Sahir Ludhianvi – चलो इकबार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो, या गाण्यासाठी साहिर का आग्रही होता?
८ मार्च १९२१ रोजी जन्मलेल्या साहिरच्या रचनांची हिंदी सिनेमाला घातलेली भुरळ आजही कायम आहे. तो हाडाचा कवी होता. रूपेरी पडद्यावर आल्यावर त्याच्यातील कवीचा गीतकार कधी झाला नाही. स्वत:च्या शब्दावर त्याचे नितांत प्रेम असायचे.
गाण्याच्या निर्मितीत गीतकाराचा मोठा वाटा असतो ते साहिर (Sahir Ludhianvi) आग्रहाने मांडायचा. त्यामुळेच संगीतकारापेक्षा किमान एक रुपया तरी जास्त मानधन तो कायम घ्यायचा. याच कारणाने त्याचे प्रतिथयश संगीताकारांसोबत मतभेद देखील झाले. पण साहीर आपल्या भूमिकेवर ठाम राहिला. त्याची सिनेमातील गाणी म्हणजे त्याच्या कविताच असायच्या.
साहीर (Sahir Ludhianvi) हा डाव्या विचारांचा होता. आपले साम्यवादी विचार त्याने चित्रपट गीतातून ज्या ज्या वेळी संधी मिळाली त्या त्या वेळी आवर्जून मांडले. रमेश सैगल यांच्या ‘फिर सुबह होगी’ (१९५८) हा सिनेमा रशियन लेखक Fyodor Dostoevsky‘s यांच्या गाजलेल्या Crime and Punishment वर आधारीत होता. यातील ‘वो सुबह कभीतो आयेगी’ मधील साहीरने व्यक्त केलेला आशावाद काय जबरदस्त होता. यातील अंतऱ्यातील साहीरचे शब्द पहा.
इन काली सदियों के सर से,
जब रात का आँचल ढलकेगा
जब दुःख के बादल पिघलेंगे,
जब सुख का सागर छलकेगा
जब अंबर झूम के नाचेगा,
जब धरती नग्में गायेगी
वो सुबह कभी तो आयेगी…
जिस सुबह की खातिर जुग
जुग से, हम सब मर मर कर जीते हैं
जिस सुबह के अमृत की धून में,
हम जहर के प्याले पीते हैं
इन भूखी प्यासी रूहों पर,
एक दिन तो करम फर्मायेगी
वो सुबह कभी तो आयेगी…
याच प्रमाणे गुरुदत्तच्या ‘प्यासा’ मधील ‘जिन्हें नाज़ है हिन्द पर वो कहाँ हैं…’ मधील साहीरने व्यवस्थेला विचारलेले ‘सवाल’ आजही आपल्याला अनुत्तरीत करतात. तुम्हाला ज्या गोष्टींचा मोठा गर्व वाटतो, अभिमान वाटतो ती प्रतीकं कुठे आहेत ? असा जळजळीत सवाल साहीरने या गीतात विचारला आहे.
कवी आणि प्रेमभंग याचा जवळचा संबध असतो. साहिरचं नाव देखील अमृता प्रीतम, सुधा मल्होत्रा सोबत जोडलं गेलं होतं. त्यापूर्वी लाहोरमध्ये कॉलेजला असताना त्याची एक पंजाबी मुलगी त्याची प्रेयसी होती. पण ती धनवान होती. साहिर कवी होता. तो कफल्लक होता. त्यामुळे ते नातं पुढं जावू शकलं नाही. ही ठसठसती जखम घेवून तो आयुष्यभर वावरला.
====
हे देखील वाचा: चित्रपटसृष्टीला व्यापून राहिलेला कवी…साहिर लुधियानवी!
====
‘एक शहेन शहाने दौलत का सहारा लेकर हम गरिबोंके मुहोब्बत का उडाया है मजाक’ ही त्याची ’ताजमहल’ वरची कविता त्याचंच द्योतक होतं. साहिर आयुष्यभर अविवाहितच राहिला. १९६३ साली बी आर चोपडा गुमराह चित्रपट निर्माण करीत होते.
आपली भूतपूर्व प्रेयसी आता जी आता दुसर्या कुणाची झालीय या सिच्युएशन वर चोप्रांना गाणं हवं होतं. साहिरने त्याच्या ’तल्खियां’ या काव्य संग्रहातील एक कविता इथे वापरली. ‘चलो इकबार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो’ उर्दू शब्दांची रेलचेल असलेलं गाणं चोप्रांना आवडल होतं, पण आपल्या हिंदी रसिकांना कसं आवडणार? पेच निर्माण झाला.
साहिर हट्टाला पेटला. शेवटी फार मोठी ‘माथापच्ची’ केल्यावर यात फक्त एक छोटासा बदल त्याने केला. शेवटच्या अंतर्यात ‘वो अफ़साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन उसे इक खूबसूरत मोड़ दे कर छोड़ना अच्छा’ यात ‘अंजाम’ शब्दाच्या जागी ‘तकमिल’ हा शब्द होता. तेवढा त्याने बदलला! गाणं आजही लोकप्रिय आहे.
=====
हे देखील वाचा: मार्चमध्ये प्रदर्शित होणार ‘हे’ 4 बहुचर्चित चित्रपट!
=====
साहिर (Sahir Ludhianvi) सच्चा कवी होता.चोप्रांनी संगीतकार बदलले, पण गीतकार साहिर मात्र कधीच बदलला नाही. आज ८ मार्च साहीर यांचा जन्म दिवस आहे त्या निमिताने त्याचे स्मरण !