मराठी सिनेसंगीत क्षेत्रात इतना सन्नाटा क्यूं है भाई?
परवा रेडिओ डे झाला. मी रेडिओ आवर्जून ऐकतो. जेव्हा केव्हा मी मराठी गाण्याचा रेडिओ लावतो तेव्हा, मला फार जुनी गाणी ऐकू येतात. जी मी यापूर्वी बऱ्याचदा ऐकतो. म्हणूनच ‘रेडिओ डे’ च्या निमित्ताने आजचा नवा विषय. तर आजचा विषय आहे गाण्याचा. म्हणजे, सिनेमातली गाणी. ज्याला आपण सिनेसंगीत म्हणतो.
साधारण विचार करुया,
आता लॉकडाऊननंतर थिएटर ५० टक्के क्षमतेनं सुरू झाली आहे. अनेक सिनेमे रिलीज झाले आहेत. अलिकडचा विचार करायचा, तर पांघरूण, लोच्या झाला रे, डार्लिंग, फास, पांडू, झिम्मा आणखीही इतर आहेत यात. सगळीच नावं आत्ता आठवत नाहीयेत. पण यात आणखी किमान तीन सिनेमांची भर पडेल. आता गेल्या काही दिवसांत कानांवर पडणारी नवी मराठी गाणी कुठली आहेत, हे जरा आठवून पहा बरं.
अगदीच ढोबळ विचार करताना मला आठवतात ती पांडू सिनेमातली गाणी. त्यातही बुरुम बुरूम.. ते बुलेटचं गाणं. शिवाय, अलिकडे पांघरूण सिनेमातलीही गाणी कानावर पडली आहेत. म्हणजे, पांघरूणची टीम प्रमोशनला शोमध्ये जाते तेव्हा तिथे गाणी सादर होतात. त्यातून त्या चित्रपटात असलेल्या संगीताचा बाज माझ्या लक्षात येतो. गाणी कशी बनवली आहेत ते कळतं. त्यातलं गीतलेखन कसं झालं आहे याचा अंदाज मला येतो.
राग मानायचं कारण, नाही. पण डार्लिंग, लोच्या झाला रे किंवा झोंबिवली यातली गाणी माझ्या कानावर पडलेली मला आठवत नाही. आता सिनेमात गाणी नसतीलच, तर हरकत नाही. पण सध्या नवं मराठी सिनेसंगीत कानावर पडत नाहीये, हे येतंय का लक्षात आपल्या?
आता कालच आपण ‘रेडिओ डे’ साजरा केला. त्या निमित्ताने सहज नेट सर्च करताना एक नवा सर्वे दिसला. त्यात आता रेडिओ ऐकणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसू लागली आहे. म्हणजे फार पूर्वी आपले वडील, आजोबा कानाशी रेडिओ घेऊन बसत होते. रेडिओ हा आपल्या घरातला सदस्यच होता. पण कालांतराने काळ बदलला. टीव्ही आला. पुढे नेट आलं, यू ट्यूब आलं आणि मग सगळी गणितं बदलली.
ऑडिओ व्हिज्युअल्सचा मामला आला. त्यानुसार गाणीही बदलली. म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल्स आल्यावर आपली गाणी चकचकीत कशी असतील यावर सिनेनिर्माते, दिग्दर्शक भर देऊ लागले. गाणी उत्तम कोरिओग्राफ होऊ लागली. कोरस असेल तर त्यावर वेगळा खर्च केला जाऊ लागला. पुढे अल्बम्स मग सिंगल्स अशी स्थित्यंतरं होत गेली.
आता पुन्हा एकदा रडिओ लोकांना हवाहवासा वाटू लागला आहे. त्यातही भरमसाठ जाहिराती असल्यामुळे आणि रेडिओवर आरजेंची चालणारी बडबड (बडबडच म्हणायचं आहे. कारण, फार कमी आरजे ऐकणाऱ्यांशी संवाद साधतात असो. तो आजचा मुद्दा नाही.) यांना कंटाळले आहेत. म्हणून मग गाण्यांची ॲप्स आली. गाण्यांच्या ॲप्समध्ये पॉडकास्ट्स आली. म्हणजे, पुन्हा एकदा आपण ऑडिओकडे शिफ्ट होऊ लागलो असताना आपल्या कानावर नवी गाणी न पडणं, हे कसं वाटतंय? चांगलं वाईट हे काळ ठरवेल. पण जर सिनेमात गाणी असतील, तर ती प्रमोट का होत नाहीयेत हा मुद्दा आहे.
आता सिनेमात गाणी असूनही प्रमोट न करण्यामागे त्याचा बिझनेस हे कारण असू शकतं. म्हणजे आयपीआरएसनुसार जर गाण्याची रीतसर नोंद करण्यात आली असेल आणि ते गाणं रेडिओवर वाजलं तर त्याची रॉयल्टी द्यावी लागते. ती गायकाला, संगीतकाराला, गीतकाराला द्यायची हे ठरलेले असते. आता द्यावी लागणारी रॉयल्टी आणि होणारा बिझनेस याचं प्रमाण आपल्याकडे फार व्यस्त असल्याचं कळतं. बरं गंमत अशी की, आपल्या गाण्याचा बिझनेस नक्की कसा वाईट आहे, हे कुणीच सांगत नाही. कुणी सांगत नसल्यामुळे त्यावर उपचारही होत नाहीत.
परिस्थिती अशी आहे की, आज मराठी संगीतकारांची अवस्था दयनीय झाली आहे. अंगी उत्तम गुण असून, मेहनतीची तयारी असूनही अत्यंत अल्प मोबदल्यात या लोकांना काम करावं लागतंय. अर्थात, आज अजय-अतुल, अवधूत गुप्ते, सलील कुलकर्णी, कौशल इनामदार ही पहिल्या फळीतली मंडळी नावारुपाला आली आहेत. त्यांनी केलेल्या कामाचीच ती पावती आहे. पण मराठीचं टॅलेंट इथं संपत नाही. तर इथून सुरू होतं.
आज टीव्हीवरच्या डेलीसोप्सवर नजर टाकली तरी कितीतरी नावं आपल्याला कळतात जी अनेक वर्षं काम करतायत. यात आवर्जून उल्लेख करायला हवा, तो रोहित नागभिडे, ए.व्ही.प्रफुल्लचंद्र, समीर साप्तीसकर, ऐश्वर्य मालगावे, विजय गावंडे, शशांक पोवार, साई-पियूष अशी कितीतरी मेहनती नावं आहेत जी कित्येक वर्षं काम करतायत. त्यांची गाणी येतायत. पण स्थिती अशी आहे, की निर्मात्यांनी मराठी संगीतकारांसाठी गाण्याचं बजेट आता भयंकर कमी केलं आहे. कारण अलिकडे गाणी प्रमोट होत नाहीत.
====
हे देखील वाचा: ‘या’ म्युझिक अल्बम्सच्या ‘१२ लाख’ कॅसेट्सची झाली होती विक्रमी विक्री!
====
तुम्हाला माहीतीये, आज मुंबईत सिनेमाचं एक मराठी गाणं रेकॉर्ड करायचं असेल तर त्याचं बजेट किती ठेवलं जातं? तर दीड लाख. यात जर चार गाणी असतील तर साधारण सहा ते सात लाख रुपये बजेट देऊन गाणी तयार करायला सांगितली जातात. कारण, रिकव्हरी नसते. कारण प्रमोशन होत नाही. या दीड लाखात संगीतकाराने गाणं करून द्यायचं असतं. यात स्टुडिओचं भाडं, गायक-वादकांचं मानधन आदी गोष्टी भागवायच्या असतात आणि त्यातून उरले तर संगीतकार आपलं मानधन घेत असतो. हे फार भयानक नाही वाटत?
आपल्याकडे सिनेसंगीत हा सिनेमाचा फार महत्वाचा भाग आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून सिनेसंगीताकडे आपण डोळेझाक करत आहोत. साहजिकच गायकांची, गायिकांची, संगीतकारांची, म्युझिक ॲरेंजर्सची दुसरी आणि येणारी नवोदितांच्या फळीचा स्ट्रगल आपण वाढवत आहोत. आजमितीला सिनेमाचे निर्माते झी स्टुडिओज असतील किंवा एखाद्या सिनेमाला ‘झी’ने हातभार लावला, तरच गाणी प्रमोट होतात. नाही म्हणायला, आपल्याकडे एखादं म्युझिक चॅनल आहे. पण सिनेमाच्या तुलनेत संगीताचं बजेटच कमी असल्यामुळे त्याची निर्मितीही तशीच होते.
====
हे देखील वाचा: मराठी चित्रपटसृष्टी कात कधी टाकणार? ‘सिंडिकेट’ बनाना मंगता है!
====
आपलं सिनेसंगीताच्या या दुनियेकडे दुर्लक्ष होतंय. खरंतर माणसाच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे गाणं. आतून तुटणाऱ्या, आनंदाने भरारी मारणाऱ्या मानवी मनाला वेळोवेळी या सिनेसंगीताने धीर दिला आहे.. बळ दिलं आहे. आज सिनेनिर्मिती १०० सिनेमांच्या पार पोचली आहे. पण असं असताना, कानावर पडणाऱ्या गाण्यांची संख्या मात्र आता बोटावर मोजण्या इतपत आली आहे, याकडे लक्ष द्यायला हवं.
असो, या लेखामुळे लगेच बदल घडण्याची अपेक्षा नाही. पण काहीतरी कुठेतरी दुखतंय, एवढं कळलं तरी मग उपचार करण्याच्या शक्यतेला चालना मिळते. नाही?