अमिताभ – रेखा – हुकलेली संधी, बदललेली समीकरणं आणि काही न जुळलेले ‘संजोग’
अमिताभ बच्चनच्या एकनिष्ठ चाहत्यांना, फॅन्स आणि फाॅलोअर्सना त्याचा ‘संजोग’ नावाचा एक चित्रपट होता हे निश्चित माहित असेल. एखाद्या सुपरस्टारवरचे प्रेम छोटे छोटे तपशीलही माहित असावेत असेच असते. आपल्याकडच्या चित्रपट रसिकांची संस्कृती अशी भन्नाट आहे. २५ फेब्रुवारी १९७२ रोजी ‘संजोग’ प्रदर्शित झाला. म्हणजेच त्याला पन्नास वर्षे पूर्ण झाली.
अमिताभच्या अगदी सुरुवातीच्या काळातील अनेक चित्रपट रसिकांनी नाकारले. त्यात स्वीकारावे काय, असा प्रश्न होताच. त्यातीलच हा एक दक्षिणेकडील चित्रपट निर्मिती संस्था जेमिनी स्टुडिओ निर्मित चित्रपट असून या चित्रपटात माला सिन्हा अमिताभची नायिका होती. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या पोस्टरवर, वृत्तपत्रातील जाहिरातीत आणि श्रेयनामावलीत माला सिन्हाचे नाव अगोदर येते आणि मग अमिताभचे.
माला सिन्हा तेव्हा खूपच सिनियर अभिनेत्री म्हणून ओळखली जाई (१९७१ सालचा अरविंद सेन दिग्दर्शित ‘मर्यादा’ या चित्रपटात माला सिन्हाची दुहेरी भूमिका आहे आणि तेथेही राजकुमार आणि राजेश खन्नाच्या अगोदर माला सिन्हाचे नाव होते/आहे.) याचाच अर्थ माला सिन्हा आता नवीन पिढीतील नायकांसोबत भूमिका साकारत होती.
एस. एस. बालन दिग्दर्शित ‘संजोग’ या चित्रपटात अरुणा इराणी, मदन पुरी, जाॅनी वाॅकर, नासिर हुसेन, रमेश देव, केश्तो मुखर्जी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. तर, या चित्रपटाला तर संगीत होते राहुल देव बर्मन यांचे. संजोग के. बालचंदर दिग्दर्शित ‘Iru Kodugal’ या तमिळ चित्रपटाचा हा रिमेक होता. मुंबईत या चित्रपटाचे मेन थिएटर होते सेन्ट्रल (गिरगाव).
‘संजोग’ चित्रपटाच्या निर्मितीच्या दिवसात अमिताभच्या प्रगती पुस्तकात फक्त आणि फक्त ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘आनंद’ (रिलीज १२ मार्च १९७१) मधील डाॅ. भास्करच्या अभिनयाचे कौतुक होते. ‘आनंद’ राजेश खन्नाचा चित्रपट म्हणून अगदी आजही ओळखला जातो. प्रेक्षकांना तो अगदी संवादांसह आठवतो.
के. ए. अब्बास दिग्दर्शित ‘सात हिन्दुस्तानी’ (१९६९) पासून अमिताभ बच्चन चित्रपट अभिनयाच्या क्षेत्रात आला तरी त्याला खरं यश आणि ओळख प्राप्त करायला सलिम जावेद लिखित आणि प्रकाश मेहरा निर्मित आणि दिग्दर्शित “जंजीर ” (रिलीज मे१९७३) पर्यंत थांबावं लागलं. तोपर्यंत त्याचे बंधे हाथ, रास्ते का पत्थर, एक नजर, प्यार की कहानी, बन्सी बिरजू पडद्यावर आल्या आल्याच फ्लाॅप झाले होते.
ज्योती स्वरुप दिग्दर्शित ‘परवाना’ (१९७१) मध्ये त्याने व्हीलन साकारला. सिनेमा मात्र फ्लाॅप ठरला. तर, एस. रामनाथन दिग्दर्शित ‘बाॅम्बे टू गोवा’ (१९७२) च्या यशाचे श्रेय मेहमूदला मिळाले.
अशातच अमिताभबाबत काही वेगळ्या गोष्टी घडल्या. स्टार असो किंवा सर्वसाधारण माणूस आयुष्यात ‘पडत्या काळात’ अगदी निराशाजनक गोष्टी घडतात आणि अनेकदा तो माणूस परिस्थितीपुढे हतबल होतो. या सगळ्या ‘पडत्या काळात’च कुंदनकुमार निर्मित आणि दिग्दर्शित ‘दुनिया का मेला’ या चित्रपटात तो रेखाचा नायक साकारत होता.
मोहन सैगल निर्मित आणि दिग्दर्शित ‘सावन भादो’ (१९७०) या पहिल्याच चित्रपटाच्या रौप्यमहोत्सवी यशाने आणि त्यातील आक्रमक अदाकारीने रेखाने नवीन निश्चलपेक्षा जरा जास्तच रसिक, मिडिया आणि चित्रपटसृष्टीचे लक्ष वेधून घेतले आणि तिला नवीन चित्रपट मिळू लागले. तरी स्थिरस्थावर होण्यासाठी आणखीन यश हवे होते. अशा वेळी लहान मोठे जे जे चित्रपट साईन करता येतात ते करायचे असते. चित्रपटसृष्टीतील वाटचाल हा एक अनेक अनाकलनीय गोष्टीनी भरलेला विषय आहे. त्यात अधिकृत नियम वगैरे वगैरे काही नाही.
अशातच चांदिवली स्टुडिओत अमिताभ आणि रेखा यांच्यावर ‘तौबा तौबा’ या गाण्याचे शूटिंग झाले. चित्रपटाचे शूटिंग कधी सलग होत नसते. कधी इनडोअर तर कधी आऊटडोअर्स शूटिंग, कधी गाण्याचे तर कधी फायटींगचे वगैरे शूटिंग होत असते. त्याचे सगळे तपशील दिग्दर्शनीय विभागाकडे असतात.
काही दिवसांनी रेखा पुन्हा याच चांदिवली स्टुडिओत शूटिंगला गेली आणि तेव्हा तिला आश्चर्याचा मोठा धक्काच बसला. कारण आता त्याच ‘तौबा तौबा’ या गाण्याचे शूटिंग पुन्हा करायचे होते. पण आता ते संजय खानवर करायचे होते आणि केलेही बरं का! गंमत म्हणजे, यू ट्यूबवर या दोघांवरचे गाणे पाहायला मिळतेय.
काही समजलं का? अमिताभचा पडता काळ सुरु असल्याने कुंदनकुमारने आता त्याच्याऐवजी संजय खानची निवड केली. पण नशीब कसे असते बघा. ‘दुनिया का मेला’ पूर्ण होऊन पडद्यावर येईपर्यंत ‘जंजीर’ सुपरहिट ठरल्याने अमिताभ स्टार झाला आणि मुंबईत मेन थिएटर इंपिरियलमध्ये ‘जंजीर’ने पन्नास आठवड्याचा मुक्काम केला. त्याच इंपिरियल थिएटरमध्ये त्यानंतर ‘दुनिया का मेला’ प्रदर्शित झाला आणि जेमतेम यशावर समाधान मानावे लागले.
आपला निर्णय चुकल्याचे कुंदनकुमारच्या लक्षात आले. पण कालांतराने ज्या अमिताभ आणि रेखाची जोडी जमली आणि गाजली त्या जोडीच्या पहिल्या चित्रपटाचा योग असा हुकावा? म्हटलं ना, चित्रपटसृष्टीत कधीही काहीही घडू शकते आणि त्याला नेमके उत्तर नसतं आणि हीच तर या मनोरंजन क्षेत्रातील गंमत आहे.
अशीच एक कथा आहे ‘नाम बडे’ या चित्रपटाची. देवेन वर्मा दिग्दर्शित या चित्रपटात रेखा राव अमिताभची नायिका होती. ‘जंजीर’ निर्मितीवस्थेत असताना याचेही शूटिंग सुरु झाले. पण ‘जंजीर’ पाठोपाठ ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘नमक हराम’ (रिलीज नोव्हेंबर १९७३) हा चित्रपटही सुपरहिट ठरला आणि अमिताभ स्टार झाला. त्यानंतर त्याच्याकडे रवि टंडन दिग्दर्शित ‘मजबूर’, यश चोप्रा दिग्दर्शित ‘दीवार’, रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’, वगैरे चित्रपटांची रांग लागली आणि ‘नाम बडे’ साठी त्याच्या तारखाच मिळेनात.
देवेन वर्माने मग जमेल तशा तारखा घेत घेत शूटिंग सुरु ठेवले. चित्रपटाचे नाव बदलून ‘पूजा’ असे केले. काही महिन्यांनी तेही बदलून ‘पतझड’ केले. तरीही चित्रपटाचे नशीब बदलत नव्हते, फारशी प्रगती होत नव्हती. अमिताभ तर अधिकाधिक बिझी होत गेला.
====
हे देखील वाचा: तब्बल अठरा वर्षाचा काळ लागला ‘हे’ गाणे बनायला
====
देवेन वर्माने हे सगळे ओळखून हा चित्रपटच डब्यात ठेवला आणि मग अमिताभ आणि शर्मिला टागोर अशी जोडी जमवत ‘बेशरम’ चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन सुरु केले. अडिच तीन वर्षे शूटिंग करीत १९७८ साली चित्रपट पडद्यावर आणला… योगायोगाने याचेही मेन थिएटर इंपिरियल!
यशापयशाची खेळी ही अशी असते. त्यात काही गोष्टी घडायच्या राहून जातात. बिचारी रेखा राव आपण अमिताभच्या नायिका आहोत याची तिची खुशी, याचा तिचा आनंद या सगळ्यात विरला. कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीला तिला हा सुखद योग आला होता. दुर्दैवाने तो कायमचा हुकला. काही वर्षातच ती मराठी चित्रपटात भूमिका साकारु लागली आणि यशस्वी ठरली, मग काही हिंदी चित्रपटात लहान मोठ्या भूमिका साकारल्या. तरी हुकलेल्या गोष्टी मनात घर करुन राहतात.
अमिताभच्या ‘संजोग’ला पन्नास वर्षे पूर्ण झाली पण त्याभोवती या अशा अनेक गोष्टींचा खेळ आहे. ज्याच्या वाटेला येतो त्यालाच त्याचा गुंता माहित असतो. एका चित्रपटासाठी रेखाचा नायक म्हणून अमिताभ हुकला तरी पुढे अनेक योग आले. रेखा रावच्या बाबतीत मात्र तसे घडले नाही. दोन्हीकडे ‘रेखा’च. पण गोष्ट खूपच वेगळी.
====
हे देखील वाचा: किस्सा तलत मेहमूद यांच्या पहिल्या गाण्याचा!
====
नसिब अपना अपना, किस्मत अपनी अपनी. काही ‘संजोग’ असेही….!