मराठी ‘झुंड’ चालतेय पुढे….
बऱ्याच काळानंतर फार इंटरेस्टिंग सिच्युएशन तयार झाली आहे आपल्याकडे. खरंतर गेल्या दोनेक वर्षापासून आपल्याकडे कोरोनामुळे परिस्थिती अत्यंत वाईट होती. आपल्याकडेच काय तर सगळीकडेच ही अवस्था होती. पण लॉकडाऊन निघाला आणि काही गोष्टी पुन्हा एकदा रुळावर येतायत की काय, असं वाटू लागलं. याची सुरूवात केली ‘झिम्मा’ या चित्रपटाने.
लॉकडाऊन निघाला आणि झिम्मा प्रदर्शित झाला. त्यालाही आता १०० दिवस उलटून गेले आहेत. म्हणजे, या चित्रपटाने नुकताच १०० दिवसांचा आकडा पार केला. हेमंत ढोमे दिग्दर्शित या सिनेमाचं मराठी रसिकांनी उत्स्फूर्त स्वागत केलं. तो सिनेमा येऊन जातो न जातो तोच पुढे त्याचा कित्ता पांडूने गिरवला. विजू माने दिग्दर्शित हा सिनेमा पूर्णत: सामान्य लोकांसाठी होता. सामान्य म्हणजे, अगदी पिटातला प्रेक्षक म्हटला तरी वावगा ठरू नये.
आता इथे पिटातला प्रेक्षक म्हणजे कमी प्रतीचा आणि बाल्कनीतला म्हणजे भारी असं अजिबात म्हणायचं नाहीये. प्रेक्षक हा प्रेक्षक असतो. जे त्याला आवडतं त्याचं तो कौतुक करत असतो. सांगायचा मुद्दा असा की, झिम्मा आणि पांडू या दोन्ही सिनेमांनी आपला असा क्राऊड ठरवला होता. झिम्माने क्लास आणला आणि पांडूने मास आणला. पण दोन्ही सिनेमे चालले. त्यांनी नेमका किती गल्ला जमवला हे सांगणं कठीण आहे.
खरंतर हा आकडा खरा असतोच असं नाही. म्हणजे, सिनेमेकर्स तो आकडा सांगतात म्हणून आपण त्यावर विश्वास ठेवतो. पण उद्या त्या आकड्याला कोणी अव्हान दिलं, तर परिस्थिती कठीण होऊन बसेल. त्यामुळे त्या आकड्यावर आपण आत्ता नको जाऊया.
मुद्दा असा की, झिम्मा आणि पांडू हे चालले. आता त्यानंतर काय असा प्रश्न पडला असतानाच आदित्य सरपोतदार या दिग्दर्शकाने झोंबिवलीसारखा वेगळा प्रयोग केला. मुळात आपल्याकडे हॉरर-कॉमेडी बनत नाही. पण त्यातही आदित्यने झोंबीसारखा विषय घेऊन नवा विषय मराठीत आणला.
अमेय वाघ, ललित प्रभाकर, वैदेही परशुरामी आदींच्या अभिनयाने नटलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांना वेगळा विषय दिला. खरंतर लॉकडाऊननंतर मराठी सिनेरसिकांच्या वाट्याला प्लॅटर आला. क्लासि-मासी आणि शिवाय हॉररपट आल्याने प्रेक्षकांसाठी ती पर्वणी होती. अशी स्थिती खरंतर लॉकडाऊन पूर्वी फार कमी वेळा यायची.
आता त्याहीपलिकडची स्थिती मराठीत आली आहे. खरंतर ही मराठी माणसांसाठी पर्वणी ठरायला हवी. याचं कारण लोकाश्रयाची ही झालेली सुरूवात आता दिग्पाल लांजेकरच्या पावनखिंडने आणखी अधोरेखित केली आहे. या चित्रपटाला खूपच चांगले शोज मिळाले आहेत. या शोजची संख्याही चांगली आहे. चित्रपटाबद्दल सुरू असलेल्या चर्चेनुसार या चित्रपटाने सध्या पाच कोटीवर गल्ला जमवलेला आहे.
पावनखिंड अजूनही थिएटरवर आपली कामगिरी बजावत असताना, आता दुसरीकडे नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा हिंदी चित्रपट थिएटरवर येतो आहे. खरंतर ‘झुंड’ हा हिंदी चित्रपट असला तरी त्यातले बहुतांश कलाकार हे मराठी आहेत हे आपण सगळेच जाणतो. त्यात छोट्यामोठ्या भूमिका साकारणारी मुलं तर महाराष्ट्रातली आहेतच. शिवाय या सिनेमात आकाश ठोसर, रिंकू राजगुरू, किशोर कदम, छाया कदम आदी अनेक मराठी कलाकार झळकताना दिसतायत. त्यामुळे आता ४ मार्चनंतर थिएटरवर गेलात तर सगळीकडे मराठी कलाकाारांचेच चेहरे दिसतील, अमिताभ बच्चन यांचा अपवाद वगळला तर.
म्हणजे, एकिकडे, अजय पूरकर, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, आस्ताद काळे आदी सगळी त्वेषाने तयार असलेली मंडळी आणि दुसरीकडे नागराज आणि त्याची ‘झुंड’ अशी टीम असेल. एक सिनेमा हिंदी आणि एक सिनेमा मराठी असा हा सामना असला तरी यातल्या दोन्ही संघातले खेळाडू हे आपलेच असणार आहेत, ही त्यातली जमेची बाजू.
====
हे ही वाचा: ‘द कश्मीर फाइल्स’चे निर्माते काश्मीर नरसंहाराच्या कहाणीला मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी सज्ज!
====
यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की, यापैकी पावनखिंड या सिनेमाने आपली कामगिरी यापूर्वीच फत्ते केलेली आहे. त्यामुळे यानंतर केवळ मिळालेलं यश त्यांना साजरं करायचं आहे, तर दुसरीकडे ‘झुंड’ चित्रपटाला लोकाश्रयाच्या कसोटीला उतरायचं आहे. पण त्याचंही निम्मं काम झालं आहे. कारण या सिनेमाचं कौतुक खुद्द आमीर खानने केल्याचा व्हिडिओ जबर व्हायरल झाला आहे.
प्रिव्ह्यूनंतर उभं राहून मानवंदना मिळालेला हा सिनेमा पाहिल्यानंतर सद्गदित झालेला आमीरही सगळ्यांनी पाहिला. त्यामुळे तारे जमीन पर, दंगल, सरफरोश असे एकापेक्षा एक चित्रपट दिलेला कलाकार जेव्हा नागराजची मुक्तकंठाने प्रशंसा करतो; त्याच्यासोबत सिनेमा बनवण्याची मनीषा असल्याचं सांगतो तेव्हा परिस्थिती वेगळी ठरते.
नागराजने यापूर्वी मराठी चित्रपट रसिकांना आपली ओळख वारंवार करून दिली आहेच. अगदी फॅंड्री, सैराटपासून अगदी अलिकडच्या वैकुंठपर्यंत नागराज सातत्याने काम करत येतो आहे. त्यामुळे त्याचं काम मराठी रसिकांना नवं नाही.
झुंडची गाणीही आता वाजू लागली आहेत. त्यामुळे अजय अतुल यांच्या संगीताची जादू पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना अनुभवता येणार आहे. तात्पर्य, सध्या माहौल मराठीचा आहे. खरंतर, नागराज, अजय-अतुल ही सगळी मंडळी हिंदीत गेली आहेत. त्यामुळे आता प्रत्येकवेळी त्यांना मराठमोळा म्हटलं जाऊ नये. कारण, एका अर्थाने ते सीमोल्लंघन आहे. हिंदीत चारही दिशांना ही मंडळी आपलं आणि महाराष्ट्राचं नाव गाजवताना दिसत आहेत. ही फार महत्वाची गोष्ट आहे.
====
हे ही वाचा: 2022 मध्ये देशभक्तीचा महापूर- भारतीय सैनिकांच्या आयुष्यावर आधारित तब्बल 7 चित्रपट
====
आता खरंतर हे यापूर्वी कधी घडलं नव्हतं का असा प्रश्न विचारला जाऊच शकतो. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की, लॉकडाऊनमुळे सगळ्याच इंडस्ट्रीज आता शून्यावर आल्या आहेत. कोट्यवधी कमावणारा उद्योगपती आणि दरदिवसाला ५०० रुपये कमावणारा पानाच्या ठेल्यावर बसणारा व्यापारी, हे दोघेही पुन्हा एकदा शून्यापासून सुरूवात करत आहेत. सिनेसृष्टीचंही तसंच आहे.
हिंदी, तामीळ, मराठी, तेलुगु, भोजपुरी, बंगाली, गुजराथी आदी सगळ्या प्रादेशिक भाषांमधले सिनेमेकर्स आता पुन्हा एकदा नव्याने शर्यतीसाठी तयार झाले आहेत. अशावेळी ही शर्यत जिंकण्याची संधी प्रत्येकाला असणार आहे.
अशावेळी हिंदी-मराठी चित्रपट एकमेकांसमोर उभे ठाकले तरी तिथे मराठीची भगवी पताका फडकती पाहाणे हे भाग्याचं असणार आहे. असं भाग्य यापुढे कदाचित वारंवार येईलही पण लॉकडाऊनंतरचा हा पहिला सुवर्ण योग अनुभवणारे भाग्यवान आपणच असणार आहोत, हे आपण यापुढे विसरु नये. जय हो!