‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
ब्लॉग: असं काय घडलं की, अमिताभ बच्चन यांच्या ‘शहेनशहा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली
एखाद्या चित्रपटाच्या प्रदर्शनावरुन वाद होणं, आंदोलनं होणं या गोष्टी अधूनमधून होतच असते. त्याला कारणे भिन्न असतात. त्यातील काही चित्रपटांचे असे वादग्रस्त प्रदर्शन कायमच लक्षात राहते. असाच एक महत्त्वाचा चित्रपट, टीनू आनंद दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन आणि मीनाक्षीचा ‘शहेनशहा’ हा चित्रपट. हा चित्रपट १२ फेब्रुवारी १९८८ रोजी म्हणजेच आजपासून ३४ वर्षांपूर्वी रिलीज झाला होता. या रिलीजमध्ये एक ट्वीस्ट आहे.
अमिताभ बच्चनच्या सिनेमाला पंचवीस तीस वर्षापूर्वी ‘फस्ट डे फर्स्ट शो’ला थिएटरबाहेर दोन कारणास्तव तगडा पोलीस बंदोबस्त असायचा; एक म्हणजे, सहजासहजी आवरता न येणारी गर्दी आणि दुसरे कारण म्हणजे याच गर्दीचा फायदा घेऊन तिकीटाचा काळाबाजार करणारे यांना आवरण्यासाठी पोलीस बंदोबस्त अनिवार्य होता.
तेव्हा म्हणजे १९८५ ते ९० या काळात दक्षिण मुंबईतील वातानुकूलित थिएटरमध्ये बाल्कनीचे तिकीट सतरा ते वीस रुपये असे. ब्लॅक मार्केटमध्ये ते फस्ट डे फर्स्ट शोला पन्नास रुपयांपर्यंत जाई. उपनगरात अर्थात हा तिकीट दर उतरता असे. ‘शहेनशहा’ च्या चक्क पहिल्या आठवडाभर मुंबईत मेन थिएटर मराठा मंदिर येथे खूप मोठा पोलीस बंदोबस्त ठेवावा लागला. (त्या काळात मेन थिएटर हा खूपच महत्त्वाचा फंडा होता. तो ज्या चित्रपट रसिकांनी अनुभवला त्यांना त्यातील खूप आठवणी असतील.)
ज्या अमिताभने प्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘जंजीर’ वगैरे अनेक चित्रपटांत कर्तबगार पोलीस इन्स्पेक्टर साकारला आणि अगदी या ‘शहेनशहा ‘मध्येही तो पोलीस इन्स्पेक्टरच्या होता (पण थोडा वेगळा), त्याच्या चित्रपटावर अशी पोलीस संरक्षणाची वेळ का यावी?
अमिताभने १९८४ साली राजकारणात पाऊल टाकले आणि उत्तर प्रदेशातील अलाहाबाद मतदारसंघांतून इंदिरा काँग्रेसचा उमेदवार म्हणून तो जनता पक्षाच्या उमेदवार हेमवती नंदन बहुगुना यांचा पराभव करुन भरगोस मतांनी जिंकलाही. ही निवडणूक प्रचंड गाजली.
=====
हे देखील वाचा: अमिताभ बच्चन -अमजद खान यांच्या मैत्रीची ‘अधुरी एक कहाणी’
=====
अमिताभ लोकसभेचा खासदार झाला. पण पडद्यावर जोरदार डायलॉगबाजी करणारा अमिताभ लोकसभेत मात्र मौनी खासदार ठरला. म्हणजे तो कोणत्याही चर्चेत भाग घेत नसे आणि प्रश्नही करीत नसे. पडद्यावर जोरदार डायलॉगबाजी करणारा लोकसभेत मात्र गप्प, याची मिडियातून बरीच चर्चा झाली. तो ‘अमिताभ बच्चन’ असल्याने ती चर्चा अधिकाधिक रंगतदार असायची. त्यातून ‘राजकारण हे त्याचे काम नाही’, असे सूचित केले जाई.
अशातच बोफोर्स घोटाळा प्रकरणी त्याचे नाव घेतले जाऊ लागले आणि या गोष्टीचे मोठ्या प्रमाणावर समाजकारण आणि राजकारण तापले. तेव्हा मुद्रित माध्यमातून त्याची बरीच उलटसुलट चर्चा रंगली. रुपेरी पडद्यावरचा हीरो आता खलनायक झाला, असा त्याला रंग दिला गेला. अमिताभ विरोधातील आंदोलनाचा फटका नेमक्या त्याच वेळेस प्रदर्शनास सज्ज असलेल्या ‘शहेनशहा’ चित्रपटाला बसणार असे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, अमिताभने खासदारकीचा राजीनामा दिला तरी हे वातावरण कायमच राहिले.
अशा वेळी ते वातावरण निवळण्याचा एक मार्ग म्हणून अमिताभची पाहुणे कलाकार म्हणून नृत्य असलेल्या राकेशकुमार दिग्दर्शित ‘कौन जीता कौन हारा’ हा चित्रपट रिलीज केला. तेव्हा मुंबईतील मेन थिएटर म्हणजे ‘इंपिरियल’ थिएटर. त्या चित्रपटाच्या पोस्टरला काही ठिकाणी चक्क काळे फासले गेले. यामुळे पुढच्याच शुक्रवारी ‘शहेनशहा’ प्रदर्शित होत असतानाच त्याच्या पोस्टरलाही काळे फासले जाण्याची शक्यता होती.
‘फस्ट डे फर्स्ट शो’ला निदर्शने झाली असती. अशा वेळी सिक्युरिटी आवश्यक होतीच. ‘शहेनशहा ‘ रिलीज झाला आणि वातावरण निवळत गेले. पब्लिक रिपोर्ट संमिश्र होता. तरी पहिले चार पाच आठवडे सिनेमाची हवा होती. महत्वाचे म्हणजे आता ‘अभिनेता अमिताभ बच्चन’ वर फोकस पडायला लागला आणि तोही आपल्या नवीन चित्रपटांचे मुहूर्त आणि शूटिंगमध्ये रमला. त्याचे खरे मैदान हेच असल्याने तो येथील ‘शहेनशहा’ म्हणूनच कायमचा ओळखला जातो.
काळ जस जसा पुढे सरकला तस तशी ही गोष्ट मागे पडत गेली. अगदी बोफोर्स प्रकरणात तो निर्दोष आहे असाही कौल मिळाला. पण हा काळ अमिताभसाठी खूपच अवघड होता.
=====
हे देखील वाचा: सिनेमातील ‘या’ गाण्यावर नृत्याभिनय करताना अमिताभ अक्षरश: रडकुंडीला आला….
=====
त्या काळात चित्रपटाची गाणी रसिकांपर्यंत पोहचून ती हिट झाल्याचा चित्रपटाला फायदा होई. या चित्रपटाच्या गाण्याची ध्वनिफीत प्रकाशित करुन चित्रपटाच्या पूर्वप्रसिध्दीला सुरुवात झाली तेव्हा शहेनशहाला अमर उत्पल यांचे संगीत आहे. “अंधेरी रातो मे”, हे गाणे आजही लोकप्रिय आहे. जुहूच्या एका पंचतारांकित हाॅटेलमध्ये ध्वनिफीत सोहळ्यास अमिताभ अगदी वेळेवर आला. (त्याची ती जुनी व्यावसायिक शिस्त).
चित्रपटाची नायिका मीनाक्षी शेषाद्रीचे आगमन होण्यापूर्वीच पाहुण्या पूनम धिल्लाचे आगमन झाले. अगदी आटोपशीर असे ध्वनिफीत प्रकाशन सोहळा होता, तो आटपून अमिताभ निघालाही. पण त्याचा त्या दिवशी काय मस्त मूड होता माहित नाही. तेवढ्यात त्याने टीनू आनंदला त्या हाॅटेलच्या स्वीमिंग पूलमध्ये ढकलले आणि आम्हा सिनेपत्रकारांसाठी एक छान “ओलेती” बातमी मिळाली. अगदी चौकटीतील गोष्ट असे म्हणत हे रंगवून खुलवून लिहिले गेले.
हे कव्हरेज जरा कुठे रंग भरतय तोच अमिताभ बच्चन विरोधात वातावरण निर्माण होईल असे त्याच्या राजकारणातील अपयशावर अधिकाधिक फोकस पडू लागला. माझ्यासारख्या सिनेपत्रकाराला (आणि अमिताभ चाहत्याला) हे गोंधळून टाकणारे होते. अमिताभबद्दल खूप वेगाने नकारात्मक वातावरण तयार झाले (अथवा केले गेले). त्यातील राजकीय संदर्भ आता सांगता येत नाहीत.
अमिताभ बच्चन विरोधात तापलेल्या वातावरणात ‘शहेनशहा’ चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. अखेर १२ फेब्रुवारी १९८८ ही तारीख ठरली. पूर्वप्रसिध्दीत चित्रपटाच्या अधिकाधिक फोटोंचा वापर केला गेला. तेव्हा तेच शक्य होते आणि ते बरेच उपयोगीही पडले. आम्हा समिक्षकांसाठी ‘शहेनशहा’ चित्रपटाचा ‘प्रेस शो’ नक्की कुठे आणि कधी, हा खूप महत्वाचा विषय होता.
=====
हे देखील वाचा: या गोष्टीमुळे बॉलीवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि कमल हसन एकत्र काम करू शकले नाहीत…
=====
या चित्रपटाचे मेन थिएटर मराठा मंदिर होते. पण आम्हा समिक्षकांसाठी ‘ड्रीमलॅन्ड’ थिएटरमध्ये सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला. गिरगावात लहानाचा मोठा होताना ‘ड्रीमलॅन्ड’ थिएटरमध्ये अनेक चित्रपट एन्जाॅय केले होते. पण यावेळचा अनुभव व वातावरण वेगळे होते. थिएटरमध्ये शिरताना चक्क आम्हा प्रत्येकाची बॅग तपासली (ऐन थिएटरमध्ये कोणी काही आंदोलन करेल, असे वाटले होते की काय?) आणि मग सिनेमा सुरु झाला. विशेष म्हणजे, या चित्रपटाची कथा कल्पना जया बच्चन यांची आहे.
या चित्रपटाची समिक्षा मिश्र स्वरुपाची होती. म्हणजे, काही समिक्षकानी ‘बरा’ चित्रपट म्हटले तर, काहींनी चांगला. त्या काळात समिक्षेला स्टार देण्याची पध्दत नव्हती आणि ते अगदी चांगले होते. गल्ला पेटीवर ‘शहेनशहा’ सिनेमाला सर्वसाधारण स्वरुपाचे यश मिळाले. चित्रपट हिट तर झाला, पण सुपरहिटची अपेक्षा होती.
पण या सगळ्यातून एक अतिशय चांगली गोष्ट घडली. ती म्हणजे, त्यानंतर काही महिन्यातच अमिताभ बच्चनने मिडियावरचा बॅन (बंदी) उठवला आणि आम्हा एकेका सिनेपत्रकाराला स्वतंत्रपणे मुलाखत देऊ लागला. महत्वाचे म्हणजे, त्यात वेळेचे अजिबात बंधन नव्हते… आता तो एक वेगळा ‘शहेनशहा’ होता.