‘त्या’ निनावी पत्रामुळे इंदीवर यांनी लिहिलं “फूल तुम्हे भेजा है खत में…” हे प्रेमगीत
पूर्वीच्या सिनेमातील प्रेमाच्या भावनेला एक निरागस सात्विकता होती. मनाच्या मिलनाची पवित्र उदात्तता होती. वाटव्यांच एक प्रेमगीत होतं ‘रानात सांग कानात आपुले नाते…’ रानात जावून पुन्हा फक्त कानात सांगायची इतकी ही प्रेमभावना नाजूक, गोड आणि ‘व्हेरी व्हेरी पर्सनल’ होती.
गुलझार यांनी देखील ‘हाथ से छूके इसे रिश्ते का इल्जाम न दो’ असं ‘प्लॅटोनिक लव्ह’ आपल्या गीतातून व्यक्त केलं होतं. असंच एक नितांत सुंदर गाणं होतं सरस्वती चंद्र (१९६८) या सिनेमात; ‘फूल तुम्हे भेजा है खत मे …’ या गाण्याच्या निर्मितीच्या वेळचा किस्सा फार सुंदर आहे.
‘सरस्वती चंद्र’ या सिनेमाचे संगीतकार कल्याणजी आनंदजी यांच्या ‘म्युझिक रूम’ मध्ये काम करीत होते. एक लिफाफा आला. हे पत्र कोण देऊन गेलं याबद्दल कुणालाच माहित नव्हते. पाकीट फोडल्यावर त्यांना आणखी आश्चर्याचा धक्का बसला कारण त्यात एक गुलाबचे फूल होते आणि पत्रावर ओठाच्या लिपस्टिकचा ठसा होता आणि लिहिलं होतं ‘टू डिअर…’!
सारेच जण गोंधळले. कुणाचे व कुणासाठी हे पत्र ते काही कळेना. बरं ओठाचा नाजूक आकार मुलीचाच असल्याने पत्र नक्की कुठल्यातरी मुलीनेच पाठवले हे निश्चित होतं. गीतकार इंदीवर तिथे आले, त्यांनाही कळेना. ते म्हणाले, “ये खत किसीके लिए भी हो सकता है…आपके लिए मेरे लिए..! लेकीन लडकी बडी शर्मिली है… प्यार तो करती है, पर इजहार करनेसे डरती है!”
या पत्राला बघून म्युझिक रूम मध्ये मस्त गप्पा चाललेल्या असताना गीतकार इंदीवर म्हणाले “यार, इस सिच्युएशन पर तो अच्छा खासा गाना बन सकता है!” फूल, खत,दिल, भेजा या गोष्टी समोरच होत्या. इंदीवर यांनी शब्द लिहिले, “फूल तुम्हे भेजा है खत मे फूल नही मेरा दिल है, प्रियतम मेरे मुझको लिखना क्या तुम्हारे काबील है….”
====
हे देखील वाचा: किस्सा तलत मेहमूद यांच्या पहिल्या गाण्याचा!
====
प्रेयसीच्या नाजूक भावनांना त्यांनी फार सुरील्या रितीने कागदावर उतरविले. लता व मुकेश यांनी तितक्याच नाजूकतेनं हे गाणं गायलं. ‘सरस्वती चंद्र ‘या सिनेमात हे गाणे आले यातील “चंदनसा बदन”, “छोड दे सारी दुनिया किसीके लिए” “मै तो भूल चली बाबूल का देस”, “हमने अपना सब कुछ खोया प्यार तेरा पाने को” ही गाणी जबरदस्त लोकप्रिय झाली. सिनेमाला मात्र फारसं यश मिळालं नाही.
गोवर्धनराम माधवराम त्रिपाठी यांच्या मूळ कादंबरीवर आधारीत हा सिनेमा गोविंद सरैया यांनी दिग्दर्शित केला होता. सिनेमाचं बजेटच कमी होतं; त्यामुळे हा सिनेमा १९६८ सालचा असूनही कृष्ण धवलच होता. या सिनेमावर पुरस्कारांची मात्र बरसात झाली.
त्या वर्षीचा राष्ट्रीय पुरस्कारासोबतच संगीत (कल्याणजी आनंदजी), छायाचित्रण ( नरीमण इराणी) संवाद (अली रजा) हे फिल्मफेअरचे पुरस्कार मिळाले. सिनेमा जरी अपयशी ठरला असला तरी “फूल तुम्हे भेजा है खत मे …” या गाण्याच्या ओळी साठ आणि सत्तरच्या दशकातील अनेक नवविवाहित आणि प्रेमात पडलेल्या जोड्यांकरीता पत्र लिहिताना उपयोगी पडल्या. त्या काळतील अनेक साहित्य कृतीत या गाण्याचा उल्लेख सापडतो.
====
हे देखील वाचा: तब्बल अठरा वर्षाचा काळ लागला ‘हे’ गाणे बनायला
====
हे गाणे लिहिणाऱ्या गीतकार इंदीवर यांचा आज २८ फेब्रुवारी ला स्मृती दिन आहे. गीतकारीची मोठी इनिंग खेळणाऱ्या इंदीवर यांचे २८ फेब्रुवारी १९९७ ला निधन झाले. त्त्यांच्या या गीताची अनोखी आठवण तुम्हाला नक्कीच आवडली असेल.