शंभर टक्के सत्य होतं.
मीनाकुमारीचे पिणे प्रमाणाबाहेर वाढले आणि तिला लिवर सिरॉसिस झाला. मीना दूर गेल्यापासून कमालची अवस्था अत्यंत बिकट झाली. पण पुढे खय्याम, सुनील दत्त आणि नर्गिस यांनी पुढाकार घेतल्याने ‘पाकीजा’ या चित्रपटाची निर्मिती पुन्हा सुरू झाली. कमाल करीता ‘पाकिजा’ हे एक मोठं स्वप्न होतं, जे मीना कुमारी सोबत त्यांनी पाहिलं होतं. ज्या चित्रपटाच्या सेटवरून ते वेगळे झाले तोच चित्रपट त्यांना पुन्हा एकत्र घेऊन आला.
आता पाकिजा सिनेमास्कोप रंगीत बनवला गेला. ‘पाकीजा’ ४ फेब्रुवारी १९७२ रोजी मुंबईच्या मराठा मंदिर येथे प्रदर्शित झाला. त्यावेळी मात्र मीनाकुमारी खूप आजारी होती तरीही प्रीमियरला ती कशीबशी आली होती. त्यानंतर लगेचच ती मुंबईच्या एलिझाबेथ रुग्णालयात दाखल झाली. पुढे दोन महिन्यातच ३१ मार्च १९७२ या दिवशी मीनाकुमारीचे निधन झाले.
मीनाच्या निधनानंतर ‘पाकिजा’ धो धो चालला. कमाल अमरोही मात्र सैरभैर झाले. शंकर हुसेन या चित्रपटाचा अपवाद वगळता त्यांच्याकडून फारसे काम होत नव्हते. पण नंतर एका ऐतिहासिक सिनेमासाठी ते पुन्हा सज्ज झाले. धर्मेंद्र, हेमामालिनी आणि परवीन बाबी यांना घेऊन त्यांनी मोठ्या मेहनतीने बनवलेला ‘रजिया सुलतान’ देखील व्यावसायिकदृष्ट्या फ्लॉप झाला! पण तरी कमाल जिद्द हरला नाही. ‘आखरी मुघल’ या सिनेमाची स्क्रिप्ट त्याने बनवली. सिनेमाची जुळवाजुळव सुरु केली पण हा सिनेमा बनवणे त्याच्या नशिबात नव्हते.
मीना कुमारीनंतर २१ वर्षानी ११ फेब्रुवारी १९९३ ला कमाल अमरोही यांचे निधन झाले!